Monday 30 September 2019


राजकीय प्रतिनिधींच्या उपस्थितीमध्ये
ईव्हीएम मशिन्सचे सरळमिसळीकरण संपन्न
            जालना, दि. 30 – विधानसभा सार्वत्रिक निवडणूक 2019 साठी जिल्ह्यातील पाच विधानसभा मतदारसंघात मतदानासाठी वापरण्यात येणाऱ्या ईव्हीएम मशिन्सचे सरळमिसळीकरण जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी तथा जिल्हाधिकारी रवींद्र बिनवडे यांच्या अध्यक्षतेखाली तसेच उपजिल्हाधिकारी निवडणूक श्रीमती दीपाली मोतियाळे व विविध राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींच्या उपस्थितीमध्ये जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात करण्यात आली.
            यावेळी 99-परतुर विधानसभा मतदारसंघासाठी 390 मतदान (BU) व 390 नियंत्रण (CU) यंत्रे व 423 व्हीव्हीपॅट 100-घनसावंगी मतदारसंघासाठी 407 मतदान व 407 नियंत्रण यंत्रे व 441 व्हीव्हीपॅट, जालना मतदारसंघासाठी 382 मतदान व 382 नियंत्रण यंत्रे व 414 व्हीव्हीपॅट, बदनापुर मतदारसंघासाठी 419 मतदान व 419 नियंत्रण यंत्रे व 454 व्हीव्हीपॅट तर भोकरदन मतदारसंघासाठी 387 मतदान व 387 नियंत्रण यंत्रे व 419 व्हीव्हीपॅटचे ऑनलाईन वितरण करण्यात आले.





निवडणुकीसाठी नियुक्त सुक्ष्म निरीक्षकांचे पहिले प्रशिक्षण संपन्न
सुक्ष्म निरीक्षकांनी दिलेली जबाबदारीचोखपणे पार पाडावी
                                        - दीपाली मोतियाळे
        जालना, दि. 30 – विधानसभा सार्वत्रिक निवडणुक 2019 साठी नियुक्त करण्यात आलेल्या सुक्ष्म निरीक्षकांचे पहिले प्रशिक्षण उपजिल्हाधिकारी श्रीमती दीपाली मोतियाळे यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाले.  सुक्ष्म निरीक्षकांना निवडणुकीचे दिलेले काम जबाबदारीने पार पाडण्याच्या सुचना त्यांनी यावेळी दिल्या. यावेळी जिल्हा पुरवठा अधिकारी तथा मनुष्यबळ कक्षाच्या नोडल अधिकारी श्रीमती रिना बसेय्ये यांची प्रमुख उपस्थिती होती.
            श्रीमती मोतियाळे म्हणाल्या, मतदान व मतमोजणीच्या वेळी सुक्ष्म निरीक्षकांची गरज भासत असल्याने विधानसभा सार्वत्रिक निवडणुक 2019 साठी सुक्ष्म निरीक्षकांच्या नियुक्त्या करण्यात आल्या आहेत.  सुक्ष्म निरीक्षकांनी मतदानाच्या वेळी येणाऱ्या मतदारांची ओळख पटवली जाते काय ? मतदान केल्यानंतर मतदारांच्या बोटावर शाई लावली जाते काय ? विना ओळख पटवता मतदारांना मतदान केंद्रामध्ये प्रवेश दिला जातो काय याबरोबरच मतदान केंद्राच्या परिसरात कायदा व सुव्यवस्था तसेच इतर काही अनुचित प्रकार घडत असल्यास त्याची माहिती निवडणुक निरीक्षकांना द्यावी. दिव्यांगांना मतदान केंद्रावर आवश्यक त्या सर्व सुविधा देण्यात येतात किंवा नाही याची पहाणी करण्याबरोबरच मतदानाच्या दिवशी पोलिंग पार्टीकडून मॉकपोल घेतला आहे किंवा नाही यावरही नजर ठेवण्याच्या सुचना श्रीमती मोतियाळे यांनी उपस्थित सुक्ष्म निरीक्षकांना केल्या.
******




विधानसभा सार्वत्रिक निवडणुक 2019
पूर्वपीठिकेचे जिल्हाधिकारी रवींद्र बिनवडे यांच्या हस्ते प्रकाशन
            जालना, दि. 30 :-  विधानसभा सार्वत्रिक निवडणूक-2019 च्या अनुषंगाने  तयार करण्यात आलेल्या पूर्वपीठिकेचे प्रकाशन जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी रवींद्र बिनवडे यांच्या हस्ते करण्यात आले.
            जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या प्रकाशन प्रसंगी उपजिल्हा निवडणूक अधिकारी श्रीमती दीपाली मोतियाळे, माध्यम प्रमाणन व सनियंत्रण समितीचे नोडल अधिकारी प्रमोद धोंगडे, माहिती सहाय्यक अमोल महाजन यांची प्रमुख उपस्थितीत होती.
            यावेळी श्री धोंगडे यांनी विधानसभा सार्वत्रिक निवडणूक-2019 साठी जिल्हा माहिती अधिकारी कार्यालयातर्फे तयार करण्यात आलेल्या पूर्वपीठिकीमध्ये सन 1980 ते 2014 या कालावधीत झालेल्या विधानसभा निवडणुकांमध्ये निवडणूक लढविलेल्या उमेदवारांची नांवे, त्यांना मिळालेली  मते, विजयी उमेदवार या संबंधीची आकडेवारी, पेड न्यूज, आदर्श आचारसंहितेची मार्गदर्शक तत्वे, मतदारसंघनिहाय निवडणुकीशी संबंधित निवडणुक निर्णय अधिकारी, सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी यांचे नांवे दूरध्वनी क्रमांक, विधानसभा मतदारसंघनिहाय मतदारांचा तपशिल, विधानसभा मतदारसंघनिहाय मतमोजणीचे ठिकाण, जालना जिल्हा तसेच विधानसभा मतदारसंघनिहाय नकाशे आदी माहितीचा या पूर्वपिठीकेमध्ये समावेश असल्याचे सांगितले.
*******


Saturday 28 September 2019

प्रसारमाध्यम कक्षास निवडणुक निरीक्षकांची भेट एमसीएमसी समितीच्या कामकाजाची केली पहाणी



