Tuesday 26 February 2019

प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना जालना जिल्ह्यातील 7 हजार 429 शेतकरी कुटूंबाच्या खात्यात रक्कम जमा



जालना,दि.26: प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेचा राष्ट्रीय पातळीवर शुभारंभ प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उत्तर प्रदेशातील गोरखपूर येथे नुकताच संपन्न झाला असुन जिल्हास्तरावरही जिल्हाधिकारी रवींद्र बिनवडे यांच्यासह विविध मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये योजनेचा शुभारंभ करण्यात आला. या योजनेंतर्गत जिल्ह्यातील 7 हजार 429  शेतकरी कुटूंबाच्या खात्यात प्रत्येकी दोन हजार रुपये याप्रमाणे एकुण एक कोटी 48 लाख 58 हजार  रुपये जमा करण्यात आले असल्याची माहिती प्रशासनामार्फत देण्यात आली आहे.   
शेतकऱ्यांना निश्चित उत्पन्न मिळण्याकरिता केंद्र शासनाने प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना सुरु केली असुन या योजनेंतर्गत अल्प व अत्यल्प भू-धारक शेतकरी कुटुंबास प्रतीवर्ष 6 हजार रुपये तीन टप्प्यांमध्ये उपलब्ध करुन देण्यात येणार आहेत. तालुकास्तरीय व ग्रामस्तरीय क्षेत्रीय यंत्रणेमार्फत पात्र कुटूंबांच्या अंतिम करुन संकेत स्थळावर अपलोड करण्यात येत आहेत.  आज दि. 26 फेब्रुवारी, 2019 रोजीच्या स्थितीनुसार जालना जिल्ह्यातील एक लाख 67 हजार 533 पात्र शेतकरी कुटुंबांची माहिती PM-KISAN पोर्टलवर आपलोड करण्यात आले असुन जिल्ह्यातील इतर पात्र शेतकरी कुटंबांची माहिती पोर्टलवर अपलोड करण्याचे काम गतीने करण्यात येत आहे.  
जालना जिल्ह्यांतर्गत आर्थिक सहाय्य वितरणासाठी प्रमाणित केलेल्या पहिल्या बॅचमध्ये एकुण 7 हजार 429 लाभार्थ्यांचा समावेश करण्यात आला असुन ऑनलाईन पडताळणी आधारे बॅचनिहाय ऑनलाईन पद्धतीने अर्थसहाय्य पात्र लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये वितरण करण्यात येत असल्याचे निवासी उपजिल्हाधिकारी, जालना यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे कळविले आहे.
*******



Thursday 7 February 2019

शासनाच्या योजना तळागाळातील प्रत्येकापर्यंत पोहोचविण्यासाठी प्रत्येकाने पुढाकार घेण्याची गरज - पालकमंत्री बबनराव लोणीकर



