Sunday 29 March 2020

परदेश, परराज्य, परजिल्ह्यातुन आलेल्या नागरिकांनी त्यांची माहिती जिल्हा प्रशासनास द्यावी - जिल्हाधिकारी रवींद्र बिनवडे



        जालना, दि. 29 – मागील एक महिन्यात जिल्ह्यातील कोणी नागरिक कोरोनाग्रस्त अथवा इतर देशातुन, राज्यातुन, इतर जिल्हा अथवा शहरामधून जालना जिल्ह्यात आला असाल तर http://ezee.app/covid19jalna या वेबलिंकवर जाऊन आपली संपूर्ण माहिती भरावी. जेणेकरुन प्रशासनाला आपली मदत करता येणे शक्य होईल, असे आवाहन जिल्हाधिकारी रवींद्र बिनवडे यांनी केले आहे.
            दि. 1 मार्च, 2020 नंतर परदेश प्रवासावरुन आलेल्या नागरिकांची आरोग्य तपासणी व आवश्यकतेनुसार अलगीकरण किंवा विलगीकरण करण्यात येणार असुन यासाठी जिल्हा स्तरावर मुख्य कार्यकारी अधिकारी यांना समन्वयक अधिकारी म्हणूननिश्चित केलेले असुन त्यांच्या अधिनस्त उपमुख्य कार्यकारी अधिकारी (पंचायत) यांची सहाय्यक अधिकारी म्हणून नेमणुक करण्यात आली आहे.  नागरिकांनी त्यांची माहिती http://ezee.app/covid19jalna या वेबलिंकवर जाऊन भरावी व प्रशासनास सहकार्य करावे.
            लॉकडाऊनमुळे अडकलेल्या मजुर, विस्थापित झालेले कामगार, परराज्यातील अडकलेले कामगार यांच्यासाठी निवारागृह, अन्न, पाणी, वैद्यकीय देखभाल आदी व्यवस्था जिल्हा प्रशासनामार्फत करण्यात येणार असुन अशा संबंधित नागरिकांनी ते आहेत त्या ठिकाणीच थांबावे. प्रवासाचा प्रयत्न न करता तालुका अथवा जिल्हा प्रशासनाला माहिती देण्याचे आवाहनही जिल्हाधिकाऱ्यांनी केले आहे.
            जिल्ह्यात जमाबंदीच्या कालावधीमध्ये अत्यावश्यक सेवा देणारी वाहने (पिण्याचे पाणी पुरवठा, सांडपाणी, निचरा व्यवस्थापन, रुग्णालये, पॅथॉलॉजी, लॅबोरोटरी, सर्व प्रकारचे दवाखाने, वैद्यकीय महाविद्यालय, किराणा सामान दुकानदार, खाद्यतेल, अन्नधान्य, दुध, दुग्ध उत्पादने,फळे, भाजीपाल्याची वाहने, गॅस, औषधालये, अत्यावश्यक सेवा देणारे शासकीय कर्मचारी, आपत्ती व्य्वस्थापन कर्मचारी, शववाहिका वसक्षम अधिकारी यांना परवाना दिलेली वाहने यांना पेट्रोल पंप चालकांनी इंधन पुरवठा करावा. तसेच जमाबंदीच्या कालावधीमध्ये कृषीशी निगडीत उपकरणांना डिझेल व पत्रकारांना पेट्रोल उपलब्ध करुन देण्याचे आदेशही जिल्हाधिकाऱ्यांनी निर्गमित केले आहेत.
            जालना जिल्ह्यामध्ये 29 मार्च, 2020 रोजी दोन रुग्ण नव्याने दाखल झाले असुन आतापर्यंत 78 रुग्ण विलगीकरण कक्षात दाखल होते.  त्यापैकी 76 रुग्णांचे स्वॅब घेण्यात आले आहेत. त्यापैकी 71 रुग्णांचे अहवाल निगेटिव्ह प्राप्त झाले असुन त्यांना डिस्चार्जही देण्यात आला आहे.  आजरोजी चार रुग्ण विलगीकरण कक्षामध्ये दाखल असुन त्यांची प्रकृती स्थिर आहे.
            रुग्णालयातुन डिस्चार्ज झालेल्या तसेच परदेशी प्रवासाचा पूर्व इतिहास असणाऱ्या सर्व व्यक्तींचे घरीच अलगीकरण करण्यात आले आहे. आजपर्यंत एकुण 110 परदेश प्रवास केलेल्या व्यक्तींपैकी 108 व्यक्तींचे घरीच अलगीकरण करण्यात आले आहे.  इतर शहरे व राज्यातुन आलेल्या 4 हजार 788 व्यक्तींची तपासणी करुन त्यांचेही घरीच अलगीकरण करण्यात आले असल्याची माहिती जिल्हाधिकाऱ्यांनी दिली आहे.
-*-*-*-*-*

