Thursday 18 August 2022

पीकविम्याची रक्कम मिळण्यासाठी ई-पीक पहाणीमध्ये नोंद करणे बंधनकारक शेतकऱ्यांनी ई-पीक पहाणीमध्ये नोंद करावी -- जिल्हाधिकारी डॉ. विजय राठोड

 



            जालना, दि. 18 (जिमाका):- खरीप हंगामातील पेरणी झालेल्या पिकांची ई-पीक पाहणी कार्यक्रम जिल्ह्यात 1 ऑगस्ट, 2022 पासुन सुरू झाला आहे. पिकांच्या नुकसानीपोटी पीकविम्याची रक्कम मिळण्यासाठी ई-पीक पहाणीमध्ये नोंद करणे बंधनकारक असुन चालु खरीप हंगामातील पिकांची नोंद शेतकऱ्यांनी ई-पीक पहाणीमध्ये करण्याचे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. विजय राठोड यांनी केले आहे.

            ई-पीक पहाणीमध्ये नोंदीसाठी ई पीक पहाणी मोबाईल ॲप व्हर्जन-2 नव्याने या ॲपची निर्मिती करण्यात आली असुन शेतकऱ्यांनी मोबाईल अॅपमध्ये नोंदविलेल्या पीक पाहणीमध्ये ४८ तासांच्या आत दुरुस्ती करता येणे शक्य होणार आहे. याशिवाय हमीभावाने नाफेडमध्ये पिकाच्या विक्रीसाठी नोंदविल्याची सुविधादेखील यंदा आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना नाफेड केंद्रांवर ऑनलाईन नोंदणीसाठी ताटकळण्याची गरज राहणार नाही.

            खातेदारांना त्यांच्या गावातील संपूर्ण पीक पाहणी नोंद पाहण्याची सुविधा देण्यात आलेली आहे. यापूर्वी मुख्य पीक व दोन दुय्यम पिकाची नोंद करता येत होती. या हगामापासून एक मुख्य पीक व तीन दुय्यम पिकांच्या नोंदीची सुविधा आहे. याशिवाय खातेदारांना पीक पाहणीमध्ये दुरुस्ती करायची झाल्यास तलाठ्याकडे अर्ज करणे शक्य होणार आहे.

            शेतकऱ्यांनी त्यांच्या मोबाईलमधील जुने ॲप डिलीट करुन https://play.google.com/store/apps/details?id=io.sc.eppCordova या लिंकद्वारे गुगल प्ले स्टोअरवर जाऊन ई पीक पहाणी मोबाईल ॲप व्हर्जन-2 हे नवीन ॲप आपल्या मोबाईलमध्ये डाऊनलोड करुन आपल्या शेतातील पिकाची नोंद शेतकऱ्यांना स्वत: शेतामध्ये जाऊन करण्याचे आवाहनही जिल्हाधिकारी डॉ. विजय राठोड यांनी केले आहे.

******* 

No comments:

Post a Comment