Monday 18 April 2022

आरोग्य मेळावे अतिशय उपयुक्त - पालकमंत्री राजेश टोपे

 


 

            जालना दि. 18 (जिमाका):-  जिल्ह्यातील तज्ज्ञांच्या उपस्थितीमध्ये आरोग्य विषयक विविध तपासण्या एकाच छताखाली होत असल्याने आरोग्य मेळावे हे अतिशय उपयुक्त असून या मेळाव्याचा नागरिकांनी लाभ घेण्याचे आवाहन पालकमंत्री राजेश टोपे यांनी केले.

            स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त आरोग्य कुटूंब कल्याण मंत्रालय, राष्ट्रीय आरोग्य अभियान व सार्वजनिक आरोग्य विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित आरोग्य मेळाव्याचा शुभारंभ पालकमंत्री राजेश टोपे यांनी दूरदृष्यप्रणालीद्वारे केला. त्याप्रसंगी उपस्थितांशी संवाद साधताना ते बोलत होते.

            व्यासपीठावर अपर जिल्हाधिकारी अंकुश पिनाटे, जिल्हा आरोग्य अधिकारी विवेक खतगावकर, जिल्हा शल्य चिकित्सक अर्चना भोसले, कल्याण सपाटे आदींची प्रमुख उपस्थिती होती.

            पालकमंत्री राजेश टोपे म्हणाले, सर्वसामान्यांना आरोग्याच्या सेवा मोफत स्वरुपात मिळाव्यात यासाठी केंद्र व राज्य शासनामार्फत अनेकविध योजना राबविण्यात येतात. आरोग्य व कुटूंबकल्याण कार्यक्रमांतर्गत जागरुकता निर्माण व्हावी व सर्वसामान्यांना सेवा उपलब्ध व्हाव्यात यादृष्टीकोनातुन या आरोग्य शिबीराचे आयोजन करण्यात आले आहे.  या शिबीरामध्ये विविध प्रकारच्या तपासण्या करुन आवश्यकतेप्रमाणे रुग्णांना औषधीही उपलब्ध करुन देण्यात येत आहे.  18 ते २२ एप्रिल दरम्यान जालना जिल्ह्यातील तालुका स्तरावर या शिबीराचे आयोजन करण्यात आले असुन या शिबीराचा प्रत्येकाने लाभ घेण्याचे आवाहनही पालकमंत्री श्री टोपे यांनी यावेळी केले.

            यावेळी प्रधानमंत्री जनआरोग्य योजनेंतर्गत लाभार्थ्यांची नोंदणी करण्यात येऊन कार्डचे वाटपही यावेळी करण्यात आले.

            कार्यक्रमास अधिकारी, पदाधिकारी यांच्यासह लाभार्थ्यांची मोठ्या प्रमाणात उपस्थिती होती.

 

-*-*-*-*-*-*-

 

 

 

 

 

 

No comments:

Post a Comment