Thursday 24 March 2022

राज्य सेवा हमी कायदा अंमलबजावणीसंदर्भात आढावा बैठक संपन्न जनतेच्या सेवापुर्ततेमध्ये अधिकाऱ्यांनी आपली संवेदनशीलता अधिक प्रगल्भ करावी -- आयुक्त डॉ. किरण जाधव

 





 
   जालना दि. 24 (जिमाका):- जनतेला पारदर्शक, गतीमान आणि दिलेल्या कालमर्यादेत माहिती तंत्रज्ञानाचा वापर  करुन अधिक प्रभावीपणे सेवा देण्यासाठी महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियमाची स्थापना करण्यात आली आहे.  आतापर्यंत राज्यात 11 कोटी सेवा जनतेपर्यंत पोहोचविण्यात आल्या असुन येणाऱ्या काळातही जनतेच्या सेवापुर्ततेमध्ये शासकीय अधिकाऱ्यांनी आपली संवेदनशिलता अधिक प्रगल्भ करण्याचे निर्देश राज्य सेवा हक्क आयोगाचे आयुक्त   डॉ. किरण जाधव यांनी आज दिले.


     महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियमाच्या अंमलबजावणीबाबत जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात आढावा बैठकीचे आयोजन करण्यात आले होते.  त्याप्रसंगी उपस्थित अधिकाऱ्यांना मार्गदर्शन करताना ते बोलत होते.
 व्यासपीठावर जिल्हाधिकारी डॉ. विजय राठोड, जिल्हा पोलीस अधीक्षक विनायक देशमुख, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मनुज जिंदल, उपजिल्हाधिकारी (सामान्य प्रशासन) शर्मिला भोसले आदींची प्रमुख उपस्थिती होती.
 आयुक्त डॉ. जाधव म्हणाले की, जनतेच्या हक्कांना जपणारा हा कायदा असून या माध्यमातून प्रशासन नागरिकांच्या दारात पोहोचावे. जनतेला पारदर्शकपणे व दिलेल्या विहित कालावधीमध्ये सेवा मिळावी या उद्देशाने ही सेवा सुरु करण्यात आली आहे.  संपुर्ण देशभरामध्ये केवळ महाराष्ट्र, उत्तराखंड, तेलंगणा, पंजाब व हरियाणा या पाच राज्यांमध्ये या अधिनियमांतर्गत जनतेला माहिती तंत्रज्ञानाचा वापर करुन सेवा पुरवण्यात येत आहे. महाराष्ट्र शासनाच्या अधिपत्याखालील सर्व शासकीय विभाग तसेच प्राधिकरणे यांच्या 530 अधिसुचित करण्यात आलेल्या सेवांचा लाभ जनतेला देण्यात येत आहे.  या अधिनियमाच्या स्थापनेपासुन आजपर्यंत जनतेला 11 कोटी सेवा विहित वेळेत पुरविण्यात आल्या असल्याचेही आयुक्त डॉ. जाधव यांनी यावेळी सांगितले.


   जालना जिल्ह्यामध्ये शासकीय विभागांमार्फत जनतेला देण्यात येणाऱ्या ज्या सुविधा अधिसुचित करण्यात आलेल्या नाहीत अशा 45 सेवांचा प्रस्ताव अधिसुचित करण्यासाठी जिल्हाधिकारी डॉ. विजय राठोड यांच्या पुढाकाराने शासनाला पाठविल्याबद्दल आयुक्तांनी जिल्हाधिकारी डॉ. राठोड यांचे विशेष अभिनंदन करत येणाऱ्या काळात जालना जिल्हा महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियमाच्या माध्यमातून जनतेला सेवा पुरवण्यामध्ये अग्रेसर रहावा, अशी अपेक्षाही त्यांनी यावेळी व्यक्त केली.


  हा कायदा जनतेसाठी अत्यंत उपयुक्त असून या कायद्याची माहिती जनतेला होण्यासाठी प्रत्येकाने आपल्या कार्यालयात दर्शनी भागात या कायद्याच्या कार्यक्षेत्रात येणाऱ्या सेवांची व त्यासाठीच्या कालमर्यादेची माहिती लावणे बंधनकारक आहे. या कायद्याच्या अंमलबजावणीने प्रशासन अधिक गतीमान आणि पारदर्शक होण्यास मदत होणार आहे. दिलेल्या कालमर्यादेत जनतेला सेवा देणे आवश्य क आहे, प्रत्येक सेवेसाठी ज्या पध्दतीने प्राधिकृत अधिकारी नेमला आहे,      

     त्याचप्रमाणे अपिलीय अधिकारी सुध्दा नेमण्यात आला आहे. या कायद्याच्या माध्यमातून जनतेचे काम अधिक सोपे होणार आहे. दिलेल्या कालमर्यादेत काम न करणाऱ्या अधिकाऱ्यासाठी पाचशे रुपयांपासून ते पाच हजार रुपयांपर्यंतच्या दंडाची तरतूद करण्यात आली असल्याचेही डॉ. जाधव यांनी यावेळी सांगितले.


