Saturday 30 April 2022

जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रांगणात जिल्हाधिकारी डॉ. विजय राठोड यांच्या हस्ते ध्वजारोहण संपन्न

 



           जालना, दि. 1 (जिमाका):- - महाराष्ट्र राज्य स्थापनेच्या 62 व्या वर्धापन दिनानिमित्त जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रांगणात जिल्हाधिकारी डॉ. विजय राठोड यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी अपर जिल्हाधिकारी अंकुश पिनाटे, अतिरिक्त पोलीस अधीक्षक विक्रांत देशमुख, निवासी उपजिल्हाधिकारी केशव नेटके, उपजिल्हाधिकारी (रोहयो) रविंद्र परळीकर, उपजिल्हाधिकारी गणेश निऱ्हाळी, उप विभागीय अधिकारी संदीपान सानप, उपजिल्हाधिकारी (सामान्य प्रशासन) शर्मिला भोसले, उपजिल्हा निवडणुक अधिकारी ज्ञानोबा बानापुरे, तहसिलदार श्रीकांत भुजबळ, प्रशांत पडघन  यांच्यासह प्रशासकीय इमारतीमधील सर्व शासकीय कार्यालयातील अधिकारी, कर्मचारी, महिला कर्मचारी यांच्यासह नागरिक उपस्थित होते.

-*-*-*-*-*-

महाराष्ट्र दिनानिमित्त पालकमंत्री राजेश टोपे यांच्या हस्ते मुख्य शासकीय ध्वजारोहण संपन्न कोरोनापासुन सुरक्षिततेसाठी लसीकरण मोहिमेत सक्रिय सहभाग नोंदवा - पालकमंत्री राजेश टोपे यांचे आवाहन · जिल्ह्यात आरोग्य क्षेत्रात भरीव कामगिरी · जालन्यात कँसर युनिट व कॅथलॅब उभारणीस मंजुरी · शिक्षण व्यवस्था अधिक दर्जेदार करण्यावर भर · शेतकऱ्यांच्या हितासाठी कृषि विभागाच्या योजनांची प्रभावी अंमलबजावणी

 


          



 

            जालना, दि. 1 (जिमाका):- सध्या कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाला असला अजूनही सावधगिरी बाळगणे गरजेचे आहे.  कोरोनाच्या संकटातून मुक्त होऊन सर्वांना सुरक्षित ठेवण्यासाठी प्रत्येकाने कोव्हीड अनुषंगिक वर्तणुकीचे पालन करण्याबरोबरच कोव्हीड प्रतिबंधात्मक लस घेऊन लसीकरणाच्या मोहिमेत सक्रिय सहभाग नोंदविण्याचे आवाहन राज्याचे सार्वजनिक आरोग्य व कुटूंब कल्याण मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री राजेश टोपे यांनी केले.

            महाराष्ट्र दिनाच्या 62 व्या वर्धापन दिनानिमित्त पोलीस मुख्यालयाच्या मैदानावर पालकमंत्री राजेश टोपे यांच्या हस्ते मुख्य शासकीय ध्वजारोहण संपन्न झाले. त्याप्रसंगी जनतेला उद्देशुन शुभेच्छा संदेश देताना ते बोलत होते.

            याप्रसंगी माजी आमदार अर्जूनराव खोतकर, जिल्हाधिकारी डॉ. विजय राठोड, जिल्हा पोलीस अधीक्षक हर्ष पोद्दार, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मनुज जिंदल, अपर जिल्हाधिकारी अंकुश पिनाटे, अतिरिक्त पोलीस अधीक्षक विक्रांत देशमुख, निवासी उपजिल्हाधिकारी केशव नेटके, उपजिल्हाधिकारी (रोहयो) रविंद्र परळीकर, उपजिल्हाधिकारी गणेश निऱ्हाळी, उप विभागीय अधिकारी संदीपान सानप, उपजिल्हाधिकारी (सामान्य प्रशासन) शर्मिला भोसले, उपजिल्हा निवडणुक अधिकारी ज्ञानोबा बानापुरे, जिल्हा शल्य‍ चिकित्सक डॉ. अर्चना भोसले, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. विवेक खतगावकर, तहसिलदार श्रीकांत भुजबळ, प्रशांत पडघन  आदींची उपस्थिती होती.

