Monday 23 September 2019

विधानसभा सार्वत्रिक निवडणूक 2019 सर्व शासकीय विभाग प्रमुखांनी आचारसंहितेचे काटेकोरपणे पालन करावे निवडणुकीच्या काळात पूर्वपरवानगीशिवाय मुख्यालय सोडू नये -- जिल्हाधिकारी रवींद्र बिनवडे


जालना, दि.23 :- विधानसभा सार्वत्रिक निवडणूक 2019 चा कार्यक्रम जाहीर करण्यात आला असुन  या निवडणुकी दरम्यान सर्व शासकीय विभागप्रमुखांनी  आचारसंहितेचे काटेकोर पालन करण्याबरोबरच निवडणुकीच्या कालावधीत देण्यात आलेली जबाबदारी बिनचुक पार पाडण्याबरोबरच   निवडणुकीसाठी नियुक्त अधिकाऱ्यांनी पूर्वपरवानगीशिवाय मुख्यालय न सोडण्याचे निर्देश जिल्हाधिकारी रवींद्र बिनवडे यांनी दिले.
            विधानसभा सार्वत्रिक निवडणूक 2019 च्या अनुषंगाने सर्व विभाग प्रमुखांच्या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते.  त्याप्रसंगी उपस्थित अधिकाऱ्यांना मार्गदर्शन करताना जिल्हाधिकारी श्री बिनवडे बोलत होते.
            यावेळी जिल्हा पोलीस अधीक्षक एस. चैतन्य, जिल्हा परिषदेच्या प्रभारी मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती कल्पना क्षीरसागर उपजिल्हाधिकारी (निवडणूक) श्रीमती दीपाली मोतीयळे, जिल्हा पुरवठा अधिकारी श्रीमती रिना बसेय्यै, लेखा  व वित्त अधिकारी उत्तम चव्हाण, जिल्हा कोषागार अधिकारी श्रीमती वैशाली थोरात, बालकामगार विभागाचे प्रकल्प संचालक मनोज देशमुख, राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या अधीक्षक श्रीमती भाग्यश्री जाधव, कार्यकारी अभियंता श्री चांडक, जिल्हा दुग्धव्यवसाय अधिकारी श्रीमती देवयानि भारसवाडकर आदींची  प्रामुख्याने उपस्थिती होती.
            जिल्हाधिकारी श्री बिनवडे म्हणाले की,जालना जिल्ह्यात पाच विधानसभा मतदार संघ असुन या पाचही मतदारसंघात निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे.  99-परतूर मतदारसंघासाठी भाऊसाहेब जाधव, उप विभागीय अधिकारी, परतूर 100-घनसावंगीसाठी शशिकांत हदगल, 101-जालना मतदारसंघासाठी श्रीमंत हारकर, 102- बदनापुर मतदारसंघासाठी  गणेश निऱ्हाळी तर 103-भोकरदन विधानसभा मतदारसंघासाठी शिवकुमार स्वामी यांची निवडणुक निर्णय अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.    दि. 31 ऑगस्ट, 2019 नुसार अंतिम मतदारांची संख्या 15 लक्ष 54 हजार 110 एवढी असुन यामध्ये पुरुष मतदारांची संख्या 8 लाख 16 हजार 229, स्त्री मतदारांची संख्या 7 लाख 36 हजार 367, इतर 02 व सैनिक मतदार 1 हजार 511 एवढी असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले. जिल्ह्यातील पाचही विधानसभा मतदारसंघामध्ये मिळुन 1 हजार 633 मुख्य मतदान केंद्रे तर 20 सहाय्यक मतदान केंद्रे अशी एकुण 1 हजार 653 मतदान केंद्रे आहेत.  99-परतुर विधानसभा मतदारसंघात 325 मुख्य मतदान केंद्र, 100-घनसावंगी मतदारसंघात 339, 101- जालना मतदारसंघात 304 मुख्य मतदान केंद्र व 14 सहाय्य्क मतदान केंद्र, 102- बदनापुर मतदारसंघात 347 मुख्य तर 02 सहाय्यक मतदान केंद्र व 103-भोकरदन मतदारसंघामध्ये 318 मुख्य तर 4 सहाय्यक मतदान केंद्र असल्याची माहितीही त्यांनी यावेळी दिली.

..2..
            निवडणुकीच्या कामासाठी विविध विभागांच्या अधिकाऱ्यांची नोडल अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली असुन नियुक्त अधिकाऱ्यांनी त्यांना दिलेले काम चोखपणे पार पाडावे.  सर्व अधिकाऱ्यांना कामाचा अहवाल विहित नमुन्यात सादर करावा. निवडणुकी दरम्यान जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्था अबाधित राहण्यासाठी पोलीस प्रशासनाने चोख बंदोबस्त ठेवावा. निवडणुकीमध्ये आवश्यक असणाऱ्या विविध परवानग्यांसाठी आयोगाकडून संगणकीय ॲप्लीकेशन उपलब्ध करुन देण्यात आले आहे. निवडणुकीच्या अनुषंगाने स्थापन करण्यात आलेल्या भरारी पथकांनी चोखपणे आपली जाबबदारी पार पाडत अवैध रोकड, मद्य वाहतुक यासारख्या बाबींना पायबंद घालण्याचे  निर्देशही जिल्हाधिकारी श्री बिनवडे यांनी दिले.
            विधानसभा मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी नामनिर्देशित उमेदवार, राजकीय पक्ष यांनी प्रचारासाठी वाहन परवाना, सभा, लाऊडस्पीकर व ईतर बाबींसाठी आवश्यक असणाऱ्या परवानग्यासाठी त्या त्या विधानसभा मतदारसंघाच्या निवडणूक निर्णय अधिकारी यांच्या कार्यालयात एक खिडकी कक्षाची स्थापना करण्यात आली आहे.  तसेच राजकीय जाहिरातीच्या प्रसारणपूर्व प्रमाणिकरणासाठी माध्यम प्रमाणिकरण व सनियंत्रण समितीची स्थापना करण्यात आली आहे.   मतदारांना  त्यांच्य मतदार यादीतील नावासंदर्भात अथवा निवडणुकीविषयी ईतर माहितीसाठी 1950 हा टोल फ्री क्रमांकही उपलब्ध करुन देण्यात आला असल्याची माहितीही जिल्हाधिकारी श्री बिनवडे यांनी यावेळी दिली.
            विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीच्या अनुषंगाने सर्व नियुक्त अधिकारी, कर्मचाऱ्यांनी पोलीस प्रशासनासोबत समन्वयाने काम करण्याच्या सुचना जिल्हा पोलीस अधीक्षक एस. चैतन्य यांनी यावेळी दिल्या.
                        बैठकीस निवडणुकीशी संबंधित सर्व प्रमुख अधिकारी उपस्थित होते.
******* 


No comments:

Post a Comment