Monday 23 September 2019

विधानसभा सार्वत्रिक निवडणूक : राजकीय पक्ष प्रतिनिधींसोबत बैठक निवडणूक यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी प्रशासनास सहकार्य करावे-- जिल्हाधिकारी रवींद्र बिनवडे



            जालना, दि‍. 23 : विधानसभा सार्वत्रिक निवडणूक 2019  निवडणूकीची आदर्श आचारसंहिता लागू झाली आहे. ही विधानसभा निवडणुक यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी राजकीय पक्षांनी प्रशासनास सहकार्य करण्याचे आवाहन जिल्हाधिकारी रवींद्र बिनवडे यांनी केले.
            जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात राजकीय पक्ष प्रतिनिधींसोबत बैठक आयोजित करण्यात आली होती. त्यावेळी जिल्हाधिकारी श्री बिनवडे बोलत होते.  यावेळी जिल्हा पोलीस अधीक्षक एस. चैतन्या, उपजिल्हाधिकारी (निवडणूक) श्रीमती दीपाली मोतियाळे, लेखा  व वित्त अधिकारी उत्तम चव्हाण, जिल्हा कोषागार अधिकारी श्रीमती वैशाली थोरात, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे तय्यबबापू देशमुख, भारतीय जनता पार्टीचे सिद्धीविनायक मुळे, शिवसेनेचे दिनेश फलके, बसपाचे सुधाकर बडगे यांच्यासह सतीष जाधव, अरुण पठाडे, रोशन चौधरी, तुलजेश चौधरी, प्रशांत आढावे, आर.डी. वाघमारे, शशिकांत घुगे, दीपक रणनवरे, दुर्गेश काठोठीवाले आदी उपस्थित होते.
            जिल्हाधिकारी श्री बिनवडे म्हणाले निवडणुकीदरम्यान आदर्श आचारसंहितेचे सर्व पक्षांनी पालन करावे.  निवडणुकीमध्ये आवश्यक असणाऱ्या विविध परवानग्यांसाठी आयोगाकडून संगणकीय ॲप्लीकेशन उपलब्ध करुन देण्यात येणार असुन याचा वापर राजकीय पक्षांनी करण्याचे आवाहन करत प्रत्येक विधानसभा मतदारसंघामध्ये परवानग्यांसाठी एक खिडकी कक्ष स्थापन करण्यात आला आहे. उमेदवारांना 28 लक्ष रूपये खर्चाची मर्यादा आहे. यापेक्षा अधिक खर्च होणार नाही, याबाबत काळजी घेण्याचे आवाहनही त्यांनी यावेळी केले.
            27 सप्टेंबरपासुन नामनिर्देशपत्र दाखल करता येणार असुन नामनिर्देशन पत्र दाखल करण्याची अंतिम तारीख 4 ऑक्टोबर अशी राहणार आहे.  नामनिर्देशन पत्राची छाननीची तारीख 5 ऑक्टोबर असुन उमेदवारी मागे घेण्याची तारीख 7 ऑक्टोबर असणार आहे.  मतदानाची तारीख 21 ऑक्टोबर, 2019 अशी असुन मतमोजणी ही 24 ऑक्टोबर, 2019 रोजी होणार असल्याचही माहितीही  जिल्हाधिकाऱ्यांनी उपस्थित राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींना दिली.
            यावेळी जिल्हा पोलीस अधीक्षक एस. चैतन्या यांनीसुद्धा निवडणुकीच्या अनुषंगाने पोलीस प्रशासनाच्यावतीने राजकीय पक्षांना सुचना करत कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी पोलीस प्रशासनाला सहकार्य करण्याचे आवाहन केले.


No comments:

Post a Comment