 

 

कोरोनापासुन सुरक्षिततेसाठी लसीकरण मोहिमेत सक्रिय सहभाग नोंदवा

            पालकमंत्री राजेश टोपे म्हणाले, गत दोन वर्षात कोरोना महामारीच्या काळात संघर्ष करत या महामारीतून मुक्त होण्यासाठी सर्वांनी मोठा लढा दिला.  आजघडीला कमी झालेला कोरोनाचा आलेख काही प्रमाणात वाढत असल्याने या संकटातुन मुक्त होऊन सर्वांना सुरक्षित रहाण्यासाठी कोव्हीड प्रतिबंधात्मक लस प्रत्येकाने टोचुन घेणे गरजेचे आहे.                १२ ते 15 तसेच 15 ते 17 आणि १८ वर्षावरील प्रत्येक लाभार्थ्यानी कोरोनापासुन सुरक्षित राहण्यासाठी लस टोचुन घ्यावी.  6 ते 12 वयोगटातील लाभार्थ्यांना लस देण्याची मुभा भारत सरकारने दिली असुन प्रत्येक पालकाने आपल्या पात्र पाल्यांना कोरोना प्रतिबंधक लसीचा डोस मनामध्ये कुठलीही शंका न बाळगता टोचुन घेत या संकटापासुन सुरक्षित राहण्यासाठी प्राधान्याने लस टोचुन घेण्याचे आवाहनही पालकमंत्री श्री टोपे यांनी यावेळी केले.  

जिल्ह्यात आरोग्य क्षेत्रात भरीव कामगिरी

            जालना जिल्ह्यातील जनतेला आरोग्याच्या सेवा अधिक चांगल्या मिळाव्यात यासाठी आरोग्य क्षेत्रात भरीव काम केले असल्याचे सांगत पालकमंत्री राजेश टोपे म्हणाले, जिल्हा सामान्य रुग्णालयात खासगी रुग्णालयाच्या तोडीच्या सेवा उपलब्ध करून देण्यात येऊन अत्याधुनिक अतिदक्षता विभाग, शस्त्रक्रियागृह, ऑक्सिजन प्लँट आदींसह जिल्हा सामान्य रुग्णालयाचा चेहरा मोहरा बदलण्याचे काम करण्यात आले आहे. केवळ जिल्ह्याच्या ठिकाणीच नव्हे तर तालुका व ग्रामीण स्तरावरही आरोग्य सेवेचे सक्षमीकरण करण्यात आले आहे. या ठिकाणी खाटांच्या क्षमतेमध्ये वृद्धी, आवश्यक साधनसामुग्री, मनुष्यबळ, रुग्णवाहिका आदी सेवा उपलब्ध करुन देण्यात आल्या आहेत. महानगरामध्ये असलेल्या खासगी रुग्णालयांतील स्वच्छतेच्या बरोबरीने जिल्ह्यातील सर्व ग्रामीण, जिल्हा रुग्णालय तसेच महिला रुग्णालयातील स्वच्छतेचा दर्जा अधिक प्रमाणात सुधारावा यासाठी विशेष निधी मंजूर करुन स्वच्छतेचे काम करण्यात येत असल्याचेही पालकमंत्री राजेश टोपे यांनी यावेळी सांगितले.

 

जालन्यात कँसर युनिट व कॅथलॅब उभारणीस मंजुरी

            कर्करोगग्रस्त रुग्णांना उपचारासाठी महानगरामध्ये  जावे लागते.  जालना जिल्ह्यातील रुग्णांना वेळेत उपचार मिळावेत यासाठी जालना जिल्ह्यासाठी कँसर युनिट मंजुरीचा नुकताच निर्णय मंत्रीमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला आहे.  या सुविधेमुळे रुग्णांची वेळेत तपासणी तसेच उपचार घेणे सोईचे होणार आहे.  आजघडीला हृदयाच्याबाबतीतल्या अनेक समस्या नागरिकांना भेडसावत आहेत.  हृदयाच्याबाबतीतल्या सर्व तपासण्या मोफत स्वरूपात उपलब्ध व्हाव्यात यासाठी जालना येथे कॅथलॅब उभारणीसाठीही मंजुरी मिळाली असल्याचेही पालकमंत्री राजेश टोपे यांनी यावेळी सांगितले.

शिक्षण व्यवस्था अधिक दर्जेदार करण्यावर भर

            आरोग्याबरोबरच शिक्षणही तेवढेच महत्वाचे आहे.  जालना जिल्ह्यात शिक्षण व्यवस्था अधिक चांगली व दर्जेदार करण्यावरही भर देण्यात येत आहे. जालना जिल्ह्यात जिल्हा परिषदेच्या शाळेमध्ये प्रत्येक इयत्तेसाठी स्वतंत्र वर्ग व्हावा व मुलांना चांगले शिक्षण मिळावे यासाठी शिक्षण विभागाव्यतिरिक्त जिल्हा नियोजन मंडळाच्या माध्यमातुन अधिकचा निधी मंजूर करुन शाळाखोल्यांची उभारणी करण्यात येत आहे.  जिल्ह्यातील बेरोजगारांना कौशल्यावर आधारित प्रशिक्षणही देण्यात येत असुन मुख्यमंत्री महाआरोग्य  कौशल्य विकास कार्यक्रम या योजनेतुन आरोग्य क्षेत्रात काम करण्यास पात्रताधारक व इच्छुक असलेल्या युवक-युवतींना प्रशिक्षण देण्यात येत आहे.  जालना जिल्ह्यात आवश्यक असलेल्या कौशल्ययुक्त मनुष्यबळासाठी अधिकाधिक प्रशिक्षण सत्रांची सुरुवात करण्यात यावी. शासनामार्फत या प्रशिक्षण सत्रांना आवश्यक ते सर्व सहकार्य करण्याची ग्वाहीही पालकमंत्री श्री टोपे यांनी यावेळी दिली.

