Friday 26 August 2022

सार्वजनिक गणेश मंडळांना अन्न औषध प्रशासनातर्फे आवाहन

 


 

   जालना दि. 26 (जिमाका) :-   दि. 31 ऑगस्ट 2022 पासुन गणेश उत्सव साजरा करण्यात येणार आहे. गणेश उत्सवानिमित्त विविध मंडळातर्फे भंडारा प्रसाद, अन्नदान इत्यादी कार्यक्रम ठेवण्यात येतात, त्याअनुषंगाने सर्व सार्वजनिक धार्मिक उत्सव मंडळे, त्यांचे पदाधिकारी आणि प्रसाद उत्पादन व  वितरण करणारे अन्न व्यावसायिक यांनी अन्न सुरक्षा व मानके अधिनियमानुसार तरतुदींचे पालन करणे बंधनकारक राहील, असे आवाहन अन्न व औषध प्रशासन विभागाने केले आहे.

            प्रसाद वितरण करणाऱ्या मंडळांनी अन्न सुरक्षा  कायद्यानुसार www.foscos.gov.in  या वेबसाईटवर नोंदणी प्रमाणपत्रासाठी ऑनलाईन अर्ज करुन प्रति वर्ष रुपये 100 /- शुल्क भरावे व नोंदणी प्रमाणपत्र घेण्यात यावे, प्रसाद करताना उत्पादनाची जागा स्वच्छ व आरोग्यदायी असावी, प्रसादासाठी लागणारा कच्चा माल अन्नपदार्थ परवाना धारक अथवा नोंदणीकृत अन्न व्यावसायिकांकडून खरेदी करावा, तसेच प्रसाद बनविणाऱ्या केटरर्सची माहिती अद्यावत करुन ठेवावी, प्रसादासाठी लागणारी भांडी स्वच्छ, आरोग्यदायी व झाकण असलेली असावी, आवश्यक तेवढ्याच प्रसादाचे उत्पादन करावे, उरलेल्या शिळे अन्नपदार्थांची योग्य रीतीने विल्हेवाट लावावी, प्रसाद उत्पादन व वितरण करणारा स्वयंसेवक हा कुठल्याही संसर्गजन्य रोगापासुन मुक्त असावा, लोकांच्या आरोग्याच्या दृष्टीने वरील मार्गदर्शक सुचनांचे पालन करावे. जालना जिल्ह्यातील सर्व सार्वजनिक गणेश उत्सव मंडळांनी वरील सर्व बाबींचे काटेकोरपणे पालन करण्याचे  आवाहन सहायक आयुक्त (अन्न) अन्न व औषध प्रशासन, कार्यालयाने यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे केले आहे.

-*-*-*-*-*- 

ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी ई-पीक पहाणी ॲपमध्ये ऊस पिकाची नोंद करावी --- जिल्हाधिकारी डॉ. विजय राठोड

 


 

            जालना, दि. 26 (जिमाका):- राज्यामध्ये ई-पीक पहाणी प्रकल्प दि. 15 ऑगस्ट, 2021 पासुन सुरु झाला आहे.  ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी ऊस पिकाची नोंद ई-पीक पहाणी ॲपमध्ये करण्याच्या सूचना साखर आयुक्तांमार्फत देण्यात आल्या आहेत.  त्यानुसार जिल्हाधिकारी डॉ. विजय राठोड यांनी जिल्ह्यातील सर्व साखर कारखान्यांनी ऊस उत्पादक शेतकऱ्यांकडून ऊस पिकाची नोंद ई-पीक पहाणी ॲपमध्ये करण्याच्या सूचना दिल्या असुन सर्व शेतकऱ्यांनी आपल्या ऊस पिकाची नोंद ई-पीक पहाणी ॲपमध्ये करण्याचे आवाहनही एका पत्रकाद्वारे केले आहे.

            शेतकऱ्यांनी https://play.google.com/store/apps/details?id=io.sc.eppCordova या लिंकद्वारे गुगल प्ले स्टोअरवर जाऊन ई पीक पहाणी मोबाईल ॲप व्हर्जन-2 हे नवीन ॲप आपल्या मोबाईलमध्ये डाऊनलोड करावे. या ॲपवर जिल्हा, तालुका, गाव व गटनंबर, नाव निवडून स्वत:च्या शेतामध्ये घेत असलेल्या पिकांची नोंद करावी.  एका मोबाईलवर 50  शेतकरी ई-पीक पहाणी ॲपद्वारे पिकाची नोंद करु शकतात.  साखर कारखान्यांकडे ऊस नोंदणी केलेल्या सर्व शेतकऱ्यांनी ई-पीक पहाणी ॲपमध्ये ऊस पिकाच्या नोंदी कराव्यात. साखर कारखान्यांनी आपल्या शेती विभागाच्या मदतीने ई-पीक पहाणी ॲपमध्ये ऊस पिकाच्या नोंदीसाठी शेतकऱ्यांना प्रशिक्षित करण्यासाठी मोहिमेचे  आयोजन करत शेतकऱ्यांना माहिती देऊन कारखान्याकडे नोंद झालेल्या ऊस उत्पादक शेतकऱ्यांकडून ॲपद्वारे गाव नमुना नंबर 12 (सातबारा) मध्ये ऊस पिकांच्या नोंदी करुन घ्याव्यात.  जेणेकरुन अचूक ऊस पीक क्षेत्राचा अदांज करता येईल व कारखान्यांनाही नक्की किती ऊस गाळपासाठी उपलब्ध होईल, याचीही माहिती मिळेल.

            साखर कारखान्यांच्या शेती विभागामार्फत ऊसाच्या नोंदी करण्यासाठी ई-पीक पहाणी ॲपद्वारे करण्यासाठी कारखाना व गट ऑफीसस्तरावर मोबाईल ॲप सुविधा उपलब्ध करुन देण्याबरोबरच तलाठी व कृषि सहाय्यकांची यासाठी मदत घ्यावी.  गाळप हंगाम 2021-22 सुरु होण्यापूर्वी सर्व शेतकऱ्यांच्या ऊस पिकांच्या नोंदी गाव नमुना नंबर 12 (सातबारा) मध्ये होतील, यादृष्टीने कार्यवाही करण्याच्या सुचनाही पत्रकाद्वारे देण्यात आल्या आहेत.

*******

Thursday 25 August 2022

जादुटोणाचे प्रकार आढळल्यास पोलीसांशी तात्काळ संपर्क साधावा --- जिल्हाधिकारी डॉ. विजय राठोड जादुटोणा विरोधी कायदा जनजागृती प्रचार-प्रसार समितीची बैठक संपन्न

 



            जालना, दि. 25 (जिमाका):- जादुटोणा विरोधी कायदा जनजागृती प्रचार  आणि प्रसार कार्यक्रमाच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी जिल्हास्तरीय समितीची स्थापना करण्यात आली असून या समितीची बैठक जिल्हाधिकारी    डॉ. विजय राठोड यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली. जादुटोणाचे प्रकार आढळल्यास जनतेने तात्काळ जवळच्या पोलीस स्थानकात याबाबतची माहिती  देण्याचे आवाहन यावेळी त्यांनी केले.

