Thursday 24 March 2022

राज्य सेवा हमी कायदा अंमलबजावणीसंदर्भात आढावा बैठक संपन्न जनतेच्या सेवापुर्ततेमध्ये अधिकाऱ्यांनी आपली संवेदनशीलता अधिक प्रगल्भ करावी -- आयुक्त डॉ. किरण जाधव

 





 
   जालना दि. 24 (जिमाका):- जनतेला पारदर्शक, गतीमान आणि दिलेल्या कालमर्यादेत माहिती तंत्रज्ञानाचा वापर  करुन अधिक प्रभावीपणे सेवा देण्यासाठी महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियमाची स्थापना करण्यात आली आहे.  आतापर्यंत राज्यात 11 कोटी सेवा जनतेपर्यंत पोहोचविण्यात आल्या असुन येणाऱ्या काळातही जनतेच्या सेवापुर्ततेमध्ये शासकीय अधिकाऱ्यांनी आपली संवेदनशिलता अधिक प्रगल्भ करण्याचे निर्देश राज्य सेवा हक्क आयोगाचे आयुक्त   डॉ. किरण जाधव यांनी आज दिले.


     महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियमाच्या अंमलबजावणीबाबत जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात आढावा बैठकीचे आयोजन करण्यात आले होते.  त्याप्रसंगी उपस्थित अधिकाऱ्यांना मार्गदर्शन करताना ते बोलत होते.
 व्यासपीठावर जिल्हाधिकारी डॉ. विजय राठोड, जिल्हा पोलीस अधीक्षक विनायक देशमुख, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मनुज जिंदल, उपजिल्हाधिकारी (सामान्य प्रशासन) शर्मिला भोसले आदींची प्रमुख उपस्थिती होती.
 आयुक्त डॉ. जाधव म्हणाले की, जनतेच्या हक्कांना जपणारा हा कायदा असून या माध्यमातून प्रशासन नागरिकांच्या दारात पोहोचावे. जनतेला पारदर्शकपणे व दिलेल्या विहित कालावधीमध्ये सेवा मिळावी या उद्देशाने ही सेवा सुरु करण्यात आली आहे.  संपुर्ण देशभरामध्ये केवळ महाराष्ट्र, उत्तराखंड, तेलंगणा, पंजाब व हरियाणा या पाच राज्यांमध्ये या अधिनियमांतर्गत जनतेला माहिती तंत्रज्ञानाचा वापर करुन सेवा पुरवण्यात येत आहे. महाराष्ट्र शासनाच्या अधिपत्याखालील सर्व शासकीय विभाग तसेच प्राधिकरणे यांच्या 530 अधिसुचित करण्यात आलेल्या सेवांचा लाभ जनतेला देण्यात येत आहे.  या अधिनियमाच्या स्थापनेपासुन आजपर्यंत जनतेला 11 कोटी सेवा विहित वेळेत पुरविण्यात आल्या असल्याचेही आयुक्त डॉ. जाधव यांनी यावेळी सांगितले.


   जालना जिल्ह्यामध्ये शासकीय विभागांमार्फत जनतेला देण्यात येणाऱ्या ज्या सुविधा अधिसुचित करण्यात आलेल्या नाहीत अशा 45 सेवांचा प्रस्ताव अधिसुचित करण्यासाठी जिल्हाधिकारी डॉ. विजय राठोड यांच्या पुढाकाराने शासनाला पाठविल्याबद्दल आयुक्तांनी जिल्हाधिकारी डॉ. राठोड यांचे विशेष अभिनंदन करत येणाऱ्या काळात जालना जिल्हा महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियमाच्या माध्यमातून जनतेला सेवा पुरवण्यामध्ये अग्रेसर रहावा, अशी अपेक्षाही त्यांनी यावेळी व्यक्त केली.


  हा कायदा जनतेसाठी अत्यंत उपयुक्त असून या कायद्याची माहिती जनतेला होण्यासाठी प्रत्येकाने आपल्या कार्यालयात दर्शनी भागात या कायद्याच्या कार्यक्षेत्रात येणाऱ्या सेवांची व त्यासाठीच्या कालमर्यादेची माहिती लावणे बंधनकारक आहे. या कायद्याच्या अंमलबजावणीने प्रशासन अधिक गतीमान आणि पारदर्शक होण्यास मदत होणार आहे. दिलेल्या कालमर्यादेत जनतेला सेवा देणे आवश्य क आहे, प्रत्येक सेवेसाठी ज्या पध्दतीने प्राधिकृत अधिकारी नेमला आहे,      

     त्याचप्रमाणे अपिलीय अधिकारी सुध्दा नेमण्यात आला आहे. या कायद्याच्या माध्यमातून जनतेचे काम अधिक सोपे होणार आहे. दिलेल्या कालमर्यादेत काम न करणाऱ्या अधिकाऱ्यासाठी पाचशे रुपयांपासून ते पाच हजार रुपयांपर्यंतच्या दंडाची तरतूद करण्यात आली असल्याचेही डॉ. जाधव यांनी यावेळी सांगितले.


   यावेळी आयुक्त डॉ. जाधव यांनी गतवर्षभरामध्ये महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियमाच्या माध्यमातून शासनाच्या विविध विभागांमार्फत देण्यात आलेल्या सेवांचा सविस्तर आढावाही घेतला. उपजिल्हाधिकारी (सामान्य प्रशासन) यांनी महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियमाच्या माध्यमातून जिल्ह्यात झालेल्या कामांची पॉवर पॉईंटच्या माध्यमातुन माहिती दिली. बैठकीस सर्व संबंधित विभागांचे प्रमुख अधिकारी उपस्थित होते.

आपले सरकार केंद्रास आयुक्त डॉ. जाधव यांची भेट

        जालना शहरातील गणपती गल्ली येथे असलेल्या विनायक मल्टी सर्व्हीसेस या आपले सरकार केंद्रास आयुक्त डॉ. किरण जाधव यांनी प्रत्यक्ष भेट देऊन पहाणी केली. या केंद्राच्या माध्यमातुन जनतेला देण्यात येत असलेल्या सेवांची पहाणी करुन त्यांनी यावेळी समाधान व्यक्त केले. यावेळी नायब तहसिलदार तुषार निकम यांच्यासह सेवाकेंद्राचे चालक व संबंधित विभागाचे अधिकारी उपस्थित होते.


          -*-*-*-*-*-*-

No comments:

Post a Comment