            मागासप्रवर्गातील लाभार्थ्यांना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी सामाजिक न्याय विभागांतर्गत विविध योजनांच्या माध्यमातुन काम करण्यात येत आहे. जिल्ह्यातील एकही मागासवर्गीय घरापासुन वंचित राहू नये तसेच प्रत्येकाला त्याच्या स्वत:चे व हक्काचे घर मिळावे यासाठी चालू वर्षात राज्यात सर्वाधिक म्हणजेच 11 हजार 600 घरकुले मंजूर करुन घेण्यात आली आहेत.  तसेच मागासवर्गीयांसाठी विविध महामंडळांमार्फत राबविण्यात येणाऱ्या योजना, सफाई कामगारांसाठी हिताच्या योजना, आंतरजातीय विवाहास प्रोत्साहनपर आर्थिक सहाय्य योजना, ज्येष्ठ नागरीकांसाठी मातोश्री वृद्धाश्रम योजना, कन्यादान योजनेंतर्गत सामुहिक विवाह सोहळा योजना आणि बार्टीचे विविध मोफत प्रशिक्षण कार्यक्रम यासह इतर योजनांचा लाभार्थ्यांनी लाभ घेण्याचे आवाहनही पालकमंत्री राजेश टोपे यांनी यावेळी केले.

शेतकऱ्यांच्या हितासाठी कृषि विभागाच्या योजनांची प्रभावी अंमलबजावणी

            भारत हा कृषिप्रधान देश आहे. राज्यासह जिल्ह्याचे अर्थकारण शेतीवरच अवलंबून आहे.  शेतकऱ्यांच्या उत्पादनात वाढ होऊन त्यांचे जीवनमान उंचावण्यासाठी कृषि विभागामार्फत शेतकऱ्यांच्या हिताच्या अनेक योजना राबविण्यात येत असल्याचे सांगत नानाजी देशमुख कृषि संजीवनी प्रकल्प हा शेतकऱ्यांसाठी अत्यंत उपयुक्त आहे. या प्रकल्पांतर्गत जिल्ह्यातील 363 गावांची निवड करण्यात आली आहे.  या प्रकल्पाच्या माध्यमातुन 50 हजार शेतकऱ्यांना लाभ देण्यात येऊन 343 कोटी रुपयांचा निधी शेतकऱ्यांना वाटप करण्यात आला आहे.  या योजनेत जालना जिल्हा राज्यात दुसऱ्या क्रमांकावर आहे. शेतकऱ्यांना शेतीमध्ये जाण्यासाठी रस्ता अत्यंत महत्वाचा आहे.  शेतातील पिकांना योग्यवेळी बाजारात नेण्यास या रस्त्यांमुळे मदत होणार असल्याने राज्य शासनाने मातोश्री ग्रामसमृद्धी शेत-पाणंद रस्ते योजना सुरु केली आहे. जालना जिल्ह्यात या योजनेंतर्गत 993 रस्ते मंजुर झाले असुन या रस्त्यांची कामे तातडीने पुर्ण करण्यात येणार आहेत.  शेतकऱ्यांच्या हितासाठी कृषि विभागाच्या योजनांची जिल्ह्यात प्रभावीपणे अंमलबजावणी करण्याबरोबरच लोकप्रतिनिधी व अधिकाऱ्यांनी समन्वयाने तसेच एकदिलाने काम करण्याची गरज असल्याचेही पालकमंत्री राजेश टोपे यावेळी म्हणाले.

            जलजीवन मिशन अंतर्गत सर्व गावे, वाड्या-वस्त्यांना प्रतिदिन ५५ लिटर दरडोईनुसार पाणी पुरवठा करण्याचे राष्ट्रीय धोरण असुन या अंतर्गत जिल्ह्यातील 629 गावांचा समावेश करण्यात आला आहे. ही कामेही वेगाने केली जाणार आहेत.

सामाजिक न्याय विभागाच्या स्टॉलचा शुभारंभ

            सामाजिक न्याय विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या विविध योजनांची माहिती सर्वसामान्य जनतेला व्हावी यादृष्टीने उभारण्यात आलेल्या स्टॉलचा शुभारंभ पालकमंत्री राजेश टोपे यांच्या हस्ते फित कापून करण्यात आला.  यावेळी सर्व मान्यवरांसह समाजकल्याण विभागाचे सहाय्यक आयुक्त अमित घवले उपस्थित होते.


              यावेळी पालकमंत्री श्री टोपे यांनी उपस्थित स्वातंत्र्यसैनिक,नागरिक, पदाधिकारी अधिकाऱ्यांच्या भेटी घेऊन भारतीय स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छाही दिल्या.