            बैठकीस जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. अक्षय शिंदे, सहाय्यक आयुक्त समाजकल्याण अमित घवले,  जिल्हा महिला व बालकल्याण अधिकारी आर.एन चिमिंद्रे, एस.जे. चौधरी यांच्यासह संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांची उपस्थिती होती.

            जिल्हाधिकारी डॉ. राठोड म्हणाले की, महाराष्ट्र नरबळी आणि इतर अमानुष, अनिष्ट व अघोरी प्रथा व जादुटोणा यांना प्रतिबंध घालण्यासाठी व त्याचे समूळ उच्चाटन होण्यासाठी अधिनियम 2013 जारी करण्यात आलेला आहे.  या कायद्याची  परिणामकारक व योग्य अंमलबजावणीसाठी जादुटोणा विरोधी कायदा जनजागृती प्रचार आणि प्रसार समितीची स्थापना करण्यात आली आहे.  समितीच्या माध्यमातून जालना जिल्ह्यात सर्वदूर या कायद्याची जनजागृती करण्यात यावी.  शाळा, महाविद्यालयांमधून जादुटोणा विरोधी कायद्याची माहिती देणाऱ्या व्याख्यानांचे, कार्यक्रमांचे आयोजन करण्यात यावे.  तसेच ग्रामीण भागामध्येही याची प्रभावीपणे जागृती करण्याच्या सुचनाही जिल्हाधिकारी डॉ. राठोड यांनी यावेळी दिल्या. 

-*-*-*-*-*-*-

जालना जिल्ह्यात गणेशोत्सव शांततेत व शिस्तबद्धरीतीने साजरा करावा जिल्ह्यात प्लॅस्टीकमुक्त गणेशोत्सव साजरा करावा - जिल्हाधिकारी डॉ. विजय राठोड

 



            जालना, दि. 25 (जिमाका):- सण, उत्सव शांततेत व शिस्तबद्धरितीने साजरे करण्याची जालना जिल्हयाची परंपरा आहे. यंदाच्या गणेशोत्सवामध्येही परंपरा कायम राखत हा उत्सव अत्यंत शांततेत तसेच दिलेल्या मार्गदर्शक सुचनांचे पालन करत साजरा करावा.  तसेच पर्यावरणाच्या रक्षणासाठी जालना जिल्ह्यात प्लॅस्टीकमुक्त गणेशोत्सव साजरा करण्याचे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. विजय राठोड यांनी केले.

      जिल्हा नियोजन समितीच्या सभागृहात सार्वजनिक श्री गणेशोत्सव 2022 ची पूर्वतयारीच्या दृष्टीने समन्वय व शांतता समितीच्या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते.  त्याप्रंसगी मार्गदर्शन करताना जिल्हाधिकारी डॉ. राठोड बोलत होते.

            बैठकीस जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. अक्षय शिंदे, अपर पोलीस अधीक्षक विक्रांत देशमुख, निवासी उपजिल्हाधिकारी केशव नेटके, उप विभागीय अधिकारी संदीपान सानप, स्वप्नील कापडणीस, भाऊसाहेब जाधव, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. अर्चना भोसले आदींची प्रमुख उपस्थिती होती.

         जिल्हाधिकारी डॉ. राठोड म्हणाले की , गणेशोत्सवादरम्यान गणेश मंडळाच्या ठिकाणी आणि ज्या मार्गाने गणरायाची मिरवणूक निघणार आहे, अशा रस्त्यांवर असलेले खड्डे बुजविण्यात यावे व परिसर स्वच्छ करण्यात यावा. मिरवणुकीच्या मार्गाची संबंधित विभागांच्या अधिकाऱ्यांनी एकत्रितरित्या पहाणी करुन या ठिकाणी आढळणाऱ्या त्रुटींची तातडीने पूर्तता करण्यात यावी. रस्त्यांवर उभे राहणाऱ्या मोकाट जनावरांमुळे वाहने तसेच पादचाऱ्यांना त्रास होत असुन वाहतुकीचाही खोळंबा होतो.  त्यामुळे अशा मोकाट जनावरांचा तातडीने बंदोबस्त करण्यात यावा. गणेश मंडळाच्या ठिकाणी तसेच मिरवणुकीच्या मार्गावर सीसीटीव्ही यंत्रणा कार्यरत राहील, याची दक्षता घेण्याचे निर्देशही जिल्हाधिकाऱ्यांनी यावेळी दिले.  

            गणेशोत्सवाच्या काळामध्ये गणेश मंडळाकडून मोठ्या प्रमाणात विद्युत रोषणाई करण्यात येते.  अशावेळी कुठलीही दुर्घटना घडू नये यासाठी मार्गावरील लोंबकळणाऱ्या विद्युत तारा, नादुरुस्त असलेल्या डीपी आदींची तातडीने दुरुस्ती करुन घेण्यात यावी.  गणेशोत्सवाच्या काळात वीज पुरवठा खंडीत होणार नाही, याबाबतची महावितरणने दक्षता घ्यावी.  महामंडळांनीही विद्युत विभागाकडून अधिकृतिरित्या तात्पुरत्या स्वरुपात वीजजोडणी घेण्याचे आवाहनही जिल्हाधिकारी डॉ. राठोड यांनी यावेळी केले.

            जिल्ह्यातील गणेश मंडळांना आवश्यक असणाऱ्या सर्व परवानग्या एकाच छताखाली मिळाव्यात यादृष्टीकोनातून सर्व परवानग्यांसाठी एक खिडकी योजना अंमलात आणण्यात यावी.  सर्व संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांनी आवश्यक असणाऱ्या परवाग्यांसाठी त्यांच्या अधिकाऱ्यांची या ठिकाणी नेमणूक करावी.  गणेशमूर्तींच्या विसर्जनासाठी तीन ते चार प्रभाग मिळून एक अशा कृत्रिम तलावाची उभारणी करण्यात यावी. गणेशोत्सवादरम्यान महाप्रसादाचे आयोजन करण्यात येते.  या ठिकाणी देण्यात येणाऱ्या प्रसादाच्या नमुन्यांची अन्न व औषध विभागाने तपासणी करावी.  गणेशोत्सवाच्या काळात अग्निशमन यंत्रणा तसेच वैद्यकीय पथके आवश्यक त्या सुविधेसह तैनात ठेवण्याच्या सुचनाही जिल्हाधिकारी डॉ. विजय राठोड यांनी यावेळी दिल्या.  जालना जिल्ह्यात गणेशोत्सव हा आनंदात व शांततेत साजरा करण्यासाठी सर्वांनी सहकार्य करण्याचे आवाहनही जिल्हाधिकारी डॉ. विजय राठोड यांनी यावेळी केले.


         जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. अक्षय शिंदे म्हणाले, शांतता समितीच्या सदस्यांनी मांडलेल्या मुद्दयांची निश्चितपणे दखल घेण्यात येईल. सर्वोच्च न्यायालयाच्या मार्गदर्शक तत्वानुसारच वाद्यांचा आवाज असला पाहिजे. गणेशोत्सव साजरा करत असताना कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी सर्वांनी नियमांचे पालन करुन पोलीस प्रशासनाला सहकार्य करावे. महामंडळांनी मंडपांची उभारणी करताना वाहतुकीला कुठल्याही प्रकारचा अडथळा निर्माण होणार नाही यादृष्टीने काळजी घ्यावी.  प्रत्येक गणेश मंडळांनी त्यांच्या स्वयंसेवकांची यादी संबंधित पोलीस स्टेशनला उपलब्ध करुन द्यावी. गणेशोत्सवाच्या निमित्ताने देखावे, बॅनर्स, पोस्टर्स  लावताना ते समाजप्रबोधनात्मक असावेत.  या माध्यमातून कोणाच्याही भावना दुखवणार नाहीत, याची काळजी घ्यावी. गणेशोत्सव काळात समाज विघातक कृत्य करणाऱ्या व्यक्तींवर प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात येईल. गणेशोत्सवाच्या मिरवणुकीमध्ये मोठ्या प्रमाणात गुलालाचा वापर करण्यात येतो.  पर्यावरणाच्या व आरोग्याच्यादृष्टीने गुलाल हानीकारक असुन गुलालाऐवजी मंडळांनी फुलांचा वापर करण्याचे आवाहनही डॉ. शिंदे यांनी यावेळी केले.

            यावेळी उपस्थित शांतता समितीचे सदस्य तसेच विविध गणेश मंडळांच्या पदाधिकाऱ्यांनी मौलिक अशा सुचना केल्या.

            बैठकीस शांतता समितीचे सदस्य, विविध गणेश मंडळांचे पदाधिकाऱ्यांसह संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांची उपस्थिती होती.

-*-*-*-*-*-

जालना जिल्हयात महाराष्ट्र स्टार्टअप व नाविन्यता यात्रेस प्रारंभ विदयार्थी व नवउदयोजकांनी जास्तीतजास्त संख्येने सहभागी व्हावे -- जिल्हाधिकारी डॉ. विजय राठोड

 





जालना, दि. 25 (जिमाका) – नाविन्यता संकल्पना आणि नवउद्योगांना प्रोत्साहन देण्यासाठी महाराष्ट्र स्टार्टअप व नाविन्यता यात्रेचा जालना जिल्हयात दि. 23 ऑगस्टपासून प्रारंभ झाला आहे.  आज जालना शहरात  ही यात्रा दाखल झाली.  जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रांगणात दाखल झालेल्या या यात्रेतील मोबाईल वाहनाची जिल्हाधिकारी डॉ. विजय राठोड यांनी पाहणी केली. 29 ऑगस्टपर्यंत जिल्हयात भ्रमण करणाऱ्या या यात्रेत जिल्हयातील जास्तीतजास्त विदयार्थी व नवउदयोजकांनी सहभागी व्हावे. तसेच तालुकास्तरीय प्रचार-प्रसिध्दी अभियान किंवा जिल्हास्तरीय सादरीकरण सत्राच्या ठिकाणी उपस्थित राहून आपला सहभाग नोंदवावा, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. विजय राठोड, तथा अध्यक्ष, कौशल्य, रोजगार, उदयोजकता व नाविन्यता जिल्हा कार्यकारी समिती, जालना यांनी यावेळी  केले.

याप्रसंगी  जिल्हयाचे स्टार्टअप यात्रेचे नोडल अधिकारी कैलास काळे, रोजगार व उदयोजकता मार्गदर्शन अधिकारी सुरेश बहरे, आत्माराम दळवी, प्रदिप डोले, उमेश कोल्हे, दिनेश उढान उपस्थित होते.

राज्यातील नाविन्यपूर्ण संकल्पना आणि नवउद्योजकांना प्रोत्साहन देण्यासाठी कौशल्य रोजगार, उदयोजकता व नाविन्यता विभागातंर्गत महाराष्ट्र राज्य नाविन्यतापूर्ण स्टार्टअप धोरण 2018" जाहीर करण्यात आले आहे. सदर धोरणाच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी महाराष्ट्र राज्य नाविन्यता सोसायटी ही नोडल एजन्सी म्हणून कार्यरत आहे. या धोरणाच्या माध्यमातून राज्यामध्ये स्टार्टअपच्या विकासाकरीता पोषक वातावरणनिर्मिती करून त्यातून यशस्वी उदयोजक घडविण्याकरीता इन्क्युबेटर्सची स्थापना व विस्तार, गुणवत्ता परीक्षण व स्टार्टअप्सना बौध्दिक मालमत्ता हक्कासाठी अर्थसहाय्य, अँड चॅलेंज, स्टार्टअप वीक यासारख्या अनेक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येते.

नाविन्यता, कल्पकता यांना भौगोलिकतेच्या मर्यादा नसतात, त्या कुठेही यशस्वी होऊ शकतात. नवकल्पनांना योग्य पाठबळ मिळण्याची आवश्यकत असते परंतु काही वेळा योग्य मार्गदर्शनाअभावी चांगल्या कल्पना प्रत्यक्षात उतरू शकत नाहीत. याकरीता, कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभागामार्फत, जिल्हयातील नागरीकांच्या नाविन्यपूर्ण नवसंकल्पनांना मूर्त स्वरूप देण्यासाठी महाराष्ट्र स्टार्टअप व नाविन्यता यात्रेचे आयोजन करण्यात आले.

स्टार्टअप यात्रेच्या प्रथम टप्यात प्रत्येक तालुक्यातील शाळा/महाविदयालये/आयटीआय/लोकसमुह एकत्रित होण्याच्या जागेवर स्टार्टअप यात्रेचा प्रचार व प्रसार करण्यासाठी एक वाहन (मोबाईल व्हॅन) पाठविण्यात आले आहे. सदर वाहनासोबत असलेल्या प्रतिनिधींव्दारे नागरिकांना या यात्रेबाबतची संपूर्ण माहिती, नाविन्यपूर्ण संकल्पना व त्यांचे इतर पैलू तसेच विभागामार्फत राबविल्या जाणा-या विविध उपक्रमांबददल माहिती देण्यात येत आहे. याचबरोबर नाविन्यपूर्ण कल्पना असलेल्या नागरीकांची नोंदणी करून यात्रेच्या पुढील टप्याबाबत माहिती पुरविण्यात येते.

जालना जिल्हयात दि. 23 ऑगस्टपासून सुरु झालेली ही यात्रा मंठा तालुक्यात दि. 23 ऑगस्ट 2022 रोजी,  परतुर व घनसावंगी तालुक्यात दि. 24 ऑगस्ट रोजी तर अंबड व जालना तालुक्यांत दि. 25 ऑगस्ट रोजी दाखल झाली.  बदनापूर तालुक्यात 26 ऑगस्ट, भोकरदन तालुक्यात  27 ऑगस्ट आणि  जाफ्राबाद तालुक्यात 29 ऑगस्ट रोजी स्टार्टअप यात्रा येणार आहे.

