Wednesday 20 April 2022

7 मे रोजी जिल्हा न्यायालयासह सर्व तालुका न्यायालयात राष्ट्रीय लोकअदालतीचे आयोजन पक्षकारांचा पैसा, श्रम व वेळ वाचवण्याबरोबरच समतोल न्यायासाठी राष्ट्रीय लोकअदालत महत्वपूर्ण - रेणूप्रसाद पारवेकर

 



 

            जालना दि. 20 (जिमाका):-  जिल्हा न्यायालयासह सर्व तालुका न्यायालयामध्ये 7 मे, 2022 रोजी राष्ट्रीय लोकअदालतीचे आयोजन करण्यात आले आहे.  पक्षकारांचा पैसा, श्रम व वेळ वाचवण्याबरोबरच समतोल न्यायासाठी लोकअदालत अत्यंत महत्वूपर्ण असुन अधिकाधिक प्रकरणे या राष्ट्रीय लोकअदालतीमध्ये ठेऊन ती तडजोडीने मिटविण्याचे आवाहन जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव रेणूप्रसाद पारवेकर यांनी केले आहे.

            राष्ट्रीय लोकअदालतीच्या अनुषंगाने जिल्हा विधी सेवा प्राधिकरण कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेमध्ये पत्रकारांशी संवाद साधताना श्री पारवेकर बोलत होते.

            दि. 7 मे, 2022 रोजी आयोजित करण्यात आलेल्या राष्ट्रीय लोकअदालतीमध्ये जिल्हा न्यायालयासह सर्व तालुका न्यायालयामध्ये प्रलंबित मोटार वाहन अपघात कायद्यांतर्गत नुकसान भरपाईचे प्रकरणे, प्रलंबित दिवाणी व फौजदारी प्रकरणे, कलम 138, एन.आय. ॲक्टची प्रकरणे, बँकेची वसुली प्रकरणे, कौटुंबिक वादाची प्रकरणे, मजुरी संबंधीची वादाची प्रकरणे, भुसंपादनाची प्रकरणे, इलेक्ट्रीसीटी, पाणीबील, महसुल यासह ईतर दावा दाखल प्रकरणे या लोकअदालतीमध्ये तडजोडीने मिटविण्यासाठी ठेवता येणार असल्याची माहितीही श्री. पारवेकर यांनी यावेळी दिली.

            दि. 12 मार्च, 2022 रोजी झालेल्या राष्ट्रीय लोकअदालतीमध्ये 825 प्रकरणे तडजोडीने निकाली काढण्यात यश मिळाल्याचे सांगत आठ कुटूंबांचा संसारही या लोकअदालतीमध्ये जुळुन आला.  विविध प्रकरणातील दीड कोटी रुपयांपेक्षा अधिक रक्कम तडजोडीने प्राप्त झाल्याची माहितीही श्री पारवेकर यांनी यावेळी दिली.

-*-*-*-*-*-*-*-

No comments:

Post a Comment