Tuesday 8 March 2022

महिलांना अधिक सक्षम करण्यासाठी समाजाने त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे रहावे - जिल्हाधिकारी डॉ. विजय राठोड

 

 




 

     जालना दि.8 (जिमाका) :-  आज स्त्री प्रत्येक क्षेत्रात यशाचे शिखर पादाक्रांत करीत आहे. असे एकही क्षेत्र  नाही की जेथे महिलांनी त्यांच्या यशाची मोहर उमटवलेली नाही. केवळ महिला दिनीच नव्हे तर संपुर्ण वर्षभर महिलांच्या कर्तत्वाचा त्यांच्या नेतृत्वाचा मान सन्मान केला गेला पाहिजे. महिलांना अधिक सक्षम करण्यासाठी समाजाने त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहण्याचे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. विजय राठोड यांनी केले.

                जागतिक महिला दिनानिमित्त महिला व बालकल्याण विभागाच्यावतीने पाठक मंगल कार्यालयात भव्य मेळावा व महिला जागर सप्ताहाचा शुभारंभ जिल्हाधिकारी डॉ. विजय राठोड यांच्या हस्ते करण्यात आला. त्याप्रसंगी उपस्थितांशी संवाद साधताना ते बोलत होते.

                याप्रसंगी जिल्हा परिषदेचे अध्यक्ष  उत्तम वानखेडे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मनुज जिंदल, महिला व बालकल्याण सभापती अयोध्या चव्हाण, आरोग्य व शिक्षण सभापती पुजा सपाटे, जयप्रकाश चव्हाण, प्रकल्प संचालक तथा अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती कल्पना क्षीरसागर, उपमुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती संगिता लोंढे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती वैशाली रसाळ, शैलेश चौधरी, एम.आर.खतीब आदींची प्रमुख उपस्थिती होती.

                सर्वांना सकारात्मक ऊर्जा देणाऱ्या कार्यक्रमाच्या आयोजनाबद्दल महिला व बालविकास विभागाचे अभिनंदन करत जिल्हाधिकारी डॉ. विजय राठोड म्हणाले, प्रत्येक यशस्वी पुरुषाच्यामागे एक स्त्री असते.  तसेच प्रत्येक स्त्रीच्या मागेसुद्धा स्त्रीने खंबीरपणे उभे राहिले पाहिजे.  मुलींनी चांगले शिक्षण घेऊन समाजामध्ये आदर्श निर्माण करण्याबरोबरच मुलींनी जीवनात निर्णयक्षम होण्यासाठीही महिलांनी पुढाकार घेण्याची गरज असुन समाजाने महिलांकडे बघण्याचा दृष्टीकोन बदलण्याची गरज आहे. महिलांचे सक्षमीकरण करावे हे सातत्याने बोलले जाते.  परंतु महिलांना त्यांचे क्षेत्र निवडण्याची, शिक्षण घेण्याची, कुठल्या वर्षात लग्न करावे, पुरुषांप्रमाणे काम करण्याची संधी त्यांच्या मनाप्रमाणे ज्यावेळेस मिळेल त्यावेळेसच खऱ्या अर्थाने महिलांचे सक्षमीरकरण झाले असे म्हणता येईल,  असेही जिल्हाधिकारी डॉ. राठोड यांनी यावेळी सांगितले. कोरोना परिस्थितीमध्ये तसेच लसीकरणामध्ये जिल्ह्यातील अंगणवाडी सेविका, मदतनीस, आशा कार्यकर्त्या, बचतगटातील महिलांनी अत्यंत उत्कृष्ट कार्य केल्याबद्दल या सर्व स्त्रीशक्तीचे त्यांनी आभारही व्यक्त केले.

                जिल्हा परिषदेचे अध्यक्ष उत्तम वानखेडे म्हणाले, मानवी जीवन जगत असताना एका यशस्वी पुरुषाच्या मागे आई, बहिण, पत्नी स्वरुपामध्ये एक स्त्रीशक्ती खंबीरपणे त्याच्या मागे उभी असते.  स्त्रीशक्तीच्या मदतीमुळेच जीवनात येणाऱ्या अडी-अडचणीवर मात करुन एक पुरुष यशस्वी बनत असल्याचे सांगत कोरोना काळात जालना जिल्ह्यातील अंगणवाडी सेविका, मदतनीस, आशा कार्यकर्त्यांनी अत्यंत उत्कृष्ट कार्य केल्याबद्दल त्यांचे कौतुकही केले. 

                जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मनुज जिंदल म्हणाले, कोरोनाकाळात जनमानसांमध्ये जनजागृतीचे उत्कृष्ट काम अंगणवाडी सेविका, मदतनीस यांनी केले आहे.  परंतु कोरोनाशी लढाई अजुन संपलेली नसुन ग्रामीण भागात आजही अनेक नागरिकांनी कोरोना प्रतिबंधात्मक लसीचा दुसरा डोस घेतलेला नाही.  लसीपासुन वंचित असलेल्या नागरिकांच्या घरोघरी जाऊन त्यांना डोस घेण्यासाठी प्रवृत्त करण्याचे आवाहनही त्यांनी यावेळी केले.

                 उमेद जालनाच्या वतीने जिल्हा व तालुका अभियान व्यवस्थापन कक्ष जालना यांच्या  संयुक्त विद्यमाने उपजीविका वर्ष 2022-23  महाजीविका अभियान राज्यस्तरीय शुभारंभ ऑनलाईन व गटातील महिलांनी उत्पादित केलेल्या मालाचे विक्री व प्रदर्शन व अभियानामध्ये उत्कृष्ट कार्य करणाऱ्या जालना तालुक्यातील कॅडरचा मान्यवरांच्या हस्ते प्रशस्तीपत्र पत्र देऊन गौरव करण्यात आला. यावेळी बचतगटांनी उत्पादित केलेल्या विविध उत्पादनांचे प्रदर्शनही याठिकाणी भरवण्यात आले होते.

                कार्यक्रमास पदाधिकारी, अधिकारी, अंगणवाडी सेविका, मदतनीस, आशा कार्यकर्त्या, बचतगटातील महिलांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.                                                                

-*-*-*-*-*-*-*-

No comments:

Post a Comment