Sunday 1 September 2019

कमी खर्चात अधिक उत्पन्न देणाऱ्या रेशीम व्यवसायाकडे शेतकऱ्यांनी वळण्याची गरज -- केंद्रीय राज्यमंत्री राज्यमंत्री रावसाहेब दानवे


जालना, दि. 1 –  रेशीम शेती उद्योग हा कृषीवर आधारित आहे.   कमी पाण्यावर व कमी खर्चात अधिक उत्पन्न देण्याबरोबरच रोजगाराची प्रचंड क्षमता असलेला व ग्रामीण भागातील लोकांचा आर्थिक स्तर उंचावण्यासाठी सहाय्यभूत असा उद्योग असुन शेतकऱ्यांनी या उद्योगाकडे वळण्याची गरज असल्याचे प्रतिपादन केंद्रीय अन्न नागरी पुरवठा, ग्राहक संरक्षण व वितरण राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी केले. 
            येथील जुना मोंढा परिसरात रेशीम दिन कार्यक्रम तसेच रेशीम कोष ईमारत बांधकाम भुमिपुजननिमित्त आयोजित कार्यक्रमात उपस्थित शेतकऱ्यांशी संवाद साधताना ते बोलत होते.
            व्यासपीठावर राज्याचे पशुसंवर्धन, दुग्धविकास, मस्त्यव्यवसाय व वस्त्रोद्योग राज्यमंत्री अर्जुनराव खोतकर,आमदार राजेश टोपे, आमदार शिवाजी कर्डिले,  महिला आर्थिक विकास महामंडळाच्या अध्यक्षा श्रीमती ज्योती ठाकरे, गोदावरी खोरे पाटबंधारे महामंडळाचे उपाध्यक्ष भास्कर आंबेकर, संजय खोतकर, अभिमन्यू खोतकर, ए.जे. बोराडे, पंडितराव भुतेकर, भरत गव्हाणे, बाबा मोरे, सहकार, पणन व वस्त्रोद्योग विभागाचे सचिव डॉ. के.एच. गोविंदराज, रेशीम संचालनालयाच्या संचालक श्रीमती भाग्यश्री बानायत आदींची प्रमुख उपस्थिती होती.
            केंद्रीय राज्यमंत्री श्री दानवे म्हणाले, भारत हा कृषिप्रधान देश आहे.  देशाची अर्थव्यवस्था शेतीवरच अवलंबून आहे.  आजघडीला शेती क्षेत्रामध्ये नवनवीन तंत्रज्ञान येत आहे.  शेतकऱ्यांनी बदलत्या हवामानानुसार व शास्त्रशुद्ध पद्धतीने शेती करण्याची गरज आहे.  केंद्र व राज्य शासन शेतकऱ्यांच्या हितासाठी अनेकविध योजना राबवित आहे.  शेतकऱ्यांनी या योजनांची माहिती करुन घेत याचा अधिकाधिक फायदा घेण्याची गरज असल्याचे सांगत शेतकऱ्यांनी गटशेतीला प्राधान्य देण्याची गरज आहे.  फळपिकापेक्षा कमी पाण्यात व कमी खर्चात अधिक उत्पन्न देणारा असा रेशीम उद्योग असुन अधिकाधिक शेतकऱ्यांनी या व्यवसायाकडे वळण्याची गरज असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.
मराठवाड्यासाठी स्वतंत्र रेशीम उपसंचालक कार्यालयाची स्थापना करणार
चॉकीसाठी शेतकऱ्यांना एक हजार रुपयांचे अनुदान देणार
कोषविक्रीसाठी शेतकऱ्यांना प्रतिकिलो 50 रुपये अनुदान देणार
                                                                        -- राज्यमंत्री अर्जुनराव खोतकर
            निसर्गाच्या लहरीपणामुळे शेतकऱ्यांना सातत्याने दुष्काळी परिस्थितीला सामोरे जावे लागत असल्याने पारंपरिक शेतीच्या माध्यमातुन शेतकऱ्यांना अपेक्षित असे उत्पन्न मिळत नाही.  रेशीम उद्योग हा अत्यंत कमी पाण्यात व कर्मी खर्चात अधिक प्रमाणात उत्पन्न देणारा व्यवसाय असुन रेशीम शेती शेतकऱ्यांसाठी वरदान ठरत असल्याचे सांगत चॉकी (रेशीमअळी) विकत घेण्यासाठी शेतकऱ्यांना एक हजार रुपयांचे अनुदान देण्याबरोबरच कोष विक्रीसाठी शेतकऱ्यांना प्रतिकिलो 50 रुपयांची सबसिडी देण्याची घोषणा करत मराठवाड्यामध्ये रेशीम विकासाला गती देण्यासाठी उपसंचालक कार्यालयाची स्थापना करण्यात येणार असल्याचे  राज्यमंत्री अर्जुनराव खोतकर यांनी यावेळी सांगितले.
