Friday 12 August 2022

शालेय विद्यार्थ्यांनी साकारली स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाच्या लोगोची सजीव प्रतिकृती हवेत फुगे सोडून प्रकट केली देशभक्तीची भावना विद्यार्थ्यांनी सामूहिकरीत्या राष्ट्रगीत गाऊन दिला देशभक्तीचा संदेश प्रत्येकाने तिरंगा आपल्या घरावर फडकवून देशभक्तीचा संदेश सर्वदूर पोहोचवावा सांस्कृतिक कार्यक्रमात निघाला सूर दि. 13 ते 15 ऑगस्ट दरम्यान घरांवर तिरंगा फडकविण्याचे आवाहन

 











            जालना, दि. 12 (जिमाका):- आजचे विद्यार्थी हे उद्याच्या बलशाली भारताचे आधारस्तंभ आहेत. भारत देशाला अधिक प्रगतशील व शक्तीशाली बनविण्यासाठी विद्यार्थ्यांनी चांगले शिक्षण घेऊन विविध क्षेत्रे पादाक्रांत करावीत.  अनेक ज्ञात, अज्ञात वीरांच्या बलिदानातून आपला भारत देश स्वतंत्र झाला आहे.  स्वातंत्र्याची फळे केवळ त्यांच्याच बलिदानातून आपण चाखत आहोत. स्वातंत्र्यासाठी सर्वस्व अर्पण केलेल्यांचे स्मरण करणे हे प्रत्येक भारतीयाचे कर्तव्य असुन दि. 13 ते 15 ऑगस्ट दरम्यान प्रत्यकाने अभिमानाने आपल्या घरावर तिरंगा फडकवून देशभक्तीचा संदेश सर्वदूर पोहोचवावा, असा सूर जिल्हा क्रीडा प्रबोधिनी येथे आज आयोजित सांस्कृतिक कार्यक्रमात निघाला.

            भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त जि.प. मुलांची प्रशाला, जिल्हा क्रीडा प्रबोधिनी येथे शिक्षण विभागाच्यावतीने सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. 

            व्यासपीठावर आमदार नारायण कुचे, जिल्हाधिकारी डॉ. विजय राठोड, जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. अक्षय शिंदे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मनुज जिंदल, शिक्षणाधिकारी (माध्यमिक) कैलास दातखीळ, जिल्हाधिकाऱ्यांच्या सुविद्य पत्नी श्रीमती प्रेरणा राठोड, लायन्स क्लबचे राजेश भुतीया, उपशिक्षणाधिकारी श्री खरात, श्रीमती गिता नाकाडे आदींची प्रमुख उपस्थिती होती.

            आमदार नारायण कुचे म्हणाले की, मुलांमध्ये नैतिक मूल्यांचे संस्कार रुजविणारे विश्वसनीय ठिकाण म्हणजे शाळा. उद्याच्या भारताचे आधारस्तंभ शाळेत घडवले जातात. शिक्षणाच्या जोरावर आपल्याला हवे ते यश आपण संपादन करु शकतो. त्यामुळे भारत देशाला अधिक सशक्त व बलवान बनविण्यासाठी विद्यार्थ्यांनी अत्यंत चांगल्या पद्धतीने शिक्षण घेण्याचे आवाहन करत कार्यक्रमात विद्यार्थ्यांनी साकारालेल्या प्रतिकृतींचे त्यांनी कौतुकही केले.

            जिल्हाधिकारी डॉ. राठोड म्हणाले की, आजचे युवक हे उद्याच्या बलशाली भारताचे आधारस्तंभ आहेत.  युवकांनी शिक्षणाची कास धरत विविध क्षेत्रामध्ये भरारी घ्यावी.  आपल्याला मिळालेल्या स्वातंत्र्याची फळे चाखत असताना ज्यांनी देश स्वतंत्रतेसाठी बलिदान दिले त्यांच्याप्रती स्मरण करणे हे आपले आद्य कर्तव्य आहे. दि. 13 ते 15 ऑगस्ट दरम्यान  घरोघरी तिरंगा या उपक्रमांतर्गत प्रत्येक नागरिकाला आपल्या घरावर तिरंगा फडकवण्याचे भाग्य लाभले असुन याचा प्रत्येकाने अभिमान बाळगत मानाने आपल्या घरावर तिरंगा फडकवावा.  तिरंगा फडकवताना त्याचा अवमान होणार नाही याची काळजी घेत प्रत्येकाने तिरंग्याच्या संहितेचे काटेकोरपणे पालन करण्याचे आवाहनही त्यांनी यावेळी केले.