            यावेळी चंदीगड येथे अश्वारोहन स्पर्धेत महाराष्ट्र राज्याने प्रथम पुरस्कार प्राप्त करत सुवर्ण पदक मिळविल्याबद्दल जिल्हा पोलीस अधीक्षक हर्ष पोद्दार यांना पालकमंत्र्यांच्या हस्ते पदक बहाल करण्यात आले. तसेच पोलीस दलातील विविध अधिकारी, कर्मचाऱ्यांचाही यावेळी सन्मान करण्यात आला.   तसेच कोव्हीड19 मध्ये कर्तव्य बजावत असताना मृत्यू पावलेल्या श्रीमती नलिनी उमाकांत पुरी यांच्या वारसांना 50 लक्ष रुपयांचा धनादेशही पालकमंत्र्यांच्या हस्ते वितरित करण्यात आला.

            कार्यक्रमास पदाधिकारी, अधिकारी, कर्मचारी यांच्यासह नागरिकांची उपस्थिती होती.

-*-*-*-*-*-*-*-

Wednesday 27 April 2022

वृक्ष लागवडीच्या उद्दिष्ट पूर्तीसाठी काटेकोर नियोजन करा - जिल्हाधिकारी डॉ. विजय राठोड

 



        जालना, दि. 27 (जिमाका):-  जागतिक स्तरावर उष्णतेमध्ये सातत्याने वाढ होत आहे. वाढणारे प्रदुषण रोखून पर्यावरणाचा समतोल राखला जावा यासाठी वृक्ष लागवड ही काळाजी गरज बनली आहे. येत्या पावसाळयात जालना जिल्ह्यात अधिकाधिक वृक्षांची लागवड करुन जिल्ह्याला देण्यात आलेल्या उद्दिष्टपूर्तीसाठी प्रत्येक विभागाने वृक्ष लागवडीचे काटेकोर नियोजन करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी डॉ. विजय राठोड यांनी दिले.

            वृक्ष लागवडी संदर्भात जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात आढावा बैठकीचे आयोजन करण्यात आले होते.  त्याप्रसंगी उपस्थित अधिकाऱ्यांना मार्गदर्शन करताना जिल्हाधिकारी डॉ. राठोड बोलत होते.

            यावेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मनुज जिंदल, उपजिल्हाधिकारी (रोहयो) रविंद्र परळीकर, कार्यकारी अभियंता श्री डाकोरे आदींची प्रमुख उपस्थिती होती.

            गत वर्षात प्रत्येक विभागाला देण्यात आलले वृक्ष लागवडीचे उद्दिष्ट पूर्ण केल्याबद्दल सर्व विभाग प्रमुखांचे अभिनंदन करुन जिल्हाधिकारी डॉ. राठोड म्हणाले की, या वर्षात जालना जिल्ह्याला 82 लक्ष 55 हजार 600 वृक्ष लागवडीचे उद्दिष्ट देण्यात आले आहे.  जालना जिल्ह्याला देण्यात आलेल्या उद्दिष्टापेक्षा अधिकची वृक्ष लागवड करण्यासाठी प्रत्येक विभागाने वृक्ष लागवडीचे काटोकोर नियोजन करावे.  ज्या शासकीय विभागांना वृक्ष लागवडीसाठी जागा उपलब्ध आहे अशांनी त्या जागेत वृक्ष लागवड करावी.  तसेच ज्यांना जागा उपलब्ध नसेल त्यांनी शासकीय खुली जागा, रस्त्याच्या दुतर्फा वृक्ष लागवड करावी. कमी जागेमध्ये अधिक वृक्षांची लागवड करण्यासाठी अटल आनंद घनवन अत्यंत उपयुक्त असुन जिल्ह्यात अधिकाधिक अटल आनंद घनवन निर्मितीसाठी प्रयत्न करण्यात यावेत. वृक्ष लागवडीसाठी आवश्यक असणारे खड्डे जुनपूर्वी खोदल्या जातील, याचीही दक्षता घेण्याचे निर्देशही जिल्हाधिकारी डॉ. राठोड यांनी यावेळी दिले.

            वृक्ष लागवड करताना वृक्ष लागवडीची माहिती ऑनलाईन पद्धतीने अपलोड करणेही तेवढेच गरजेचे आहे. अनेक शासकीय कार्यालयामार्फत वृक्ष लागवड केल्यानंतर ऑनलाईन माहिती अपलोड करण्यात येत नाही. ऑनलाईन माहिती अपलोड करण्यासंदर्भात काही समस्या, अडचणी असतील तर त्या संबंधित विभागाशी संपर्क साधुन त्यांचा निपटारा करुन घेण्यात यावा. वृक्ष लागवडीनंतर माहिती ऑनलाईन पद्धतीने अपलोड होईल, याची नोंद घेण्याच्या सूचना देत विभागनिहाय वृक्ष लागवडीचा आढावाही जिल्हाधिकारी डॉ. राठोड यांनी यावेळी घेतला. उपजिल्हाधिकारी (रोहयो) रविंद्र परळीकर यांनी पॉवर पॉईंटच्या माध्यमातुन वृक्ष लागवडीची माहिती दिली.