जिल्हास्तरीय प्रशिक्षण शिबिर व सादरीकरण सत्र -- सर्व तालुक्यांत दि. 23 ते 29 ऑगस्ट 2022 या कालावधीमध्ये प्रचार व प्रसिध्दी झाल्यानंतर, जिल्हास्तरीय एकदिवसीय प्रशिक्षण शिबिर व सादरीकरण सत्रांचे दि. 17 सप्टेंबर 2022 रोजी आयोजन करण्यात आले आहे. प्रशिक्षण शिबिरात नाविन्यता तथा उदयोजकतेबाबतचे माहिती सत्र, स्थानिक उदयोजकांची व्याख्याने, तज्ञ मार्गदर्शक व सल्लागारांची सत्रे, तसेच नोंदणी केलेल्या नवउदयोजकांचे संकल्पना सादरीकरण सत्र आयोजित करण्यात येणार आहे. सादरीकरण सत्रात नोंदणी केलेल्या नागरिकांना स्थानिक समस्येसाठी उत्तम उपाय व विविध क्षेत्रातील आपल्या नाविन्यपूर्ण कल्पना व उदयोगांचे सादरीकरण जिल्हास्तरीय तज्ञ समितीसमोर करण्याची संधी देण्यात येईल. जिल्हास्तरावर अव्वल 3 विजेते घोषित केले जातील, तसेच सर्वोत्तम 10 (अव्वल 3 सह) सहभागींना राज्यस्तरावर सादरीकरणाची संधी मिळेल.

जिल्हा स्तरावर प्रथक पारितोषिक- रु. 25 हजार, व्दितीय पारितोषिक : रु. 15 हजार,  तृतीय पारितोषिक : रु. 10 हजार असे स्वरुप राहणार आहे.

राज्यस्तरीय सादरीकरण सत्र व विजेत्यांची घोषणा समारोह -- प्रत्येक जिल्हयातील सादरीकरण सत्रातील उत्तम 10 कल्पनांचे अंतिम सादरीकरण राज्यस्तरीय तज्ञ समितीसमोर करण्यात येईल. अंतिम विजेत्यांची निवड राज्यस्तरीय निवड समितीव्दारे करण्यात येईल. राज्यस्तरीय विजेत्यांना प्रथम पारितोषिक रुपये 1 लाख व व्दितीय पारितोषिक रू. 75 हजार तसेच इन्क्युबेशन सहाय्य, बीज भांडवल/निधीसाठी सहाय्य, नाविन्यता परिसंस्थेतील महत्वाच्या संस्था व तज्ञ व्यक्तींचे मार्गदर्शन सत्रे तसेच सॉफटवेअर क्रेडीटस, क्लाऊड क्रेडीटस सारखे इतर लाभही पुरविण्यात येतील.

या यात्रे दरम्यान प्रचार व प्रबोधन करुन यात्रेबाबतची संपूर्ण माहिती, नावीन्यपूर्ण संकल्पना, त्याचे इतर पैलू याबाबतची माहिती देण्यात येत आहे. नावीन्यपूर्ण कल्पना असलेले युवक-युवती आपल्या कल्पना यावेळी www.msins.in किंवा www.mahastartupyatra.in या वेबसाईटवर नोंदवू शकतात.

-*-*-*-*-

अल्पसंख्याक शाळा, महाविद्यालय औद्योगिक प्रशिक्षण संस्थांच्या पायाभुत सुविधांसाठी अनुदान योजना 31 ऑगस्ट पर्यंत प्रस्ताव दाखल करण्याचे आवाहन

 


 

   जालना दि. 25 (जिमाका) :-  अल्पसंख्यांक विकास विभागाच्या शासन निर्णयानुसार राज्यातील धार्मीक अल्पसंख्याक विद्यार्थी बहुल शासनाच्या खाजगी शाळा, कनिष्ठ महाविद्यालय, औद्योगिक प्रशिक्षण संस्था व अपंग शाळांमध्ये पायभुत सुविधा पुरविण्यासाठी अनुदान  योजना राबविण्यास शासन मंजुरी देण्यात आलेली आहे.

            महाराष्ट्र शासन अल्पसंख्याक विकास विभाग यांच्या परिपत्रकान्वये सन 2022-23 या वर्षासाठी सदर योजना राबविण्यात येणार असल्याने अनुदान मिळवू इच्छिणाऱ्या अल्पसंख्यांक बहुल शासन मान्य खाजगी शाळा, कनिष्ठ महाविद्यालय, अपंग शाळा, नगरपालिका,नगरपरिषद शाळा, औद्योगिक प्रशिक्षण संस्था यांनी दि. 31 जुलै 2022 पर्यंत अर्ज करण्याची मुदत नमुद करुन पत्र संस्थांची शासनास शिफारस करण्याचे निर्देश दिले आहे. आता अल्पसंख्यांक विभागाने 5 जुलै 2022 च्‍या शासन परिपत्रकान्वये संस्थांनी अर्ज सादर करण्याची मुदत वाढवून दि. 31 ऑगस्ट 2022 अशी सुधारीत केली आहे. यास अनुसरुन सदर शासन निर्णयातील कार्यपध्दतीचा अवलंब करुन तसेच अटी व शर्ती पुर्ण करणाऱ्या शाळांना, संस्थांनी अर्जासोबत शासन निर्णयांमध्ये नमुद केल्याप्रमाणे कागदपत्रे जोडून सदर परिपूर्ण प्रस्ताव जिल्हा नियोजन समिती, जिल्हाधिकारी कार्यालय या कार्यालयात दाखल करण्याची अंतिम मुदत दि. 31 ऑगस्ट 2022 पर्यंत आहे याची नोंद घ्यावी. तसेच सदर योजनेच्या अर्जाचा नमुना महाराष्ट्र शासनाच्या संकेतस्थळावर शासन निर्णयअंतर्गत तसेच अल्पसंख्याक विकास विभागाच्या  https://mdd.maharashtra.gov.in संकेतस्थळावर योजना शैक्षणिक अंतर्गत शासन निर्णयासोबतचा अर्जाचा नमुना उपलब्ध आहे. तसेच  https://jalna.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे अशी माहिती जिल्हा प्रशासनाने  प्रसिध्दीपत्रकाद्वारे दिली आहे.

-*-*-*-*-

राष्ट्रीय सुरक्षा अभियान शेतकरी उत्पादक संघ/कंपनी यांना आवाहन

 


 

जालना दि. 25 (जिमाका) :-  केंद्र पुरस्कृत योजना राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियान कडधान्य सन 2022- 23 स्थानिक पुढाकार बाबी मध्ये जिल्हयास कमाल 250 मेट्रीक टन गोदाम बांधकामासाठी भौतिक 1 चा लक्षांक प्राप्त असून प्रत्यक्ष झालेल्या बांधकामाच्या 50 टक्के किंवा 12 लाख 50 हजार रुपये यापैकी जे कमी असेल ते अनुदान अनुज्ञेय राहील. सदर बाब बँक कर्जाशी निगडीत असून इच्छुक अर्जदाराने (शेतकरी उत्पादक संघ/कंपनी FPO/FPC) यांनी केंद्र शासनाच्या ग्रामीण भंडारण योजना,नाबार्डच्या मार्गदर्शक सूचनानुसार बँकेकडे प्रकल्प सादर करणे आवश्यक आहे. बँकेने कर्ज मंजूर केल्यानंतर संबंधित अर्जदारास अनुदान अनुज्ञेय आहे. सदर बाबीसाठी इच्छुक अर्जदाराने (शेतकरी उत्पादक संघ/कंपनी FPO/FPC) महाराष्ट्र राज्य वखार महामंडळाच्या प्राधिकृत अधिकारी अथवा सार्वजनिक बांधकाम विभागाच्या मान्यता प्राप्त डिसाइन, स्पेसिफिकेशन्स व खर्चाच्या अंदाजपत्रकासह गोदाम बांधकामाचा प्रस्ताव यासाठी आवश्यक राहील.