   यावेळी आयुक्त डॉ. जाधव यांनी गतवर्षभरामध्ये महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियमाच्या माध्यमातून शासनाच्या विविध विभागांमार्फत देण्यात आलेल्या सेवांचा सविस्तर आढावाही घेतला. उपजिल्हाधिकारी (सामान्य प्रशासन) यांनी महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियमाच्या माध्यमातून जिल्ह्यात झालेल्या कामांची पॉवर पॉईंटच्या माध्यमातुन माहिती दिली. बैठकीस सर्व संबंधित विभागांचे प्रमुख अधिकारी उपस्थित होते.

आपले सरकार केंद्रास आयुक्त डॉ. जाधव यांची भेट

        जालना शहरातील गणपती गल्ली येथे असलेल्या विनायक मल्टी सर्व्हीसेस या आपले सरकार केंद्रास आयुक्त डॉ. किरण जाधव यांनी प्रत्यक्ष भेट देऊन पहाणी केली. या केंद्राच्या माध्यमातुन जनतेला देण्यात येत असलेल्या सेवांची पहाणी करुन त्यांनी यावेळी समाधान व्यक्त केले. यावेळी नायब तहसिलदार तुषार निकम यांच्यासह सेवाकेंद्राचे चालक व संबंधित विभागाचे अधिकारी उपस्थित होते.


          -*-*-*-*-*-*-

Wednesday 23 March 2022

दिव्यांग पुनर्वसन केंद्र चालवण्यास इच्छुक संस्थांनी अर्ज सादर करण्याचे आवाहन

  

     जालना दि.23 (जिमाका) :-   ज्या स्वयंसेवी संस्था दिव्यांग पुनर्वसन केंद्र चालविण्यास इच्छुक आहेत अशा स्वयंसेवी संस्थांनी जिल्हा समाज कल्याण अधिकारी, जिल्हा परिषद जालना यांचे कार्यालयास बातमी प्रसिध्द झाल्यापासुन सात दिवसांत प्रस्ताव सादर करण्याचे आवाहन सदस्य सचिव तथा जिल्हा समाज कल्याण अधिकारी जिल्हा परिषद जालना यांनी  केले आहे.

 

 

अर्ज सादर करण्यासाठी अटी व शर्ती

       संस्थेकडे दिव्यांग क्षेत्रात कार्य करणे बाबत सक्षम प्राधिकारी तथा आयुक्त दिव्यांग कल्याण आयुक्तालय, महाराष्ट्र राज्य पुणे यांचे कार्यालयाकडुन नोंदणी प्रमाणपत्र असणे आवश्यक तथा बंधनकारक आहे.

    संस्थेला महाराष्ट्र राज्यात जिल्हा दिव्यांग पुनर्वसन केंद्र (DDRC) चालविण्याचा अनुभव असावा.

   संस्थेने यापूर्वी महाराष्ट्र राज्यात दिव्यांग व्यक्तीना कृत्रिम अवयव व साहित्य साधने वाटप शिबीरे आयोजित

करण्याचा किमान पाच वर्षांचा अनुभव असावा.

      संस्थेकडे दिव्यांग व्यक्तीना कृत्रिम अवयव व साहित्य साधने वाटप व तालुकास्तरीय मोजमाप शिबीराचे आयोजन करण्याकरीता स्वतःच्या मालकीचे अद्यावत मोठे वाहन असावे. केंद्र शासनाकडून अनुदान  न मिळाल्यास संस्थेने स्वनिधीतुन योजना राबविण्यासाठी संस्थेकडे किमान रक्कम रुपये 25 लक्ष बॅंक बॅंलन्स राष्ट्रीयकृत बँकेमध्ये असावा.

    अनुदान न मिळाल्यास संस्था स्वबळावर प्रकल्प राबवेल या बाबतचे रक्कम 100 रुपयांच्या बंधपत्रावर हमी पत्र.

    संस्थेकडे पॅरामेडीकल व पुनर्वसन क्षेत्रातील तज्ञ (भौतिकोपचार तज्ञ, स्पीच थेरपिस्ट क्लिनिकल सायकॉलॉजिस्ट) व इतर कर्मचारी असणे आवश्यक आहे.संस्थेचे मागील 3 वर्षाचे ऑडीट रिपोर्ट.

    जिल्हा दिव्यांग पुनर्वसन केंद्र (DDRC) चे प्राप्त प्रस्तावाबातचे अधिकार जिल्हा दिव्यांग पुनर्वसन समितीने राखुन ठेवले आहेत.असे  सदस्य सचिव तथा जिल्हा समाज कल्याण अधिकारी जिल्हा परिषद जालना यांनी प्रसध्दिीपत्रकाद्वारे कळविले आहे.

-*-*-*-*-*-

वृत्त क्र. 252                                                                                                                                 दि. 23.3.2022

 

व्हॉलीबॉल खेळाच्या कौशल्य वृध्दी व गुणवंत खेळाडू शोध घेण्यासाठी प्रशिक्षण

     जालना दि.23 (जिमाका) :-  संचालनालयाव्दारा व्हॉलीबॉल खेळ व खेळाडू यांच्या भवितव्याचा विचार करुनच खेळाडू शोध प्रक्रीयेतून 16 वर्षाखालील 30 मुलांसाठी 20 दिवसांचे प्रशिक्षण शिबीराचे आयोजन शिवछत्रपती क्रीडा संकुल,  म्हाळुंगे- बालेवाडी पुणे येथे एप्रिल व मे 2022  मध्ये करण्यात येणार आहे.

