Sunday 29 March 2020

परदेश, परराज्य, परजिल्ह्यातुन आलेल्या नागरिकांनी त्यांची माहिती जिल्हा प्रशासनास द्यावी - जिल्हाधिकारी रवींद्र बिनवडे



        जालना, दि. 29 – मागील एक महिन्यात जिल्ह्यातील कोणी नागरिक कोरोनाग्रस्त अथवा इतर देशातुन, राज्यातुन, इतर जिल्हा अथवा शहरामधून जालना जिल्ह्यात आला असाल तर http://ezee.app/covid19jalna या वेबलिंकवर जाऊन आपली संपूर्ण माहिती भरावी. जेणेकरुन प्रशासनाला आपली मदत करता येणे शक्य होईल, असे आवाहन जिल्हाधिकारी रवींद्र बिनवडे यांनी केले आहे.
            दि. 1 मार्च, 2020 नंतर परदेश प्रवासावरुन आलेल्या नागरिकांची आरोग्य तपासणी व आवश्यकतेनुसार अलगीकरण किंवा विलगीकरण करण्यात येणार असुन यासाठी जिल्हा स्तरावर मुख्य कार्यकारी अधिकारी यांना समन्वयक अधिकारी म्हणूननिश्चित केलेले असुन त्यांच्या अधिनस्त उपमुख्य कार्यकारी अधिकारी (पंचायत) यांची सहाय्यक अधिकारी म्हणून नेमणुक करण्यात आली आहे.  नागरिकांनी त्यांची माहिती http://ezee.app/covid19jalna या वेबलिंकवर जाऊन भरावी व प्रशासनास सहकार्य करावे.
            लॉकडाऊनमुळे अडकलेल्या मजुर, विस्थापित झालेले कामगार, परराज्यातील अडकलेले कामगार यांच्यासाठी निवारागृह, अन्न, पाणी, वैद्यकीय देखभाल आदी व्यवस्था जिल्हा प्रशासनामार्फत करण्यात येणार असुन अशा संबंधित नागरिकांनी ते आहेत त्या ठिकाणीच थांबावे. प्रवासाचा प्रयत्न न करता तालुका अथवा जिल्हा प्रशासनाला माहिती देण्याचे आवाहनही जिल्हाधिकाऱ्यांनी केले आहे.
            जिल्ह्यात जमाबंदीच्या कालावधीमध्ये अत्यावश्यक सेवा देणारी वाहने (पिण्याचे पाणी पुरवठा, सांडपाणी, निचरा व्यवस्थापन, रुग्णालये, पॅथॉलॉजी, लॅबोरोटरी, सर्व प्रकारचे दवाखाने, वैद्यकीय महाविद्यालय, किराणा सामान दुकानदार, खाद्यतेल, अन्नधान्य, दुध, दुग्ध उत्पादने,फळे, भाजीपाल्याची वाहने, गॅस, औषधालये, अत्यावश्यक सेवा देणारे शासकीय कर्मचारी, आपत्ती व्य्वस्थापन कर्मचारी, शववाहिका वसक्षम अधिकारी यांना परवाना दिलेली वाहने यांना पेट्रोल पंप चालकांनी इंधन पुरवठा करावा. तसेच जमाबंदीच्या कालावधीमध्ये कृषीशी निगडीत उपकरणांना डिझेल व पत्रकारांना पेट्रोल उपलब्ध करुन देण्याचे आदेशही जिल्हाधिकाऱ्यांनी निर्गमित केले आहेत.
            जालना जिल्ह्यामध्ये 29 मार्च, 2020 रोजी दोन रुग्ण नव्याने दाखल झाले असुन आतापर्यंत 78 रुग्ण विलगीकरण कक्षात दाखल होते.  त्यापैकी 76 रुग्णांचे स्वॅब घेण्यात आले आहेत. त्यापैकी 71 रुग्णांचे अहवाल निगेटिव्ह प्राप्त झाले असुन त्यांना डिस्चार्जही देण्यात आला आहे.  आजरोजी चार रुग्ण विलगीकरण कक्षामध्ये दाखल असुन त्यांची प्रकृती स्थिर आहे.
            रुग्णालयातुन डिस्चार्ज झालेल्या तसेच परदेशी प्रवासाचा पूर्व इतिहास असणाऱ्या सर्व व्यक्तींचे घरीच अलगीकरण करण्यात आले आहे. आजपर्यंत एकुण 110 परदेश प्रवास केलेल्या व्यक्तींपैकी 108 व्यक्तींचे घरीच अलगीकरण करण्यात आले आहे.  इतर शहरे व राज्यातुन आलेल्या 4 हजार 788 व्यक्तींची तपासणी करुन त्यांचेही घरीच अलगीकरण करण्यात आले असल्याची माहिती जिल्हाधिकाऱ्यांनी दिली आहे.
-*-*-*-*-*

No comments:

Post a Comment