Wednesday 27 April 2022

वृक्ष लागवडीच्या उद्दिष्ट पूर्तीसाठी काटेकोर नियोजन करा - जिल्हाधिकारी डॉ. विजय राठोड

 



        जालना, दि. 27 (जिमाका):-  जागतिक स्तरावर उष्णतेमध्ये सातत्याने वाढ होत आहे. वाढणारे प्रदुषण रोखून पर्यावरणाचा समतोल राखला जावा यासाठी वृक्ष लागवड ही काळाजी गरज बनली आहे. येत्या पावसाळयात जालना जिल्ह्यात अधिकाधिक वृक्षांची लागवड करुन जिल्ह्याला देण्यात आलेल्या उद्दिष्टपूर्तीसाठी प्रत्येक विभागाने वृक्ष लागवडीचे काटेकोर नियोजन करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी डॉ. विजय राठोड यांनी दिले.

            वृक्ष लागवडी संदर्भात जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात आढावा बैठकीचे आयोजन करण्यात आले होते.  त्याप्रसंगी उपस्थित अधिकाऱ्यांना मार्गदर्शन करताना जिल्हाधिकारी डॉ. राठोड बोलत होते.

            यावेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मनुज जिंदल, उपजिल्हाधिकारी (रोहयो) रविंद्र परळीकर, कार्यकारी अभियंता श्री डाकोरे आदींची प्रमुख उपस्थिती होती.

            गत वर्षात प्रत्येक विभागाला देण्यात आलले वृक्ष लागवडीचे उद्दिष्ट पूर्ण केल्याबद्दल सर्व विभाग प्रमुखांचे अभिनंदन करुन जिल्हाधिकारी डॉ. राठोड म्हणाले की, या वर्षात जालना जिल्ह्याला 82 लक्ष 55 हजार 600 वृक्ष लागवडीचे उद्दिष्ट देण्यात आले आहे.  जालना जिल्ह्याला देण्यात आलेल्या उद्दिष्टापेक्षा अधिकची वृक्ष लागवड करण्यासाठी प्रत्येक विभागाने वृक्ष लागवडीचे काटोकोर नियोजन करावे.  ज्या शासकीय विभागांना वृक्ष लागवडीसाठी जागा उपलब्ध आहे अशांनी त्या जागेत वृक्ष लागवड करावी.  तसेच ज्यांना जागा उपलब्ध नसेल त्यांनी शासकीय खुली जागा, रस्त्याच्या दुतर्फा वृक्ष लागवड करावी. कमी जागेमध्ये अधिक वृक्षांची लागवड करण्यासाठी अटल आनंद घनवन अत्यंत उपयुक्त असुन जिल्ह्यात अधिकाधिक अटल आनंद घनवन निर्मितीसाठी प्रयत्न करण्यात यावेत. वृक्ष लागवडीसाठी आवश्यक असणारे खड्डे जुनपूर्वी खोदल्या जातील, याचीही दक्षता घेण्याचे निर्देशही जिल्हाधिकारी डॉ. राठोड यांनी यावेळी दिले.

            वृक्ष लागवड करताना वृक्ष लागवडीची माहिती ऑनलाईन पद्धतीने अपलोड करणेही तेवढेच गरजेचे आहे. अनेक शासकीय कार्यालयामार्फत वृक्ष लागवड केल्यानंतर ऑनलाईन माहिती अपलोड करण्यात येत नाही. ऑनलाईन माहिती अपलोड करण्यासंदर्भात काही समस्या, अडचणी असतील तर त्या संबंधित विभागाशी संपर्क साधुन त्यांचा निपटारा करुन घेण्यात यावा. वृक्ष लागवडीनंतर माहिती ऑनलाईन पद्धतीने अपलोड होईल, याची नोंद घेण्याच्या सूचना देत विभागनिहाय वृक्ष लागवडीचा आढावाही जिल्हाधिकारी डॉ. राठोड यांनी यावेळी घेतला. उपजिल्हाधिकारी (रोहयो) रविंद्र परळीकर यांनी पॉवर पॉईंटच्या माध्यमातुन वृक्ष लागवडीची माहिती दिली.

            बैठकीस शासकीय यंत्रणेचे प्रमुख अधिकारी उपस्थित होते.

-*-*-*-*-*-

No comments:

Post a Comment