Tuesday 23 August 2022

कुंडलिका-सीना नदीच्या पुनरुज्जीवनासाठी प्रशासनाचे सवतोपरी सहकार्य -- जिल्हाधिकारी डॉ. विजय राठोड

 




 

जालना, दि. 22 (जिमाका):- जालना जिल्हयाची जीवनवाहिनी म्हणून ओळखल्या जाणारी कुंडलिका-सीना नदीच्या पुनरुज्जीवनासाठी जिल्हा प्रशासनाच्यावतीने सर्वतोपरी प्रयत्न केले जातील. या नदीचा सविस्तर प्रकल्प अहवाल (डीपीआर) मंजुरीकरीताही शासनाकडे निश्चितपणे पाठपुरावा केला जाईल, अशी ग्वाही जिल्हाधिकारी डॉ. विजय राठोड यांनी दिली.

कुंडलिका, सीना नदीच्या डीपीआरबाबत जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली. बैठकीस अपर जिल्हाधिकारी अंकुश पिनाटे, उपजिल्हाधिकारी (रोहयो) रवींद्र परळीकर, उपविभागीय अधिकारी, संदीपान सानप, तहसिलदार श्रीकांत भुजबळ, समस्त महाजन ट्रस्टच्या नूतन देसाई, उदयोजक सुनील रायठठ्ठा, महिकोचे शिरीष बारवाले, जलतज्ञ डॉ. अजित गोखले, कुंडलिका-सीना फाऊंडेशनचे सहसचिव सुरेश केसापूरकर, किशोर पांडे, उदय शिंदे, शिवरतन मुंदडा, सुमंत पांडे, डॉ. श्रीनिवास वडगबाळकर, अविनाश निवाते आदींसह कृषी, जलसंधारण, पोकरा, नगरपालिका, सिंचन विभागाचे अधिकारी उपस्थित होते.

जिल्हाधिकारी डॉ. राठोड म्हणाले की, मागील तीन वर्षांपासून लोकसहभागातून कुंडलिका-सीना नदी स्वच्छ करण्याचे काम सुरु आहे.  या मोहिमेत सामान्य नागरिकांपासून ते व्यापारी, उदयोजक, विदयार्थी, अधिकारी, कर्मचारी यांचा सहभाग उल्लेखनीय आहे. ही नदी कायमस्वरुपी शास्त्रशुध्द पध्दतीने स्वच्छ आणि सुंदर करण्यासाठी  सर्वांच्या सूचनांची दखल घेऊन एक परिपूर्ण डिपीआर तयार केला जाईल.  ही नदी ज्या गावांतून जाते त्यानुसार गावनिहाय सुक्ष्म आराखडा तयार करुन नदी पात्राची स्वच्छता केली जाईल. त्यासाठी  शासनाच्या विविध योजनेतंर्गत कामे केली जातील. यामध्ये नदीपात्रातील गाळ काढणे, बंधारे दुरुस्त करणे तसेच नवीन बंधारे बांधणे, नदी पात्रातील कचरा काढून पात्राच्या परिसराचे सौंदर्यकरण करणे आदी कामे केली जातील. सर्व विभागांच्या समन्वयातून हे कार्य केले जाईल. कुंडलिका-सीना नदी पुनरुज्जीवनचे एक आदर्शवत मॉडेल देशाला दिशादर्शक ठरणार असेल.  या मोहिमेसाठी प्रशासनाचे संपूर्ण सहकार्य राहिल. तर उदयोजक, व्यापारी, स्वयंसेवी संस्था यांनीही सहकार्य करण्याचे आवाहन जिल्हाधिकारी यांनी यावेळी केले.

  जलतज्ञ डॉ. अजित गोखले यांनी कुंडलिका-सीना नदी पुनरुज्जीवनासाठी करण्यात येणाऱ्या कामांचे सादरीकरण केले. या नदीमध्ये  घानेवाडी, जामवाडी तलावातून पाणी येते. जालना, बदनापूर, भोकरदन तालुक्यांतील साधारण वीस गावातून या नदीचा प्रवाह आहे. सदर तलावांच्या स्वच्छतेबरोबरच गावनिहाय संबंधित योजनांच्या माध्यमातून नदी पात्राच्या स्वच्छतेसह सौंदर्यकरणाच्या कामांचा यामध्ये समावेश करण्यात आला आहे.  नदी पुनरुज्जीवनाच्या कामात सहभागी सर्वांच्या सुचनांची दखल घेऊन डिपीआर अंतिम केला जाणार आहे. यावेळी नूतन देसाई,  सुनील रायठठ्ठा, सुमंत पांडे व  शिरीष बारवाले यांनीही मार्गदर्शन केले.

-*-*-*-*-*-*-

 

No comments:

Post a Comment