Tuesday 15 March 2022

प्रत्येक शासकीय कार्यालयांमध्ये कामकाज मराठी भाषेतच करा -- जिल्हाधिकारी डॉ. विजय राठोड

 


        जालना, दि. 15 (जिमाका) :- मराठी भाषा वृद्धींगत करण्यासाठी तीचा प्रचार प्रसार होण्याच्यादृष्टीने सर्व शासकीय कार्यालयांमध्ये कामकाज मराठी भाषेतच करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी डॉ. विजय राठोड यांनी दिले.

            जिल्हा मराठी भाषा समितीची बैठक जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखालील नुकतीच जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात संपन्न झाली. त्याप्रसंगी जिल्हाधिकारी डॉ. राठोड बोलत होते.

            यावेळी उपजिल्हाधिकारी (सामान्य प्रशासन) श्रीमती शर्मिला भोसले,    समितीचे अशासकीय सदस्य रावसाहेब ढवळे, प्रा. राजेंद्र सोनवणे, दिलीप अर्जूने, विश्वंभरराव वडजे आदींची प्रमुख उपस्थिती होती.

            जिल्हाधिकारी डॉ. विजय राठोड म्हणाले, महाराष्ट्र राजभाषा अधिनियम 2021 नुसार प्रत्येक जिल्ह्यामध्ये जिल्हा मराठी भाषा समिती गठित करण्यात आली आहे.  प्रत्येक कार्यालयामध्ये मराठी भाषा अधिकारी म्हणुन अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात यावी.  तसेच मराठी राजभाषेचा प्रचार प्रसार करण्यासाठी शिक्षण विभागाने जालना जिल्ह्यात शिक्षक संमेलनाचे आयोजन करण्याच्या सुचनाही यावेळी त्यांनी दिल्या.

            यावेळी समितीच्या अशासकीय सदस्यांनीही मराठी राजभाषेचा प्रचार प्रसार होण्याच्यादृष्टीने उपयुक्त अशा सुचना केल्या. 

*******

No comments:

Post a Comment