                जालना, दि. 7 – समाजातील उपेक्षित, वंचित, दीन दुबळे तसेच निराधारांसाठी शासन अनेकविध योजना राबवित आहे. या योजनेच्या माध्यमातुन निराधारांच्या जीवनातील अंधार दूर करण्याचे काम शासनामार्फत करण्यात येत असुन शासनाच्या या योजना तळागाळातील प्रत्येकापर्यंत पोहोचविण्यासाठी शासकीय अधिकाऱ्यांबरोबरच समाजातील प्रत्येकाने या कामात पुढाकार घेण्याचे आवाहन राज्याचे पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री बबनराव लोणीकर यांनी केले.
                नेर येथे सामाजिक अर्थसहाय्य योजनेंतर्गत समाधान शिबीराचे आयोजन करण्यात आले होते.  त्याप्रसंगी उपस्थित लाभार्थ्यांशी संवाद साधताना पालकमंत्री श्री लोणीकर बोलत होते.
                व्यासपीठावर  भुजंगराव गोरे, सुभाषराव पालवे, हनुमंतराव उफाड, ज्ञानेश्वर माऊली शेजुळ, प्रकाशराव टकले, जिजाबाई जाधव, गावच्या सरपंच श्रीमती पठाण, मुरलीधर उफाड, बाबासाहेब मोरे, दिलीप पवार, अशोक डोके, डॉ. देशमुख, नसीरभाई, खलील चौधरी, संजय गांधी निराधार योजनेचे अध्यक्ष सहदेव मोरे, सदस्य समाधान वाघमारे, संजय काळे, श्रीमती तारामती खरात, शेख खलील, उमेश मोहिते, तहसलिदार बिपीन पाटील, नायब तहसिलदार श्रीमती चामनार, तालुका कृषी अधिकारी श्री सुखदेव आदींची उपस्थिती होती.
                पालकमंत्री श्री लोणीकर म्हणाले,  सामान्य नागरिकांना केंद्रबिंदू मानून राज्य व केंद्र शासन अनेक कल्याणकारी योजना राबवित आहे. या योजनांचा लाभ घेण्यासाठी सर्वसामान्यांना शासनाच्या योजनेसाठी आवश्यक असणाऱ्या कागदपत्रांची माहिती नसल्याने या लाभापासून ते वंचित राहतात.  जालना जिल्ह्यात अर्थसहाय्य योजना समितीच्या माध्यमातुन व सर्व शासकीय विभागांच्या सहकार्याने सर्वसामान्यांना या योजनांचा लाभ एकाच छताखाली मिळावा यासाठी प्रयत्न करण्यात आल्याने गेल्या तीन वर्षात 12 हजार निराधारांना या योजनेचा लाभ मिळाला आहे.  नेर व सेवली परिसरातील तीन हजार 300 लाभार्थ्यांना लाभ देण्यात आला आहे. येणाऱ्या काळात प्रत्येक पात्र व गरजू लाभार्थ्याला लाभ देण्यासाठी पदाधिकारी व अधिकाऱ्यांनी समन्वयाने काम करण्याच्या सुचनाही त्यांनी यावेळी दिल्या.
                समाजातील दिव्यांगांच्या उन्नतीसाठी शासन अनेकविध योजना राबविते. समाजकल्याण विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या योजना, एस.टी. महामंडळामार्फत देण्यात येणारे लाभ तसेच कौशल्य विकास विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या योजनांचा लाभ समाजातील प्रत्येक दिव्यांगांना एकाच छताखाली मिळण्यासाठी लवकरच महाशिबीराचे आयोजन येणार आहे.  परतूर, मंठा, नेर व सेवली भागात जवळपास 52 हजार दिव्यांगांची संख्या असुन आजपर्यंत 22 हजार दिव्यांगांची नोंदणी करण्यात आली आहे.  या सर्व दिव्यांगांना शासनाच्या योजनांचा लाभ देण्यासाठी त्यांच्याप्रती सकारात्मक दृष्टीकोन ठेऊन अधिकाधिक योजना लाभार्थ्यांपर्यंत पोहोचविण्याबरोबरच शासनाच्या योजनांपासुन एकही दिव्यांग वंचित राहणार नाही यासाठी सर्वांनी प्रयत्न करण्याचे आवाहनही पालकमंत्री श्री लोणीकर यांनी यावेळी केले.
                राज्य शसनाने महात्मा ज्योतिबा फुले जनआरोग्य योजना सुरु करुन या योजनेच्या माध्यमातुन समाजातील अनेक गोरगरीबांना या योजनेमुळे जीवनदान दिले आहे.  या योजनेमध्ये समाविष्ट न होणाऱ्या लाभार्थ्यांना प्रधानमंत्री जनआरोग्य योजनेच्या माध्यमातुन पाच लाख रुपयापर्यंतच्या वैद्यकीय सेवा मोफत स्वरुपात उपलब्ध करुन देण्यात येत असल्याचे सांगत  राज्यातील 84 लाख कुटुंबाना या योजनेचा लाभ मिळणार असुन या योजनेची माहिती गावातील शेवटच्या घटकापर्यंत पोहोचण्यासाठी योजनेचा प्रचार, प्रसार करण्यात यावा, असेही त्यांनी यावेळी सांगितले.
                शेतक-यांना निश्चित उत्पन्न मिळण्याकरिता केंद्र शासनाने प्रधानमंत्री किसान सन्मान निधी   योजना सुरु केली आहे. अल्प व अत्यल्प भूधारक शेतक-यांना या योजनांतर्गत  प्रती शेतकरी कुटुंबाला प्रतीवर्ष सहा हजार रुपये इतके आर्थिक सहाय्य अनुदान देण्यात येणार असल्याचे सांगत प्रधानमंत्री आवास योजनेच्या माध्यमातुन प्रत्येक बेघराला त्याच्या स्वत:चे व हक्काचे घर उपलब्ध करुन देण्यात येत आहे. सेवली  येथे 300 लाभार्थ्यांना तर आष्टी येथे 450 लाभार्थ्यांना घरकुले उपलब्ध करुन देण्यात आली असुन येत्या 2022 पर्यंत देशात एकही व्यक्ती बेघर राहणार नसल्याचे पालकमंत्री श्री लोणीकर यांनी यावेळी सांगितले.
                प्रधानमंत्री उज्वला गॅस योजनेच्या माध्यमातुन देशातील पाच कोटी कूटुंबांना केवळ 100 रुपयांमध्ये गॅसचे वितरण करण्यात आले असुन जालना जिल्ह्यात एक लाख लाभार्थ्यांना याचे वाटप करण्यात आले आहे.  या योजनेच्या माध्यमातुन महिलांची धुरापासुन मुक्तता करण्यात आली असल्याचे सांगत पालकमंत्री श्री लोणीकर यांनी यावेळी इंदिरा गांधी राष्ट्रीय वृद्धापकाळ निवृत्तीवेतन योजना, इंदिरा गांधी राष्ट्रीय विधवा निवृत्तीवेतन योजना, इंदिरा गांधी राष्ट्रीय अपंग निवृत्तीवेतन योजना, राष्ट्रीय कुटूंब अर्थसहाय्य योजना, संजय गांधी निराधार अनुदान योजना, श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्तीवेतन योजनेसंदर्भातही उपस्थित लाभार्थ्यांना माहिती दिली.
                यावेळी संजय गांधी निराधार अनुदान योजनेंतर्गत निवृत्तीवेतन मंजुर करण्यात आलेल्या लाभार्थ्यांना पालकमंत्र्यांच्या हस्ते प्रातिनिधीक स्वरुपात मंजुरी आदेशाचे वितरणही करण्यात आले.  या योजनेंतर्गत उत्कृष्ट कार्य केल्याबद्दल योजनेचे अध्यक्ष सहदेव मोरे यांच्यासह सर्व सदस्यांचा पालकमंत्र्यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
                कार्यक्रमास पदाधिकारी, अधिकारी यांच्यासह लाभार्थ्यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.
*******





वाटूर येथे कृषी प्रदर्शनाचे पालकमंत्र्यांच्या हस्ते उदघाटन संपन्न नैसर्गिक शेतीसाठी सेंद्रीय शेती हा उत्तम पर्याय - पालकमंत्री बबनराव लोणीकर