   तसेच या प्रशिक्षण शिबीरासाठी पी.सी. पांडियन, आंतरराष्ट्रीय प्रशिक्षक तामिळनाडू यांचे मार्गदर्शन व प्रशिक्षण मिळणार आहे. विविध स्पर्धामध्ये खेळण्याची संधी उपलब्ध होऊन, भविष्यात या खेळाडूंना परदेशी प्रशिक्षकांचे मार्गदर्शन व प्रशिक्षणाची संधी उपलब्ध होऊ शकेल.

      खालील निकषाप्रमाणे पात्र खेळाडूंनी या सुवर्ण संधीचा फायदा घेऊन आपले क्रीडा नैपुण्य दाखवून, या प्रशिक्षणामध्ये सहभागी होऊन आपल्या जिल्हयाचे नाव वृध्दींगत करावे.

खेळाडू पात्रता निकष (16 वर्षाआतील मुले)

   खेळाडुचे वय 1 जानेवारी 2023 रोजी 16 वर्षाखालील असावे दि. 1 जानेवारी 2007 रोजी किंवा त्यानंतरचा जन्म.

खेळाडुची उंची किमान 6 फुट असावी.खेळाडु शाळेत शिकत असलेली किंवा नसलेला तसेच जालना जिल्ह्यातील असावा. सन 2010-20 मध्ये व्हॉलीबॉल खेळाच्या जिल्हा, विभाग व राज्य स्पर्धेत प्रथम चार क्रमांकाच्या शाळेतील खेळाडू या वयोगटामध्ये असल्यास परंतु उंचीची किमान 6 फुट अट पूर्ण करणे आवश्यक आहे. प्रत्येक जिल्ह्यातुन सेंटर ॲट कर युनिर्व्हसल, ब्लॉकर या स्थानाप्रमाणे, खेळाडूच्या खेळातील जागा यानुसार निवड होईल.

 

उल्लेखित पात्रता निकषानुसार मुख्याध्यापकांना आपल्या शाळेतील, संस्थेतील, विद्यालयातील किंवा संपर्कातील व्हॉलीबॉल खेळातील इच्छुक व पात्र खेळाडूंची निवड करण्यासाठी पुढीलप्रमाणे आयोजित निवड चाचणीसाठी उपस्थित राहणेस सूचित करण्यात यावे.

व्हॉलीबॉल खेळाडू निवड चाचणी कार्यक्रम

 खेळाचे नाव व वयोगट व्हॉलीबॉल 16 वर्षाआतील मुले, निवड चाचणी दिनांक दि. 25 मार्च 2022, निवड चाचणी उपस्थिती दिनांक व वेळ दि. 25 मार्च 2022 वेळ सायंकाळी 5 वाजता, निवड चाचणी आयोजन ठिकाण दत्ताजी भाले हायस्कुल, अंबड ता. अंबड जि. जालना, अधिक माहितीसाठी जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय जालना येथे संपर्क करण्याचे आवाहन जिल्हा क्रीडा अधिकारी जालना यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे केले आहे.

-*-*-*-*-*-

शासकीय व्यवहारासाठी स्टेट बँक ऑफ इंडिया बँक 31 मार्च रोजी मध्यरात्रीपर्यंत सुरु ठेवा ----- जिल्हाधिकारी डॉ. विजय राठोड


         जालना दि.23 (जिमाका) :-  शासनाकडून व प्रत्येक नियंत्रक अधिका-यांकडून  विविध लेखाशीर्षा अंतर्गत प्राप्त झालेली अनुदाने व सुधारीत मागणीनुसार दि. 31 मार्च 2022 अखेर प्राप्त व्हावे व ती व्यपगत होऊ नयेत, तसेच शासकीय रक्कमांचा जास्तीत जास्त भरणा करणे सुलभ व्हावे या दृष्टीने महाराष्ट्र कोषागार नियम 1968 चे नियम क्रमांक 409  अन्वये प्राप्त झालेल्या अधिकारानुसार जिल्हाधिकारी डॉ. विजय राठोड, यांनी जालना जिल्ह्यातील शासकीय आदान प्रदानाचा व्यवहार करणारी स्टेट बँक ऑफ इंडिया शिवाजी चौक, जालना ही दि. 31 मार्च 2022 रोजी 12.00 वाजेपर्यंत  व तालुका स्तरावरील शासनाचे कामकाज सुरु ठेवतील.

 

     जिल्ह्यातील सर्व आहरण संवितरण अधिकारी तसेच वरील बँकाचे सर्व व्यवस्थापक स्टेट बँक ऑफ इंडिया शिवाजी चौक, जालना तालुका स्तरावरील कोषागाराचे आर्थिक व्यवहार पाहणा-या अंबड, परतूर, भोकरदन, मंठा येथील स्टेट बँक ऑफ इंडिया च्या शाखा तसेच जाफ्राबाद, बदनापुर व घनसावंगी येथील बँक ऑफ महाराष्ट्रच्या शाखा यांनी वरील आदेशाचे पालन करण्याचे  आणि प्राप्त अनुदान व्यपगत होणार नाही शासकीय वसुलीचा जास्तीत जास्त भरणा शासनखाती होईल कटाक्षाने दक्षता घ्यावी, असे आदेश जिल्हाधिकारी डॉ. विजय राठोड यांनी दिले आहेत.

