Wednesday 17 August 2022

स्वराज्य महोत्सवातंर्गत “समूह राष्ट्रगीत गायन” उपक्रमास जिल्ह्यात उत्स्फूर्त प्रतिसाद

 


            जालना, दि. 17 (जिमाका):-  भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त स्वराज्य महोत्सवातंर्गत ‘समूह राष्ट्रगीत गायन’ हा उपक्रम संपूर्ण जिल्हाभरात आज उत्साहात संपन्न झाला. ठिक सकाळी  11.00 वाजता केंद्र व राज्य शासनाच्या संबंधित कार्यालयांतील अधिकारी व कर्मचारी तसेच जिल्हास्तर, तालुकास्तर, ग्रामस्तरावरील सर्व शाळा, महाविद्यालयातील शिक्षक, विदयार्थी, खाजगी आस्थापना, व्यापारी प्रतिष्ठाने, संस्थेतील कर्मचारी, राजकीय पदाधिकारी आणि नागरिकांनी या उपक्रमात उत्स्फूर्तपणे सहभाग घेत सामुहिकरित्या राष्ट्रगीताचे गायन केले. 

            जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रांगणात जिल्हाधिकारी डॉ. विजय राठोड यांच्या प्रमुख उपस्थितीत समूह राष्ट्रगीत गायन पार पडले. यावेळी अपर जिल्हाधिकारी  अंकुश पिनाटे, निवासी उपजिल्हाधिकारी केशव नेटके, उपजिल्हाधिकारी रवींद्र परळीकर, गणेश नि-हाळी, रिना बसैये, शर्मिला भोसले, राज्य उत्पादन शुल्कचे अधीक्षक पराग नवलकर, जिल्हा कोषागार अधिकारी सचिन ढस आदिंसह तहसिलदार व जिल्हाधिकारी कार्यालयातील सर्व विभागप्रमुख, कर्मचारी उपस्थित होते.

            जिल्हा परिषदेत मुख्य कार्यकारी अधिकारी मनुज जिंदल यांच्या प्रमुख उपस्थितीत समूह राष्ट्रगीत गायन पार पडले. यावेळी सर्व संबंधीत विभागांचे अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते. जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयाच्या प्रांगणात गृह शाखेचे उपअधीक्षक श्री. व्यास यांच्या उपस्थितीत समूह राष्ट्रगीत गायन पार पडले. यावेळी सर्व पोलीस अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते. जिल्हयातील सर्व पोलीस उपविभागीय कार्यालये, पोलीस स्थानकात समूह राष्ट्रगीत गायन झाले. सर्व  शाळा, महाविदयालयांमध्ये विदयार्थी, शिक्षक, कर्मचारी यांनी सामुहिकपणे राष्ट्रगीत गायन केले. याशिवाय जिल्ह्यातील सर्व शासकीय, निमशासकीय कार्यालये, विविध संस्थांमध्ये समूह राष्ट्रगीत गायनाचा कार्यक्रम पार पडला. अनेक ठिकाणी नागरिकांनी उत्स्फूर्तपणे सहभागी होत राष्ट्रगीत गायन केले.

-*-*-*-*-*-*-

No comments:

Post a Comment