      जालना, दि. 7 – आजघडीला पारंपरिक शेतीमध्ये अधिकचे उत्पन्न घेण्याच्यादृष्टीने रासायनिक खते तसेच किटकनाशकाच्या  अती वापराने शेतीची सुपिकता घटत चालली आहे.  रासायनिक खतापासुन निर्मित अन्नधान्यामुळे मानवी आरोग्यावर घातक परिणाम होत आहे. जमीनीचा पोत टिकुन राहुन कमी खर्चात  नैसर्गिक शेतीसाठी सेंद्रीय शेती हा उत्तम पर्याय असल्याचे प्रतिपादन राज्याचे पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री बबनराव लोणीकर यांनी केले.
            वाटुर येथे आर्ट ऑफ लिव्हींग व शासनाचा आत्मा विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने 7 ते 9 फेब्रुवारी दरम्यान कृषिमंत्र 2019 नैसर्गिक शेती प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले असुन या प्रदर्शनाचे उदघाटन पालकमंत्री श्री लोणीकर यांच्या हस्ते करण्यात आले.  त्याप्रसंगी उपस्थितांशी संवाद साधताना ते बोलत होते.
            व्यासपीठावर विजयअण्णा बोराडे, पुरुषोत्तम वायाळ, भगवान काळे, भुजंगराव गोरे, अंकुर गुप्ता राहुल हुसे, रामेश्वर तनपुरे, कैलास बोराडे, आश्रुबा डक, तहसिलदार श्री कदम आदींची उपस्थिती होती.
            पालकमंत्री श्री लोणीकर म्हणाले की, आर्ट ऑफ लिव्हींगच्या माध्यमातुन संपुर्ण देशभरात नैसर्गिक शेतीच्या प्रचार व प्रसाराबरोबरच जलसंधारणाची कामे, युवकांसाठी व्यसनमुक्तीचे कार्यक्रम राबविण्यात येत आहेत. शासनाच्या विविध कृषि योजना, संशोधित कृषी तंत्रज्ञान, नाविन्यपूर्ण प्रयोगशिल शेतकऱ्यांचे अनुभव, बाजारपेठ व्यवस्थापन, कृषीपूरक व्यवसाय आदीबाबत शेतकऱ्यांना मार्गदर्शन मिळावे व या माध्यमातुन शेतकऱ्यांनी आधुनिक शेती करुन आपली उन्नती साधावी यादृष्टीकोनातुन या कृषी प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले असुन या प्रदर्शनाचा लाभ जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी घ्यावा, असे आवाहनही त्यांनी यावेळी केले.
            विजयअण्णा बोराडे यांच्या माध्यमातुन खरपुडी येथे कृषि विज्ञान केंद्राच्या माध्यमातुन शेतीमधील नवनवीन प्रयोग, आधुनिक तंत्रज्ञानाबाबत शेतकऱ्यांना सातत्याने मार्गदर्शन करण्यात येत असल्याचे सांगत  कडवंची या गावाने शेततळयाची निर्मिती करुन पाण्याचे उत्तम व्यवस्थापन करत दुष्काळी परिस्थितीमध्येसुद्धा कोट्यावधी रुपयांचे द्राक्षाचे पीक घेतल्याचे नमूद करत जिल्ह्यातील शेतकऱ्यांनीही अशाच प्रकारे शेती केल्यास त्यांच्या उत्पन्नात नक्कीच भर पडेल असा विश्वासही पालकमंत्री श्री लोणीकर यांनी यावेळी व्यक्त केला.
            भारत हा कृषिप्रधान देश असुन 70 टक्के लोकांचा उदरनिर्वाह शेतीव्यवसायावर निर्भर आहे. जगाचा पोशिंदा असलेला शेतकरी सन्मानाने जगला पाहिजे. तसेच शेतकऱ्यांचे आर्थिक उत्पन्न वाढून त्यांचा आर्थिक स्तर उंचावण्यासाठी शासनामार्फत अनेकविध योजना राबविण्यात येत आहेत.  वाटुर येथे आयोजित करण्यात आलेल्या प्रदर्शनाच्या माध्यमातुन शेतकऱ्यांना आधुनिक पद्धतीच्या व नैसर्गिक शेतीची माहिती मिळण्यास मोठ्या प्रमाणात मदत होणार असुन या प्रदर्शनाची शासनामार्फत आवश्यक ती सर्व मदत केली जाईल, अशी ग्वाहीही पालकमंत्री श्री लोणीकर यांनी यावेळी दिली.
            यावेळी विजयअण्णा बोराडे यांनीही मनोगत व्यक्त केले.  कार्यक्रमाच्या प्रास्ताविकात पुरुषोत्तम वायाळ यांनी आर्ट ऑफ लिव्हींगच्या माध्यमातुन करण्यात येत असलेल्या विविध उपक्रमांची माहिती उपस्थितांना दिली. कार्यक्रमाचे आभार परमेश्वर राजबिंडे यांनी मानले.
                सर्वप्रथम पालकमंत्री बबनराव लोणीकर यांच्या हस्ते कृषी प्रदर्शनाचे फित कापून उदघाटन करण्यात आले.  यावेळी पालकमंत्र्यांनी प्रदर्शनातील प्रत्येक स्टॉलला भेट देऊन स्टॉलधारकांकडून माहिती जाणून घेतली.
                कार्यक्रमास पदाधिकारी, अधिकारी यांच्यासह शेतकरी व नागरिकांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.
*******

Monday 4 February 2019

कृत्रिम रेतनाची लॅब औरंगाबादेत सुरु करणार -- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस · प्रायोगिक तत्वावर गायींचा विमा उतरविणार · मुख्यमंत्री पशुधन योजना राज्यात लागू होणार