-*-*-*-*-*-

Saturday 19 March 2022

जालना पंचायत समितीच्या नूतन इमारतीचे लोकार्पण संपन्न जालना पंचायत समितीची इमारत राज्यासाठी आदर्श ठरावी - महसुल राज्यमंत्री अब्दुल सत्तार

 





 

            जालना, दि. 19  (जिमाका) :- जालना येथे नूतन पंचायत समितीची अत्यंत सुसज्ज व सर्व सोई-सुविधांनी युक्त अशी इमारत उभारण्यात आली असुन ही इमारत राज्यासाठी आदर्श ठरावी, असे प्रतिपादन राज्याचे महसुल व ग्रामविकास राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांनी केले.

जालना येथे पंचायत समितीच्या नूतन इमारतीचे लोकार्पण राज्याचे महसुल व ग्रामविकास राज्यमंत्री यांच्या हस्ते आज करण्यात आले. त्याप्रसंगी उपस्थितांना मार्गदर्शन करताना ते बोलत होते.

            यावेळी राज्याचे सार्वजनिक आरोग्य व कुटूंबकल्याण मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री राजेश टोपे, जिल्हा परिषद अध्यक्ष उत्तमराव वानखेडे, माजी मंत्री अर्जुनराव खोतकर, महेंद्र पवार, अनिरुद्ध खोतकर, भास्कर आंबेकर, पुजा सपाटे, भास्कर आंबेकर, ए. जे.बोराडे, मनीष श्रीवास्तव, विमलताई पाखरे, पंडित भुतेकर, पांडूरंग डोंगरे, संतोष मोहिते,  फेरोज लाला तांबोळी, जिल्हाधिकारी डॉ. विजय राठोड, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी कल्पना क्षीरसागर गटविकास अधिकारी संजय कुलकर्णी आदींची प्रमुख उपस्थिती होती.

            महसुल राज्यमंत्री अब्दुल सत्तार म्हणाले की,  माजी मंत्री अर्जुनराव खोतकर यांच्या मार्गदर्शन व पुढाकाराने उभारण्यात आलेली जालना पंचायत समितीची ईमारत ही मराठवाड्यातील एकमेव सुसज्ज व सर्वसुविधांनी परिपूर्ण प्रशासकीय ईमारत आहे. या ठिकाणी येणाऱ्या नागरिकांची प्रशासकीय कामे तत्परतेने पूर्ण होतील, असा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला.

            पालकमंत्री राजेश टोपे म्हणाले की, पंचायत समितीची सुसज्ज व सर्व-सुविधांनीयुक्त अशी नवीन प्रशासकीय इमारत उभारण्यात आली असुन त्याचा आपल्याला मनस्वी आनंद आहे. जालना जिल्ह्यात अनेक शासकीय कार्यालये ही भाड्याच्या इमारतीमधून आपला कारभार चालवत आहेत. अशा शासकीय विभागांना नवीन इमारती मिळाव्यात. तसेच जिल्ह्याचा सर्वांगीण विकास करण्याच्यादृष्टीने प्रयत्नशील असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.

      माजी राज्यमंत्री अर्जुनराव खोतकर म्हणाले की, सुमारे पाच कोटी रुपयांचा निधी खर्च करुन पंचायत समितीची ही इमारत उभारण्यात आली आहे. संपूर्ण राज्यभरात मॉडेल ठरावी अशा पद्धतीचा इमारत बांधकामासाठी प्लॅन ठरविण्यात आला होता. या इमारतीमधील फर्निचरसाठी दीड ते दोन कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करुन देण्यात आला तो पुरेसा नाही. फर्निचरसाठी तसेच पंचायत समितीच्या अधिकारी, कर्मचाऱ्यांच्या निवासस्थानासाठी निधी उपलब्ध करुन देण्याची मागणीही त्यांनी यावेळी मंत्री महोदयांकडे केली.

      कार्यक्रमास पदाधिकारी, अधिकारी यांच्यासह नागरिकांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.

*******

 

पालकमंत्र्यांच्या उपस्थितीमध्ये पत्रकार सत्कार समारंभाचा कार्यक्रम संपन्न कोरोनाकाळात पत्रकारांनी केलेले कार्य उल्लेखनीय - पालकमंत्री राजेश टोपे

 





            जालना, दि. 19 (जिमाका) :- समाजातील उपेक्षित, वंचित घटकांना न्याय मिळवून देण्याचे काम पत्रकार आपल्या लेखणीच्या माध्यमातून करत असतात. कोरोना काळामध्ये भयभीत झालेल्या, घाबरलेल्या जनतेला शासन, प्रशासनामार्फत करण्यात येत असलेल्या विविध उपाययोजनांची तसेच कोरोनावर विजय मिळवलेल्यांची माहिती यशकथांच्या माध्यमातुन सर्वसामान्य जनतेपर्यंत पोहोचवुन त्यांना जगण्याची प्रेरणा,जिद्द माध्यमांनी दिली. कोरोनाकाळात पत्रकारांनी केलेले हे कार्य उल्लेखनीय असल्याचे गौरवोदगार राज्याचे सार्वजनिक आरोग्य व कुटूंबकल्याण मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री राजेश टोपे यांनी काढले.

            येथील बीजशीतल सभागृहात सार्वजनिक आरोग्य विभागाच्यावतीने पत्रकारांच्या सत्कार समारंभाचे आयोजन करण्यात आले होते.  त्याप्रसंगी उपस्थित माध्यमांशी संवाद साधताना पालकमंत्री श्री टोपे बोलत होते.