Tuesday 17 March 2020

येणारे 15 दिवस अत्यावश्यक असेल तरच घराबाहेर निघा परदेशातुन आलेल्या व्यक्तींची माहिती जिल्हा प्रशासनाला द्या कोरोनाचा जिल्हयात एकही पॉझिटीव्ह रुग्ण नाही जिल्हाधिकारी रवींद्र बिनवडे यांचे आवाहन




            जालना, दिनांक 17  :-  कोरोना विषाणू प्रसार रोखण्यासाठी प्रशासनामार्फत आवश्यक त्या सर्व उपाययोजना करण्यात येत असुन नागरिकांनीही या विषाणुचा प्रसार होऊ नये यादृष्टीने येणाऱ्या पंधरा दिवसात अत्यावश्यक असेल तरच घराबाहेर पडा. परदेशातुन आलेल्या व्यक्तींची माहिती जिल्हा प्रशासनाला देण्याबरोबरच प्रत्येकाने वैयक्तिक स्वच्छता राखण्याचे आवाहन जिल्हाधिकारी रवींद्र बिनवडे यांनी केले आहे.
            जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते.  त्याप्रसंगी माध्यम प्रतिनिधींशी संवाद साधताना जिल्हाधिकारी श्री बिनवडे बोलत होते.
            यावेळी अपर जिल्हाधिकारी रवींद्र परळीकर, निवासी उपजिल्हाधिकारी निवृत्ती गायकवाड, उपजिल्हाधिकारी गणेश निऱ्हाळी, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. एम.के. राठोड, जिल्हा आरोग्य अधिकारी   डॉ. खतगावकर, तहसिलदार श्री पडघन, संतोष बनकर यांच्यासह माध्यम प्रतिनिधींची उपस्थिती होती.
जिल्हाधिकारी श्री बिनवडे म्हणाले, कोरोनाचे गांर्भीय जनतेपर्यंत पोहोचण्यासाठी सर्व माध्यमातुन जनजागृती करण्यात येत असुन गर्दी जमणाऱ्या कुठल्याही कार्यक्रमास परवानगी नाकारण्यात आलेली आहे. जिल्ह्यातील सर्व शाळा, महाविद्यालयेही बंद ठेवण्याच्या सुचना देण्याबरोबरच आठवडी बाजार, धार्मिक स्थळे, पर्यटनस्थळे बंद ठेवण्याचे आदेश निर्गमित करण्यात आलेले आहेत.  बाजारामधील जीवनाश्यक वस्तु किराणा दुकान, दुध, औषध विक्रेता, भाजीपाला आदी दुकानांना परवानगी देण्यात आली असल्याची माहितीही जिल्हाधिकाऱ्यांनी यावेळी दिली.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात क्वारंटाईनचे तीन ठिकाण निश्चित करण्यात आले असुन सर्व उप विभागीय अधिकारी व तहसिलदार यांना तालुकास्तरावर शोध घेण्याबाबत निर्देशित करण्यात आले आहे.  जिल्ह्यातील 217 उपकेंद्रावर डॉक्टर्स, .एन.एम, आशा, अंगणवाडी सेविका, तलाठी व ग्रामसेवक यांचा आराखडा तयार करण्यात येत असुन जनतेचे सर्वेक्षण करण्यात येऊन त्याबाबतच्या माहितीचे मॅपिंग करण्यात येणार असल्याची माहितीही जिल्हाधिकारी श्री बिनवडे यांनी यावेळी दिली.