जालना,दि 28 :- विधानसभा सार्वत्रिक निवडणूक 2019 च्या अनुषंगाने जिल्हा माहिती कार्यालय, जालना येथे स्थापन करण्यात आलेल्या माध्यम कक्षास निवडणूक निरीक्षक (खर्च) जी हुकुघा सेमा यांनी प्रत्यक्ष भेट देऊन पहाणी केली.  तसेच माध्यम प्रमाणन व  सनियंत्रण ‍ समितीच्या कामकाजाची पहाणी करत समाजमाध्यमांवरुन प्रसारित होणाऱ्या जाहिराती, व्हिडीओ यावर करडी नजर ठेवण्याचे निर्देश त्‍यांनी यावेळी दिले.
            यावेळी उपजिल्हाधिकारी (निवडणूक) दीपाली मोतियाळे, माध्यम कक्षाचे नोडल अधिकारी प्रमोद धोंगडे, कृषी विभागाचे उपसंचालक विजय माईनकर, माहिती सहाय्यक अमोल महाजन, समितीचे सदस्य लक्ष्मीकांत देशमुख आदी उपस्थित होते.
या भेटी दरम्‍यान मिडिया कक्षातील माध्‍यम प्रमाणीकरणासाठी विविध वाहिन्‍यां तसेच स्‍थानिक केबल वाहिन्‍यांच्‍या देखरेखीसाठी लावण्‍यात आलेल्‍या टीव्‍ही संचाची तसेच कक्षात दररोज येणा-या विविध वृत्‍तपत्रातील बातम्‍यांच्‍या कात्रणाच्‍या संचाचीही निरिक्षकांनी यावेळी पाहणी केली.
यावेळी श्री. धोंगडे यांनी इलेक्ट्रॉनिक माध्यमांना उमेदवारांकडून देण्यात येणाऱ्या जाहिराती, इतर इलेक्ट्रॉनिक स्वरुपातील माहितीची प्रसिध्दीपूर्व तपासणी करुन प्रमाणपत्र देणे तसेच पेड न्यूज व सोशल मिडियावरुन प्रसिद्ध होणाऱ्या जाहिरातीवरही या कक्षातून बारीक लक्ष ठेवण्यात येत असल्याची माहिती निवडणूक निरीक्षकांना दिली.
-*-*-*--



Thursday 26 September 2019

निवडणुकीदरम्यान बँकेतुन होणाऱ्या व्यवहारावर करडी नजर ठेवा - उपजिल्हाधिकारी (निवडणूक) दीपाली मोतियाळे



            जालना, दि.26 :- विधानसभा सार्वत्रिक निवडणूक 2019 चा कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे.  या निवडणुकी दरम्यान बँकेतील होणाऱ्या व्यवहारावर करडी नजर ठेवण्याचे निर्देश उपजिल्हाधिकारी (निवडणूक) दीपाली मोतियाळे यांनी दिले.
            विधानसभा सार्वत्रिक निवडणूक 2019 च्या अनुषंगाने सर्व बँकर्सच्या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते.  त्याप्रसंगी उपस्थित अधिकाऱ्यांना मार्गदर्शन करताना श्रीमती मोतियाळे बोलत होत्या.
            यावेळी लेखा  व वित्त अधिकारी उत्तम चव्हाण, लिड बँकचे व्यवस्थापक श्री ईलमकर, जिल्हा उपनिबंधक नानासाहेब चव्हाण यांच्यासह सर्व बँकांचे व्यवस्थापक उपस्थित होते.
            उपजिल्हाधिकारी श्रीमती मोतियाळे म्हणाल्या, निवडणूक प्रक्रियेदरम्यान कोणत्याही व्यक्तीच्या बँक खात्यातुन रोख रक्कम काढण्याल्या संशयास्पद व्यवहाराची माहिती निवडणूक विभागाला तातडीने देण्यात यावी.   मागील दोन महिन्यांच्या कालावधीत पैसे जमा करण्याच्या किंवा काढण्याच्या अशा कोणत्याही प्रसंगाशिवाय निवडणूक प्रक्रियेदरम्यान बँक खात्यातुन एक लाखापेक्षा अधिक रक्कम संशयास्पदरितीने बँक खात्यातुन काढली असल्यास अथवा जमा केली असल्यास त्याबाबतही माहिती देण्याचे निर्देश त्यांनी यावेळी दिले.
            मुख्य निवडणुक अधिकाऱ्यांच्या संकेतस्थळावर उपलब्ध असलेल्या उमेदवारांच्या शपथपत्रात नमूद केल्याप्रमाणे उमेदवारांच्य किंवा तिच्या पतीच्या, त्याच्या पत्नीच्या किंवा त्यांच्या अवलंबितांच्या बँक खात्यातुन एक लाखापेक्षा अधिक रक्कम जमा करणे अथवा काढणे. निवडणूक प्रक्रियेदरम्यान राजकीय पक्षाच्या खात्यातुन एक लाखापेक्षा अधिक रक्कम काढणे तसेच मतदारांना लाचलुचपत देण्यासाठी जी वापरली जाऊ शकते अशा रोख रक्कमेचे कोणतेही संशयित व्यवहार रोखण्यासाठी बँक अधिकाऱ्यांनी दक्ष राहण्याबरोबरच याबाबतची माहिती निवडणूक विभागास तातडीने सादर करण्याच्या सुचनाही त्यांनी यावेळी दिल्या.
            निवडणुकीदरम्यान मोठ्या प्रमाणात रोख काढल्याचे कोणतेही संशयास्पद प्रकरण निदर्शनास आल्यास त्यावर तातडीने कारवाई करण्याच्या सुचना देत निवडणुकीसाठी जे उमेदवार बँकेत खाते उघडतील त्यांना तातडीने धनादेश उपलब्ध करुन देण्याच्या सुचनाही श्रीमती मोतियाळे यांनी यावेळी उपस्थित बँक अधिकाऱ्यांना दिल्या.
            यावेळी लेखा  व वित्त अधिकारी उत्तम चव्हाण यांनी निवडणुकीच्या अनुषंगाने बँक अधिकाऱ्यांना आवश्यक त्या सुचना केल्या.
*******


Monday 23 September 2019

विधानसभा सार्वत्रिक निवडणुक 2019 मतदान केंद्रावर दिव्यांगांना सर्व सुविधा उपलब्ध करुन देणार- जिल्हाधिकारी रवींद्र बिनवडे