      जालना, दि. 4 – शेतीला जोडव्यवसाय म्हणून पशुपालन हा उत्तम मार्ग आहे. पशुपालनात विविध जातींचे संवर्धन होऊन शेतकऱ्यांचा आर्थिक स्तर उंचावण्यासाठी कृत्रिम लिंग निर्धारित  रेतन लॅब महत्वाची आहे. म्हणून ही लॅब मराठवाड्याची राजधानी असलेल्या औरंगाबादेत सुरु करण्यात येणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी  आज येथे केली. त्याचबरोबर प्रायोगिक तत्वावर गायींचा विमा उतरविण्यात येईल, असेही ते म्हणाले.
            येथील कृषी उत्पन्न बाजार समितीसमोरील विस्तीर्ण अशा पटांगणावर आयोजित करण्यात आलेल्या भव्य अशा अखिल भारतीय पशुस्तरावरील महा पशुप्रदर्शनाचा समारोप व बक्षीस वितरण समांरभात            श्री. फडणवीस यांच्या हस्ते झाले.  यावेळी ते बोलत होते. यावेळी पशुसंवर्धन व मस्त्यव्यवसाय मंत्री महादेव जानकर, पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री  बबनराव लोणीकर, पशुसंवर्धन व मस्त्यव्यवसाय,  वस्त्रोद्योग राज्यमंत्री अर्जुन खोतकर, सर्वश्री आमदार नारायण कुचे, प्रशांत बंब, जिल्हा परिषद अध्यक्ष अनिरुद्ध खोतकर, प्रधान सचिव अनूपकुमार, विभागीय आयुक्त डॉ.पुरुषोत्तम भापकर, पशुसंवर्धन विभागाचे आयुक्त कांतीलाल उमप, भास्कर आंबेकर, रामेश्वर भांदरगे, संतोष सांबरे, संजय खोतकर, अभिमन्यू खोतकर, जिल्हाधिकारी रवींद्र बिनवडे, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती निमा अरोरा, जिल्हा पोलीस अधीक्षक एस. चैतन्या आदींची प्रमुख उपस्थिती होती.
            मुख्यमंत्री श्री फडणवीस म्हणाले,  देशातले सर्वात भव्य असे हे महाएक्स्पो प्रदर्शन आहे. देशात पशुपक्ष्यांच्या प्रजातीला एकत्र करण्याचे काम या प्रदर्शनाच्या माध्यमातन झाले आहे. पशुसंवर्धन, चारा याबरोबरच पशुपक्ष्याच्या संवर्धनाचे प्रशिक्षण येथे अनुभवयास मिळाले. एवढचे नव्हे तर प्रदर्शन शेतकरी आणि पशुपालकांसाठी आदर्श अशी कार्यशाळा ठरली आहे.  पाच लाख शेतकऱ्यांनी या प्रदर्शनाला भेट दिली आहे. ही या प्रदर्शनाची उपयुक्तता आहे.  शेतकऱ्यांनी केवळ शेतीवर अवलंबून न राहता शेतीला जोडव्यवसाय निवडणे आवश्यक आहे. ज्या शेतकऱ्यांनी शेतीला पशुपालनाची जोड दिली तेथे शेतकऱ्यांनी आत्महत्या केलेल्या नाहीत. शासनामार्फत पशुपालकांसाठी 243 कोटी रुपयांची जनावरे वाटपाची योजना राबविण्यात येत आहे. याचा फायदा बहुसंख्य लाभार्थ्यांना झालेला आहे. पशुखाद्याबरोबरच पशुपालकांना कृत्रिम लिंग निर्धारित  रेतन लॅब महत्वाची ठरणार आहे, असेही ते म्हणाले. 
            राज्यात मराठवाडा आणि विदर्भ विभाग दुध उत्पादनात आघाडीवर होते. परंतु या भागातील शेतकरी कापूस, सोयबीन पिकांकडे वळल्यामुळे चारा उत्पादनात घट झाली. पर्यायाने या भागात दुधाचे उत्पादन कमी झाले. त्यामुळे येथील शेतकऱ्यांनी चारा उत्पादनासाठी पुढाकार घेणे आवश्यक आहे.  शासनामार्फत दुग्ध उत्पादन वाढविण्यासाठी लिटर मागे पाच रुपये प्रमाणे 500 कोटी रुपयांचे अनुदान देण्यात येत आहे.  त्यापैकी 250 कोटी रुपयांचे अनुदान दुध उत्पादकांना वाटप करण्यात  आले आहे. पशुपालकांसाठी जेनेरिक औषधी आणि रुग्णवाहिका महत्वाची आहे. त्यामुळे पशुवसंवर्धन विभागाने पशुंसाठी असलेली जेनेरीक औषधी पशुपालकांना उपलब्ध व्हावी. तसेच पशुंसाठी आवश्यक रुग्णवाहिका याबाबतही तात्काळ कार्यवाही करावी, अशा सूचनाही श्री. फडणवीस यांनी दिल्या.
            पशुसंवर्धन विभागाला नावलौकिक मिळवून देण्याचा मान पशुसंवर्धन मंत्री महादेव जानकर आणि पशुसंवर्धन राज्यमंत्री अर्जुन खोतकर यांनाच जातो. या विभागात  नोकरभरती होणे आवश्यक असल्याने ही भरती संपूर्णरित्या पुर्ण करण्याचे आदेशही श्री. फडणवीस यांनी यावेळी दिले.