सुरक्षिततेच्या दृष्टीकोनातुन एस.टी. महामंडळातील बसेस व खासगी बसेसना स्वच्छ व निर्जंतुकीकरण करण्याबरोबरच प्रवासामध्ये आजारी असलेल्या प्रवाशांची यादी तयार करुन ती प्रशासनाला सादर करण्याच्या सुचना देण्यात आल्या आहेत.  अन्न व औषधी विभागामार्फत दुकानांची तपासणी करुन औषधी उपलब्ध असल्याची खात्री करण्यात येत असुन जनतेला सॅनीटायजर व मास्क पुरेशा प्रमाणात उपलब्ध होतील याची दक्षता घेण्याचे आदेशही देण्यात आले आहेत. जिल्ह्यात दूरध्वनी,  इंटरनेट व विद्युत पुरवठा सुरळीत राहण्यासाठी सर्व संबंधित विभागाला निर्देश देण्यात आले असल्याचेही जिल्हाधिकारी  श्री बिनवडे यांनी यावेळी सांगितले.
विविध कामांसाठी नागरिकांची शासकीय कार्यालयात होणारी गर्दी टाळण्यासाठी नागरिकांची शासन दरबारी असलेली कामे करण्यासाठी कार्यालयात ड्रॉपबॉक्सची सुविधा उपलब्ध करुन देण्यात येत आहे.  तसेच  -मेल अथवा व्हॉटसअपद्वारे नागरिकांनी त्यांच्या कामासंदर्भात संदर्भात संपर्क साधावा. सात दिवसांमध्ये त्यांच्या प्रश्नाचे उत्तर देण्यात येणार असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.
कोरोनापासुन बचावासाठी प्रत्येकाने आवश्यकता असल्यासच घराबाहेर पडावे. वैयक्तिक स्वच्छतेवर भर द्यावा.  सातत्याने गरम पाणी पिणे, स्वच्छ, ताजे व पौष्टिक अन्न खावे, सातत्याने साबानाने हात धुवावेत, सर्दी खोकला, ताप असल्यास नजिकच्या प्राथमिक आरोग्य केंद्रात जाऊन आपली तपासणी करुन घ्यावी.  तसेच जनतेने जागरुक रहावे. कुठलीही माहिती लपवु नये व प्रशासनास सहकार्य करण्याचे आवाहनही जिल्हाधिकारी रवींद्र बिनवडे यांनी यावेळी केले.
 जिल्हा सामान्य रुग्णालयामध्ये दि. 12 मार्च रोजी एक रुग्ण दाखल झाला होता.  त्या रुग्णाचे रिपोर्ट निगेटीव्ह आल्याने रुग्णाला साधारण कक्षामध्ये स्थलांतरीत करण्यात आले आहे. दि. 16 मार्च रोजी एक रुग्ण जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले असुन त्याचे नमुने पुणे येथे तपासणीसाठी पाठविण्यात आले आहेत. तसेच या रुग्णाच्या सहवासात आलेल्या 34 जणांची तपासणी करुन त्यांना अलगीकरण कक्षात ठेवण्याची कार्यवाही सुरु आहे.  तसेच  दि. 17 मार्च रोजी प्रत्येकी एक रुग्ण दाखल असुन त्याचेही नमुना तपासणीसाठी पाठविण्यात आले आहेत.  या रुग्णाच्या सहवासात आलेल्या 4 जणांची तपासणी करुन अलगीकरण करण्यात येत आहे. तसेच जालना शहरातील सात व्यक्ती थायलंड येथे 5 मार्च रोजी गेल्या होत्या.  त्या व्यक्ती दि. 11 मार्च, 2020 रोजी जालना शहरात परतल्या असुन त्यापैकी पाच व्यक्तींची तपासणी करुन त्यांना घरीच अलगीकरण करण्यात आले असुन इतर दोन व्यक्ती इतर शहरात गेल्या असुन त्यांनाही सुचना देण्यात आल्या असल्याचेही जिल्हाधिकारी श्री बिनवडे यांनी यावेळी सांगितले.
*******