 

सदर बाबीचा अर्ज,प्रस्ताव दिनांक 25 सप्टेंबर 2022 तालुका कृषी अधिकारी कार्यालयाकडे सादर करावा. गोदामाचे बांधकाम 2022-23 या आर्थिक वर्षात पूर्ण करणे बंधनकारक आहे. तसेच गोदामाचा वापर शेतकऱ्यांनी उत्पादित केलेला कृषी माल साठवणूकिसाठी शेतकऱ्यांना योग्य व माफक दर आकारून करावा या बाबत 100 रुपयाच्या स्टम्प पेपरवर नोटराईज्ड हमी पत्र देणे बंधनकारक आहे. लक्षांकाच्या तुलनेत अर्ज जास्त आल्यास सोडत पद्धतीने निवड करण्यात येईल. या योजनेचा लाभ घेण्यासाठी जिल्ह्यातील शेतकरी उत्पादक संघ/कंपनी FPO/FPC यांनी अधिक माहितीसाठी कृषी विभागाच्या तालुका कृषी अधिकारी कार्यालयाशी संपर्क साधावा. असे आव्हान जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी, भिमराव रणदिवे, यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे केले आहे.

-*-*-*-*-*-*-

Wednesday 24 August 2022

विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या माजी सैनिक,पत्नी पाल्यांसाठी "विशेष गौरव पुरस्कार" 10 सप्टेंबरपर्यंत अर्ज करण्याचे आवाहन

 


 

जालना, दि. 24 (जिमाका) :- विविध क्षेत्रात अति उत्कृष्ट  कार्य करणाऱ्या माजी सैनिक, पत्नी, पाल्य यांना शैक्षणिक वर्ष 2021-22 या वर्षासाठी देश व राज्याची प्रतिष्ठा वाढवतील अशा स्वरुपाचे लक्षणीय काम केलेले असेल त्यांना एकरकमी रुपये  10 हजार व आंतरराष्ट्रीय स्तरासाठी रुपये 25 हजार चा "विशेष गौरव पुरस्कार" तसेच 10 वी व 12 वी बोर्डाच्या परीक्षेत 90 टक्केपेक्षा जास्त गुण मिळवून उत्तीर्ण झालेल्या पाल्यांना "एअर मार्शल व्ही.ए. पाटकर विशेष गौरव पुरस्कार" सैनिक कल्याण विभाग, पुणे यांचे मार्फत दिला असुन इयत्ता 10 वी 12 मध्ये 90 टक्के किंवा त्यापेक्षा अधिक गुण घेतलेल्या माजी सैनिक, विधवा पत्नीचे पाल्य, राष्ट्रीय, राज्य स्तरीय प्रतियोगितेत सुवर्ण, रौप्य, कास्य यापैकी पदक मिळालेले असावे, खेळामध्ये आंतरराष्ट्रीय स्पर्धेत भारताचे प्रतिनिधीत्व केलेले असावे, खेळामध्ये मिळविलेले प्रमाणपत्र इंडियन ऑलंपिक, असोसिएशन, स्पोर्टस् ऑथोरिटी ऑफ इंडिया, नॅशनल फेडरेशन यांनी प्रमाणित केलेले असावे, साहित्य, संगीत, गायन, वादन, नृत्य व इतर कला क्षेत्रात अतिउत्कृष्ट कामगीरी, पुरस्कार प्राप्त असला पाहिजे, नैसर्गिक आपत्तीमध्ये बहुमोल कामगिरी : पुर, जळीत दरोडा, अपघात (भुकंप, वादळ) यामध्ये बहुमोल कामगिरी केलेली असावी, यशस्वी उद्योजकांना पुरस्कार, सामाजिक कार्य आणि पर्यावरण विषयक पुरस्कार मिळविणारे पात्र माजी सैनिक, पत्नी, पाल्यांनी वरील अर्ज दाखल करतांना त्या संबंधी वर्तमान पत्रांची कात्रण, फोटो, प्रसिध्दी प्रकरणा सोबत जोडावे सदरचे अर्ज जिल्हा सैनिक कल्याण कार्यालय जालना येथे 10 सप्टेंबर 2022 किंवा तत्पूर्वी सादर करावे या संधीचा जास्तीत जास्त माजी सैनिक व त्यांचे पाल्य यांनी घेण्याचे आवाहन जिल्हा सैनिक कल्याण, अधिकारी यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे केले आहे.

-*-*-*-*-*-

 

पीकर्जाची नियमितपणे परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांसाठी कार्यशाळा संपन्न

 


जालना, दि. 24 (जिमाका) :-  सन 2017-18,2018-19,2019-20 या वर्षात पीक कर्ज घेऊन त्याची विहीत मुदतीत नियमित परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांसाठी महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना 2019 अंतर्गत पीक कर्जाच्या रकमेवर जास्तीत जास्त रुपये 50 हजार पर्यंत प्रोत्याहनपर लाभ देण्याची योजना सुरु करण्यात आलेली आहे.

या योजनेची अंमलबजावणी तातडीने व अचूक होण्यासाठी योजनेच्या कार्यपध्दतीबाबत जिल्ह्यातील सहाय्यक निबंधक, लेखापरीक्षक, जिल्हा मध्यवर्ती बँकेचे क्षेत्रीय स्तरावरील अधिकारी तसेच विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्थांचे शाखासचिव यांना माहिती होण्यासाठी जालना जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या सभागृहात कार्यशाळा दि. 23 ऑगस्ट रोजी आयोजित केली होती.

या कार्यशाळेत जिल्हा उपनिबंधक, सहकारी संस्था, नानासाहेब चव्हाण, तसेच जिल्हा विशेष लेखापरीक्षक, सहकारी संस्था, एस.पी. काकडे, यांनी योजनेच्या निकषांबाबत व अंमलबजावणीच्या कार्यपध्दीबाबत विस्तृत मार्गदर्शन केले. कार्यशाळेस कार्यकारी संचालक, जिल्हा सहकारी बँक आशुतोष देशमुख, जिल्हातील सहाय्यक निबंधक, लेखापरीक्षक, जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे तालुका स्तरावरील अधिकारी तसेच शाखा सचिव व गटसचिव संघटना अध्यक्ष उपस्थित होते.

कार्यशाळेस मार्गदर्शन करताना जिल्हा उपनिबंधक यांनी योजनेच्या निकषानुसार योजनेचा  लाभ मिळण्यासाठी पात्र असलेल्या शेतकऱ्यांचा आधार क्रमांक बँकेच्या खात्यास लिंक असणे आवश्यक असल्याने नियमित कर्ज परतफेड करणाऱ्या ज्या शेतकऱ्यांनी बँक खात्यांना आधार क्रमांक लिंक केलेला नाही अशा शेतकऱ्यांनी संबंधित बँकेकडे तसेच संबंधित विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्थांचे गटसचिव यांच्याकडे संपर्क साधुन आधार कार्डशी छायांकित प्रत तात्काळ उपलब्ध करुन देण्याबाबत  जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था यांनी आवाहन केले आहे.