            प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी केंद्र सरकारतर्फे सुरु केलेल्या योजनांचीही अंमलबजावणी राज्यात प्रभावीपणे राबविण्यात राज्य आघाडीवर आहे. या केंद्राच्या योजनांमधून राज्यात नीलक्रांती झाली आहे.  त्याचबरोबर राज्याच्या महामेष योजनेतून मेंढीपालन मोठ्याप्रमाणात वाढलेले आहे. पशुपालकांसाठी वृक्ष संवर्धन, पशुपक्षी संवर्धन महत्वाचे असून  यासाठी सर्वांनीच पुढाकार घ्यावा, असे आवाहनही श्री. फडणवीस यांनी यावेळी केले. राज्यमंत्री श्री खोतकर यांनी गायींच्या संवर्धनासाठी त्यांचा विमा उतरविण्यात यावा याबाबत प्रास्ताविकात मुख्यमंत्री फडणवीस यांच्याकडे मागणी केली. या मागणीला सकारात्मक प्रतिसाद देत मुख्यमंत्र्यांनी ही योजना प्रायोगिक तत्वावर राबविण्यास मान्यता देण्यात येईल, अशी ग्वाहीही यावेळी दिली.
            पशुसंवर्धन मंत्री महादेव जानकर यांनी मुख्यमंत्र्यांच्या नावे पशुसंवर्धन विभागामार्फत मुख्यमंत्री पशुधन योजना राबविणार असल्याची घोषणा  यावेळी केली.
            राज्याचे पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री श्री लोणीकर म्हणाले, देशाच्या कानाकोपऱ्यातून शेतकऱ्यांनी या महाएक्स्पोचा लाभ घेतला आहे. कोट्यवधी रुपयांचे पशुधन या प्रदर्शनात दाखल झाले आहे. ही जालन्यासह राज्यातील शेतकऱ्यांना पशुसंवर्धन विभागाने संधी निर्माण करुन दिली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील सरकारने कायम शेतकऱ्यांना केंद्रबिंदू मानून शेतकऱ्यांच्या विकासासाठी सातत्याने भरीव निधीची तरतूद केलेली आहे.
            प्रास्ताविकात राज्यमंत्री श्री.खोतकर म्हणाले, शेतकऱ्यांच्या या एक्स्पो उपक्रमाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भरीव निधी दिला आहे. या प्रदर्शनात काश्मीर ते कन्याकुमारीपर्यंतच्या सर्व पशुपक्षी यात दाखल झालेले आहेत. दोन दिवसात पाच लाख शेतकरी बांधवांनी या ठिकाणी भेट दिली असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.
            यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याहस्ते प्रदर्शनात दाखल झालेल्या पशुपालकांना बक्षीसांचे वितरणही करण्यात आले. सुरुवातीला महापुरुषांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन दीपप्रज्वलनाने सुरुवात झाली. मुख्यमंत्र्यांच्या हस्ते यावेळी दुग्धव्यवसायिकांच्या यशकथा या पुस्तिकेचे विमोचनही करण्यात आले. महाएक्स्पोच्या उत्कृष्ट आयोजनाबद्दल पशुसंवर्धन विभागाचे आयुक्त कांतीलाल उमप यांचा मुख्यमंत्री             श्री. फडणवीस यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
            कार्यक्रमास पदाधिकारी, अधिकारी, पशुपालक, शेतकरी आदींची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.
पशुपालकांना मुख्यमंत्र्यांच्या हस्ते बक्षीसाचे वितरण
पशुपालकांचे नाव
गटांचा प्रकार
बक्षीसांचा प्रकार
रक्कम
श्री. माणिक निवृत्ती जाधव रा. हासेगाव ता. औसा जि. लातूर
देवणी  गटात वळु
प्रथम
1,00,000/-
श्री. विनायक गुरुनाथ चव्हाण रा. विळेगाव ता. देवणी जि. लातूर
देवणी  नर गट 
प्रथम
1,00,000/-
श्री. महादेव नारायण आकमार रा. शिरडशहापूर ता. औंढा जि. हिंगोली
देवणी  गाय गट 
प्रथम
1,00,000/-
श्री.बालाजी यादवराव तिडके रा. कुणकी ता. जळकोट जि. लातूर
देवणी  गट
कालवड
प्रथम
1,00,000/-
श्री.दत्तात्रय रामभाऊ आर्दड रा. टाकळी ता. घनसावंगी जि. जालना
गीरगायगट
प्रथम
1,00,000/-
श्री.  दत्ताराम तुकाराम दुमनल रा. जोगलगाव ता. पालम जि. परभणी
संकरित एचएफ गट
प्रथम
1,00,000/-
श्री.बळीराम गोविंद शिंदे  ता. पंढरपूर जि. सोलापूर
खिल्लारगट गाय
प्रथम
1,00,000/-
श्री. सुनिल बाळासाहेब पवार रा. विखेडे ता. मोहोळ           जि. सोलापूर
खिल्लार कालवड गट
प्रथम
1,00,000/-
श्री. सत्यजीत एकनाथ जाधव रा. इस्मालपूर ता. वाळवा जि. सांगली
खिल्लारगट
कालवड
प्रथम
1,00,000/-
श्री. नामदेव कोंडीबा पवार रा. कडलस ता सांगोला जि. सोलापूर
खिल्लारगट वळु
प्रथम
1,00,000/-
श्री. रणजीत हनुमंत जाधव रा. सिध्देवाडी ता. पंढरपुर जि. सोलापूर
खिल्लारअदात वळू
प्रथम
1,00,000/-