            यावेळी जिल्हाधिकारी डॉ. विजय राठोड, जिल्हा पोलीस अधीक्षक विनायक देशमुख, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती कल्पना क्षीरसागर, कल्याण सपाटे, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. अर्चना भोसले, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. विवेक खतगावकर, जिल्हा माहिती अधिकारी प्रमोद धोंगडे आदींची प्रमुख उपस्थिती होती.

            पत्रकारांनी केलेले कार्य समाजापर्यंत पोहोचावे, पत्रकारांचा मान-सन्मान तसेच त्यांच्या कार्याचीही गुणगौरव व्हावा, यादृष्टीने या सत्कार समारंभाचे आयोजन करण्यात आले असल्याचे सांगत पालकमंत्री राजेश टोपे म्हणाले की, लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ म्हणून माध्यमांकडे पाहिले जाते.  सर्वसामान्य व्यक्तीला केंद्रबिंदू मानुन पत्रकार हे समाजामधील वाईट प्रवृत्तीबरोबरच सकारात्मक गोष्टीबद्दल लिखाण करुन समाजजागृती करण्याचे काम आपल्या लेखणीच्या माध्यमातून करतात.  कोरोनाकाळामध्ये सर्वत्र भीतीदायक वातावरण निर्माण झाले होते.  अशा परिस्थितीमध्ये सर्वसामान्यांना मानसिक आधाराबरोबरच वस्तुस्थितीदर्शक माहितीची गरज होती.  या काळामध्ये शासन, प्रशासनामार्फत दैनंदिन देण्यात येणाऱ्या सूचना, कोरोना काळात स्वत:ची आपल्या कुटूंबाची घ्यावयाची काळजी,  कोरोना झाल्यानंतर घ्यावयाची दक्षता, उपलब्ध बेड, ऑक्सिजन, कोरोना चाचण्यांची केंद्रे यासह ईतर अनेक बाबींची माहिती माध्यमांनी सकारात्मक तसेच वास्तवपणे सर्वसामान्यांपर्यंत पोहोचवली.  त्यामुळेच सर्वसामान्यांमध्ये कोरोनाप्रती असलेली भिती दूर होण्याबरोबरच त्यापासून बचावासाठी आवश्यक असलेल्या गोष्टी अंगीकारण्याची सवय निर्माण झाल्याचे चित्र पहावयास मिळाले असल्याचेही पालकमंत्री श्री टोपे यांनी यावेळी सांगितले.  

            जिल्ह्यात आरोग्य सेवेचे सक्षमीकरण करण्याबरोबरच जिल्ह्याचा चौफर विकास करण्यावर भर देण्यात येत आहे.  आरोग्य, शिक्षण, विद्युतीकरण, रस्तेविकास, ग्रामीण भागाचा विकास यासह सर्वच विकास कामांमध्ये जालना जिल्हा अग्रेसर रहावा, यादृष्टीने प्रयत्न करण्यात येत आहे. जिल्ह्याचा सर्वांगिण विकास अधिक गतीने होऊन सर्वसामान्यांच्या हिताची जपवणूक करण्यासाठी सर्वांच्या सहकार्याची अपेक्षा व्यक्त करत आपण आदर्श पत्रकारितेच्या पाठीशी सदैव उभे राहू अशी ग्वाहीही त्यांनी यावेळी दिली.

            जिल्हाधिकारी डॉ. विजय राठोड म्हणाले की, कोरोनाकाळात विश्वासार्ह व खरी माहिती सर्वसामान्यांपर्यंत पोहोचविण्याचे काम माध्यमांनी केले.  पत्रकारांनी केलेल्या या कामामुळे जनसामान्यांमधील भितीच वातावरण निवळण्यास मदत झाली. कोव्हीड प्रतिबंधात्मक लसीकरणाबाबत जनमानसांमध्ये असलेले समज, गैरसमज दूर करण्यामध्ये माध्यमांची मोठी मोलाची मदत झाली असल्याचे सांगुन सर्व पत्रकारांचे त्यांनी यावेळी अभिनंदनही केले.

            जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. अर्चना भोसले म्हणाल्या की,  कोरोना काळामध्ये पत्रकारांनी केलेले काम अत्यंत कौतुकास्पद तसेच उल्लेखनीय आहे.दैनंदिन कोरोना बाधितांची संख्या, प्रशासनामार्फत करण्यात आलेल्या उपाययोजना, कोरोनाच्या अनुषंगाने नागरिकांनी घ्यावयाची खबरदारी आदी बाबी जनसामान्यांपर्यंत पोहोचविण्यामध्ये माध्यमांची भूमिका मोलाची ठरली असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.

            जिल्हा माहिती अधिकारी प्रमोद धोंगडे म्हणाले की, कोरोना काळामध्ये प्रशासनामार्फत करण्यात आलेल्या उपाययोजना तसेच महत्वपूर्ण माहिती जिल्हा माहिती कार्यालयामार्फत अखंडीतपणे वृत्तपत्रांना पोहोचविण्यात आली. पत्रकारांनीही त्यास व्यापक स्वरुपात प्रसिद्धी देऊन ही माहिती सर्वदूर पोहोचवली.  शासनाच्या पत्रकारांसाठी अनेकविध योजना असुन या योजनांचा त्यांनी लाभ घेण्याचे आवाहनही त्यांनी यावेळी केले.

