Thursday 25 August 2022

जालना जिल्ह्यात गणेशोत्सव शांततेत व शिस्तबद्धरीतीने साजरा करावा जिल्ह्यात प्लॅस्टीकमुक्त गणेशोत्सव साजरा करावा - जिल्हाधिकारी डॉ. विजय राठोड

 



            जालना, दि. 25 (जिमाका):- सण, उत्सव शांततेत व शिस्तबद्धरितीने साजरे करण्याची जालना जिल्हयाची परंपरा आहे. यंदाच्या गणेशोत्सवामध्येही परंपरा कायम राखत हा उत्सव अत्यंत शांततेत तसेच दिलेल्या मार्गदर्शक सुचनांचे पालन करत साजरा करावा.  तसेच पर्यावरणाच्या रक्षणासाठी जालना जिल्ह्यात प्लॅस्टीकमुक्त गणेशोत्सव साजरा करण्याचे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. विजय राठोड यांनी केले.

      जिल्हा नियोजन समितीच्या सभागृहात सार्वजनिक श्री गणेशोत्सव 2022 ची पूर्वतयारीच्या दृष्टीने समन्वय व शांतता समितीच्या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते.  त्याप्रंसगी मार्गदर्शन करताना जिल्हाधिकारी डॉ. राठोड बोलत होते.

            बैठकीस जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. अक्षय शिंदे, अपर पोलीस अधीक्षक विक्रांत देशमुख, निवासी उपजिल्हाधिकारी केशव नेटके, उप विभागीय अधिकारी संदीपान सानप, स्वप्नील कापडणीस, भाऊसाहेब जाधव, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. अर्चना भोसले आदींची प्रमुख उपस्थिती होती.

         जिल्हाधिकारी डॉ. राठोड म्हणाले की , गणेशोत्सवादरम्यान गणेश मंडळाच्या ठिकाणी आणि ज्या मार्गाने गणरायाची मिरवणूक निघणार आहे, अशा रस्त्यांवर असलेले खड्डे बुजविण्यात यावे व परिसर स्वच्छ करण्यात यावा. मिरवणुकीच्या मार्गाची संबंधित विभागांच्या अधिकाऱ्यांनी एकत्रितरित्या पहाणी करुन या ठिकाणी आढळणाऱ्या त्रुटींची तातडीने पूर्तता करण्यात यावी. रस्त्यांवर उभे राहणाऱ्या मोकाट जनावरांमुळे वाहने तसेच पादचाऱ्यांना त्रास होत असुन वाहतुकीचाही खोळंबा होतो.  त्यामुळे अशा मोकाट जनावरांचा तातडीने बंदोबस्त करण्यात यावा. गणेश मंडळाच्या ठिकाणी तसेच मिरवणुकीच्या मार्गावर सीसीटीव्ही यंत्रणा कार्यरत राहील, याची दक्षता घेण्याचे निर्देशही जिल्हाधिकाऱ्यांनी यावेळी दिले.  

            गणेशोत्सवाच्या काळामध्ये गणेश मंडळाकडून मोठ्या प्रमाणात विद्युत रोषणाई करण्यात येते.  अशावेळी कुठलीही दुर्घटना घडू नये यासाठी मार्गावरील लोंबकळणाऱ्या विद्युत तारा, नादुरुस्त असलेल्या डीपी आदींची तातडीने दुरुस्ती करुन घेण्यात यावी.  गणेशोत्सवाच्या काळात वीज पुरवठा खंडीत होणार नाही, याबाबतची महावितरणने दक्षता घ्यावी.  महामंडळांनीही विद्युत विभागाकडून अधिकृतिरित्या तात्पुरत्या स्वरुपात वीजजोडणी घेण्याचे आवाहनही जिल्हाधिकारी डॉ. राठोड यांनी यावेळी केले.

            जिल्ह्यातील गणेश मंडळांना आवश्यक असणाऱ्या सर्व परवानग्या एकाच छताखाली मिळाव्यात यादृष्टीकोनातून सर्व परवानग्यांसाठी एक खिडकी योजना अंमलात आणण्यात यावी.  सर्व संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांनी आवश्यक असणाऱ्या परवाग्यांसाठी त्यांच्या अधिकाऱ्यांची या ठिकाणी नेमणूक करावी.  गणेशमूर्तींच्या विसर्जनासाठी तीन ते चार प्रभाग मिळून एक अशा कृत्रिम तलावाची उभारणी करण्यात यावी. गणेशोत्सवादरम्यान महाप्रसादाचे आयोजन करण्यात येते.  या ठिकाणी देण्यात येणाऱ्या प्रसादाच्या नमुन्यांची अन्न व औषध विभागाने तपासणी करावी.  गणेशोत्सवाच्या काळात अग्निशमन यंत्रणा तसेच वैद्यकीय पथके आवश्यक त्या सुविधेसह तैनात ठेवण्याच्या सुचनाही जिल्हाधिकारी डॉ. विजय राठोड यांनी यावेळी दिल्या.  जालना जिल्ह्यात गणेशोत्सव हा आनंदात व शांततेत साजरा करण्यासाठी सर्वांनी सहकार्य करण्याचे आवाहनही जिल्हाधिकारी डॉ. विजय राठोड यांनी यावेळी केले.


         जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. अक्षय शिंदे म्हणाले, शांतता समितीच्या सदस्यांनी मांडलेल्या मुद्दयांची निश्चितपणे दखल घेण्यात येईल. सर्वोच्च न्यायालयाच्या मार्गदर्शक तत्वानुसारच वाद्यांचा आवाज असला पाहिजे. गणेशोत्सव साजरा करत असताना कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी सर्वांनी नियमांचे पालन करुन पोलीस प्रशासनाला सहकार्य करावे. महामंडळांनी मंडपांची उभारणी करताना वाहतुकीला कुठल्याही प्रकारचा अडथळा निर्माण होणार नाही यादृष्टीने काळजी घ्यावी.  प्रत्येक गणेश मंडळांनी त्यांच्या स्वयंसेवकांची यादी संबंधित पोलीस स्टेशनला उपलब्ध करुन द्यावी. गणेशोत्सवाच्या निमित्ताने देखावे, बॅनर्स, पोस्टर्स  लावताना ते समाजप्रबोधनात्मक असावेत.  या माध्यमातून कोणाच्याही भावना दुखवणार नाहीत, याची काळजी घ्यावी. गणेशोत्सव काळात समाज विघातक कृत्य करणाऱ्या व्यक्तींवर प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात येईल. गणेशोत्सवाच्या मिरवणुकीमध्ये मोठ्या प्रमाणात गुलालाचा वापर करण्यात येतो.  पर्यावरणाच्या व आरोग्याच्यादृष्टीने गुलाल हानीकारक असुन गुलालाऐवजी मंडळांनी फुलांचा वापर करण्याचे आवाहनही डॉ. शिंदे यांनी यावेळी केले.

            यावेळी उपस्थित शांतता समितीचे सदस्य तसेच विविध गणेश मंडळांच्या पदाधिकाऱ्यांनी मौलिक अशा सुचना केल्या.

            बैठकीस शांतता समितीचे सदस्य, विविध गणेश मंडळांचे पदाधिकाऱ्यांसह संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांची उपस्थिती होती.

-*-*-*-*-*-

No comments:

Post a Comment