 \











Sunday 3 February 2019

मराठवाडा विकास पॅकेज अंतर्गत पशुपालकांना दुधाळ गाय, म्हैस व शेळीगटांचे वितरण



            जालना, दि. 3 – मराठवाडा विकास पॅकेज अंतर्गत जिल्ह्यातील पशुपालकांना 50 टक्के अनुदानावर दुधाळ गाय, म्हैस व शेळीगटांचे वितरणाचा कार्यक्रम येथील कृषि उत्पन्न बाजार समितीसमोरील विस्तीर्ण अशा प्रांगणात आयोजित करण्यात आलेल्या भव्य अशा अखिल भारतीय पशुपक्षी प्रदर्शनात पशुसंवर्धन, दुग्ध विकास, मत्स्य व्यवसाय व वस्त्रोद्योग राज्यमंत्री अर्जुनराव खोतकर, खासदार रावसाहेब दानवे, युवानेते आदित्य ठाकरे यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये  संपन्न झाला.
            यावेळी जिल्हा परिषदेचे अध्यक्ष अनिरुद्ध खोतकर, माजी आमदार शिवाजी चोथे, संतोष सांबरे, माजी नगराध्यक्ष भास्कर आंबेकर, सिद्धेश कदम, अभिमन्यू खोतकर, संजय खोतकर, विजय पवार, श्री घुगे आदींची प्रमुख उपस्थिती होती.
            यावेळी राज्यमंत्री अर्जुनराव खोतकर म्हणाले की, महापशुधन एक्स्पोमध्ये देशातील नामवंत अशा विविध प्रजाती, पशुधनाचा समावेश करण्यात आला असुन हे प्रदर्शन भरविण्यासाठी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, वित्तमंत्री सुधीर मुनगंटीवार तसेच पशुसंवर्धन मंत्री महोदव जानकर यांनी मोलाचे सहकार्य केल्याबद्दल त्यांचे आभार व्यक्त करत राज्यातला पशुपालक, शेतकरी तांत्रिकदृष्टया सक्षम व्हावा, नवनव्या तंत्रज्ञानाचा वापर करुन पशुसंवर्धनाचा व्यवसाय करावा यासाठी पशुसंवर्धन विभाग भरीव अशी कामगिरी करत आहे.  संपुर्ण देशभरात यापूर्वी कधीच भरविण्यात आले नाही अशा पद्धतीचे भव्य असे प्रदर्शन जालन्यामध्ये भरविण्यात येऊन पशुपालकांसह शेतकऱ्यांना याचा मोठा फायदा होणार असल्याने आपणास मनस्वी आनंद झाला असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.
            राज्यात उत्पादित होणाऱ्या दुधापैकी 73 टक्के दुध हे पश्चिम महाराष्ट्रात होत असुन उर्वरित 17 टक्के दुध मराठवाड्यासह इतर भागातुन संकलित करण्यात येते.  मराठवाडा हा दुग्धव्यवसायामध्ये अग्रेसर व्हावा यासाठी प्रदर्शनामध्ये 30 लिटरपेक्षा अधिक दुध देणाऱ्या गायी व म्हैशींचा समावेश करण्यात आला असुन अशाच पद्धतीच्या   गायी व म्हैशींचे संगोपन केल्या पशुपालक व शेतकऱ्यांच्या आर्थिक उत्पन्नात भर पडण्याबरोबरच मराठवाडा दुग्धविकासामध्ये नक्कीच अग्रेसर होईल असा विश्वास व्यक्त करत मराठवाडा विकास पॅकेज अंतर्गत 50 टक्के अनुदानावर जिल्ह्यातील 6 हजार शेतकऱ्यांना 26 हजार दुधाळ जनावरांचे वाटप करण्यात आले असुन येणाऱ्या काळात 1 लाख दुधाळ जनावरांचे वाटप करण्याचा आपला मानस असुन जालन्यामध्ये भरविण्यात आलेल्या या प्रदर्शनास राज्याच्या कानाकोपऱ्यातुन शेतकरी, पशुपालक तसेच
नागरिक, महिलांनी लाखोच्या संख्येने उपस्थित राहुन उत्स्फुर्त असा प्रतिसाद दिल्याबद्दल त्यांनी आभारही व्यक्त केले.
            खासदार रावसाहेब दानवे म्हणाले की, निसर्गाच्या लहरीपणामुळे तसेच पावसाच्या अनियमितपणामुळे मराठवाड्याला सातत्याने दुष्काळी परिस्थितीचा सामना करावा लागतो.  शेतकऱ्यांनी पारंपरिक शेतीबरोबरच उत्पन्न वाढीच्या दृष्टीकोनातुन शेतीला पुरक असे जोडधंदे करण्याची गरज असुन या माध्यमातुन शेतकऱ्यांचा आर्थिकस्तर उंचावण्यास मदत होईल असे सांगुन शासन शेतकऱ्यांच्या हिताचे अनेकविध निर्णय घेत असुन पीकविमा, दुष्काळी अनुदान, बोंडअळी, छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेच्या माध्यमातुन शेतकऱ्यांना मदत करत आहे.  दोन हेक्टरपर्यंत शेती असणाऱ्या अल्पभूधारक शेतकऱ्यांना हजार रुपये देण्याचा केंद्र शासनाने निर्णय घेतला असल्याचे सांगत शासन शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे असल्याची ग्वाहीही त्यांनी यावेळी दिली.
            यावेळी युवानेते आदित्य ठाकरे यांनीही उपस्थितांना मार्गदर्शन केले.  यावेळी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते पशुपालकांना मराठवाडा विकास पॅकेज अंतर्गत दुधाळ जनावरांसाठीच्या अनुदानाचे वाटप करण्यात आले.
            या कार्यक्रमास पदाधिकारी, अधिकारी, शेतकरी, पशुपालक तसेच महिलांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.
*******





           