Friday 13 March 2020


कोरोना संशयित रुग्ण विलगीकरण कक्षात देखरेखीखाली
रुग्णाची प्रकृती समाधानकारक
नागरिकांनी घाबरुन जाता काळजी घेण्याचे आवाहन
            जालना, दि. 13 – जिल्हा रुग्णालय, जालना येथे दि. 13 मार्च, 2020 रोजी एकही संशयित रुग्ण भरती झालेला नसुन काल भरती झालेल्या रुग्णास विलगीकरण कक्षामध्ये दाखल करण्यात आले आहे. संशयित रुग्णावर विलगीकरण कक्षामध्ये विशेषतंत्र यांच्या देखरेखीखाली सेवा देण्यात येत आहे. सदरील रुग्णाचे नमुने एन.आय.व्ही. पुणे येथे तपासणीसाठी पाठविण्यात आले असुन त्याचा अहवाल अद्यापपर्यंत प्राप्त झालेला नाही. संशयित रुग्णाची प्रकृती समाधानकारक आहे. 
            नागरिकांनी घाबरुन जाता काळजी घ्यावी.  गर्दीच्या ठिकाणी, यात्रा, सार्वजनिक ठिकाणी जाणे टाळावे.  तसेच स्वच्छ पाण्याने साबनाने वारंवार हात धुवावेत.  आजारी व्यक्तीचा सहवास शक्यतो टाळावा आजारी व्यक्तीने शिंकताना, खोकताना रुमालाचा वापर करावा.  कोरोनाबात लक्षणे आढळून आल्यास तात्काळ नजीकच्या आरोग्य केंद्रात जाऊन तपासणी करावी, असे जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. एम. के. राठोड  यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे कळविले आहे.



कोरोना विषाणू संशयिताची आरोग्य यंत्रणेमार्फत तपासणी नागरिकांनी अधिक काळजी घ्यावी जिल्हा प्रशासकीय व आरोग्य यंत्रणा सज्ज - जिल्हाधिकारी रवींद्र बिनवडे



             जालना, दि. 13: कोरोना विषाणूसंदर्भात जालना येथे आढळलेल्या संशयित रुग्णाची तपासणी आरोग्य यंत्रणेमार्फत करण्यात येत असून या संदर्भात नागरिकांनी घाबरुन जाता अधिक काळजी घ्यावी. तसेच गर्दीच्या ठिकाणी जाण्याचे टाळावे, असे आवाहन जिल्हाधिकारी रवींद्र बिनवडे यांनी केले आहे.
            कोरोना विषाणुपासुन बचावासाठी प्रत्येकाने वैयक्तिक स्वच्छतेवर भर दिला पाहिजे.  सार्वजनिक गर्दीच्या ठिकाणी जाणे टाळावे.  कोरोनासंदर्भात समाजमाध्यमांद्वारे पसरविण्यात येणाऱ्या कुठल्याही अफवांवर नागरिकांनी विश्वास ठेऊ नये, या संदर्भात माहिती हवी असल्यास जिल्हा प्रशासनाशी संपर्क साधण्याचे आवाहनही जिल्हाधिकारी श्री बिनवडे यांनी केले आहे.
            कोरोना संशयित रुग्णांसाठी जिल्हा सामान्य रुग्णालयात अलगीकरण कक्ष (Isolation Ward)  तयार करण्यात आला असुन कोरोना विषाणुचा प्रसार होऊ नये यासाठी प्रशासनामार्फत आवश्यक ती खबरदारी घेण्यात येत असल्याचेही श्री बिनवडे यांनी सांगितले.
जिल्ह्यात आपत्ती व्यवस्थापन कायदा लागू
        आंतरराष्ट्रीय स्तरावर व देशांतर्गत कोरोना विषाणूबाधित रुग्ण आढळत आहेत.  त्यामुळे हा संसर्ग वाढण्याची शक्यता लक्षात घेता त्यावर तात्काळ नियंत्रण करणे व विषाणूंचे संसर्गात वाढ होऊ न देता त्यावर प्रतिबंधात्मक उपाययोजना आखणे गरजेचे असल्याने कोरोना विषाणूचा प्रसार रोखण्यासाठी  जिल्हाधिकारी तथा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे अध्यक्ष रवींद्र बिनवडे यांनी कायद्यातील कलम 30 () अन्वये जिल्ह्यात आपत्ती व्यवस्थापन कायदा लागू केला आहे. जिल्ह्यात करावयाची पूर्वतयारी व प्रत्यक्ष अंमलबजावणीसाठी Incident Commander म्हणून जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. एम.के. राठोड मो.क्र.9422215730 व जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. विवेक खतगावकर मो.क्र.9764860468 यांना सनियंत्रक म्हणून घोषित केले आहे.  त्याचबरोबर पोलीस विभाग, आरोग्य विभाग,नगर परिषद, नगर पंचायत, जिल्हा परिषद, महसुल विभाग, अन्न व औषध प्रशासन, महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ, शिक्षण विभाग आदींना जबाबदाऱ्या नेमून दिल्या असुन संबंधित विभागांनी जबाबदारी पार न पाडल्यास आपत्ती व्यवस्थापन अधिनियम 2005 मधील कलम 56 नुसार कारवाईचा इशाराही जिल्हाधिकाऱ्यांनी दिला आहे.
            कोरोनाबाबत माहितीसाठी राष्ट्रीय राज्यस्तरीय नियंत्रण कक्ष स्थापन करण्यात आले असुन राष्ट्रीय कॉल सेंटर क्रमांक 91-11-23978046 तर राज्यस्तरीय नियंत्रण कक्ष क्रमांक 020-26127394 असा असल्याची माहितीही जिल्हाधिकाऱ्यांनी यावेळी दिली.
*******