            जालना, दि. 23 – विधानसभा सार्वत्रिक निवडणूक 2019 चा कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे.  या निवडणुकीदरम्यान दिव्यांग मतदारांना मतदान केंद्रावर सर्व सोयी-सुविधा उपलब्ध करुन देण्याचे निवडणूक आयोगाने निर्देश दिले असुन त्यादृष्टीकोनातुन पाचही विधानसभा मतदारसंघातील मतदान केंद्रावर दिव्यांगाना सोई-सुविधा उपलब्ध करुन देण्यात येणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी रवींद्र बिनवडे यांनी दिली.
            विधानसभा सार्वत्रिक निवडणूक 2019 च्या अनुषंगाने मतदानाच्यावेळी दिव्यांगांना उपलब्ध करुन देण्यात येणाऱ्या सोयी-सुविधा संदर्भात संबंधित अधिकाऱ्यांच्या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते.  त्याप्रसंगी ते बोलत होते.
            यावेळी उपजिल्हाधिकारी (निवडणूक) श्रीमती दीपाली मोतियाळे,   आदींची उपस्थिती होती.
            जिल्हाधिकारी श्री बिनवडे म्हणाले, विधानसभा निवडणुकीदरम्यान दिव्यांगांना मतदान केंद्रावर रॅम्प तसेच पिण्याच्या पाण्याची सुविधा देण्याबरोबरच घरापासुन मतदान केंद्रापर्यंत नेणे व तेथुन त्यांच्या घरापर्यंत सोडण्यासाठी प्रशसनामार्फत मोफत वाहन सुविधा उपलब्ध करुन देण्यात येणार आहे.  अंध मतदारांसाठी ब्रेल लिपीमध्ये माहितीपुस्तिकाही उपलब्ध करुन देण्यात येणार असुन मतदान केंद्रावर व्हिलचेअर तसेच मॅग्नीफाईल लेन्सेसही उपलब्ध करुन देण्यात येणार आहे. अधिकाधिक दिव्यांगांनी मतदानाचा हक्क बजवावा यासाठी निकेश मदारे यांची आयकॉन म्हणुन नियुक्ती करण्यात आली असुन प्रत्येक विधानसभा मतदारसंघामध्ये होणाऱ्या बैठकांमध्ये श्री मदारे हे दिव्यांगांना मतदानासाठी प्रोत्साहितही करणार असल्याचे जिल्हाधिकाऱ्यांनी यावेळी सांगितले.
******* 


विधानसभा सार्वत्रिक निवडणूक : राजकीय पक्ष प्रतिनिधींसोबत बैठक निवडणूक यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी प्रशासनास सहकार्य करावे-- जिल्हाधिकारी रवींद्र बिनवडे



            जालना, दि‍. 23 : विधानसभा सार्वत्रिक निवडणूक 2019  निवडणूकीची आदर्श आचारसंहिता लागू झाली आहे. ही विधानसभा निवडणुक यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी राजकीय पक्षांनी प्रशासनास सहकार्य करण्याचे आवाहन जिल्हाधिकारी रवींद्र बिनवडे यांनी केले.
            जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात राजकीय पक्ष प्रतिनिधींसोबत बैठक आयोजित करण्यात आली होती. त्यावेळी जिल्हाधिकारी श्री बिनवडे बोलत होते.  यावेळी जिल्हा पोलीस अधीक्षक एस. चैतन्या, उपजिल्हाधिकारी (निवडणूक) श्रीमती दीपाली मोतियाळे, लेखा  व वित्त अधिकारी उत्तम चव्हाण, जिल्हा कोषागार अधिकारी श्रीमती वैशाली थोरात, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे तय्यबबापू देशमुख, भारतीय जनता पार्टीचे सिद्धीविनायक मुळे, शिवसेनेचे दिनेश फलके, बसपाचे सुधाकर बडगे यांच्यासह सतीष जाधव, अरुण पठाडे, रोशन चौधरी, तुलजेश चौधरी, प्रशांत आढावे, आर.डी. वाघमारे, शशिकांत घुगे, दीपक रणनवरे, दुर्गेश काठोठीवाले आदी उपस्थित होते.
            जिल्हाधिकारी श्री बिनवडे म्हणाले निवडणुकीदरम्यान आदर्श आचारसंहितेचे सर्व पक्षांनी पालन करावे.  निवडणुकीमध्ये आवश्यक असणाऱ्या विविध परवानग्यांसाठी आयोगाकडून संगणकीय ॲप्लीकेशन उपलब्ध करुन देण्यात येणार असुन याचा वापर राजकीय पक्षांनी करण्याचे आवाहन करत प्रत्येक विधानसभा मतदारसंघामध्ये परवानग्यांसाठी एक खिडकी कक्ष स्थापन करण्यात आला आहे. उमेदवारांना 28 लक्ष रूपये खर्चाची मर्यादा आहे. यापेक्षा अधिक खर्च होणार नाही, याबाबत काळजी घेण्याचे आवाहनही त्यांनी यावेळी केले.
            27 सप्टेंबरपासुन नामनिर्देशपत्र दाखल करता येणार असुन नामनिर्देशन पत्र दाखल करण्याची अंतिम तारीख 4 ऑक्टोबर अशी राहणार आहे.  नामनिर्देशन पत्राची छाननीची तारीख 5 ऑक्टोबर असुन उमेदवारी मागे घेण्याची तारीख 7 ऑक्टोबर असणार आहे.  मतदानाची तारीख 21 ऑक्टोबर, 2019 अशी असुन मतमोजणी ही 24 ऑक्टोबर, 2019 रोजी होणार असल्याचही माहितीही  जिल्हाधिकाऱ्यांनी उपस्थित राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींना दिली.
            यावेळी जिल्हा पोलीस अधीक्षक एस. चैतन्या यांनीसुद्धा निवडणुकीच्या अनुषंगाने पोलीस प्रशासनाच्यावतीने राजकीय पक्षांना सुचना करत कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी पोलीस प्रशासनाला सहकार्य करण्याचे आवाहन केले.


विधानसभा सार्वत्रिक निवडणूक 2019 सर्व शासकीय विभाग प्रमुखांनी आचारसंहितेचे काटेकोरपणे पालन करावे निवडणुकीच्या काळात पूर्वपरवानगीशिवाय मुख्यालय सोडू नये -- जिल्हाधिकारी रवींद्र बिनवडे