100 खाटांच्या जिल्हा स्त्री रुग्णालयाच्या ईमारतीचा लोकार्पण सोहळा संपन्न



            जालना, दि. 3 – जालना शहरात उभारण्यात आलेल्या 100 खाटांच्या जिल्हा स्त्री रुग्णालयाच्या ईमारतीचा लोकार्पण सोहळा  आज दि. 3 फेब्रुवारी रोजी पशुसंवर्धन, दुग्ध विकास, मत्स्य व्यवसाय व वस्त्रोद्योग राज्यमंत्री अर्जुनराव खोतकर, खासदार रावसाहेब दानवे, युवानेते आदित्य ठाकरे यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये  संपन्न झाला.
            यावेळी जिल्हा परिषदेचे अध्यक्ष अनिरुद्ध खोतकर, माजी आमदार शिवाजी चोथे, संतोष सांबरे, माजी नगराध्यक्ष भास्कर आंबेकर, सिद्धेश कदम, अभिमन्यू खोतकर, संजय खोतकर, विजय पवार, श्री घुगे आदींची प्रमुख उपस्थिती होती.
            यावेळी मार्गदर्शन करताना राज्यमंत्री श्री खोतकर म्हणाले की,  जालना शहरामध्ये महिलांसाठी अत्याधुनिक असे रुग्णालय असावे यासाठी सातत्याने पाठपुरावा केला व त्यास यश येऊन आज भव्य अशी ईमारत उभी राहीली आहे.  शहराच्या मध्यभागी रुग्णालयाची उभारणी केली असल्याने नागरिकांना सहज व सुलभपणे वैद्यकीय सेवेसाठी रुग्णालयात येता येणार असुन या माध्यमातुन शहरासह जिल्ह्यातील महिलांना आरोग्य सेवेचा लाभ मिळणार आहे.  जालन्याचा विकास करण्यासाठी आपण सातत्याने प्रयत्नशिल असल्याचे सांगत  अंदाज समितीच्या माध्यमातुन राज्यातील पोलीसांसाठी चांगली व सुसज्ज घरे असावीत असा अहवाल मुख्यमंत्र्यांना सादर केल्यामुळे पोलीसांसाठी 600 ते 800 स्क्वेअर फुटाची घरे देण्यात येत असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.
            खासदार रावसाहेब दानवे म्हणाले की, सर्वसामान्यांबरोबरच महिलांच्या विकासासाठी केंद्र व राज्य शासनामार्फत अनेकविध योजना राबविल्या जात आहेत.  जालना येथे रुग्णालय उभारणीसाठी सामुहिकरित्या प्रयत्न करण्यात आले असुन या प्रयत्नांच्या माध्यमातुन जालना शहरात भव्य व सुसज्ज अशी  रुग्णालयाची ईमारत उभारण्यात आली आहे.  आयुष्यमान भारत योजनेच्या माध्यमातुन पाच लाख रुपयापर्यंतच्या आरोग्य सेवा मोफत देण्यात येत असुन महिलांना प्रसुतीसाठी असलेली रजा 10 आठवड्यावरुन 26 आठवडे करण्यात आली आहे.  पंतप्रधान उज्ज्वला गॅस योजनेच्या माध्यमातुन देशातील आठ कोटी कुटूंबांना केवळ 100 रुपयात गॅसचे वितरण करण्यात आले असुन ग्रामीण तसेच शहरी भागातील महिलांची या योजनेच्या माध्यमातुन धुरापासुन मुक्तता करण्यात आली असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.
            यावेळी युवानेते आदित्य ठाकरे यांनीही उपस्थितांना मार्गदर्शन केले.
            कार्यक्रमास पदाधिकारी, अधिकारी, नागरिक, महिला तसेच रुग्णालयातील डॉक्टर्स, परिचारिका आदींची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.
*******






Saturday 2 February 2019

महापशुधन एक्स्पो 2019 शेतकरी तसेच पशुपालकांसाठी मार्गदर्शक ठरेल कृषी क्षेत्रातील विविध समस्या दूर करण्याची ताकद समृद्ध पशुपालनामध्ये - विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे उदघाटनाच्या पहिल्याच दिवशी दीड लाख लोकांनी दिली महाएक्स्पोला भेट



