Tuesday 10 September 2019

जिल्ह्यात एक हजार कोटी रुपयांच्या माध्यमातुन विद्युत विकासाची कामे शेतकऱ्यांना व नागरिकांना अखंडितपणे वीज पुरवठ्यासाठी वीजेचे जाळे निर्माणावर भर - पालकमंत्री बबनराव लोणीकर



            जालना, दि. 10 -  शेतकऱ्यांच्या शेतीला अखंडितपणे पाणी पुरवठा होण्यासाठी तसेच सर्वसामान्य जनतेला योग्य दाबाने वीजेचा पुरवठा होण्यासाठी जालना जिल्ह्यात गेल्या साडेचार वर्षाच्या काळात वीजेचे जाळे निर्माण करण्यावर भर देण्यात आला असुन जवळपास एक हजार कोटी रुपयांच्या माध्यमातुन जिल्ह्यात विद्युत विकासाची कामे करण्यात येत असल्याचे प्रतिपादन राज्याचे पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री बबनराव लोणीकर यांनी केले. 
            परतुर तालुक्यातील सोयंजना येथे 33 के.व्ही. उपकेंद्राचे पालकमंत्री बबनराव लोणीकर यांच्या हस्ते लोकार्पण करण्यात आले. त्याप्रसंगी उपस्थितांशी संवाद साधताना ते बोलत होते.
            व्यासपीठावर जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष राहूल लोणीकर, उद्धव खेडेकर, मदन शिंगी, रामप्रसाद थोरात, रमेश भापकर, सुधाकर सातोनकर, अंकुशराव नवल, बद्रीभाऊ ढवळे, शिवाजी पाईकराव, सरपंच केशवराव ढवळे, रावसाहेब सोळंके, रामबापु ढवळे, नारायणराव सोळंके, दिगांबर मुजमुले, संपत टकले, अधीक्षक अभियंता श्री हुमणे, इन्फ्राच्या श्रीमती संध्या चिवडे, तहसिलदार भाऊसाहेब कदम आदींची प्रमुख उपस्थिती होती.
            पालकमंत्री श्री लोणीकर म्हणाले, गेल्या सत्तर वर्षाच्या काळात जालना जिल्ह्यात केवळ 79 उपकेंद्रे होती.  परंतू विद्यमान शासनाच्या कार्यकाळात ऊर्जामंत्री श्री बावनकुळे यांच्या माध्यमातुन जिल्ह्यात 33 के.व्ही.ची 49 उपकेंद्रे मंजुर करण्यात आली आहेत.  यापैकी 19 उपकेंद्रे सुरु करण्यात आली असुन येणाऱ्या दोन महिन्याच्या कालावधीत आणखीन 10 उपकेंद्रे सुरु होतील.  57 कोटी रुपयांच्या माध्यमातुन परतूर येथे एक 220 के.व्ही व 170 कोटी रुपये खचूर्न जालना येथे स्वतंत्र असे 220 के.व्ही चे केंद्र कार्यान्वित करण्यात आले आहे.  जालना जिल्ह्यातील जनतेला योग्य दाबाने व सुरळीतपणे वीजेचा पुरवठा करण्यासाठी जिल्ह्यात वीजेचे जाळे निर्माण करण्यावर भर देण्यात आला असल्याचे सांगत विद्युत विकासासाठी जवळपास एक हजार कोटी रुपयांचा निधी मंजूर करुन घेत जिल्ह्यात एक हजार 500 नवीन ट्रान्सफार्मरची उभारणी करण्यात आली आहे.  परतूर ते आष्टीपर्यंत 35 किलोमीटर नव्याने 550 विद्युत पोलच्या उभारणीबरोबरच या पोलवरुन नवीन तारा टाकण्यात आल्या असल्याचेही पालकमंत्री श्री लोणीकर यांनी यावेळी सांगितले.
            सोयंजना व परिसरात उपकेंद्रावर तसेच ट्रान्सफार्मरवर वीजेचा अतिरिक्त ताण पडल्याने नागरिकांना पुरेशा प्रमाणात वीजेचा पुरवठा होत नव्हता.  या प्रश्नावर कायमस्वरुपी  मात करण्यासाठी या परिसरात तातडीने 33 के.व्ही. चे उपकेंद्र मंजुर करुन घेऊन त्याचे काम पुर्ण करत आज लोकार्पण करत आहोत.  या उपकेंद्रामुळे परिसरातील शेतकऱ्यांच्या शेतीला तसेच जनतेला अखंडितपणे वीजेचा पुरवठा होणार असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.