जालना, दि.23 :- विधानसभा सार्वत्रिक निवडणूक 2019 चा कार्यक्रम जाहीर करण्यात आला असुन  या निवडणुकी दरम्यान सर्व शासकीय विभागप्रमुखांनी  आचारसंहितेचे काटेकोर पालन करण्याबरोबरच निवडणुकीच्या कालावधीत देण्यात आलेली जबाबदारी बिनचुक पार पाडण्याबरोबरच   निवडणुकीसाठी नियुक्त अधिकाऱ्यांनी पूर्वपरवानगीशिवाय मुख्यालय न सोडण्याचे निर्देश जिल्हाधिकारी रवींद्र बिनवडे यांनी दिले.
            विधानसभा सार्वत्रिक निवडणूक 2019 च्या अनुषंगाने सर्व विभाग प्रमुखांच्या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते.  त्याप्रसंगी उपस्थित अधिकाऱ्यांना मार्गदर्शन करताना जिल्हाधिकारी श्री बिनवडे बोलत होते.
            यावेळी जिल्हा पोलीस अधीक्षक एस. चैतन्य, जिल्हा परिषदेच्या प्रभारी मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती कल्पना क्षीरसागर उपजिल्हाधिकारी (निवडणूक) श्रीमती दीपाली मोतीयळे, जिल्हा पुरवठा अधिकारी श्रीमती रिना बसेय्यै, लेखा  व वित्त अधिकारी उत्तम चव्हाण, जिल्हा कोषागार अधिकारी श्रीमती वैशाली थोरात, बालकामगार विभागाचे प्रकल्प संचालक मनोज देशमुख, राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या अधीक्षक श्रीमती भाग्यश्री जाधव, कार्यकारी अभियंता श्री चांडक, जिल्हा दुग्धव्यवसाय अधिकारी श्रीमती देवयानि भारसवाडकर आदींची  प्रामुख्याने उपस्थिती होती.
            जिल्हाधिकारी श्री बिनवडे म्हणाले की,जालना जिल्ह्यात पाच विधानसभा मतदार संघ असुन या पाचही मतदारसंघात निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे.  99-परतूर मतदारसंघासाठी भाऊसाहेब जाधव, उप विभागीय अधिकारी, परतूर 100-घनसावंगीसाठी शशिकांत हदगल, 101-जालना मतदारसंघासाठी श्रीमंत हारकर, 102- बदनापुर मतदारसंघासाठी  गणेश निऱ्हाळी तर 103-भोकरदन विधानसभा मतदारसंघासाठी शिवकुमार स्वामी यांची निवडणुक निर्णय अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.    दि. 31 ऑगस्ट, 2019 नुसार अंतिम मतदारांची संख्या 15 लक्ष 54 हजार 110 एवढी असुन यामध्ये पुरुष मतदारांची संख्या 8 लाख 16 हजार 229, स्त्री मतदारांची संख्या 7 लाख 36 हजार 367, इतर 02 व सैनिक मतदार 1 हजार 511 एवढी असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले. जिल्ह्यातील पाचही विधानसभा मतदारसंघामध्ये मिळुन 1 हजार 633 मुख्य मतदान केंद्रे तर 20 सहाय्यक मतदान केंद्रे अशी एकुण 1 हजार 653 मतदान केंद्रे आहेत.  99-परतुर विधानसभा मतदारसंघात 325 मुख्य मतदान केंद्र, 100-घनसावंगी मतदारसंघात 339, 101- जालना मतदारसंघात 304 मुख्य मतदान केंद्र व 14 सहाय्य्क मतदान केंद्र, 102- बदनापुर मतदारसंघात 347 मुख्य तर 02 सहाय्यक मतदान केंद्र व 103-भोकरदन मतदारसंघामध्ये 318 मुख्य तर 4 सहाय्यक मतदान केंद्र असल्याची माहितीही त्यांनी यावेळी दिली.

..2..
            निवडणुकीच्या कामासाठी विविध विभागांच्या अधिकाऱ्यांची नोडल अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली असुन नियुक्त अधिकाऱ्यांनी त्यांना दिलेले काम चोखपणे पार पाडावे.  सर्व अधिकाऱ्यांना कामाचा अहवाल विहित नमुन्यात सादर करावा. निवडणुकी दरम्यान जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्था अबाधित राहण्यासाठी पोलीस प्रशासनाने चोख बंदोबस्त ठेवावा. निवडणुकीमध्ये आवश्यक असणाऱ्या विविध परवानग्यांसाठी आयोगाकडून संगणकीय ॲप्लीकेशन उपलब्ध करुन देण्यात आले आहे. निवडणुकीच्या अनुषंगाने स्थापन करण्यात आलेल्या भरारी पथकांनी चोखपणे आपली जाबबदारी पार पाडत अवैध रोकड, मद्य वाहतुक यासारख्या बाबींना पायबंद घालण्याचे  निर्देशही जिल्हाधिकारी श्री बिनवडे यांनी दिले.
            विधानसभा मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी नामनिर्देशित उमेदवार, राजकीय पक्ष यांनी प्रचारासाठी वाहन परवाना, सभा, लाऊडस्पीकर व ईतर बाबींसाठी आवश्यक असणाऱ्या परवानग्यासाठी त्या त्या विधानसभा मतदारसंघाच्या निवडणूक निर्णय अधिकारी यांच्या कार्यालयात एक खिडकी कक्षाची स्थापना करण्यात आली आहे.  तसेच राजकीय जाहिरातीच्या प्रसारणपूर्व प्रमाणिकरणासाठी माध्यम प्रमाणिकरण व सनियंत्रण समितीची स्थापना करण्यात आली आहे.   मतदारांना  त्यांच्य मतदार यादीतील नावासंदर्भात अथवा निवडणुकीविषयी ईतर माहितीसाठी 1950 हा टोल फ्री क्रमांकही उपलब्ध करुन देण्यात आला असल्याची माहितीही जिल्हाधिकारी श्री बिनवडे यांनी यावेळी दिली.
            विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीच्या अनुषंगाने सर्व नियुक्त अधिकारी, कर्मचाऱ्यांनी पोलीस प्रशासनासोबत समन्वयाने काम करण्याच्या सुचना जिल्हा पोलीस अधीक्षक एस. चैतन्य यांनी यावेळी दिल्या.
                        बैठकीस निवडणुकीशी संबंधित सर्व प्रमुख अधिकारी उपस्थित होते.
******* 


Monday 16 September 2019

पालकमंत्र्यांच्या हस्ते मुख्य शासकीय ध्वजारोहण संपन्न मराठवाडा मुक्ती संग्राम दिनानिमित्त शहिदांना पालकमंत्री बबनराव लोणीकर यांचे अभिवादन