            मुख्य कार्यकारी अधिकारी मनुज जिंदल म्हणाले की, ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांमधून चांगल्या पद्धतीचे खेळाडू निर्माण व्हावेत यासाठी जिल्हा क्रीडा प्रबोधिनी उभारण्यात आली आहे.  तत्कालिन मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांच्या पुढाकारातून या ठिकाणी दीड कोटी रुपयांचा निधी खर्च करत सर्व सुविधा निर्माण करण्यात आल्या आहेत. कॉमनवेल्थ गेम्समध्ये भारताने खेळामध्ये अनेक पदके पटकावली आहेत. जालना जिल्ह्यातून दर्जेदार खेळाडू निर्माण व्हावेत व राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पातळीवर जाऊन खेळांमध्ये देशाचा नावलौकिक होऊन देश अग्रस्थानी राहील यासाठी विद्यार्थ्यांनी क्रीडा प्रबोधिनीच्या माध्यमातुन खेळाचे गुण विकसित करावेत, अशी अपेक्षाही त्यांनी यावेळी व्यक्त केली.

            जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. अक्षय शिंदे यांनीही विद्यार्थ्यांचे कौतुक करत विद्यार्थ्यांनी दर्जेदार शिक्षण घेऊन चांगले नागरिक बनण्याचे आवाहन केले.

            कार्यक्रमाच्या प्रस्ताविकात शिक्षणाधिकारी (माध्यमिक) कैलास दाखखिळ यांनी कार्यक्रमाच्या आयोजनामागची भूमिका विषद केली.

शालेय विद्यार्थ्यांनी साकारली स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाच्या लोगोची सजीव प्रतिकृती

हवेत फुगे सोडून प्रकट केली देशभक्तीची भावना

विद्यार्थ्यांनी सामूहिकरीत्या राष्ट्रगीत गाऊन दिला देशभक्तीचा संदेश

            भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त घरोघरी तिरंगा व स्वराज्य महोत्सवांतर्गत  जि.प. मुलांची प्रशाला, जिल्हा क्रीडा प्रबोधिनी येथे आयोजित कार्यक्रमात एक हजार शालेय विद्यार्थी, विद्यार्थीनींनी मानवी साखळीद्वारे स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाच्या लोगोची प्रतिकृती साकारत सामूहिकरीत्या राष्ट्रगीत गाऊन  देशभक्तीचा संदेश दिला.   यावेळी ऑक्सफोर्ड इंग्लिश स्कुल, जिल्हा परिषद शाळा वाघरुळ, आर.व्ही.एच इंग्लिश स्कुल, सह्याद्री इंग्लिश स्कुल, जिल्हा परिषद मुलांची प्रशाला, जिल्हा परिषद नंदापुर, एम.एस. जैन इंग्लिश स्कुल, जिल्हा परिषद, हिवरा व श्री दानकुंवर महाविद्यालयातील विद्यार्थी, विद्यार्थीनींनी देशभक्तीपर गीतावर बहारदार अशी नृत्ये, लेझिमद्वारे विविध प्रतिकृती सादर केली.   मान्यवरांच्या हस्ते तिरंगी फुग्यांचा गुच्छ आकाशात सोडण्यात आला.

देशभक्तीपर गीतांवर चिमुकल्यांसह जिल्हा प्रमुखांची थिरकली पाऊले.

            स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त आयोजित कार्यक्रमात संपूर्ण वातावरण देशभक्तीमय झाले होते. या वातावरणात विद्यार्थ्यांनी केलेल्या समुह नृत्याचे जिल्हाधिकारी डॉ.विजय राठोड, मुख्य कार्यकारी अधिकारी मनुज जिंदल यांच्यासमोर सादरीकरण केहे उपस्थित प्रत्येक मान्यवरांनी यामध्ये सहभागी होत चिमुकल्यांचे मनोबल वाढवून देशभक्तीचा एक संदेश दिला.

            कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी विस्तार अधिकारी श्रीमती वडजे, श्री सोळंके, केंद्र प्रमुख भाऊसाहेब काकडे, प्रशालेचे मुख्याध्यापक श्री. कुंडलकर, प्रमोद खरात, सुनील मावकर, श्रीकृष्ण निहाळ, कल्याण गव्हाणे, अरुण नंद, संजय कायंदे, सुनिल ढाकरगे, भागवत जेटेवाड, भारत दांडेकर, सचिन दोरके, राजीव पुरी, विजय खेडेकर, यशवंत कुलकर्णी आदींनी परिश्रम घेतले.

            कार्यक्रमाचे संचलन दीपक दहेकर यांनी केले तर आभार उप शिक्षणाधिकारी बाळासाहेब खरात यांनी मानले.

*******

 

 

No comments:

Post a Comment