Monday 23 September 2019

विधानसभा सार्वत्रिक निवडणुक 2019 मतदान केंद्रावर दिव्यांगांना सर्व सुविधा उपलब्ध करुन देणार- जिल्हाधिकारी रवींद्र बिनवडे




            जालना, दि. 23 – विधानसभा सार्वत्रिक निवडणूक 2019 चा कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे.  या निवडणुकीदरम्यान दिव्यांग मतदारांना मतदान केंद्रावर सर्व सोयी-सुविधा उपलब्ध करुन देण्याचे निवडणूक आयोगाने निर्देश दिले असुन त्यादृष्टीकोनातुन पाचही विधानसभा मतदारसंघातील मतदान केंद्रावर दिव्यांगाना सोई-सुविधा उपलब्ध करुन देण्यात येणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी रवींद्र बिनवडे यांनी दिली.
            विधानसभा सार्वत्रिक निवडणूक 2019 च्या अनुषंगाने मतदानाच्यावेळी दिव्यांगांना उपलब्ध करुन देण्यात येणाऱ्या सोयी-सुविधा संदर्भात संबंधित अधिकाऱ्यांच्या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते.  त्याप्रसंगी ते बोलत होते.
            यावेळी उपजिल्हाधिकारी (निवडणूक) श्रीमती दीपाली मोतियाळे,   आदींची उपस्थिती होती.
            जिल्हाधिकारी श्री बिनवडे म्हणाले, विधानसभा निवडणुकीदरम्यान दिव्यांगांना मतदान केंद्रावर रॅम्प तसेच पिण्याच्या पाण्याची सुविधा देण्याबरोबरच घरापासुन मतदान केंद्रापर्यंत नेणे व तेथुन त्यांच्या घरापर्यंत सोडण्यासाठी प्रशसनामार्फत मोफत वाहन सुविधा उपलब्ध करुन देण्यात येणार आहे.  अंध मतदारांसाठी ब्रेल लिपीमध्ये माहितीपुस्तिकाही उपलब्ध करुन देण्यात येणार असुन मतदान केंद्रावर व्हिलचेअर तसेच मॅग्नीफाईल लेन्सेसही उपलब्ध करुन देण्यात येणार आहे. अधिकाधिक दिव्यांगांनी मतदानाचा हक्क बजवावा यासाठी निकेश मदारे यांची आयकॉन म्हणुन नियुक्ती करण्यात आली असुन प्रत्येक विधानसभा मतदारसंघामध्ये होणाऱ्या बैठकांमध्ये श्री मदारे हे दिव्यांगांना मतदानासाठी प्रोत्साहितही करणार असल्याचे जिल्हाधिकाऱ्यांनी यावेळी सांगितले.
******* 


No comments:

Post a Comment