Thursday 25 August 2022

जालना जिल्हयात महाराष्ट्र स्टार्टअप व नाविन्यता यात्रेस प्रारंभ विदयार्थी व नवउदयोजकांनी जास्तीतजास्त संख्येने सहभागी व्हावे -- जिल्हाधिकारी डॉ. विजय राठोड

 





जालना, दि. 25 (जिमाका) – नाविन्यता संकल्पना आणि नवउद्योगांना प्रोत्साहन देण्यासाठी महाराष्ट्र स्टार्टअप व नाविन्यता यात्रेचा जालना जिल्हयात दि. 23 ऑगस्टपासून प्रारंभ झाला आहे.  आज जालना शहरात  ही यात्रा दाखल झाली.  जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रांगणात दाखल झालेल्या या यात्रेतील मोबाईल वाहनाची जिल्हाधिकारी डॉ. विजय राठोड यांनी पाहणी केली. 29 ऑगस्टपर्यंत जिल्हयात भ्रमण करणाऱ्या या यात्रेत जिल्हयातील जास्तीतजास्त विदयार्थी व नवउदयोजकांनी सहभागी व्हावे. तसेच तालुकास्तरीय प्रचार-प्रसिध्दी अभियान किंवा जिल्हास्तरीय सादरीकरण सत्राच्या ठिकाणी उपस्थित राहून आपला सहभाग नोंदवावा, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. विजय राठोड, तथा अध्यक्ष, कौशल्य, रोजगार, उदयोजकता व नाविन्यता जिल्हा कार्यकारी समिती, जालना यांनी यावेळी  केले.

याप्रसंगी  जिल्हयाचे स्टार्टअप यात्रेचे नोडल अधिकारी कैलास काळे, रोजगार व उदयोजकता मार्गदर्शन अधिकारी सुरेश बहरे, आत्माराम दळवी, प्रदिप डोले, उमेश कोल्हे, दिनेश उढान उपस्थित होते.

राज्यातील नाविन्यपूर्ण संकल्पना आणि नवउद्योजकांना प्रोत्साहन देण्यासाठी कौशल्य रोजगार, उदयोजकता व नाविन्यता विभागातंर्गत महाराष्ट्र राज्य नाविन्यतापूर्ण स्टार्टअप धोरण 2018" जाहीर करण्यात आले आहे. सदर धोरणाच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी महाराष्ट्र राज्य नाविन्यता सोसायटी ही नोडल एजन्सी म्हणून कार्यरत आहे. या धोरणाच्या माध्यमातून राज्यामध्ये स्टार्टअपच्या विकासाकरीता पोषक वातावरणनिर्मिती करून त्यातून यशस्वी उदयोजक घडविण्याकरीता इन्क्युबेटर्सची स्थापना व विस्तार, गुणवत्ता परीक्षण व स्टार्टअप्सना बौध्दिक मालमत्ता हक्कासाठी अर्थसहाय्य, अँड चॅलेंज, स्टार्टअप वीक यासारख्या अनेक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येते.

नाविन्यता, कल्पकता यांना भौगोलिकतेच्या मर्यादा नसतात, त्या कुठेही यशस्वी होऊ शकतात. नवकल्पनांना योग्य पाठबळ मिळण्याची आवश्यकत असते परंतु काही वेळा योग्य मार्गदर्शनाअभावी चांगल्या कल्पना प्रत्यक्षात उतरू शकत नाहीत. याकरीता, कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभागामार्फत, जिल्हयातील नागरीकांच्या नाविन्यपूर्ण नवसंकल्पनांना मूर्त स्वरूप देण्यासाठी महाराष्ट्र स्टार्टअप व नाविन्यता यात्रेचे आयोजन करण्यात आले.

स्टार्टअप यात्रेच्या प्रथम टप्यात प्रत्येक तालुक्यातील शाळा/महाविदयालये/आयटीआय/लोकसमुह एकत्रित होण्याच्या जागेवर स्टार्टअप यात्रेचा प्रचार व प्रसार करण्यासाठी एक वाहन (मोबाईल व्हॅन) पाठविण्यात आले आहे. सदर वाहनासोबत असलेल्या प्रतिनिधींव्दारे नागरिकांना या यात्रेबाबतची संपूर्ण माहिती, नाविन्यपूर्ण संकल्पना व त्यांचे इतर पैलू तसेच विभागामार्फत राबविल्या जाणा-या विविध उपक्रमांबददल माहिती देण्यात येत आहे. याचबरोबर नाविन्यपूर्ण कल्पना असलेल्या नागरीकांची नोंदणी करून यात्रेच्या पुढील टप्याबाबत माहिती पुरविण्यात येते.