            बैठकीस शासकीय यंत्रणेचे प्रमुख अधिकारी उपस्थित होते.

-*-*-*-*-*-

Friday 22 April 2022

खरीप हंगामात शेतकऱ्यांना मुबलक बियाणे व खतांचा पुरवठा करावा - कृषी मंत्री दादाजी भुसे बोगस बियाणे व खतांची विक्री करणाऱ्यांवर कडक कारवाई करा सेंद्रीय खतांच्या वापरावर भर द्या शेतकऱ्यांना वेळेत पीककर्ज उपलब्ध करुन द्या. जालन्याच्या सीड हबचा प्रश्न लवकरच मार्गी लावणार





 



            सुधारित

वृत्त क्र. 351                                                                                                                 दि. 22.4.2022  

 

खरीप हंगामात शेतकऱ्यांना मुबलक बियाणे व खतांचा पुरवठा करावा

- कृषी मंत्री दादाजी भुसे

बोगस बियाणे व खतांची विक्री करणाऱ्यांवर कडक कारवाई करा

सेंद्रीय खतांच्या वापरावर भर द्या

शेतकऱ्यांना वेळेत पीककर्ज उपलब्ध करुन द्या.

जालन्याच्या सीड हबचा प्रश्न लवकरच मार्गी लावणार

            जालना, दि.22,(जिमाका):-  खरीप हंगामामध्ये शेतकऱ्यांना मुबलक प्रमाणात बियाणे व खतांचा वेळेत पुरवठा करावा.  गुणनियंत्रण विभागाने अधिक दक्ष राहून बोगस बियाणे, रासायनिक खतांची विक्री होणार नाही याची काळजी घ्यावी. बोगस बियाणे, खतांची विक्री करणाऱ्याबरोबरच उत्पादक कंपनी व संचालकांवर फौजदारी गुन्हे दाखल करण्याचे निर्देश राज्याचे कृषी व माजी सैनिक कल्याण मंत्री दादाजी भुसे यांनी आज येथे दिले.

            जालना येथील जिल्हाधिकारी कार्यालयातील जिल्हा नियोजन समितीच्या सभागृहात औरंगाबाद विभागाच्या खरीप हंगाम आढावा बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. त्याप्रसंगी उपस्थित अधिकाऱ्यांना मार्गदर्शन करताना  श्री. भुसे बोलत होते.

    यावेळी राज्याचे सार्वजनिक आरोग्य व कुटूंब कल्याण मंत्री तथा जालना जिल्ह्याचे पालकमंत्री राजेश टोपे, माजी मंत्री अर्जुनराव खोतकर, कृषि विभागाचे प्रधान सचिव एकनाथ डवले, कृषि विभागाचे आयुक्त धीरजकुमार, औरंगाबादचे जिल्हाधिकारी सुनिल चव्हाण, जालन्याचे प्र. जिल्हाधिकारी अंकुश पिनाटे, बीडचे प्र. जिल्हाधिकारी तुषार ठोंबरे, जालना जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मनुज जिंदल, औरंगाबादचे मुख्य कार्यकारी अधिकारी निलेश गटने, बीडचे मुख्य कार्यकारी अधिकारी अजित पवार, निविष्ठा व गुणनियंत्रण संचालक दिलीप झेंडे, संचालक (फलोत्पादन) कृषि आयुक्तालय कैलास मोते, संचालक (विस्तार व प्रशिक्षण) विकास पाटील, संचालक (आत्मा) दशरथ तांभाळे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी भीमराव रणदिवे आदींची प्रमुख उपस्थिती होती.

नाविन्यपुर्ण पीक घेणाऱ्या शेतकऱ्यांची माहिती द्या

राज्यासाठी केंद्र सरकारने 45 लक्ष मेट्रिक टन रासायनिक खतांचे आवटंन मंजूर केले आहे. हे मंजूर आवंटन वाढवावे व त्यानुसार एप्रिल, मे, जूनमध्ये हे आवंटन उपलब्ध व्हावे यासाठी  केंद्रीय कृषि मंत्री तसेच सचिवांची भेट घेऊन निवेदन देण्यात आले असल्याचे सांगत कृषी मंत्री दादाजी भुसे म्हणाले की, शेतकऱ्यांना बियाणे तसेच खतांची कमतरता भासणार नाही, यादृष्टीने नियोजन करण्यात आले आहे.  विकेल ते पिकेल या मुख्यमंत्री महोदयांच्या संकल्पनेनुसार नाविन्यपूर्ण पीकांच्या उत्पादनावर भर देण्यात येत आहे. शेतकऱ्यांच्या उत्पादनामध्ये भर पडून त्यांच्या आर्थिक उत्पन्नात भर पडण्यात मदत होण्यासाठी  प्रत्येक तालुक्यामध्ये नाविन्यपुर्ण असे उत्पादन घेणाऱ्या शेतकऱ्यांची माहिती तालुक्यातील इतर शेतकऱ्यांना देण्याच्या सुचनाही कृषि मंत्री श्री भुसे यांनी यावेळी दिल्या.

