Saturday 19 March 2022

प्रादेशिक मनोरुग्णालयाचे काम वेळेत पूर्ण होण्यासाठी तातडीने कार्यवाही करा --- पालकमंत्री राजेश टोपे

 



जालना, दि. 19 (जिमाका) :- जालना येथील महत्त्वाकांक्षी  प्रादेशिक मनोरुग्णालायाचे काम जलदगतीने  पूर्ण होण्यासाठी   आवश्यक ती  कार्यवाही  तातडीने  पूर्ण करण्यात यावी.  या रुग्णालयाचे भूमिपूजन येत्या  1 मे रोजी  होईल या दृष्टीने  नियोजन करावे, असे निर्देश राज्याचे  सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री तथा  जालना जिल्हयाचे पालकमंत्री राजेश टोपे यांनी दिले.

जिल्हाधिकारी कार्यालयात  आज  आरोग्य विषयक विविध विषयांवर बैठक  संपन्न झाली. त्यावेळी श्री. टोपे बोलत होते.  यावेळी  जिल्हाधिकारी डॉ. विजय राठोड,  जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. अर्चना भोसले,  जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. विवेक खतगावकर आदींसह बांधकाम विभागांचे अधिकारी उपस्थित होते.

नुकत्याच जाहीर करण्यात  आलेल्या  राज्याच्या अर्थसंकल्पात जालना येथे बांधण्यात येणाऱ्या प्रादेशिक मनोरुग्णालयासाठी  60 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आल्याचे सांगत श्री. टोपे म्हणाले की,  या मनोरुग्णालयाचे काम अत्यंत गुणवत्तापूर्ण करावे. कुठल्याही प्रकारची कमतरता भासू देऊ नये. रुग्णालय उभारण्याच्या टेंडरची प्रक्रीया अंतिम करुन  येत्या 1 मे रोजी  रुग्णालयाचे भूमीपूजन करण्याच्या दृष्टीने नियोजन करावे.  यामध्ये दिरंगाई करु नये.  पालकमंत्री श्री. टोपे यांनी यावेळी रामनगर येथील   ग्रामीण रुग्णालयाच्या  बांधकामच्या सदयस्थितीचाही आढावा घेतला. तसेच  जिल्हा सामान्य रुग्णालयातील  दुरुस्तीच्या कामाचाही सविस्तर आढावा घेतला.  ही कामे वेळेत पूर्ण  करण्याबाबत त्यांनी निर्देश दिले.

बैठकीच्या प्रारंभी जिल्हयातील मुख्य शासकीय रुग्णालयात रुग्णांना सुलभपणे वेळेत सुविधा मिळाव्यात,  त्यांच्या वेळेचा अपव्यय होऊ नये यासाठी  सिंगापूर आरोग्य विभागाच्या धर्तीवर  ओसरा हेल्थच्या प्रतिनिधींनी सादरीकरण केले.  शासकीय रुग्णालयात मोठया प्रमाणात रुग्णांची गर्दी होत असते. रुग्ण रुग्णालयात प्रवेश  करण्यापासून ते त्याला योग्य त्या सुविधा वेळेत मिळण्यासाठी पायाभूत सुविधांचा एक आराखडा निश्चित करण्यात आला आहे. त्यानुसार विशिष्ट प्रकाराचे सुचनांचे  बोर्ड,  रंगीत पटटया, गर्दीचे व्यवस्थापन योग्यरित्या हाताळण्यासाठी करावयाचे नियोजन याशिवाय सुरक्षा या बाबींचा आराखडयात समावेश असल्याचे प्रतिनिधींनी यावेळी सांगितले. जालना येथील सामान्य रुग्णालयात अशा पध्दतीच्या उपायांची अंमलबजावणी  करण्याच्या दृष्टीने  योग्य ती कार्यवाही करण्याच्या सूचना  श्री. टोपे  यांनी दिल्या.  यावेळी  अमेरिकन इंडिया फाऊंडेशनच्या प्रतिनिधींनी  बालमृत्यूच्या प्रमाणात घट होण्यासाठी  आशा सेविकांना  दयावयाच्या प्रशिक्षणाची सादरीकरणाव्दारे  माहिती दिली.    

-*-*-*-*-*-*-

 

 

 

No comments:

Post a Comment