            कार्यक्रमाचे प्रस्ताविकात जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. विवेक खतगावकर यांनी कार्यक्रमाच्या आयोजनामागची भूमिका विषद केली.

            यावेळी प्रिंट, इलेक्टॉनिक माध्यमातील सर्व पत्रकारांबरोबर जिल्हा माहिती अधिकारी प्रमोद धोंगडे, माहिती सहाय्यक अमोल शिवकांत महाजन, सिनेयंत्रचालक अनिल परदेशी, कु. प्रतिभा इंगळे, संतोष पाखरे आदींचा पालकमंत्री महोदयांच्या हस्ते उत्कृष्ट कार्याबद्दल प्रशस्तीपत्र देऊन गौरव करण्यात आला.

आपला जालना जिल्हा : चौफेर विकास घडीपुस्तिकेचे

पालकमंत्री राजेश टोपे यांच्या हस्ते विमोचन

            महाविकास आघाडी सरकारच्या दोनवर्षेपूर्तीनिमित्त जिल्हा माहिती कार्यालय, जालना यांच्यावतीने प्रकाशित करण्यात आलेल्या आपला जालना जिल्हा : चौफेर विकास या बहुरंगी घडीपुस्तिकेचे विमोचन राज्याचे सार्वजनिक आरोग्य व कुटूंब कल्याण मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री राजेश टोपे यांच्या हस्ते करण्यात आले.

            पुस्तिकेमध्ये गत दोन वर्षामध्ये जालना जिल्ह्यात करण्यात आलेल्या विकासकामांची सचित्र माहिती देण्यात आली आहे. यामध्ये सुसज्ज कोविड रुग्णालय, आरटीपीसीआर प्रयोगशाळा, ऑक्सिजन टँकची उभारणी, मेडीकॅब रुग्णालय, ग्रामीण आरोग्य सेवेचे सक्षमीकरण, मिशन कवच कुंडल, प्रादेशिक मनोरुग्णालय, राज्य बीमा निगमचे औषधालय, गरजूंना मोफत धान्याचे वाटप, शेतकऱ्यांना मदतीचा हात, महाशस्त्रक्रिया शिबीर, फिरता दवाखाना, शिवभोजन योजना, बालकांना अर्थसहाय्य, रिक्षा चालकांना आर्थिक सहाय्य यासह ईतर माहिती या घडीपुस्तिकेमध्ये देण्यात आली आहे.

-*-*-*-*-*-*-

प्रादेशिक मनोरुग्णालयाचे काम वेळेत पूर्ण होण्यासाठी तातडीने कार्यवाही करा --- पालकमंत्री राजेश टोपे

 



जालना, दि. 19 (जिमाका) :- जालना येथील महत्त्वाकांक्षी  प्रादेशिक मनोरुग्णालायाचे काम जलदगतीने  पूर्ण होण्यासाठी   आवश्यक ती  कार्यवाही  तातडीने  पूर्ण करण्यात यावी.  या रुग्णालयाचे भूमिपूजन येत्या  1 मे रोजी  होईल या दृष्टीने  नियोजन करावे, असे निर्देश राज्याचे  सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री तथा  जालना जिल्हयाचे पालकमंत्री राजेश टोपे यांनी दिले.

जिल्हाधिकारी कार्यालयात  आज  आरोग्य विषयक विविध विषयांवर बैठक  संपन्न झाली. त्यावेळी श्री. टोपे बोलत होते.  यावेळी  जिल्हाधिकारी डॉ. विजय राठोड,  जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. अर्चना भोसले,  जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. विवेक खतगावकर आदींसह बांधकाम विभागांचे अधिकारी उपस्थित होते.

नुकत्याच जाहीर करण्यात  आलेल्या  राज्याच्या अर्थसंकल्पात जालना येथे बांधण्यात येणाऱ्या प्रादेशिक मनोरुग्णालयासाठी  60 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आल्याचे सांगत श्री. टोपे म्हणाले की,  या मनोरुग्णालयाचे काम अत्यंत गुणवत्तापूर्ण करावे. कुठल्याही प्रकारची कमतरता भासू देऊ नये. रुग्णालय उभारण्याच्या टेंडरची प्रक्रीया अंतिम करुन  येत्या 1 मे रोजी  रुग्णालयाचे भूमीपूजन करण्याच्या दृष्टीने नियोजन करावे.  यामध्ये दिरंगाई करु नये.  पालकमंत्री श्री. टोपे यांनी यावेळी रामनगर येथील   ग्रामीण रुग्णालयाच्या  बांधकामच्या सदयस्थितीचाही आढावा घेतला. तसेच  जिल्हा सामान्य रुग्णालयातील  दुरुस्तीच्या कामाचाही सविस्तर आढावा घेतला.  ही कामे वेळेत पूर्ण  करण्याबाबत त्यांनी निर्देश दिले.