सेंद्रीय खतांच्या वापरावर भर द्या

शेतकऱ्यांना सोयाबीन बियाण्यांची कमतरता भासणार नाही, याची काळजी घेण्यात येत असुन आजघडीला मोठ्या प्रमाणात रासायनिक खतांचा वापर करण्यात येत आहे. रासायनिक खतांच्या अतिवापरामुळे गंभीर दुष्परिणाम होत असल्याने आवश्यक तेवढाच रासायनिक खतांचा वापर करण्यात यावा. रासायनिक खताला पर्याय म्हणुन सेंद्रीय खतांच्या वापरावर भर देण्याच्या सुचनाही कृषी मंत्री श्री भुसे यांनी यावेळी केल्या.

शेतकऱ्यांना वेळेत पीककर्ज उपलब्ध करुन द्या.

शेतकऱ्यांना शेतीच्या मशागतीसाठी पीककर्जाची आवश्यकता असते.  शेतकऱ्यांना वेळेत पीककर्ज मिळाले तरच त्याचा फायदा होत असल्याने जिल्हाधिकाऱ्यांनी पीककर्जासंदर्भात तातडीने विविध बँकांसोबत बैठका घेऊन कर्जवाटपाचा आढावा घेण्यात यावा.  जिल्ह्याला देण्यात आलेले पीककर्जाचे उद्दिष्ट पुर्ण होईल, यादृष्टीने प्रयत्न करण्यात यावेत.  शेतकऱ्यांच्या शेतीपंपाला मुबलक प्रमाणात वीज पुरवठा होईल, यादृष्टीनेही विद्युत विभागाने नियोजन करण्याच्या सुचनाही त्यांनी यावेळी केल्या.

गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजनेतील प्रस्ताव तातडीने निकाली काढा

 

अपघाती मृत्यू झालेल्या शेतकऱ्यांच्या वारसांना मदत मिळावी यासाठी कै. गोपीनाथ मुंडे अपघात विमा योजना सुरु करण्यात आली आहे.  या योजनेसंदर्भात सर्व शासकीय अधिकारी तसेच विमा कंपनीच्या अधिकाऱ्यांनी अत्यंत संवेदनशिल राहून काम करण्याची गरज आहे. या योजनेंतर्गत प्रलंबित असलेले प्रस्ताव तातडीने निकाली काढण्यात यावेत.  या प्रकरणांमध्ये जाणुनबुजुन प्रस्ताव प्रलंबित ठेवणाऱ्यांवर कारवाई करण्याचे निर्देशही मंत्री श्री. भुसे यांनी यावेळी दिले.

जालन्याच्या सीडहबचा प्रश्न लवकरच मार्गी लावणार

      जालना जिल्ह्यात रेशीमचे काम अत्यंत समाधानकारक असुन अधिकाधिक शेतकऱ्यांनी रेशीम शेतीकडे वळावे यासाठी जिल्ह्यात रेशीम शेतीला अधिक चालना देण्यासाठी प्रयत्न करण्यात येणार असल्याचे सांगत जालन्यातील सीडहबचा प्रश्न प्रलंबित आहे. जालन्यामध्ये सीडहब होण्यासाठी उद्योग मंत्री सुभाष देसाई यांच्या उपस्थितीमध्ये बैठक घेऊन लवकरच हा प्रश्न मार्गी लावण्यात येणार असल्याचेही मंत्री श्री भुसे यांनी यावेळी सांगितले. 

     राज्य शासनाने पहिल्यांदा कापूस व सोयाबीन पिकाच्या मुल्यसाखळी बळकटीकरणासाठी रुपये 1 हजार कोटींची तरतुद केली असल्याचे सांगत नुकत्याच पार पडलेल्या अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये मा. बाळासाहेब ठाकरे हळद संशोधन केंद्र स्थापन करण्याचा निर्णय घेतला असून, त्यासाठी रुपये 100 कोटींची तरतुद करण्यात आली असल्याचे असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले. 

राज्याचे सार्वजनिक आरोग्य व कूटूंबकल्याण मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री राजेश टोपे म्हणाले, यावर्षी समाधानकार पावसाचा अंदाज देण्यात आला आहे.  त्यामुळे शेतकऱ्यांना पुरेशा प्रमाणात बि-बियाणे तसेच खतांचा पुरवठा होईल, यादृष्टीने नियोजन करण्यात यावे.  शेतकऱ्यांना शेतीच्या मशागतीसाठी पीककर्जाची मोठ्या प्रमाणात गरज असते.  शेतकऱ्यांना वेळेत पीककर्ज मिळावे असे सांगत पोकरा योजनेमध्ये सामुहिक व वैयक्तिक स्वरुपाचा लाभ देण्यात येतो.  या योजनेत प्रलंबित असलेले प्रस्ताव तसेच नवीन प्रस्तावांना गतीने मंजुरी मिळावी. त्याचबरोबर कृषि विभागात प्रलंबित असेलेली पदे तातडीने भरण्याची मागणीही त्यांनी कृषीमंत्र्यांकडे यावेळी केली.