जालना जिल्हयात दि. 23 ऑगस्टपासून सुरु झालेली ही यात्रा मंठा तालुक्यात दि. 23 ऑगस्ट 2022 रोजी,  परतुर व घनसावंगी तालुक्यात दि. 24 ऑगस्ट रोजी तर अंबड व जालना तालुक्यांत दि. 25 ऑगस्ट रोजी दाखल झाली.  बदनापूर तालुक्यात 26 ऑगस्ट, भोकरदन तालुक्यात  27 ऑगस्ट आणि  जाफ्राबाद तालुक्यात 29 ऑगस्ट रोजी स्टार्टअप यात्रा येणार आहे.

जिल्हास्तरीय प्रशिक्षण शिबिर व सादरीकरण सत्र -- सर्व तालुक्यांत दि. 23 ते 29 ऑगस्ट 2022 या कालावधीमध्ये प्रचार व प्रसिध्दी झाल्यानंतर, जिल्हास्तरीय एकदिवसीय प्रशिक्षण शिबिर व सादरीकरण सत्रांचे दि. 17 सप्टेंबर 2022 रोजी आयोजन करण्यात आले आहे. प्रशिक्षण शिबिरात नाविन्यता तथा उदयोजकतेबाबतचे माहिती सत्र, स्थानिक उदयोजकांची व्याख्याने, तज्ञ मार्गदर्शक व सल्लागारांची सत्रे, तसेच नोंदणी केलेल्या नवउदयोजकांचे संकल्पना सादरीकरण सत्र आयोजित करण्यात येणार आहे. सादरीकरण सत्रात नोंदणी केलेल्या नागरिकांना स्थानिक समस्येसाठी उत्तम उपाय व विविध क्षेत्रातील आपल्या नाविन्यपूर्ण कल्पना व उदयोगांचे सादरीकरण जिल्हास्तरीय तज्ञ समितीसमोर करण्याची संधी देण्यात येईल. जिल्हास्तरावर अव्वल 3 विजेते घोषित केले जातील, तसेच सर्वोत्तम 10 (अव्वल 3 सह) सहभागींना राज्यस्तरावर सादरीकरणाची संधी मिळेल.

जिल्हा स्तरावर प्रथक पारितोषिक- रु. 25 हजार, व्दितीय पारितोषिक : रु. 15 हजार,  तृतीय पारितोषिक : रु. 10 हजार असे स्वरुप राहणार आहे.

राज्यस्तरीय सादरीकरण सत्र व विजेत्यांची घोषणा समारोह -- प्रत्येक जिल्हयातील सादरीकरण सत्रातील उत्तम 10 कल्पनांचे अंतिम सादरीकरण राज्यस्तरीय तज्ञ समितीसमोर करण्यात येईल. अंतिम विजेत्यांची निवड राज्यस्तरीय निवड समितीव्दारे करण्यात येईल. राज्यस्तरीय विजेत्यांना प्रथम पारितोषिक रुपये 1 लाख व व्दितीय पारितोषिक रू. 75 हजार तसेच इन्क्युबेशन सहाय्य, बीज भांडवल/निधीसाठी सहाय्य, नाविन्यता परिसंस्थेतील महत्वाच्या संस्था व तज्ञ व्यक्तींचे मार्गदर्शन सत्रे तसेच सॉफटवेअर क्रेडीटस, क्लाऊड क्रेडीटस सारखे इतर लाभही पुरविण्यात येतील.

या यात्रे दरम्यान प्रचार व प्रबोधन करुन यात्रेबाबतची संपूर्ण माहिती, नावीन्यपूर्ण संकल्पना, त्याचे इतर पैलू याबाबतची माहिती देण्यात येत आहे. नावीन्यपूर्ण कल्पना असलेले युवक-युवती आपल्या कल्पना यावेळी www.msins.in किंवा www.mahastartupyatra.in या वेबसाईटवर नोंदवू शकतात.

-*-*-*-*-

No comments:

Post a Comment