Wednesday 24 August 2022

पीकर्जाची नियमितपणे परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांसाठी कार्यशाळा संपन्न

 


जालना, दि. 24 (जिमाका) :-  सन 2017-18,2018-19,2019-20 या वर्षात पीक कर्ज घेऊन त्याची विहीत मुदतीत नियमित परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांसाठी महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना 2019 अंतर्गत पीक कर्जाच्या रकमेवर जास्तीत जास्त रुपये 50 हजार पर्यंत प्रोत्याहनपर लाभ देण्याची योजना सुरु करण्यात आलेली आहे.

या योजनेची अंमलबजावणी तातडीने व अचूक होण्यासाठी योजनेच्या कार्यपध्दतीबाबत जिल्ह्यातील सहाय्यक निबंधक, लेखापरीक्षक, जिल्हा मध्यवर्ती बँकेचे क्षेत्रीय स्तरावरील अधिकारी तसेच विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्थांचे शाखासचिव यांना माहिती होण्यासाठी जालना जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या सभागृहात कार्यशाळा दि. 23 ऑगस्ट रोजी आयोजित केली होती.

या कार्यशाळेत जिल्हा उपनिबंधक, सहकारी संस्था, नानासाहेब चव्हाण, तसेच जिल्हा विशेष लेखापरीक्षक, सहकारी संस्था, एस.पी. काकडे, यांनी योजनेच्या निकषांबाबत व अंमलबजावणीच्या कार्यपध्दीबाबत विस्तृत मार्गदर्शन केले. कार्यशाळेस कार्यकारी संचालक, जिल्हा सहकारी बँक आशुतोष देशमुख, जिल्हातील सहाय्यक निबंधक, लेखापरीक्षक, जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे तालुका स्तरावरील अधिकारी तसेच शाखा सचिव व गटसचिव संघटना अध्यक्ष उपस्थित होते.

कार्यशाळेस मार्गदर्शन करताना जिल्हा उपनिबंधक यांनी योजनेच्या निकषानुसार योजनेचा  लाभ मिळण्यासाठी पात्र असलेल्या शेतकऱ्यांचा आधार क्रमांक बँकेच्या खात्यास लिंक असणे आवश्यक असल्याने नियमित कर्ज परतफेड करणाऱ्या ज्या शेतकऱ्यांनी बँक खात्यांना आधार क्रमांक लिंक केलेला नाही अशा शेतकऱ्यांनी संबंधित बँकेकडे तसेच संबंधित विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्थांचे गटसचिव यांच्याकडे संपर्क साधुन आधार कार्डशी छायांकित प्रत तात्काळ उपलब्ध करुन देण्याबाबत  जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था यांनी आवाहन केले आहे.

-*-*-*-*-*-

No comments:

Post a Comment