            पालकमंत्री श्री लोणीकर म्हणाले, तेलंगणा, आंध्रप्रदेश, श्रीलंका व गुजरात राज्य तसेच इस्त्राईल देशाच्या धर्तीवर जालना, परतूर व मंठा या तालुक्यातील 173 गावांना वॉटरग्रीडच्या माध्यमातून शुद्ध व स्वच्छ पिण्याच्या पाण्याचा पुरवठा करण्यासाठी 234 कोटी रुपयांची योजना साकारण्यात आली आहे.  या योजनेचा लोकार्पण सोहळा राज्याचे मुख्यमंत्री    श्री फडणवीस यांच्या उपस्थितीमध्ये नुकताच संपन्न झाला असुन या योजनेमुळे या तीनही तालुक्यातील 173 गावांना स्वच्छ व शुद्ध पाण्याचा पुरवठा करण्यात येत आहे  मंठा तालुक्यातील  95 नवीन गावांसाठीही वॉटरर्गीड योजनेच्या माध्यमातुन पाणी देण्यासाठी काम युद्ध पातळीवर करण्यात येत आहे. मराठवाड्याला टंचाईतून कायमचे बाहेर काढण्यासाठी महत्वाकांक्षी अशी मराठवाडा वॉटर ग्रीड योजना राबविण्यात येत असुन कोकणातून वाहुन जाणारे 167 टीएमसी पाणी नद्यजोड प्रकल्पांतर्गत मराठवाड्यात आणण्यात येणार आहे.  या माध्यमातुन मराठवाड्यातील दुष्काळ पुढची पिढी पाहणार नाही असा विश्वासही पालकमंत्री श्री लोणीकर यांनी यावेळी व्यक्त केला.
            पालकमंत्री श्री लोणीकर म्हणाले की, दळणवळणामध्ये महत्वाची भूमिका बजावणाऱ्या रस्ते विकासासाठी मंत्रीपदाची धुरा सांभाळताच आपण जिल्ह्यातील संपुर्ण रस्त्यांची माहिती घेऊन पुढील पाच वर्षात करावयाच्या रस्त्यांचे आराखडे तयार करण्याचे निर्देश त्या त्या विभागाच्या अधिकाऱ्यांना दिले होते. गेल्या चार वर्षाच्या काळात 210 गावांमध्ये पक्के व डांबरी रस्ते तयार करण्यात आली आहेत. गावांना रस्ते व्हावेत, शेतकऱ्यांना त्यांचा माल वेळेवर बाजारामध्ये नेण्याबरोबरच सर्वसामान्य जनतेला जलदगतीने वाहतुक करता यावी यासाठी मतदारसंघातील प्रत्येक गावात रस्ते तयार करण्यात येत आहेत. या रस्त्यांचे काम दर्जेदार व गुणवत्तापूर्ण करण्याचे निर्देश कंत्राटदारांना देण्यात आले आहेत. येणाऱ्या पाच वर्षात हा रस्ता खराब झाल्यास तो दुरुस्त करण्याची जबाबदारीही या कंत्राटदारांवर निश्चित करण्यात आली असुन येणाऱ्या काळात जिल्ह्यातील वाडी,वस्ती, तांडे व गावांमध्ये पक्क्या, दर्जेदार व मजबुत रस्त्यांचे जाळे निर्माण करण्यात येणार असल्याचेही पालकमंत्री श्री लोणीकर यांनी यावेळी सांगितले. जिल्ह्याच्या रस्ते विकासासाठी केंद्र शासनामार्फत मोठ्या प्रमाणात निधी मंजूर करण्यात आला आहे. या माध्यमातून शहरांसह ग्रामीण भागात दर्जेदार रस्त्यांची निर्मिती करण्यात येत आहे. राष्ट्रीय महामार्ग अंतर्गत दिंडी मार्ग म्हणून खामगाव-लोणार-मंठा-परतूर-माजलगाव-कळंब-बार्शी-पंढरपुर-सांगोला या 430 किलोमीटरच्या रस्त्याचे काम अत्यंत वेगाने करण्यात येत आहे.  हा मार्ग पुर्ण झाल्यास परिसराचा विकास होण्याबरोबरच बेरोजगारांना मोठ्या प्रमाणात रोजगारांच्या संधी उपलब्ध होणार असुन केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, मंत्री पंकजा मुंडे, मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या माध्यमातुन जिल्ह्यातील रस्ते विकासासाठी मोठ्या प्रमाणात निधी उपलब्ध करुन देण्यात आला असल्याचेही पालकमंत्री श्री लोणीकर यांनी यावेळी सांगितले.
            महाराष्ट्र राज्य स्वच्छतेच्या बाबतीमध्ये संपुर्ण देशामध्ये अग्रेसर असुन गत पाच वर्षाच्या काळात राज्यात 70 लाख शौचालयांची निर्मिती करण्यात आली असुन यावर 6 हजार कोटी रुपये खर्च करण्यात आले आहेत.  राज्यात 12 हजार कोटी रुपयांच्या 17 हजार गावांमध्ये पिण्याच्या पाण्याच्या योजना सुरु असल्याची माहितीही पालकमंत्री श्री लोणीकर यांनी यावेळी दिली.
            कार्यक्रमास पदाधिकारी, अधिकारी तसेच ग्रामस्थांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.
*******





No comments:

Post a Comment