            निसर्गाच्या लहरीपणामुळे तसेच पावसाच्या अनियमितपणामुळे शेतकऱ्यांना अनेक संकटांचा सामना करावा लागत आहे.  कमी पाण्यात भरघोस उत्पन्न देणारा रेशीम उद्योग असुन एका एकरामध्ये दीड लक्ष रुपयांचे उत्पादन घेता येते.  कोष उत्पादनाचा विचार केला तर चीनमध्ये 82 टक्के रेशीम कोषाची निर्मिती होते तर भारत देशामध्ये केवळ 16 टक्के कोषांची निर्मिती होते. यामध्ये कनार्टक, तामीळनाडू, आंध्रप्रदेश, पंश्चिम बंगाल, जम्मू काश्मिर या राज्यात कोषांचे उत्पादन घेतले जात असुन महाराष्ट्र राज्यानेही कोष निर्मितीमध्ये आघाडी घेतली आहे. मनरेगाच्या माध्यमातुन रेशीम उद्योग करणाऱ्या शेतकऱ्यांना 3 लाख रुपयांपर्यंतचे अनुदान शासनामार्फत उपलब्ध करुन देण्यात येत असुन रेशीम कोष विक्रीचा प्रश्नही आता या रेशीम विक्री खरेदी केंद्राच्या माध्यमातुन सुटला असुन येणाऱ्या काळात रेशीम धाग्यापासुन कापड निर्मितीचा उद्योग जालन्यामध्ये आणण्यासाठी आपण प्रयत्नशिल असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.
            आमदार राजेश टोपे म्हणाले, रेशीम कोष उत्पादनाचा जिल्हा म्हणून जालना जिल्ह्याकडे पाहिले जाते. नगदी व किफायतशीर व कमी पाण्यावर शेतकऱ्यांना करता येण्याजोगा रेशीम उद्योग आहे.  रेशीम कोष उत्पादनासाठी जिल्ह्यातील शेतकऱ्यांना प्रोत्साहित करण्याची गरज असुन तंत्रज्ञानाची माहिती घेऊनआधुनिक पद्धतीने हा उद्योग केल्यास या माध्यमातुन वर्षाला भरघोस असे उत्पादन शेतकऱ्यांना मिळू शकते याचे अनेक उदाहरण आपल्या जिल्ह्यात आहेत.  रेशीम शेतीसाठी शेतकऱ्यांना देण्यात येणारे अनुदान वेळेत मिळावे, अशी अपेक्षाही त्यांनी यावेळी व्यक्त केली.
            पणन व वस्त्रोद्योग विभागाचे सचिव डॉ. के.एच. गोविंदराज म्हणाले, सन 1997 साली रेशीम संचालनालयाची स्थापना करण्यात आली असुन रेशीम उत्पादनामध्ये आजघडीला महाराष्ट्र राज्य अग्रेसर आहे.  किटकगृह संगोपन व तुती लागवडीसाठी राज्यातील शेतकऱ्यांना विभागामार्फत प्रोत्साहित करण्यात येत असुन या योजनेच्या निधीमध्ये  राज्य शासनाने भरीव अशी वाढ केलेली आहे.  रेशीम व्यवसायासाठी आवश्यक असलेल्या चॉकी सेंटर वाढीवर भर देण्यात येत असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.
            यावेळी रेशीम उद्योगामध्ये उत्कृष्ट कार्य केलेल्या 28 शेतकऱ्यांचा तसेच रेशीम संचालनालयातील उत्कृष्ट अधिकारी, कर्मचाऱ्यांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
            तत्पूर्वी गट नं. 488, सिरसवाडी येथे केंद्रीय अन्न नागरी पुरवठा, ग्राहक संरक्षण व वितरण राज्यमंत्री रावसाहेब पाटील दानवे यांच्या हस्ते रेशीम कोष बाजारपेठ इमारत बांधकामाचे भुमिपुजन करण्यात आले.  यावेळी राज्यमंत्री अर्जुनराव खोतकर,आमदार राजेश टोपे, आमदार शिवाजी कर्डिले,  महिला आर्थिक विकास महामंडळाच्या अध्यक्षा श्रीमती ज्योती ठाकरे, गोदावरी खोरे पाटबंधारे महामंडळाचे उपाध्यक्ष भास्कर आंबेकर, पंडित भुतेकर जिल्हाधिकारी रवींद्र बिनवडे, पणन व वस्त्रोद्योग विभागाचे सचिव डॉ. के.एच. गोविंदराज, रेशीम संचालनालयाच्या संचालक श्रीमती भाग्यश्री बानायत आदी उपस्थित होते.
            कार्यक्रमास पदाधिकारी, अधिकारी, महिला व शेतकऱ्यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.
******* 




No comments:

Post a Comment