Saturday 19 March 2022

पालकमंत्र्यांच्या उपस्थितीमध्ये पत्रकार सत्कार समारंभाचा कार्यक्रम संपन्न कोरोनाकाळात पत्रकारांनी केलेले कार्य उल्लेखनीय - पालकमंत्री राजेश टोपे

 





            जालना, दि. 19 (जिमाका) :- समाजातील उपेक्षित, वंचित घटकांना न्याय मिळवून देण्याचे काम पत्रकार आपल्या लेखणीच्या माध्यमातून करत असतात. कोरोना काळामध्ये भयभीत झालेल्या, घाबरलेल्या जनतेला शासन, प्रशासनामार्फत करण्यात येत असलेल्या विविध उपाययोजनांची तसेच कोरोनावर विजय मिळवलेल्यांची माहिती यशकथांच्या माध्यमातुन सर्वसामान्य जनतेपर्यंत पोहोचवुन त्यांना जगण्याची प्रेरणा,जिद्द माध्यमांनी दिली. कोरोनाकाळात पत्रकारांनी केलेले हे कार्य उल्लेखनीय असल्याचे गौरवोदगार राज्याचे सार्वजनिक आरोग्य व कुटूंबकल्याण मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री राजेश टोपे यांनी काढले.

            येथील बीजशीतल सभागृहात सार्वजनिक आरोग्य विभागाच्यावतीने पत्रकारांच्या सत्कार समारंभाचे आयोजन करण्यात आले होते.  त्याप्रसंगी उपस्थित माध्यमांशी संवाद साधताना पालकमंत्री श्री टोपे बोलत होते.

            यावेळी जिल्हाधिकारी डॉ. विजय राठोड, जिल्हा पोलीस अधीक्षक विनायक देशमुख, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती कल्पना क्षीरसागर, कल्याण सपाटे, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. अर्चना भोसले, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. विवेक खतगावकर, जिल्हा माहिती अधिकारी प्रमोद धोंगडे आदींची प्रमुख उपस्थिती होती.

            पत्रकारांनी केलेले कार्य समाजापर्यंत पोहोचावे, पत्रकारांचा मान-सन्मान तसेच त्यांच्या कार्याचीही गुणगौरव व्हावा, यादृष्टीने या सत्कार समारंभाचे आयोजन करण्यात आले असल्याचे सांगत पालकमंत्री राजेश टोपे म्हणाले की, लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ म्हणून माध्यमांकडे पाहिले जाते.  सर्वसामान्य व्यक्तीला केंद्रबिंदू मानुन पत्रकार हे समाजामधील वाईट प्रवृत्तीबरोबरच सकारात्मक गोष्टीबद्दल लिखाण करुन समाजजागृती करण्याचे काम आपल्या लेखणीच्या माध्यमातून करतात.  कोरोनाकाळामध्ये सर्वत्र भीतीदायक वातावरण निर्माण झाले होते.  अशा परिस्थितीमध्ये सर्वसामान्यांना मानसिक आधाराबरोबरच वस्तुस्थितीदर्शक माहितीची गरज होती.  या काळामध्ये शासन, प्रशासनामार्फत दैनंदिन देण्यात येणाऱ्या सूचना, कोरोना काळात स्वत:ची आपल्या कुटूंबाची घ्यावयाची काळजी,  कोरोना झाल्यानंतर घ्यावयाची दक्षता, उपलब्ध बेड, ऑक्सिजन, कोरोना चाचण्यांची केंद्रे यासह ईतर अनेक बाबींची माहिती माध्यमांनी सकारात्मक तसेच वास्तवपणे सर्वसामान्यांपर्यंत पोहोचवली.  त्यामुळेच सर्वसामान्यांमध्ये कोरोनाप्रती असलेली भिती दूर होण्याबरोबरच त्यापासून बचावासाठी आवश्यक असलेल्या गोष्टी अंगीकारण्याची सवय निर्माण झाल्याचे चित्र पहावयास मिळाले असल्याचेही पालकमंत्री श्री टोपे यांनी यावेळी सांगितले.  

            जिल्ह्यात आरोग्य सेवेचे सक्षमीकरण करण्याबरोबरच जिल्ह्याचा चौफर विकास करण्यावर भर देण्यात येत आहे.  आरोग्य, शिक्षण, विद्युतीकरण, रस्तेविकास, ग्रामीण भागाचा विकास यासह सर्वच विकास कामांमध्ये जालना जिल्हा अग्रेसर रहावा, यादृष्टीने प्रयत्न करण्यात येत आहे. जिल्ह्याचा सर्वांगिण विकास अधिक गतीने होऊन सर्वसामान्यांच्या हिताची जपवणूक करण्यासाठी सर्वांच्या सहकार्याची अपेक्षा व्यक्त करत आपण आदर्श पत्रकारितेच्या पाठीशी सदैव उभे राहू अशी ग्वाहीही त्यांनी यावेळी दिली.

