Friday 13 March 2020

कोरोना विषाणू संशयिताची आरोग्य यंत्रणेमार्फत तपासणी नागरिकांनी अधिक काळजी घ्यावी जिल्हा प्रशासकीय व आरोग्य यंत्रणा सज्ज - जिल्हाधिकारी रवींद्र बिनवडे



             जालना, दि. 13: कोरोना विषाणूसंदर्भात जालना येथे आढळलेल्या संशयित रुग्णाची तपासणी आरोग्य यंत्रणेमार्फत करण्यात येत असून या संदर्भात नागरिकांनी घाबरुन जाता अधिक काळजी घ्यावी. तसेच गर्दीच्या ठिकाणी जाण्याचे टाळावे, असे आवाहन जिल्हाधिकारी रवींद्र बिनवडे यांनी केले आहे.
            कोरोना विषाणुपासुन बचावासाठी प्रत्येकाने वैयक्तिक स्वच्छतेवर भर दिला पाहिजे.  सार्वजनिक गर्दीच्या ठिकाणी जाणे टाळावे.  कोरोनासंदर्भात समाजमाध्यमांद्वारे पसरविण्यात येणाऱ्या कुठल्याही अफवांवर नागरिकांनी विश्वास ठेऊ नये, या संदर्भात माहिती हवी असल्यास जिल्हा प्रशासनाशी संपर्क साधण्याचे आवाहनही जिल्हाधिकारी श्री बिनवडे यांनी केले आहे.
            कोरोना संशयित रुग्णांसाठी जिल्हा सामान्य रुग्णालयात अलगीकरण कक्ष (Isolation Ward)  तयार करण्यात आला असुन कोरोना विषाणुचा प्रसार होऊ नये यासाठी प्रशासनामार्फत आवश्यक ती खबरदारी घेण्यात येत असल्याचेही श्री बिनवडे यांनी सांगितले.
जिल्ह्यात आपत्ती व्यवस्थापन कायदा लागू
        आंतरराष्ट्रीय स्तरावर व देशांतर्गत कोरोना विषाणूबाधित रुग्ण आढळत आहेत.  त्यामुळे हा संसर्ग वाढण्याची शक्यता लक्षात घेता त्यावर तात्काळ नियंत्रण करणे व विषाणूंचे संसर्गात वाढ होऊ न देता त्यावर प्रतिबंधात्मक उपाययोजना आखणे गरजेचे असल्याने कोरोना विषाणूचा प्रसार रोखण्यासाठी  जिल्हाधिकारी तथा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे अध्यक्ष रवींद्र बिनवडे यांनी कायद्यातील कलम 30 () अन्वये जिल्ह्यात आपत्ती व्यवस्थापन कायदा लागू केला आहे. जिल्ह्यात करावयाची पूर्वतयारी व प्रत्यक्ष अंमलबजावणीसाठी Incident Commander म्हणून जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. एम.के. राठोड मो.क्र.9422215730 व जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. विवेक खतगावकर मो.क्र.9764860468 यांना सनियंत्रक म्हणून घोषित केले आहे.  त्याचबरोबर पोलीस विभाग, आरोग्य विभाग,नगर परिषद, नगर पंचायत, जिल्हा परिषद, महसुल विभाग, अन्न व औषध प्रशासन, महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ, शिक्षण विभाग आदींना जबाबदाऱ्या नेमून दिल्या असुन संबंधित विभागांनी जबाबदारी पार न पाडल्यास आपत्ती व्यवस्थापन अधिनियम 2005 मधील कलम 56 नुसार कारवाईचा इशाराही जिल्हाधिकाऱ्यांनी दिला आहे.
            कोरोनाबाबत माहितीसाठी राष्ट्रीय राज्यस्तरीय नियंत्रण कक्ष स्थापन करण्यात आले असुन राष्ट्रीय कॉल सेंटर क्रमांक 91-11-23978046 तर राज्यस्तरीय नियंत्रण कक्ष क्रमांक 020-26127394 असा असल्याची माहितीही जिल्हाधिकाऱ्यांनी यावेळी दिली.
*******



No comments:

Post a Comment