Wednesday 17 August 2022

राष्ट्रीय लोक अदालतीमध्ये 1 हजार 795 प्रकरणे निकाली

 


 

   जालना दि. 17 (जिमाका) :-  जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, जिल्हा व सत्र न्यायालय,  व जिल्हा वकील संघ यांच्या संयुक्त विद्यमाने दि. 13 ऑगस्ट 2022 रोजी  प्रलंबित दिवाणी व फौजदारी प्रकरणे, मोटार वाहन अपघात नुकसान भरपाई प्रकरणे, तसेच धनादेश अनादरण संदर्भातील प्रकरणे, विद्युत प्रकरणे, बँकेची प्रलंबीत  व दावा दाखलपुर्व वसूल प्रकरणे, कौटूंबिक वादाची प्ररकणे, बी.एस.एन.एल. ची दावा दाखल पुर्व प्रकरणे यासाठी राष्ट्रीय लोक अदालतचे आयोजन करण्यात आले होते. व तशी प्रकरणे ठेवण्यात आली होती. त्यापैकी दावा दाखल पुर्व 583 प्रकरणे निकाली निघाली व सदर प्रकरणात तडजोड रक्कम रुपये 3 कोटी 92 लाख 73 हजार 195 एवढी झाली व न्यायालयातील प्रलंबीत 540 प्रकरणे निकाली निघाली व सदर प्रकरणात तडजोड रक्कम रुपये 7 कोटी 5 लाख 63 हजार 167.95 एवढी  झाली. तसेच विशेष मोहिमे अंतर्गत 672 प्रकरणे निकाली निघाली. अशाप्रकारे राष्ट्रीय लोक अदालतमध्ये एकुण 1 हजार 795 प्रकरणे निकाली निघाली. सदर प्रकरणात तडजोड रक्कम रुपये 10 कोटी 98 लाख 36 हजार 362.95 एवढी झाली. वाहतुक शाखेच्या ई चलान मध्ये एकुण 2 हजार 894 प्रकरणे निकाली निघुन रक्कम रुपये 14 लाख 60 हजार 700 शासन दरबारी जमा झाली.

            राष्ट्रीय लोकअदालत उद्धघाटनाचा कार्यक्रम 10.30 वाजता पार पडला. त्यानंतर थेट पॅनलच्या कामास सुरुवात करण्यात आली. या लोक अदालतसाठी जिल्ह्याच्या मुख्यालयी 13 पॅनल ठेवण्यात आले. त्यावर पॅनल प्रमुख म्हणुन सर्व न्यायाधीशांनी काम पाहिले.

            या कार्यक्रमास प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीय तथा अध्यक्ष जिल्हा विधी सेवा प्राधिकरण एन.जी. गिमेकर, जिल्हा न्यायाधीश -1 ए.एल. टिकले, व सचिव, जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, आर.आर. अहिर,  सर्व न्यायाधीश तसेच जिल्हा सरकारी वकील ॲड दिपक कोल्हे, अध्यक्ष जिल्हा वकिल संघ ॲड रामेश्वर गव्हाणे, वकील संघाचे सर्व मान्यवर विधिज्ञ व न्यायालयीन कर्मचारी उपस्थित होते.

            कौटुंबिक न्यायालय येथील राष्ट्रीय लोकअदालतीमध्ये एकुण 13 प्रकरणात सन्मानजनक तडजोड होऊन प्रकरणे निकाली काढण्यात आली. त्यामधील 10 प्रकरणतील जोडप्यांनी परस्परांमधील वाद सामंजस्याने मिटवुन घटस्फोटाचा मार्ग सोडुन पुन्हा संसार करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

            पॅनल सदस्य म्हणुन मान्यवर विधीज्ञांनी काम पाहिले तसेच सरकारी अभियोक्ता यांनी काम पाहिले.

जिल्हा विधी सेवा प्राधिकरणातील सर्व कर्मचारी व न्यायालयीन सर्व कर्मचारी यांनी परिश्रम घेऊन लोकअदालत यशस्वी करण्यासाठी प्रयत्न केले.   

-*-*-*-*-*-*-

No comments:

Post a Comment