यावेळी बैठकीत जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी भीमराव रणदिवे  यांनी जालना जिल्ह्याची तर संबंधीत जिल्हा अधिक्षक कृषि अधिकाऱ्यांनी त्या त्या जिल्ह्याचा संगणकीय सादरीकरणाद्वारे खरीप हंगामाची माहिती सादर केली.

यावेळी कृषिमंत्री दादाजी भुसे यांच्या हस्ते कृषी पुरस्कार प्राप्त शेतकऱ्यांचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.  तसेच प्रधानमंत्री सुक्ष्म अन्नप्रक्रिया उद्योग योजनेमध्ये राज्यात औरंगाबाद जिल्हा प्रथम आल्याबद्दल जिल्हाधिकारी सुनिल चव्हाण तसेच बँक व्यवस्थापक श्री वाडेकर यांचाही यावेळी गौरव करण्यात आला.

            प्रारंभी कृषि मंत्री दादाजी भुसे यांच्या हस्ते कृषि विभागाच्या विविध योजना व उपक्रमांची माहिती व जनजागृती वाहनांस हिरवी झेंडी दाखवून या उपक्रमांचा शुभारंभ करण्यात आला.

-*-*-*-*-*-

 

Wednesday 20 April 2022

7 मे रोजी जिल्हा न्यायालयासह सर्व तालुका न्यायालयात राष्ट्रीय लोकअदालतीचे आयोजन पक्षकारांचा पैसा, श्रम व वेळ वाचवण्याबरोबरच समतोल न्यायासाठी राष्ट्रीय लोकअदालत महत्वपूर्ण - रेणूप्रसाद पारवेकर

 



 

            जालना दि. 20 (जिमाका):-  जिल्हा न्यायालयासह सर्व तालुका न्यायालयामध्ये 7 मे, 2022 रोजी राष्ट्रीय लोकअदालतीचे आयोजन करण्यात आले आहे.  पक्षकारांचा पैसा, श्रम व वेळ वाचवण्याबरोबरच समतोल न्यायासाठी लोकअदालत अत्यंत महत्वूपर्ण असुन अधिकाधिक प्रकरणे या राष्ट्रीय लोकअदालतीमध्ये ठेऊन ती तडजोडीने मिटविण्याचे आवाहन जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव रेणूप्रसाद पारवेकर यांनी केले आहे.

            राष्ट्रीय लोकअदालतीच्या अनुषंगाने जिल्हा विधी सेवा प्राधिकरण कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेमध्ये पत्रकारांशी संवाद साधताना श्री पारवेकर बोलत होते.

            दि. 7 मे, 2022 रोजी आयोजित करण्यात आलेल्या राष्ट्रीय लोकअदालतीमध्ये जिल्हा न्यायालयासह सर्व तालुका न्यायालयामध्ये प्रलंबित मोटार वाहन अपघात कायद्यांतर्गत नुकसान भरपाईचे प्रकरणे, प्रलंबित दिवाणी व फौजदारी प्रकरणे, कलम 138, एन.आय. ॲक्टची प्रकरणे, बँकेची वसुली प्रकरणे, कौटुंबिक वादाची प्रकरणे, मजुरी संबंधीची वादाची प्रकरणे, भुसंपादनाची प्रकरणे, इलेक्ट्रीसीटी, पाणीबील, महसुल यासह ईतर दावा दाखल प्रकरणे या लोकअदालतीमध्ये तडजोडीने मिटविण्यासाठी ठेवता येणार असल्याची माहितीही श्री. पारवेकर यांनी यावेळी दिली.

            दि. 12 मार्च, 2022 रोजी झालेल्या राष्ट्रीय लोकअदालतीमध्ये 825 प्रकरणे तडजोडीने निकाली काढण्यात यश मिळाल्याचे सांगत आठ कुटूंबांचा संसारही या लोकअदालतीमध्ये जुळुन आला.  विविध प्रकरणातील दीड कोटी रुपयांपेक्षा अधिक रक्कम तडजोडीने प्राप्त झाल्याची माहितीही श्री पारवेकर यांनी यावेळी दिली.

-*-*-*-*-*-*-*-

बेवारस आढळलेल्या नवजात बालकास संगोपनासाठी भारतीय समाज सेवा केंद्रात दाखल

 



             जालना, दि. 20 (जिमाका):- अंबड तालुक्यातील पारनेर शिवारातील एका हॉटेलसमोर  एक दिवसाचे पुरुष जातीचे नवजात बालक बेवारस अवस्थेमध्ये आढळून आले.  या  सापडलेल्या नवजात बालकाची माहिती अंबड पोलीस ठाण्यास समजताच या बालकाला ताब्यात घेऊन त्यास तातडीने उपचारासाठी

जालना येथील महिला रुग्णालयात दाखल केले.