बैठकीच्या प्रारंभी जिल्हयातील मुख्य शासकीय रुग्णालयात रुग्णांना सुलभपणे वेळेत सुविधा मिळाव्यात,  त्यांच्या वेळेचा अपव्यय होऊ नये यासाठी  सिंगापूर आरोग्य विभागाच्या धर्तीवर  ओसरा हेल्थच्या प्रतिनिधींनी सादरीकरण केले.  शासकीय रुग्णालयात मोठया प्रमाणात रुग्णांची गर्दी होत असते. रुग्ण रुग्णालयात प्रवेश  करण्यापासून ते त्याला योग्य त्या सुविधा वेळेत मिळण्यासाठी पायाभूत सुविधांचा एक आराखडा निश्चित करण्यात आला आहे. त्यानुसार विशिष्ट प्रकाराचे सुचनांचे  बोर्ड,  रंगीत पटटया, गर्दीचे व्यवस्थापन योग्यरित्या हाताळण्यासाठी करावयाचे नियोजन याशिवाय सुरक्षा या बाबींचा आराखडयात समावेश असल्याचे प्रतिनिधींनी यावेळी सांगितले. जालना येथील सामान्य रुग्णालयात अशा पध्दतीच्या उपायांची अंमलबजावणी  करण्याच्या दृष्टीने  योग्य ती कार्यवाही करण्याच्या सूचना  श्री. टोपे  यांनी दिल्या.  यावेळी  अमेरिकन इंडिया फाऊंडेशनच्या प्रतिनिधींनी  बालमृत्यूच्या प्रमाणात घट होण्यासाठी  आशा सेविकांना  दयावयाच्या प्रशिक्षणाची सादरीकरणाव्दारे  माहिती दिली.    

-*-*-*-*-*-*-

 

 

 

Thursday 17 March 2022

केंद्रीय योजनांची जिल्ह्यात प्रभावीपणे अंमलबजावणी करावी -- केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे

 



     जालना, दि.17 (जिमाका) :- जिल्ह्याच्या विकासासाठी केंद्र शासनाच्या अनेकविध योजनांच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात निधी उपलब्ध करून देण्यात येतो.  या केंद्रीय योजनांची जिल्ह्यात प्रभावीपणे अंमलबजावणी करून सर्व प्रलंबित कामे तातडीने पूर्ण करण्याचे निर्देश  केंद्रीय रेल्वे, कोळसा व खाण राज्यमंत्री रावसाहेब पाटील दानवे यांनी दिले.

      जिल्हा विकास  समन्वय  व सनियंत्रण  समिती (दिशा) ची बैठक समितीचे अध्यक्ष तथा  केंद्रीय रेल्वे, कोळसा व खाण मंत्री रावसाहेब पाटील दानवे यांच्या अध्यक्षतेखाली राजूर येथे आयोजित करण्यात आली होती. त्याप्रसंगी ते बोलत होते.

         व्यासपीठावर जिल्हा परिषदेचे अध्यक्ष उत्तम वानखेडे, आमदार नारायण कुचे, भास्कर दानवे, जिल्हाधिकारी डॉ. विजय राठोड, समितीचे सदस्य सर्वश्री गजानन किसन घाडगे, भाऊसाहेब गंगाधर भुजंग, समाधान कडुबा शेरकर, फैसल अहमद चाऊस, रंजना दिलीप जाधव, सुनिता कमलाकर कोल्हे, अनिल सदाशिव सरकटे, गणेश उखाजी गाडेकर, ज्योती गणेश नवले, शैलेंद्र पवार, प्रशांत दानवे,  प्रकल्प संचालक  कल्पना क्षीरसागर आदींची उपस्थिती होती.

      केंद्रीय राज्यमंत्री श्री. दानवे म्हणाले की, राष्ट्रीय ग्रामीण जीवन्नोती अभियानाच्या माध्यमातून जालना जिल्ह्यात महिलांना एकत्र करून बचगटांची  स्थापना करण्याचे काम करण्यात येत आहे. जिल्ह्यातील शहरी तसेच ग्रामीण भागात ज्या होतकरू महिला आहेत त्यांना एकत्र करण्यात यावे व बचतगटाच्या माध्यमातून उद्योग उभारणी करत आपले

जीवनमान उंचावण्यासाठी त्यांना प्रोत्साहन देण्यात यावे. उद्योग उभारणीसाठी बँकांमार्फत कर्ज उपलब्ध करून देण्यासाठीही अधिकाऱ्यांनी प्रयत्न करण्याचे निर्देश दिले.

     महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत जिल्ह्यातील मागेल त्या मजुराला विहित वेळेत काम मिळेल या दृष्टीने कामाचे नियोजन करण्यात यावे. कामे मंजूर करत असताना कुशल व अकुशल कामाचे प्रमाण 60:40 राहील. तसेच ही कामे करत असताना जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यात समानतेने कामे होतील याची दक्षता घेण्याचे निर्देश  श्री. दानवे यांनी दिले.

    प्रधानमंत्री ग्राम सडक योजनेच्या माध्यमातून ग्रामीण भागातील जी गावे मुख्य रस्त्याला जोडलेली नाहीत अशा गावांत रस्त्याची कामे करण्यात येतात. जालना जिल्ह्यात जी गावे मुख रस्त्यांना जोडलेली नाहीत अशा रस्त्यांचा प्राधान्यक्रम ठरविण्यात यावा व अशा गावांमध्ये रस्त्याची कामे प्रस्तावित करण्यात यावीत. प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत प्रत्येक तालुक्याला देण्यात आलेले उद्दिष्ट पूर्ण होईल. तसेच या योजनेचा लाभ प्रत्येक गरजू व पात्र लाभार्थ्यांना होईल, याची काळजी घेण्याचे निर्देशही  श्री. दानवे यांनी यावेळी दिले.