        जालना, दि. 17 –  मराठवाडा मुक्ती संग्राम दिनाच्या 71 व्या वर्धापन दिनानिमित्त टाऊन हॉल येथील स्मृती स्तंभास पुष्पचक्र वाहून राज्याचे पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री तथा जिल्हयाचे पालकमंत्री बबनराव लोणीकर यांनी हुतात्म्यांना आदरांजली अर्पण करुन अभिवादन केले तर पोलीस जवानांनी हवेत बंदुकीच्या तीन फेरी झाडून हुतात्म्यांना मानवंदना दिली. जिल्हयात आज सर्वत्र मराठवाडा मुक्तीसंग्राम दिन मोठया उत्साहात साजरा करण्यात आला.
            शहरातील टाऊन हॉल जवळच्या मराठवाडा मुक्तीसंग्राम स्मृती स्तंभास आज मुख्य शासकीय ध्वजवंदना आणि हुतात्म्यांना आदरांजली अर्पण करण्याचा कार्यक्रम पालकमंत्री बबनराव लोणीकर यांच्या उपस्थितीत पार पडला. यावेळी पालकमंत्री बबनराव लोणीकर यांनी जनतेला उद्देशुन शुभेच्छा संदेशही दिला.
            याप्रसंगी स्वातंत्र्य सैनिक रामेश्वरजी दायमा, तुळसीराम काळे, मंगलाबाई लक्ष्मीनारायण गिंदोडीया, इंदिराबाई गोपाळराव तांबटकर, राणीरक्षा अब्दुल अजीज खॉ, आजिमखान, सुभद्राबाई शंकरराव देशमुख, कांताबाई विश्वंभर मिटकर, जयाबाई खांडेराव खलसे, कौशल्याबाई खरात, चांदबाई माणकचंद कटारिया, प्रभावती गजाननराव जोशी,  यांचा पालकमंत्र्यांच्या हस्ते शाल व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात येऊन मान्यवरांनी स्वातंत्र्य सैनिकांसह उपस्थित नागरिकांना मराठवाडा मुक्ती संग्रामदिनाच्या शुभेच्छा दिल्या. यावेळी मान्यवरांनी लोकमान्य टिळक यांच्या पुतळयास पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले.
            या कार्यक्रमास जिल्हा परिषदेचे अध्यक्ष अनिरुद्ध खोतकर, आमदार राजेश टोपे,जि.प.चे उपाध्यक्ष सतीष टोपे,  नगराध्यक्षा संगीता गोरंट्याल, उपाध्यक्ष राजेश राऊत, माजी आमदार अरविंद चव्हाण तसेच भास्कर दानवे, रामेश्वर भांदरगे, नागोजीराव सतकर, ब्रम्हानंद चव्हाण, एकबाल पाशा,  जिल्हाधिकारी रवींद्र बिनवडे, जिल्हा पोलीस अधीक्षक एस.चैतन्य, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती निमा अरोरा, निवासी उपजिल्हाधिकारी गणेश निऱ्हाळी,  उपजिल्हाधिकारी शर्मिला भोसले, उपजिल्हाधिकारी (निवडणूक) दीपाली मोतियाळे, उपजिल्हाधिकारी प्रदीप कुलकर्णी, तहसिलदार संतोष बनकर यांच्यासह स्वातंत्र्य सैनिक, पदाधिकारी, अधिकारी, कर्मचारी, पत्रकार व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. 
***-***  




Tuesday 10 September 2019

जालना जिल्ह्यात 20 हजार निराधारांना मानधन निराधारांच्या मानधनात 600 रुपयांवरुन एक हजार रुपयांची वाढ - पालकमंत्री बबनराव लोणीकर



            जालना, दि. 10 -  समाजातील दिन, दुबळया आर्थिकदृष्टया कमकुवत असलेल्या तसेच निराधारांचे जीवनमान उंचावुन त्यांना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी शासन अनेक कल्याणकारी योजना राबवित आहे.  सामाजिक सुरक्षा अर्थसहाय्य योजनेच्या माध्यमातुन जालना जिल्ह्यात 20 हजार निराधारांना निवृत्तीवेतन देण्यात येत आहे.  या निराधारांना देण्यात येणाऱ्या 600 रुपये मानधनामध्ये वाढ करण्यात येऊन आता प्रतिमाह एक हजार रुपये मानधन देण्यात येणार असल्याची माहिती राज्याचे पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री बबनराव लोणकर यांनी दिली.
            परतुर शहरातील वरद विनायक मंगल कार्यालयात सामाजिक सुरक्षा अर्थसहाय्य योजनेच्या लाभार्थ्यांच्या मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते.  त्याप्रसंगी उपस्थितांशी संवाद साधताना पालकमंत्री श्री लोणीकर बोलत होते.
            व्यासपीठावर जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष राहूल लोणीकर, विलास आकात, अशोकराव बरकुले, रामेश्वर तनपुरे, अण्णासाहेब ढवळे, प्रदीप ढवळे, जिल्हा नियोजन अधिकारी वैभव कुलकर्णी, माविमचे जिल्हा समन्वयक उमेश कहाते, तहसिलदार भाऊसाहेब कदम, सरकारी कामगार अधिकारी टी.ई. कराड, लीड बँकेचे कैलास तावडे आदींची प्रमुख उपस्थिती होती.
            समाजातील गोरगरीब तसेच निराधार महिला, पुरुषांची मोठ्या प्रमाणात संख्या आहे.  या निराधारांना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी केंद्र व राज्य शासन अनेकविध योजना राबविते.  या योजनांचा लाभ शेवटच्या घटकापर्यंत पोहोचविण्याची जबाबदारी अधिकाऱ्यांबरोबरच पदाधिकाऱ्यांचीसुद्धा आहे.  शासनाच्या सामाजिक सुरक्षा अर्थसहाय्य योजनेंतर्गत संजय गांधी निराधार योजना व श्रावणबाळ योजनेंतर्गत परतूर तालुक्यामध्ये 5 हजार 954 लाभार्थ्यांना लाभ देण्यात येतो.  याव्यतिरिक्त तालुक्यात 2 हजार 376 निराधारांना या योजनेचा नव्याने लाभ मंजुर करण्यात आला असुन या निराधारांना आता एक हजार रुपये प्रतिमहा अनुदान देण्यात येणार आहे.  ही रक्कम प्रत्येक लाभार्थ्याच्या खात्यामध्ये तातडीने जमा करण्याच्या सुचनाही त्यांनी यावेळी उपस्थित अधिकाऱ्यांना केल्या. त्याचबरोबर तालुक्यातील 1 हजार 769 दिव्यांगांनाही शासनाच्या येाजनेचा लाभ देण्यात येणार असुन 1 हजार 400 बांधकाम कामगांराना प्रत्येकी 5 हजार रुपयांचे अनुदान त्यांच्या खात्यात जमा करण्यात येणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.
            ग्रामीण तसेच शहरी भागातील महिलांना आरोग्य चुलीच्या धुरामुळे अनेक आजारांचा सामना करावा लागत होता. महिलांची यापासुन सुटका करण्यासाठी प्रधानमंत्री उज्वला गॅस योजनेच्या माध्यमातुन देशातील 8 कोटी महिलांना गॅसचे वाटप करण्यात आले असल्याचे सांगत प्रधानमंत्री आवास योजनेच्या माध्यमातुन येत्या 2022 पर्यंत समाजातील प्रत्येकाला त्याच्या स्वत:च्या हक्काचे घर उपलब्ध करुन देण्यात येणार असल्याचेही पालकमंत्री श्री लोणीकर यांनी यावेळी सांगितले.
-*-*-*-*-*-