Thursday 12 March 2020

जिल्हा सामान्य रुग्णालयात संशयित रुग्ण दाखल नागरिकांनी घाबरु नये, काळजी घेण्याचे जिल्हा प्रशासनाचे आवाहन



        जालना, दि. 12 – जालना शहरामधील जिल्हा सामान्य रुग्णालयात आज दि. 12 मार्च, 2020 रोजी एक संशयित रुग्ण सर्दी, खोकला, ताप ही लक्षण घेऊन भरती झाला आहे.  सदर रुग्ण हा मुंबई पोलीस विभागात कार्यरत असुन मागील आठ दिवसापासुन त्याने पोलीस रुग्णालय, नायगाव दादर या ठिकाणी उपचार घेतलेला आहे. या रुग्णाचा थुंकी नमुना घेण्यात आला असुन तो तपासणीसाठी प्रयोगशाळेत पाठविण्यात आला आहे.  रुग्णाला विलगीकरण कक्षात दाखल करण्यात आले असुन त्याच्यावर उपचार सुरु असल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. एम.के. राठोड यांनी दिली आहे. 
नागरिकांनी घाबरु नये, काळजी घेण्याचे प्रशासनाचे आवाहन
कोरोना विषाणुबाबत नागरिकांनी घाबरुन न जाता काळजी घेण्याचे आवाहन जिल्हा प्रशासनामार्फत करण्यात आले आहे.    बाहेरून आल्यानंतर व्यवस्थित हात हँण्डवाश अथवा साबणाने स्वच्छ धुवावे. शिंक अथवा खोकला आल्यास तोंडावर हात, रूमाल किंवा टिश्यू पेपर ठेवावा. त्यानंतर टिश्यू पेपरची व्यवस्थित पणे बंद कचराकुंडीत विल्हेवाट लावावी. शक्यतो गर्दीमध्ये जाणे टाळावे. पुर्ण शिजविलेले खाद्यपदार्थ खावे. 
  अर्धवट शिजविलेले खाद्यपदार्थ खावू नये. ताप, खोकला आल्यास डॉक्टरकडे जाण्यासाठी टाळाटाळ करू नये. कुठल्याही वस्तूच्या पृष्ठभागावरून लागलीच हात तोंडाला लावू नये. कुठेही थुंकू नये, नागरिकांनी घाबरून जावू नये. पाळीव प्राण्यांना अस्वच्छ ठेवू नये. नागरिकांनी योग्य ती काळजी घेण्याचे आवाहन प्रशासनामार्फत करण्यात आले आहे. 
*******