    यावेळी  प्रधानमंत्री कौशल्य विकास योजना, राष्ट्रीय सामाजिक अर्थसह्यता कार्यक्रम, स्वछ भारत मिशन, राष्ट्रीय ग्रामीण पेयजल कार्यक्रम, प्रधानमंत्री कृषिसिंचन योजना, दीनदयाल उपाध्याय ग्रामज्योती योजना, श्यामाप्रसाद मूखर्जी रुरबन योजना आदी योजनांचाही  श्री. दानवे यांनी सविस्तर आढावा घेतला.

यावेळी आमदार नारायण कुचे यांच्यासह समितीच्या सदस्यांनी उपयुक्त अशा सूचना मांडल्या. बैठकीस सर्व संबंधित विभागाचे अधिकारी उपस्थित होते.

-*-*-*-*-*-*-*-*-

Tuesday 15 March 2022

जिल्हा रुग्णालयांमध्ये "जागतिक किडनी दिवस" साजरा किडनी विकारग्रस्त रुग्णांनी निशुल्क डायलिसीस सेवेचा लाभ घ्यावा जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. अर्चना भोसले

 


 

           जालना, दि. 15 (जिमाका) :- जिल्हा रुग्णालयांमध्ये आज दि. 15 मार्च रोजी 'जागतिक किडनी दिवस' साजरा करण्यात आला.

            कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. अर्चना भोसले ह्या होत्या तर प्रमुख अतिथी म्हणून मराठवाड्याचे पहिले किडनी विकार तज्ज्ञ  तथा ज्येष्ठ किडनी विकार तज्ज्ञ डॉ. सुहास बावीकर, सामान्य रुग्णालय जालना, डायलिसिस विभागाचे प्रमुख डॉ. प्रशांत बांदल, अतिरिक्त जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. राजेंद्र गायके, वैद्यकीय अधिकारी डॉ. सर्वेश पाटील डॉ. आशिष राठोड , डॉ. सुरज तौर, डॉ. अतुल पायाळ, डॉ. संतोष जायभाये, डॉ. पंडित शिरसाट परिचारिका, डायलेसिस तंत्रज्ञ, नर्सिंगच्या विद्यार्थिनी रुग्ण व तसेच रुग्णाचे नातेवाईक उपस्थित होते.

            जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. अर्चना भोसले यांनी डायलिसिस विभागामार्फत केलेल्या कामाची प्रशंसा करुन विभागामार्फत करण्यात आलेल्या कामाबद्दल समाधान व्यक्त केले. डायलिसिस विभागातील सुविधा निशुल्क असुन किडनी विकार असणाऱ्या रुग्णांनी या सेवेचा लाभ घेण्याचे आवाहन त्यांनी यावेळी केले.

            ज्येष्ठ किडनी विकार तज्ज्ञ डॉ. सुहास बाविकर यांनी किडनी विकार होऊ नये म्हणून घ्यावयाची काळजी, प्रतिबंधात्मक तसेच उपचारात्मक पद्धती आदीबाबत सविस्तर असे मार्गदर्शन केले.

            कार्यक्रमाच्या प्रास्ताविकात डॉ. प्रशांत बांदल म्हणाले, सप्टेंबर 2013 मध्ये सुरु झाले असुन  आतापर्यंत डायलिसिस विभागामध्ये  5 हजार 413 रुग्णांवर डायलिसीस केले आहेत. 1 हजार 500 रुग्णांना डायलिसिस कॅथेटर किंवा सेंट्रल लाईनची सुविधा उपलब्ध करुन दिली असुन 45 रुग्णांना ए व्ही फिस्टुला सर्जरी करण्यासाठी डायलिसिस विभागातर्फे मदत करण्यात आली आहे. तसेच 20 ते 25 रुग्णांना किडनी प्रत्यारोपण शस्त्रक्रियेसाठी प्रवृत्त करुन त्यांना आवश्यक ते सहकार्य केल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.

            कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री. राजकिरण वाघमारे (डायलेसिस तंत्रज्ञ) यांनी केले.

             डायलिसिस विभागातील वैद्यकीय अधिकारी डॉ.सर्वेश पाटील डॉ. आशिष राठोड डॉ.सुरज डॉ. अतुल पायाळ, मुख्य परिचारिका श्रीमती जोशी, तंत्रज्ञ श्री राज किरण वाघमारे श्री राहुल शेलार श्रीमती छाया नागरे श्रीमती प्रीती वाघमारे कक्ष सेवक श्री रितेश पारधी यांचा प्रशस्तीपत्रक व पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला.

            या कार्यक्रमामध्ये किडनी प्रत्यारोपण झालेल्या डॉ. बहुरे, श्री. उघडे श्री. ठाकूर यांनी आपले मनोगत व्यक्त केले.या कार्यक्रमामध्ये त्यांचाही पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.कार्यक्रमाचे संचलन राजकिरण वाघमारे यांनी केले तर आभार डॉ.सर्वेश पाटील यांनी मानले.

            कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी वैद्यकीय अधिकारी डॉ.सर्वेश पाटील डायलेसिस तंत्रज्ञ श्री राज किरण वाघमारे, श्री राहुल शेलार, श्री. रितेश पारधे यांनी परिश्रम घेतले.

-*-*-*-*-*-*-*-