जिल्ह्यात एक हजार कोटी रुपयांच्या माध्यमातुन विद्युत विकासाची कामे शेतकऱ्यांना व नागरिकांना अखंडितपणे वीज पुरवठ्यासाठी वीजेचे जाळे निर्माणावर भर - पालकमंत्री बबनराव लोणीकर



            जालना, दि. 10 -  शेतकऱ्यांच्या शेतीला अखंडितपणे पाणी पुरवठा होण्यासाठी तसेच सर्वसामान्य जनतेला योग्य दाबाने वीजेचा पुरवठा होण्यासाठी जालना जिल्ह्यात गेल्या साडेचार वर्षाच्या काळात वीजेचे जाळे निर्माण करण्यावर भर देण्यात आला असुन जवळपास एक हजार कोटी रुपयांच्या माध्यमातुन जिल्ह्यात विद्युत विकासाची कामे करण्यात येत असल्याचे प्रतिपादन राज्याचे पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री बबनराव लोणीकर यांनी केले. 
            परतुर तालुक्यातील सोयंजना येथे 33 के.व्ही. उपकेंद्राचे पालकमंत्री बबनराव लोणीकर यांच्या हस्ते लोकार्पण करण्यात आले. त्याप्रसंगी उपस्थितांशी संवाद साधताना ते बोलत होते.
            व्यासपीठावर जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष राहूल लोणीकर, उद्धव खेडेकर, मदन शिंगी, रामप्रसाद थोरात, रमेश भापकर, सुधाकर सातोनकर, अंकुशराव नवल, बद्रीभाऊ ढवळे, शिवाजी पाईकराव, सरपंच केशवराव ढवळे, रावसाहेब सोळंके, रामबापु ढवळे, नारायणराव सोळंके, दिगांबर मुजमुले, संपत टकले, अधीक्षक अभियंता श्री हुमणे, इन्फ्राच्या श्रीमती संध्या चिवडे, तहसिलदार भाऊसाहेब कदम आदींची प्रमुख उपस्थिती होती.
            पालकमंत्री श्री लोणीकर म्हणाले, गेल्या सत्तर वर्षाच्या काळात जालना जिल्ह्यात केवळ 79 उपकेंद्रे होती.  परंतू विद्यमान शासनाच्या कार्यकाळात ऊर्जामंत्री श्री बावनकुळे यांच्या माध्यमातुन जिल्ह्यात 33 के.व्ही.ची 49 उपकेंद्रे मंजुर करण्यात आली आहेत.  यापैकी 19 उपकेंद्रे सुरु करण्यात आली असुन येणाऱ्या दोन महिन्याच्या कालावधीत आणखीन 10 उपकेंद्रे सुरु होतील.  57 कोटी रुपयांच्या माध्यमातुन परतूर येथे एक 220 के.व्ही व 170 कोटी रुपये खचूर्न जालना येथे स्वतंत्र असे 220 के.व्ही चे केंद्र कार्यान्वित करण्यात आले आहे.  जालना जिल्ह्यातील जनतेला योग्य दाबाने व सुरळीतपणे वीजेचा पुरवठा करण्यासाठी जिल्ह्यात वीजेचे जाळे निर्माण करण्यावर भर देण्यात आला असल्याचे सांगत विद्युत विकासासाठी जवळपास एक हजार कोटी रुपयांचा निधी मंजूर करुन घेत जिल्ह्यात एक हजार 500 नवीन ट्रान्सफार्मरची उभारणी करण्यात आली आहे.  परतूर ते आष्टीपर्यंत 35 किलोमीटर नव्याने 550 विद्युत पोलच्या उभारणीबरोबरच या पोलवरुन नवीन तारा टाकण्यात आल्या असल्याचेही पालकमंत्री श्री लोणीकर यांनी यावेळी सांगितले.
            सोयंजना व परिसरात उपकेंद्रावर तसेच ट्रान्सफार्मरवर वीजेचा अतिरिक्त ताण पडल्याने नागरिकांना पुरेशा प्रमाणात वीजेचा पुरवठा होत नव्हता.  या प्रश्नावर कायमस्वरुपी  मात करण्यासाठी या परिसरात तातडीने 33 के.व्ही. चे उपकेंद्र मंजुर करुन घेऊन त्याचे काम पुर्ण करत आज लोकार्पण करत आहोत.  या उपकेंद्रामुळे परिसरातील शेतकऱ्यांच्या शेतीला तसेच जनतेला अखंडितपणे वीजेचा पुरवठा होणार असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.