-*-*-*-*-*-

तालुका व जिल्हास्तरावर महिला लोकशाही दिनाचे आयोजन

 


जालना दि. 24 (जिमाका) :-   महाराष्ट्र शासनाच्या महिला व बाल कल्याण विभागाने, समस्याग्रस्त व पिडित महिलांना त्यांचे प्रश्न मांडण्यासाठी व्यासपीठ मिळावे, तसेच त्यांच्या हक्कांचे संरक्षण होऊन न्याय मिळावा या हेतूने  शासन निर्णयान्वये जिल्हा तसेच तालुकास्तरावरर महिलांसाठी विशेष लोकशाही दिन पाळण्याचे ठरवले आहे. त्यानुसार तालुकास्तरावर प्रत्येक तहसिल कार्यालयात महिन्याचे चौथ्या सोमवारी आणि जिल्हाधिकारी कार्यालयात दर महिन्याचे तिसऱ्या सोमवारी महिला लोकशाही दिनाचे आयोजन करण्यात यावे असे नमुद करण्यात आले आहे.

            राज्य शासनाने लोकशाही दिनाची अंमलबजावणी तालुकास्तर, जिल्हास्तर, विभागीय आयुक्तस्तरापासुन ते मंत्रालयीनस्तरापर्यंत होण्यासाठी वेळोवेळी शासन निर्णय, परिपत्रकानुसार विविध सुचना दिलेल्या आहेत. महिलांच्या समस्यांचे निराकरण स्थानिक पातळीवरच झाल्यास त्यांना आपल्या न्याय हक्कांसाठी इतरत्र कोठेही जाण्याची आवश्यकता भासणार नाही. सबब जालना जिल्ह्यात तालुकास्तरावर व जिल्हास्तरावर घेण्यात येणाऱ्या लोकशाही दिनाची प्रचार प्रसिध्दी झाल्यास सर्वच स्तरातील महिलांचे प्रश्न लवकरात लवकर निकाली निघण्यास मदत होईल असे जिल्हाधिकारी यांनी असे आवाहन केले आहे.

            अर्ज स्वीकृतीचे निकष पुढीलप्रमाणे तक्रार, निवेदन वैयक्तिक स्वरुपाचे असावेत, तक्रार, निवेदन दोन प्रतित सादर करावेत, सदरील प्रकरण न्याय प्रविष्ठ नसावे, अर्ज विहित नमुन्यात व आवश्यक त्या कागदपत्रासह सादर करावा, सेवा व आस्थापना विषयक बाबी विचारात घेतल्या जाणार नाहीत, निवडणुक आचार संहिता काळात त्या त्या स्तरावर, विधीमंडळ अधिवेशन काळात राज्यस्तरावर महिला लोकशाही दिन पाळण्यात येत नाही.

            शासन निर्णयाप्रमाणे महिलांनी प्रथम संबंधीत तहसिलदार यांचेकडे महिला लोकशाही दिनाच्या पंधरा दिवस आधी दोन प्रतीत तक्रार दाखल करावी, तालुका महिला लोकशाही दिनात एक महिन्यांचे आत कार्यवाही न झाल्यास संबंधीत महिला जिल्हास्तरीय महिला लोकशाही दिनांत तक्रार दाखल करु शकतील. तालुकास्तरावरील लोकशाही दिनांत अर्जदार महिलेस अंतिम उत्तर शक्य तितक्या लवकर जास्तीत जास्त एक महिन्याच्या आत देण्याचे बंधन संबंधित अध्यक्ष तथा तहसिलदार व सदस्य सचिव तथा बाल विकास प्रकल्प अधिकारी यांची राहील. तरी महिलांनी तक्रार अर्ज दाखल करण्यासाठी तालुकास्तरावर तहसिल कार्यालय व जिल्हास्तरावर जिल्हाधिकारी कार्यालय आणि जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी यांच्याशी संपक्र करुन या उपक्रमाचा जास्तीत जास्त लाभ घेण्याचे  आवाहन  जिल्हाधिकारी यांनी केले आहे अशी माहिती जिल्हा महिला व बालविकास अधिकारी यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे दिली आहे.

-*-*-*-*-*-

 

Tuesday 23 August 2022

सोयाबीन व कापूस पिकांच्या योग्य वाढीसाठी शेतकऱ्यांनी काळजी घ्यावी…!

 


 






     जालना जिल्हयात अनेक शेतकऱ्यांनी कापूस व सोयाबीन पिकांची लागवड केलेली आहे.  या पिकांवर पडणाऱ्या रोगांचा समूळ नायनाट करुन उत्पादन वाढीसाठी शेतकऱ्यांनी अधिक काळजी घेणे गरजेचे आहे. कापूस पिकांमध्ये अन्नद्रव्याची कमतरता भासू नये तसेच गुलाबीअळीचे नियंत्रणही करणे आवश्यक आहे.  सोयाबीनची पिके अन्नद्रव्यामुळे गळून जाऊ नयेत यासाठी शेतकऱ्यांनी घ्यावयाच्या काळजीबाबत कृषि विभागामार्फत मार्गदर्शक सुचना निर्गमित करण्यात आल्या आहेत.  सोयाबीन व कापूस पिकांच्या योग्य वाढीसाठी शेतकऱ्यांनी खालील प्रमाणे काळजी घ्यावी,

            सततच्या पावसामुळे कापूस पिकांमध्ये अन्नद्रव्याची कमतरता दिसून येत आहे. त्यामुळे पिकामध्ये पिवळसरपणा दिसत आहे. त्यासाठी सर्व शेतकऱ्यांनी कापूस पिकास जमिनीतून नत्राची मात्रा द्यावी. सोबत फवारणीद्वारे 0.5 टक्के(10 लिटर पाण्यात 50 ग्राम मॅग्नेशियम सल्फेट व 50मिली सूक्ष्म अन्नद्रव्य ग्रेड-II एकत्र करून फवारणी करावी.  कापूस  आणि सोयाबीन उत्पादन वाढीसाठी शेतकऱ्यांनी सूक्ष्म मूलद्रव्याचा वापर करावा.

             सोयाबीन पिक हे सध्या फुलोरा व शेंगा  लागण्याच्या अवस्थेत आहे. हा फुलोरा अन्नद्रव्याच्या कमतरतेमुळे गळून जावू नये व येणारी शेंग पूर्णपणे योग्य भरण्यासाठी 12:61:0 (100 ग्राम) व 50मिली सूक्ष्म अन्नद्रव्य ग्रेड II 10 लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.

कपाशीमध्ये गुलाबी बोंडअळीचे नियंत्रणासाठी खालील उपाययोजना करा

            जालना जिल्ह्यात काही भागात वेळेवर लागवड झालेल्या कपाशीला फुले लागली असून त्यावर गुलाबी बोंडअळीचा प्रादुर्भाव आढळून येत आहे. सद्या वातावरण ढगाळ असल्याने व कापसाला पाते, फुले लागत असल्याने गुलाबी बोंडअळीचे पतंग सक्रीय झालेले आढळून येत आहे. मादी पतंग पाते, फुले यावर अंडी घालतात, त्यामुळे कपाशीच्या पिकात कामगंध सापळे लावण्याची ही योग्य वेळ आहे. जेणेकरून पुढे बोंडे लागल्यानंतर होणारा प्रादुर्भाव आतापासूनच निरीक्षणाद्वारे कमी करता येईल.

