Monday 8 August 2022

क्षयरोग मुक्त भारतासाठी समाजातील विविध घटकांनी सहकार्य करावे -- जिल्हाधिकारी डॉ. विजय राठोड

 




जालना दि. 8 (जिमाका) :- क्षयरोग (टीबी) मुक्त  भारत करण्यासाठी समाजातील उदयोजक, सामाजिक संस्था तसे विविध सामाजिक उपक्रम राबविणारे क्लब यांनी  सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. विजय राठोड यांनी केले.  

आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालय, भारत सरकार यांच्या राष्ट्रीय धोरणात्मक योजने अंतर्गत वर्ष 2025 पर्यंत क्षयरोग मुक्त भारताच्या उद्दिष्ट पूर्तीसाठी विविध कार्यक्रम राबविण्यात येत आहे.  उद्दिष्ट साध्य करण्याच्या दृष्टिने समाजातील विविध स्तरांवर काम करणाऱ्या संस्था व व्यक्ती यांच्यासोबत समन्वय साधण्यात येत आहे.  या अनुषंगाने जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित बैठकीत जिल्हाधिकारी बोलत होते.

बैठकीस  जिल्हा क्षयरोग अधिकारी डॉ. अश्वमेध जगताप, अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. इरानी,  वैद्यकीय अधिकारी डॉ. रमेश काकड, डॉ. राम देशमुख, डॉ. सोळंके, डॉ. ए.व्ही. गायकवाड, डॉ. चंदेल, डॉ. शितल सोनी, डॉ. कैलाश कांगणे, तसेच जी.जी. लोखंडे, एस.व्ही. यादव, एस.एस. खंडागळे, जी.के. वावरे,आशिष ओझा, तालुकास्तरावरील वैदयकीय अधिकारी तसेच बेजो शितल सिड्सचे समीर अग्रवाल, महिको सिड्सचे एस.ए. सुब्बाराव, विनोद रॉय इंजिनियर युनिटचे सुनिल रायठ्ठा, सेंट्रल रॉटरी क्लबचे गिरीष गिंदोडिया, मेन रोट्राक क्लबचे यश बगडिया, दक्षिण मिट टाऊन रोट्राक क्लबचे सागर दक्षीणी, सेंट्रल रोट्राक क्लबच्या मैताली उपाध्याय, रोटरी क्लब जालनाचे डॉ. श्रेयश भरतीया, इलाईट रोट्री क्लब ऑफ जालनाचे  श्रीकांत दाड यांच्यासह जालना शहरातील नामांकीत एनजीओंचे प्रतिनिधी उपस्थित होते.

क्षय रुग्णांना सामुदायिक सहाय्य मिळवून देण्यासाठी केंद्र शासन प्रधानमंत्री टीबी मुक्त भारत उपक्रमांतर्गत निक्षय मित्र कम्युनिटी सपोर्ट टु टिबी पेशंट हा उपक्रम राबवित आहे. या उपक्रमांतर्गत टिबी रुग्णांचे उपचार यशस्वीरित्या पूर्ण करण्यासाठी उपचारावरील रुग्णांना अतिरिक्त मदत देऊन त्यांना उपचाराशी जुळवून ठेवणे हा यामागील उद्देश आहे. या उपक्रमामुळे क्षयरोग दुरीकरणाच्या प्रयत्नांमध्ये व्यक्ती व सामाजिक संस्थांचा सहभाग वाढविण्यास मदत होईल.  क्षयरोगाशी संबंधीत समाजातील भीतीही जनजागृतीद्वारे कमी होईल.

सद्यस्थितीमध्ये उपचारावर असणाऱ्या क्षयरुग्णांना शासनामार्फत प्रत्येक महिन्याला निक्षय पोषण योजनेअंतर्गत 500/- रुपये अनुदान बॅंक खात्यामध्ये जमा करण्यात येते. तसेच क्षयरुग्णास औषधोपचार व निदान सुविधासुध्दा मोफत पुरविण्यात येतात. या व्यतिरिक्त क्षयरुग्णांना अतिरिक्त निक्षय आहार मदत, डायग्नोस्टिक मदत, व्होकेशनल मदत देण्याकरीता निक्षय मित्र कम्युनिटी सपोर्ट टू टिबी पेशंट हा उपक्रम सुरु करण्यात आला आहे. या उपक्रमांतर्गत समाजातील दानशूर व्यक्ती, स्वयंसेवी संस्था, उद्योगसमुहांनी सहकार्य करण्याचे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. विजय राठोड यांनी केले.

जिल्हा क्षयरोग अधिकारी डॉ. अश्वमेध जगताप यांनी उपस्थितांना राष्ट्रीय क्षयरोग दुरिकरण कार्यक्रम व क्षयरुग्णांना पुरविण्यात येणारे अतिरिक्त निक्षय आहार मदत, डायग्नोस्टिक मदत, व्होकेशनल मदत याबाबत सविस्तर माहिती दिली.

सद्यस्थितीमध्ये जालना जिल्ह्यामध्ये 1 हजार 618 क्षयरुग्ण औषधोपचार घेत आहेत. या रुग्णांना पोषण आहार व इतर मदत देण्याबाबत उद्योग समुह, रोटरी क्लब, लॉयन्स क्लब व अशासकीय संस्था (एनजीओ) यांनी बैठकीत संमती दर्शविल्याने जालना जिल्हयातील क्षयरुग्णांना सामुदायिक सहाय्य मिळण्याकरीता मदत होणार आहे.

-*-*-*-*-*-

No comments:

Post a Comment