   सदरील प्रकरणाची माहिती जिल्हा महिला व बालविकास कार्यालयास मिळताच जिल्हा महिला व बालविकास अधिकारी आर.एन.चिमंन्द्रे यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा बाल संरक्षण अधिकारी गजानन इंगळे आणि सचिन चव्हाण यांनी महिला रुग्णालयात भेट देऊन बालकाच्या प्रकृतीची चौकशी केली. बालकाची तब्येत ठीक असल्याची खात्री पटल्यानंतर बाल कल्याण समितीच्या मार्गदर्शनाखाली तातडीने पाऊले उचलण्यात येऊन बालकाच्या पुढील संगोपनासाठी भारतीय समाज सेवा केंद्र, औरंगाबाद येथे प्रवेशित करण्याचे आदेश पारित करण्यात आले.

            भारतीय समाज सेवा केंद्राच्या सामाजिक कार्यकर्त्या पुष्पा घुले आणि नर्स बालकाला घेण्यासाठी तातडीने जालन्यात दाखल होऊन बालकाला आपल्यासोबत घेऊन जात  भारतीय समाज सेवा केंद्र औरंगाबाद येथे केले.

            यावेळी महिला रुग्णालयाचे अधीक्षक डॉ.आर.एच.पाटील, डॉ.कोकाटे, जिल्हा बाल संरक्षण अधिकारी गजानन इंगळे, संरक्षण अधिकारी सचिन चव्हाण, श्रीमती आर्दड,पोलीस कर्मचारी, सामाजिक कार्यकर्त्या पुष्पा घुले यांची उपस्थिती होती.

            अशा प्रकारचे बालक आढळून आल्यास जवळील पोलीस ठाण्यास अथवा  जिल्हा महिला व बालविकास कार्यालयाशी संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा बाल संरक्षण अधिकारी गजानन इंगळे यांनी केले आहे.

-*-*-*-*-*-*-*-*-

 

Monday 18 April 2022

आरोग्य मेळावे अतिशय उपयुक्त - पालकमंत्री राजेश टोपे

 


 

            जालना दि. 18 (जिमाका):-  जिल्ह्यातील तज्ज्ञांच्या उपस्थितीमध्ये आरोग्य विषयक विविध तपासण्या एकाच छताखाली होत असल्याने आरोग्य मेळावे हे अतिशय उपयुक्त असून या मेळाव्याचा नागरिकांनी लाभ घेण्याचे आवाहन पालकमंत्री राजेश टोपे यांनी केले.

            स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त आरोग्य कुटूंब कल्याण मंत्रालय, राष्ट्रीय आरोग्य अभियान व सार्वजनिक आरोग्य विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित आरोग्य मेळाव्याचा शुभारंभ पालकमंत्री राजेश टोपे यांनी दूरदृष्यप्रणालीद्वारे केला. त्याप्रसंगी उपस्थितांशी संवाद साधताना ते बोलत होते.

            व्यासपीठावर अपर जिल्हाधिकारी अंकुश पिनाटे, जिल्हा आरोग्य अधिकारी विवेक खतगावकर, जिल्हा शल्य चिकित्सक अर्चना भोसले, कल्याण सपाटे आदींची प्रमुख उपस्थिती होती.

            पालकमंत्री राजेश टोपे म्हणाले, सर्वसामान्यांना आरोग्याच्या सेवा मोफत स्वरुपात मिळाव्यात यासाठी केंद्र व राज्य शासनामार्फत अनेकविध योजना राबविण्यात येतात. आरोग्य व कुटूंबकल्याण कार्यक्रमांतर्गत जागरुकता निर्माण व्हावी व सर्वसामान्यांना सेवा उपलब्ध व्हाव्यात यादृष्टीकोनातुन या आरोग्य शिबीराचे आयोजन करण्यात आले आहे.  या शिबीरामध्ये विविध प्रकारच्या तपासण्या करुन आवश्यकतेप्रमाणे रुग्णांना औषधीही उपलब्ध करुन देण्यात येत आहे.  18 ते २२ एप्रिल दरम्यान जालना जिल्ह्यातील तालुका स्तरावर या शिबीराचे आयोजन करण्यात आले असुन या शिबीराचा प्रत्येकाने लाभ घेण्याचे आवाहनही पालकमंत्री श्री टोपे यांनी यावेळी केले.

            यावेळी प्रधानमंत्री जनआरोग्य योजनेंतर्गत लाभार्थ्यांची नोंदणी करण्यात येऊन कार्डचे वाटपही यावेळी करण्यात आले.

            कार्यक्रमास अधिकारी, पदाधिकारी यांच्यासह लाभार्थ्यांची मोठ्या प्रमाणात उपस्थिती होती.

 

-*-*-*-*-*-*-