            कपाशीच्या पिकात नियमित सर्वेक्षण करुन डोमकळ्या दिसून आल्यास त्या तोडून आतील अळीसह नष्ट कराव्यात. गुलाबी बोंडअळीसाठीचे कामगंध सापळे हेक्‍टरी 05 या प्रमाणात लावावीत़. मोठ्या प्रमाणात पतंग जमा करून नष्ट करण्यासाठी एका एकर क्षेत्रामध्ये गुलाबी बोंडअळीचे 8 ते 10 कामगंध सापळे लावावेत.

ट्रायकोग्रामा बॅक्ट्री या परोपजीवी गांधीलमाशी ने परोजीवीग्रस्त झालेले ट्रायकोकार्ड प्रति एकरी 2-3 या प्रमाणात पीक 60 दिवसांचे झाल्यावर दोन वेळा लावावे. 5 टक्के निंबोळी अर्क अथवा बिव्हेरिया बॅसियाना या जैविक बुरशी युक्त कीटकनाशकाची 800 ग्रॅम प्रति एकर फवारणी करावी. कामगंध सापळ्यामध्ये सलग तीन दिवस 8 ते 10 पतंग प्रति सापळा किंवा 1 अळी प्रति 10 फुले किंवा 10 टक्के प्रादुर्भावग्रस्त डोमकळ्या दिसून आल्यास खालीलपैकी एका रासायनिक कीटकनाशकांची ची फवारणी करावी.

            प्रोफेनोफॉस 50 टक्के 400 मिली प्रती एकर किंवा इमामेक्टिन बेंझोएट 5 टक्के 88 ग्रॅम प्रती एकर किंवा प्रोफेनोफोस 40 टक्के + सायपरमेथ्रीन 4 टक्के (पूर्व मिश्रित कीटकनाशक) 400 मिली प्रती एकर आलटून पालटून फवारावे.

            किटकनाशकासोबत कुठल्याही प्रकारचे इतर कीटकनाशके, बुरशीनाशके, विद्राव्य खते, सूक्ष्म मूलद्रव्ये अथवा रसायने मिसळू नये. लागोपाठ एकच एक कीटकनाशक फवारू नये, असे आवाहन कृषि विभागामार्फत करण्यात आले आहे.

 

                                                                                              --  जिल्हा माहिती कार्यालय,

                                                                                                           जालना

***

कुंडलिका-सीना नदीच्या पुनरुज्जीवनासाठी प्रशासनाचे सवतोपरी सहकार्य -- जिल्हाधिकारी डॉ. विजय राठोड

 




 

जालना, दि. 22 (जिमाका):- जालना जिल्हयाची जीवनवाहिनी म्हणून ओळखल्या जाणारी कुंडलिका-सीना नदीच्या पुनरुज्जीवनासाठी जिल्हा प्रशासनाच्यावतीने सर्वतोपरी प्रयत्न केले जातील. या नदीचा सविस्तर प्रकल्प अहवाल (डीपीआर) मंजुरीकरीताही शासनाकडे निश्चितपणे पाठपुरावा केला जाईल, अशी ग्वाही जिल्हाधिकारी डॉ. विजय राठोड यांनी दिली.

कुंडलिका, सीना नदीच्या डीपीआरबाबत जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली. बैठकीस अपर जिल्हाधिकारी अंकुश पिनाटे, उपजिल्हाधिकारी (रोहयो) रवींद्र परळीकर, उपविभागीय अधिकारी, संदीपान सानप, तहसिलदार श्रीकांत भुजबळ, समस्त महाजन ट्रस्टच्या नूतन देसाई, उदयोजक सुनील रायठठ्ठा, महिकोचे शिरीष बारवाले, जलतज्ञ डॉ. अजित गोखले, कुंडलिका-सीना फाऊंडेशनचे सहसचिव सुरेश केसापूरकर, किशोर पांडे, उदय शिंदे, शिवरतन मुंदडा, सुमंत पांडे, डॉ. श्रीनिवास वडगबाळकर, अविनाश निवाते आदींसह कृषी, जलसंधारण, पोकरा, नगरपालिका, सिंचन विभागाचे अधिकारी उपस्थित होते.

जिल्हाधिकारी डॉ. राठोड म्हणाले की, मागील तीन वर्षांपासून लोकसहभागातून कुंडलिका-सीना नदी स्वच्छ करण्याचे काम सुरु आहे.  या मोहिमेत सामान्य नागरिकांपासून ते व्यापारी, उदयोजक, विदयार्थी, अधिकारी, कर्मचारी यांचा सहभाग उल्लेखनीय आहे. ही नदी कायमस्वरुपी शास्त्रशुध्द पध्दतीने स्वच्छ आणि सुंदर करण्यासाठी  सर्वांच्या सूचनांची दखल घेऊन एक परिपूर्ण डिपीआर तयार केला जाईल.  ही नदी ज्या गावांतून जाते त्यानुसार गावनिहाय सुक्ष्म आराखडा तयार करुन नदी पात्राची स्वच्छता केली जाईल. त्यासाठी  शासनाच्या विविध योजनेतंर्गत कामे केली जातील. यामध्ये नदीपात्रातील गाळ काढणे, बंधारे दुरुस्त करणे तसेच नवीन बंधारे बांधणे, नदी पात्रातील कचरा काढून पात्राच्या परिसराचे सौंदर्यकरण करणे आदी कामे केली जातील. सर्व विभागांच्या समन्वयातून हे कार्य केले जाईल. कुंडलिका-सीना नदी पुनरुज्जीवनचे एक आदर्शवत मॉडेल देशाला दिशादर्शक ठरणार असेल.  या मोहिमेसाठी प्रशासनाचे संपूर्ण सहकार्य राहिल. तर उदयोजक, व्यापारी, स्वयंसेवी संस्था यांनीही सहकार्य करण्याचे आवाहन जिल्हाधिकारी यांनी यावेळी केले.

  जलतज्ञ डॉ. अजित गोखले यांनी कुंडलिका-सीना नदी पुनरुज्जीवनासाठी करण्यात येणाऱ्या कामांचे सादरीकरण केले. या नदीमध्ये  घानेवाडी, जामवाडी तलावातून पाणी येते. जालना, बदनापूर, भोकरदन तालुक्यांतील साधारण वीस गावातून या नदीचा प्रवाह आहे. सदर तलावांच्या स्वच्छतेबरोबरच गावनिहाय संबंधित योजनांच्या माध्यमातून नदी पात्राच्या स्वच्छतेसह सौंदर्यकरणाच्या कामांचा यामध्ये समावेश करण्यात आला आहे.  नदी पुनरुज्जीवनाच्या कामात सहभागी सर्वांच्या सुचनांची दखल घेऊन डिपीआर अंतिम केला जाणार आहे. यावेळी नूतन देसाई,  सुनील रायठठ्ठा, सुमंत पांडे व  शिरीष बारवाले यांनीही मार्गदर्शन केले.