            जिल्हाधिकारी डॉ. विजय राठोड म्हणाले की, कोरोनाकाळात विश्वासार्ह व खरी माहिती सर्वसामान्यांपर्यंत पोहोचविण्याचे काम माध्यमांनी केले.  पत्रकारांनी केलेल्या या कामामुळे जनसामान्यांमधील भितीच वातावरण निवळण्यास मदत झाली. कोव्हीड प्रतिबंधात्मक लसीकरणाबाबत जनमानसांमध्ये असलेले समज, गैरसमज दूर करण्यामध्ये माध्यमांची मोठी मोलाची मदत झाली असल्याचे सांगुन सर्व पत्रकारांचे त्यांनी यावेळी अभिनंदनही केले.

            जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. अर्चना भोसले म्हणाल्या की,  कोरोना काळामध्ये पत्रकारांनी केलेले काम अत्यंत कौतुकास्पद तसेच उल्लेखनीय आहे.दैनंदिन कोरोना बाधितांची संख्या, प्रशासनामार्फत करण्यात आलेल्या उपाययोजना, कोरोनाच्या अनुषंगाने नागरिकांनी घ्यावयाची खबरदारी आदी बाबी जनसामान्यांपर्यंत पोहोचविण्यामध्ये माध्यमांची भूमिका मोलाची ठरली असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.

            जिल्हा माहिती अधिकारी प्रमोद धोंगडे म्हणाले की, कोरोना काळामध्ये प्रशासनामार्फत करण्यात आलेल्या उपाययोजना तसेच महत्वपूर्ण माहिती जिल्हा माहिती कार्यालयामार्फत अखंडीतपणे वृत्तपत्रांना पोहोचविण्यात आली. पत्रकारांनीही त्यास व्यापक स्वरुपात प्रसिद्धी देऊन ही माहिती सर्वदूर पोहोचवली.  शासनाच्या पत्रकारांसाठी अनेकविध योजना असुन या योजनांचा त्यांनी लाभ घेण्याचे आवाहनही त्यांनी यावेळी केले.

            कार्यक्रमाचे प्रस्ताविकात जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. विवेक खतगावकर यांनी कार्यक्रमाच्या आयोजनामागची भूमिका विषद केली.

            यावेळी प्रिंट, इलेक्टॉनिक माध्यमातील सर्व पत्रकारांबरोबर जिल्हा माहिती अधिकारी प्रमोद धोंगडे, माहिती सहाय्यक अमोल शिवकांत महाजन, सिनेयंत्रचालक अनिल परदेशी, कु. प्रतिभा इंगळे, संतोष पाखरे आदींचा पालकमंत्री महोदयांच्या हस्ते उत्कृष्ट कार्याबद्दल प्रशस्तीपत्र देऊन गौरव करण्यात आला.

आपला जालना जिल्हा : चौफेर विकास घडीपुस्तिकेचे

पालकमंत्री राजेश टोपे यांच्या हस्ते विमोचन

            महाविकास आघाडी सरकारच्या दोनवर्षेपूर्तीनिमित्त जिल्हा माहिती कार्यालय, जालना यांच्यावतीने प्रकाशित करण्यात आलेल्या आपला जालना जिल्हा : चौफेर विकास या बहुरंगी घडीपुस्तिकेचे विमोचन राज्याचे सार्वजनिक आरोग्य व कुटूंब कल्याण मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री राजेश टोपे यांच्या हस्ते करण्यात आले.

            पुस्तिकेमध्ये गत दोन वर्षामध्ये जालना जिल्ह्यात करण्यात आलेल्या विकासकामांची सचित्र माहिती देण्यात आली आहे. यामध्ये सुसज्ज कोविड रुग्णालय, आरटीपीसीआर प्रयोगशाळा, ऑक्सिजन टँकची उभारणी, मेडीकॅब रुग्णालय, ग्रामीण आरोग्य सेवेचे सक्षमीकरण, मिशन कवच कुंडल, प्रादेशिक मनोरुग्णालय, राज्य बीमा निगमचे औषधालय, गरजूंना मोफत धान्याचे वाटप, शेतकऱ्यांना मदतीचा हात, महाशस्त्रक्रिया शिबीर, फिरता दवाखाना, शिवभोजन योजना, बालकांना अर्थसहाय्य, रिक्षा चालकांना आर्थिक सहाय्य यासह ईतर माहिती या घडीपुस्तिकेमध्ये देण्यात आली आहे.

-*-*-*-*-*-*-

No comments:

Post a Comment