            पालकमंत्री श्री लोणीकर म्हणाले, तेलंगणा, आंध्रप्रदेश, श्रीलंका व गुजरात राज्य तसेच इस्त्राईल देशाच्या धर्तीवर जालना, परतूर व मंठा या तालुक्यातील 173 गावांना वॉटरग्रीडच्या माध्यमातून शुद्ध व स्वच्छ पिण्याच्या पाण्याचा पुरवठा करण्यासाठी 234 कोटी रुपयांची योजना साकारण्यात आली आहे.  या योजनेचा लोकार्पण सोहळा राज्याचे मुख्यमंत्री    श्री फडणवीस यांच्या उपस्थितीमध्ये नुकताच संपन्न झाला असुन या योजनेमुळे या तीनही तालुक्यातील 173 गावांना स्वच्छ व शुद्ध पाण्याचा पुरवठा करण्यात येत आहे  मंठा तालुक्यातील  95 नवीन गावांसाठीही वॉटरर्गीड योजनेच्या माध्यमातुन पाणी देण्यासाठी काम युद्ध पातळीवर करण्यात येत आहे. मराठवाड्याला टंचाईतून कायमचे बाहेर काढण्यासाठी महत्वाकांक्षी अशी मराठवाडा वॉटर ग्रीड योजना राबविण्यात येत असुन कोकणातून वाहुन जाणारे 167 टीएमसी पाणी नद्यजोड प्रकल्पांतर्गत मराठवाड्यात आणण्यात येणार आहे.  या माध्यमातुन मराठवाड्यातील दुष्काळ पुढची पिढी पाहणार नाही असा विश्वासही पालकमंत्री श्री लोणीकर यांनी यावेळी व्यक्त केला.
            पालकमंत्री श्री लोणीकर म्हणाले की, दळणवळणामध्ये महत्वाची भूमिका बजावणाऱ्या रस्ते विकासासाठी मंत्रीपदाची धुरा सांभाळताच आपण जिल्ह्यातील संपुर्ण रस्त्यांची माहिती घेऊन पुढील पाच वर्षात करावयाच्या रस्त्यांचे आराखडे तयार करण्याचे निर्देश त्या त्या विभागाच्या अधिकाऱ्यांना दिले होते. गेल्या चार वर्षाच्या काळात 210 गावांमध्ये पक्के व डांबरी रस्ते तयार करण्यात आली आहेत. गावांना रस्ते व्हावेत, शेतकऱ्यांना त्यांचा माल वेळेवर बाजारामध्ये नेण्याबरोबरच सर्वसामान्य जनतेला जलदगतीने वाहतुक करता यावी यासाठी मतदारसंघातील प्रत्येक गावात रस्ते तयार करण्यात येत आहेत. या रस्त्यांचे काम दर्जेदार व गुणवत्तापूर्ण करण्याचे निर्देश कंत्राटदारांना देण्यात आले आहेत. येणाऱ्या पाच वर्षात हा रस्ता खराब झाल्यास तो दुरुस्त करण्याची जबाबदारीही या कंत्राटदारांवर निश्चित करण्यात आली असुन येणाऱ्या काळात जिल्ह्यातील वाडी,वस्ती, तांडे व गावांमध्ये पक्क्या, दर्जेदार व मजबुत रस्त्यांचे जाळे निर्माण करण्यात येणार असल्याचेही पालकमंत्री श्री लोणीकर यांनी यावेळी सांगितले. जिल्ह्याच्या रस्ते विकासासाठी केंद्र शासनामार्फत मोठ्या प्रमाणात निधी मंजूर करण्यात आला आहे. या माध्यमातून शहरांसह ग्रामीण भागात दर्जेदार रस्त्यांची निर्मिती करण्यात येत आहे. राष्ट्रीय महामार्ग अंतर्गत दिंडी मार्ग म्हणून खामगाव-लोणार-मंठा-परतूर-माजलगाव-कळंब-बार्शी-पंढरपुर-सांगोला या 430 किलोमीटरच्या रस्त्याचे काम अत्यंत वेगाने करण्यात येत आहे.  हा मार्ग पुर्ण झाल्यास परिसराचा विकास होण्याबरोबरच बेरोजगारांना मोठ्या प्रमाणात रोजगारांच्या संधी उपलब्ध होणार असुन केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, मंत्री पंकजा मुंडे, मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या माध्यमातुन जिल्ह्यातील रस्ते विकासासाठी मोठ्या प्रमाणात निधी उपलब्ध करुन देण्यात आला असल्याचेही पालकमंत्री श्री लोणीकर यांनी यावेळी सांगितले.
            महाराष्ट्र राज्य स्वच्छतेच्या बाबतीमध्ये संपुर्ण देशामध्ये अग्रेसर असुन गत पाच वर्षाच्या काळात राज्यात 70 लाख शौचालयांची निर्मिती करण्यात आली असुन यावर 6 हजार कोटी रुपये खर्च करण्यात आले आहेत.  राज्यात 12 हजार कोटी रुपयांच्या 17 हजार गावांमध्ये पिण्याच्या पाण्याच्या योजना सुरु असल्याची माहितीही पालकमंत्री श्री लोणीकर यांनी यावेळी दिली.
            कार्यक्रमास पदाधिकारी, अधिकारी तसेच ग्रामस्थांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.
*******