-*-*-*-*-*-*-

 

स्मार्ट सिटी योजनेअंतर्गत मनपा औरंगाबाद यांच्याकडून माजी सैनिकांची पद भरती

 


जालना, दि. 23 (जिमाका):- औरंगाबाद स्मार्ट सिटी जड वाहन वाहतूक परवाना धारक अनुभवी 20 माजी सैनिक कंत्राटी ड्रायव्हर कम कंडक्टरची निवड चाचणी घेणार असुन सदर निवड प्रक्रिया 25 ऑगस्ट 2022 रोजी सकाळी 11.00 वाजता जिल्हा सैनिक कल्याण कार्यालय, नंदनवन कॉलनी, औरंगाबाद येथे राबवली जाणार आहे. खालील पात्रता धारक माजी सैनिक उमेदवारांनी वरील तारखेस व वेळेस आवश्यक कागदपत्रांनी (डिस्चार्ज बुकची कॉपी, आर्मी सिविल हेवी व्हेहिकल लायसन्स, आर्मी ग्रॅजुएशन सर्टीफिकेट इत्यादी) सह हजर रहावे.

पात्रता :- ट्रेड : सैन्य दलातील ट्रेड DSV(Spl Vch)/AM-50/Dvr(MT/DMT/DvrGnr/Dvr(AFT)  यापैकी असावा. शैक्षणिक पात्रता: 10वी, 12 वी पास आणि आर्मी ग्रॅजुएट, वैध प्रवासी बस वाहतुक परवाना PSV BUS (TRV-PSV-Bus)  धारकास प्राधान्य, निवडक उमेदवारांनी MV Act नुसार कंडक्टर बॅच (बिल्ला) निवडीच्या, नियुक्तीच्या तारखेपासून एक महिन्याच्या आत तयार करावा, सैन्य दलात हेवी व्हेहिकल ड्रायव्हिंगचा किमान 15 वर्षाचा अनुभव आवश्य, मेडीकल कॅटेगिरी SHAPE-1, वय अधिकतम 48 वर्ष,

जिल्हा सैनिक कल्याण कार्यालय 41, नंदनवन कॉलनी,औरंगाबाद दुरध्वनी क्रमांक - 0240- 2370313. अधिक माहितीसाठी वरील पत्यावर, दुरध्वनी क्रमांकारवर संपर्क करण्याचे आवाहन जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी औरंगाबाद यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे केले आहे.

-*-*-*-*-*-*-

Monday 22 August 2022

“पंडित दीनदयाळ उपाध्याय रोजगार मेळाव्याचे” आयोजन

                           

         जालना दि. 22 (जिमाका) :-   जिल्हा  कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, जालना  यांचे मार्फत दिनांक   22 ते 27  ऑगस्ट  2022   दरम्यान  ऑनलाईन पध्दतीने  पंडित दीनदयाळ उपाध्याय  रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे.  या कार्यालयाकडील  नोंदणीकृत उमेदवारांना रोजगार उपलब्ध होण्याच्या दृष्टीने सदर ऑनलाईन रोजगार मेळावा आयोजन केला असून यामधील   मुलाखती  मोबाईल दूरध्वनी, व्हिडीओ कॉन्फरन्सव्दारे   (Skype, Whatsapp, etc.)  घेण्याचे नियोजित करण्यात आलेले आहे.

 

             काही औद्योगिक आस्थापनांना मनुष्यबळाची आणि  स्थानिक बेरोजगार उमेदवारांना कामाची आवश्यकता असल्याचे जाणवत आहे.  यामुळे नियोक्ते आणि नोकरी ईच्छूक उमेदवार  यांना  एकछत्राखाली सुविधा उपलब्ध होण्याकरीता ऑनलाईन रोजगार मेळावा महास्वयंम  वेबपोर्टलवरून दिनांक 22 ते 27  ऑगस्ट  2022  दरम्यान आयोजन करण्यात आले आहे.यामध्ये ईपीपी ट्रेनी, मशिन ऑपरेटर आणि नियमित रिक्तपदे यासाठी ऑनलाईन मुलाखती व्दारे भरती प्रक्रीया करण्यात येणार आहे.

या मेळाव्यात रोजगार देणा-या विविध नामांकित कंपन्यांपैकी  एन आर बी बेअरिंग प्रा.लि.जालना यांच्याकडे  ईपीपी ट्रेनी 10 रिक्तपदे , एल जी बी बालकृष्ण प्रा.लि., जालना यांच्याकडे ईपीपी ट्रेनी  05   आणि टॅलेंसेतू सव्हिसेसे प्रा लि पूणे यांच्याकडे मशिन ऑपरेटर 20 रिक्तपदे    अशी एकूण -35 रिक्तपदे  प्राप्त झाले असून,  इतर नियोक्त्यांकडून  रिक्तपदे www.rojgar.mahaswayam.gov.in  या वेब पोर्टलवर ऑनलाईन अधिसूचित करण्यात येणार आहेत. यासाठी  सदर वेबपोर्टलवर नोंदणी केलेल्या  आणि  रिक्तपदांसाठी पात्रतेप्रमाणे मॅचिंग होणा-या किंवा ऑनलाईन अॅप्लाय केलेल्या  सुयोग्य उमेदवारांच्या  नियोक्त्यांकडून भ्रमणध्वनीद्वारे ऑनलाईन  मुलाखती घेण्यात येणार आहेत.    या सुवर्ण संधीचा जास्तीत जास्त बेरोजगार उमेदवारांनी लाभ घेण्यासाठी वरील वेबपोर्टलला लॉग-इन करावे. नोकरी इच्छुक उमेदवारांनी अद्याप पर्यत सेवायोजन नोंदणी केली नसल्यास www.rojgar.mahaswayam.gov.in या संकेतस्थळावर किंवा अँड्रॉईड मोबाईलधारकांनी प्ले स्टोअरमधून  mahaswayam  मोफत अॅप डाऊनलोड करुन नोंदणी करावी, तसेच लॉगीन करुन शैक्षणिक पात्रते नुसार उपलब्ध रिक्तपदांसाठी ॲप्लाय करावे.       

           तसेच, भरती इच्छुक नियोक्ते (Employers) यांनी जास्तीत जास्त रिक्तपदे www.rojgar.mahaswayam.gov.in  वेबपोर्टलवर  Pandit Dindayal Upadhayay Job Fair ऑप्शन वर Clik करुन   ONLINE JOB FAIR JALNA-1 (2022-23) यावर त्यांचेकडील जनरल, ईपीपी, ॲप्रेटिंस रिक्तपदे  अधिसूचित करावी. तसेच सदर मनुष्यबळाच्या मागणीची जाहिरात व प्रसिध्दी विभागाच्या वरील  वेबपोर्टलवर विनामुल्य करावी. याबाबत काही अडचण आल्यास सहाय्यासाठी कार्यालयाचदूरध्वनी 02482-299033 आणि ई-मेल  jalnarojgar@gmail.com   या वर कार्यालयीन वेळेत संपर्क करावा. या मेळाव्याचा जास्तीत जास्त भरती इच्छुक नियोक्ते आणि बेरोजगार उमेदवारांनी  ऑनलाईन पध्दतीने  लाभ घ्यावा असे आवाहन  सहायक आयुक्त, कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता जालना  यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे केले आहे.  

-*-*-*-*-*-*-