Sunday 1 September 2019

कमी खर्चात अधिक उत्पन्न देणाऱ्या रेशीम व्यवसायाकडे शेतकऱ्यांनी वळण्याची गरज -- केंद्रीय राज्यमंत्री राज्यमंत्री रावसाहेब दानवे


जालना, दि. 1 –  रेशीम शेती उद्योग हा कृषीवर आधारित आहे.   कमी पाण्यावर व कमी खर्चात अधिक उत्पन्न देण्याबरोबरच रोजगाराची प्रचंड क्षमता असलेला व ग्रामीण भागातील लोकांचा आर्थिक स्तर उंचावण्यासाठी सहाय्यभूत असा उद्योग असुन शेतकऱ्यांनी या उद्योगाकडे वळण्याची गरज असल्याचे प्रतिपादन केंद्रीय अन्न नागरी पुरवठा, ग्राहक संरक्षण व वितरण राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी केले. 
            येथील जुना मोंढा परिसरात रेशीम दिन कार्यक्रम तसेच रेशीम कोष ईमारत बांधकाम भुमिपुजननिमित्त आयोजित कार्यक्रमात उपस्थित शेतकऱ्यांशी संवाद साधताना ते बोलत होते.
            व्यासपीठावर राज्याचे पशुसंवर्धन, दुग्धविकास, मस्त्यव्यवसाय व वस्त्रोद्योग राज्यमंत्री अर्जुनराव खोतकर,आमदार राजेश टोपे, आमदार शिवाजी कर्डिले,  महिला आर्थिक विकास महामंडळाच्या अध्यक्षा श्रीमती ज्योती ठाकरे, गोदावरी खोरे पाटबंधारे महामंडळाचे उपाध्यक्ष भास्कर आंबेकर, संजय खोतकर, अभिमन्यू खोतकर, ए.जे. बोराडे, पंडितराव भुतेकर, भरत गव्हाणे, बाबा मोरे, सहकार, पणन व वस्त्रोद्योग विभागाचे सचिव डॉ. के.एच. गोविंदराज, रेशीम संचालनालयाच्या संचालक श्रीमती भाग्यश्री बानायत आदींची प्रमुख उपस्थिती होती.
            केंद्रीय राज्यमंत्री श्री दानवे म्हणाले, भारत हा कृषिप्रधान देश आहे.  देशाची अर्थव्यवस्था शेतीवरच अवलंबून आहे.  आजघडीला शेती क्षेत्रामध्ये नवनवीन तंत्रज्ञान येत आहे.  शेतकऱ्यांनी बदलत्या हवामानानुसार व शास्त्रशुद्ध पद्धतीने शेती करण्याची गरज आहे.  केंद्र व राज्य शासन शेतकऱ्यांच्या हितासाठी अनेकविध योजना राबवित आहे.  शेतकऱ्यांनी या योजनांची माहिती करुन घेत याचा अधिकाधिक फायदा घेण्याची गरज असल्याचे सांगत शेतकऱ्यांनी गटशेतीला प्राधान्य देण्याची गरज आहे.  फळपिकापेक्षा कमी पाण्यात व कमी खर्चात अधिक उत्पन्न देणारा असा रेशीम उद्योग असुन अधिकाधिक शेतकऱ्यांनी या व्यवसायाकडे वळण्याची गरज असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.
मराठवाड्यासाठी स्वतंत्र रेशीम उपसंचालक कार्यालयाची स्थापना करणार
चॉकीसाठी शेतकऱ्यांना एक हजार रुपयांचे अनुदान देणार
कोषविक्रीसाठी शेतकऱ्यांना प्रतिकिलो 50 रुपये अनुदान देणार
                                                                        -- राज्यमंत्री अर्जुनराव खोतकर
            निसर्गाच्या लहरीपणामुळे शेतकऱ्यांना सातत्याने दुष्काळी परिस्थितीला सामोरे जावे लागत असल्याने पारंपरिक शेतीच्या माध्यमातुन शेतकऱ्यांना अपेक्षित असे उत्पन्न मिळत नाही.  रेशीम उद्योग हा अत्यंत कमी पाण्यात व कर्मी खर्चात अधिक प्रमाणात उत्पन्न देणारा व्यवसाय असुन रेशीम शेती शेतकऱ्यांसाठी वरदान ठरत असल्याचे सांगत चॉकी (रेशीमअळी) विकत घेण्यासाठी शेतकऱ्यांना एक हजार रुपयांचे अनुदान देण्याबरोबरच कोष विक्रीसाठी शेतकऱ्यांना प्रतिकिलो 50 रुपयांची सबसिडी देण्याची घोषणा करत मराठवाड्यामध्ये रेशीम विकासाला गती देण्यासाठी उपसंचालक कार्यालयाची स्थापना करण्यात येणार असल्याचे  राज्यमंत्री अर्जुनराव खोतकर यांनी यावेळी सांगितले.
            निसर्गाच्या लहरीपणामुळे तसेच पावसाच्या अनियमितपणामुळे शेतकऱ्यांना अनेक संकटांचा सामना करावा लागत आहे.  कमी पाण्यात भरघोस उत्पन्न देणारा रेशीम उद्योग असुन एका एकरामध्ये दीड लक्ष रुपयांचे उत्पादन घेता येते.  कोष उत्पादनाचा विचार केला तर चीनमध्ये 82 टक्के रेशीम कोषाची निर्मिती होते तर भारत देशामध्ये केवळ 16 टक्के कोषांची निर्मिती होते. यामध्ये कनार्टक, तामीळनाडू, आंध्रप्रदेश, पंश्चिम बंगाल, जम्मू काश्मिर या राज्यात कोषांचे उत्पादन घेतले जात असुन महाराष्ट्र राज्यानेही कोष निर्मितीमध्ये आघाडी घेतली आहे. मनरेगाच्या माध्यमातुन रेशीम उद्योग करणाऱ्या शेतकऱ्यांना 3 लाख रुपयांपर्यंतचे अनुदान शासनामार्फत उपलब्ध करुन देण्यात येत असुन रेशीम कोष विक्रीचा प्रश्नही आता या रेशीम विक्री खरेदी केंद्राच्या माध्यमातुन सुटला असुन येणाऱ्या काळात रेशीम धाग्यापासुन कापड निर्मितीचा उद्योग जालन्यामध्ये आणण्यासाठी आपण प्रयत्नशिल असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.
            आमदार राजेश टोपे म्हणाले, रेशीम कोष उत्पादनाचा जिल्हा म्हणून जालना जिल्ह्याकडे पाहिले जाते. नगदी व किफायतशीर व कमी पाण्यावर शेतकऱ्यांना करता येण्याजोगा रेशीम उद्योग आहे.  रेशीम कोष उत्पादनासाठी जिल्ह्यातील शेतकऱ्यांना प्रोत्साहित करण्याची गरज असुन तंत्रज्ञानाची माहिती घेऊनआधुनिक पद्धतीने हा उद्योग केल्यास या माध्यमातुन वर्षाला भरघोस असे उत्पादन शेतकऱ्यांना मिळू शकते याचे अनेक उदाहरण आपल्या जिल्ह्यात आहेत.  रेशीम शेतीसाठी शेतकऱ्यांना देण्यात येणारे अनुदान वेळेत मिळावे, अशी अपेक्षाही त्यांनी यावेळी व्यक्त केली.
            पणन व वस्त्रोद्योग विभागाचे सचिव डॉ. के.एच. गोविंदराज म्हणाले, सन 1997 साली रेशीम संचालनालयाची स्थापना करण्यात आली असुन रेशीम उत्पादनामध्ये आजघडीला महाराष्ट्र राज्य अग्रेसर आहे.  किटकगृह संगोपन व तुती लागवडीसाठी राज्यातील शेतकऱ्यांना विभागामार्फत प्रोत्साहित करण्यात येत असुन या योजनेच्या निधीमध्ये  राज्य शासनाने भरीव अशी वाढ केलेली आहे.  रेशीम व्यवसायासाठी आवश्यक असलेल्या चॉकी सेंटर वाढीवर भर देण्यात येत असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.
            यावेळी रेशीम उद्योगामध्ये उत्कृष्ट कार्य केलेल्या 28 शेतकऱ्यांचा तसेच रेशीम संचालनालयातील उत्कृष्ट अधिकारी, कर्मचाऱ्यांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
            तत्पूर्वी गट नं. 488, सिरसवाडी येथे केंद्रीय अन्न नागरी पुरवठा, ग्राहक संरक्षण व वितरण राज्यमंत्री रावसाहेब पाटील दानवे यांच्या हस्ते रेशीम कोष बाजारपेठ इमारत बांधकामाचे भुमिपुजन करण्यात आले.  यावेळी राज्यमंत्री अर्जुनराव खोतकर,आमदार राजेश टोपे, आमदार शिवाजी कर्डिले,  महिला आर्थिक विकास महामंडळाच्या अध्यक्षा श्रीमती ज्योती ठाकरे, गोदावरी खोरे पाटबंधारे महामंडळाचे उपाध्यक्ष भास्कर आंबेकर, पंडित भुतेकर जिल्हाधिकारी रवींद्र बिनवडे, पणन व वस्त्रोद्योग विभागाचे सचिव डॉ. के.एच. गोविंदराज, रेशीम संचालनालयाच्या संचालक श्रीमती भाग्यश्री बानायत आदी उपस्थित होते.
            कार्यक्रमास पदाधिकारी, अधिकारी, महिला व शेतकऱ्यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.
*******