            जालना, दि. 2 – निसर्गाच्या लहरीपणामुळे तसेच पावसाच्या अनियमिततेमुळे सातत्याने शेतकऱ्याला नापिकीला सामोरे जावे लागते. उत्पन्न वाढीच्यादृष्टीने पारंपारिक शेतीबरोबरच शेतीला पुरक असा व्यवसाय शेतकऱ्यांनी करण्याची गरज असुन कृषी क्षेत्रातील विविध समस्या दूर करण्याची ताकद समृद्ध पशुपालनामध्ये आहे. देशातील विविध प्रजाती, पशुधन, शासनाच्या विविध योजनांची माहिती असलेले महापशुधन एक्स्पो 2019 हे शेतकरी तसेच पशुपालकांसाठी मार्गदर्शक ठरेल असा विश्वास, महाराष्ट्र राज्य विधानसभेचे अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांनी व्यक्त केला.
            येथील कृषि उत्पन्न बाजार समितीसमोरील विस्तीर्ण अशा प्रांगणात आयोजित करण्यात आलेल्या भव्य अशा अखिल भारतीय पशुपक्षी प्रदर्शनाचे उदघाटन विभानसभा अध्यक्ष श्री बागडे यांच्या हस्ते करण्यात आले.  त्याप्रसंगी उपस्थितांना मार्गदर्शन करताना ते बोलत होते.
            व्यासपीठावर राज्याचे पशुसंवर्धन, दुग्धविकास व मत्स्यव्यवसाय मंत्री महादेव जानकर, सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम) व सार्वजनिक आरोग्य व कुटूंब कल्याण मंत्री एकनाथ शिंदे, पशुसंवर्धन, दुग्ध विकास, मत्स्य व्यवसाय व वस्त्रोद्योग राज्यमंत्री अर्जुनराव खोतकर, आमदार संदीपान भुमरे, आमदार राजेश टोपे, औरंगाबाद जि.प. च्या अध्यक्षा श्रीमती देवयाणी डोणगावकर, जालना जि.प.चे अध्यक्ष अनिरुद्ध खोतकर, शेष महाराज गोंदीकर,  माजी आमदार अरविंद चव्हाण, संतोष सांबरे, माजी नगराध्यक्ष भास्कर आंबेकर, अंबादास दानवे, अभिमन्यू खोतकर, संजय खोतकर, राजेश राऊत, ए.जे. बोराडे, विलास नाईक, किशारे अग्रवाल, जिल्हाधिकारी रवींद्र बिनवडे, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती निमा अरोरा, जिल्हा पोलीस अधीक्षक एस.चैतन्य आदींची प्रमुख उपस्थिती होती.
            विधानसभा अध्यक्ष श्री बागडे म्हणाले की, पशुपालन हा शेतकऱ्यांच्या जीवनातील अविभाज्य घटक आहे.  शेतकऱ्यांनी पारंपरिक शेतीबरोबरच उत्पन्न वाढीच्या दृष्टीकोनातुन शेतीला पुरक असे जोडधंदे करण्याची गरज आहे. दुग्धव्यवसाय हा शेतीसाठी जोडधंदा म्हणून अत्यंत उपयुक्त असुन हा व्यवसाय वाढीसाठी प्रयत्न करण्याची गरज आहे.   महापशुधन एक्स्पोमध्ये देशातील नामवंत अशा विविध प्रजाती, पशुधनाचा समावेश करण्यात आला असल्याचे सांगत गीर, देवणी, लाल कंधारी यासारख्या जातीच्या गायींपासुन  अत्यंत चांगल्या पद्धतीच्या दुधाचे संकलन होत असल्याने यासारख्या जातीच्या गाईचे संगोपन करुन दुग्धव्यवसायाच्या माध्यमातुन शेतकऱ्यांनी आपली उन्नती साधण्याची गरज आहे.  पशुसंवर्धन विभागामार्फत मंत्री महादेव जानकर व राज्यमंत्री अर्जुनराव खोतकर यांच्या पुढाकाराने जालन्यामध्ये उत्कृष्ट अशा पशुपक्षी प्रदर्शनाचे आयोजन केल्याबद्दल त्यांचे अभिनंदन करत या प्रदर्शनाचा फायदा मराठवाडा,  विदर्भासह राज्यातील शेतकरी व पशुपालकांना होईल, असा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला.
            पशुसंवर्धन, दुग्धविकास व मत्स्यव्यवसाय मंत्री महादेव जानकर म्हणाले की, ग्रामीण महाराष्ट्राच्या विकासाचे सारथ्य करत उपेक्षितांच्या दारीअंगणी विकासाचा प्रवाह पोहचविणारा पशुसंवर्धन विभाग आजवर प्रगत व उन्नत महाराष्ट्राच्या विकासात योगदान देण्यात आघाडीवर राहिला आहे.  पशुजन्य उत्पादनांना वाढलेली मागणी आणि त्या तुलनेत असलेला अपुरा पुरवठा यामुळे पशुसंवर्धनाशी संबंधित सर्व व्यवसाय आज ग्रामीण अर्थव्यवस्थेचा कणा ठरु पाहत आहेत. शेतीच्या उत्पन्नातील अनिश्चिततेमुळे शेतकऱ्यांच्या हाती चार अधिकचे पैसे मिळवुन देण्यात आपण यशस्वी ठरलो असल्याचे सांगत पशुसंवर्धन विभागाने विविध योजनांच्या माध्यमातुन तरुणांना हक्काचा रोजगार मिळवुन देण्यात यश मिळवले असुन मागेल त्याला पशुधन ही प्रस्तावित योजना ग्रामीण महाराष्ट्रातील बेरोजगारांची समस्या पूर्णत: निकाली काढेल असे सांगत जालना येथे आयोजित करण्यात आलेले पशुप्रदर्शन हे विदर्भ व मराठवाड्यातील शेतकऱ्यांसाठी प्रगतीची संधी आणि विकासाची नांदी ठरेल, असा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला.
            सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम) मंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की, राज्य शासन शेतकऱ्यांच्या उन्नतीसाठी अनेकविध कल्याणकारी योजना राबवित असुन त्याचा लाभ थेट लाभार्थ्यांपर्यंत पोहोचविण्याच्यादृष्टीने प्रयत्नही करण्यात येत आहेत.  पशुसंवर्धन विभागाच्या योजना पशुपालक तसेच शेतकऱ्यांपर्यंत पोहोचविण्यासाठी पशुसंवर्धन मंत्री व राज्यमंत्र्यांनी जालना येथे भव्य अशा महापशुधन प्रदर्शनाचे आयोजन करुन अनेक नामवंत जाती, प्रजातीच्या पशुपक्षांच्या माहितीसह तांत्रिक माहितीही या माध्यमातुन मिळणार असल्याने येणाऱ्या काळात शेतकऱ्यांसह पशुपालकांना याचा निश्चितच फायदा होणार असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.
            पशुसंवर्धन, दुग्ध विकास, मत्स्य व्यवसाय व वस्त्रोद्योग राज्यमंत्री अर्जुनराव खोतकर म्हणाले की, शेती आणि पशुसंवर्धन ही ग्रामीण विकासाच्या रथाची दोन चाकं आहेत.  श्रमिकांच्या हाताला काम आणि कष्टाला दाम देण्याचे कार्य शेतीइतकेच पशुसंवर्धनाने केले आहे.  विकासाचा प्रवाह प्रत्येक पशुपालक शेतकऱ्याच्या दारापर्यंत पोहोचवत ग्रामीण महाराष्ट्राला उन्नत व विकसित महाराष्ट म्हणुन नावारुपास आणण्यासाठी पशुसंवर्धन विभागाने ठोस पावले उचचली असुन पशुपालकांशी संवादाच्या माध्यमातुन रोजगाराच्या संधी उपलब्ध करुन देत ग्रामीण विकासाचे चित्र सुस्पष्ट करण्यासाठी पशुसंवर्धन विभाग सातत्याने प्रयत्न करत असुन महापशुधन प्रदर्शन हा त्याचाच एक भाग असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.  महापशुधन 2019 प्रदर्शनाचा लाभ सर्वांनी घ्यावा आणि इतरांना त्यासाठी प्रवृत्त करावे अशी अपेक्षा व्यक्त करत घरी जाताना एक स्वप्न मनात बाळगा की मी उद्योजक होणारच. महत्वाकांक्षेच्या घडयाळाला प्रयत्नांची चावी दिली की यशाचे काटे आपोआप फिरु लागतात, हा मूलमंत्री लक्षात ठेवा. शासन तुमच्या सैदव पाठीशी असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.  
            यावेळी चारा साक्षरता अभियानामध्ये उत्कृष्ट कार्य केलेल्या पशुसंवर्धन विभागातील अधिकाऱ्यांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.  उत्कृष्ट कार्य करणाऱ्या बचतगटांमध्ये सावित्रीबाई फुले स्वयंसहाय्यता बचतगटास प्रथम, फकीरबाबा स्वयंसहाय्यता बचतगटास द्वितीय तर जय श्रीकृष्णा बचतगटास तृतीय पारितोषिक वितरण करण्यात आले.  यावेळी पशुसंवर्धन विभागाच्यावतीने तयार करण्यात आलेल्या पशुधन ऐश्वर्य या मासिकाच्या पाचव्या अंकाचे प्रकाशनही मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. सर्वप्रथम दीपप्रज्वलन तसेच छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अर्धाकृती पुतळयास पुष्पहार अर्पणाने कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली.
            दुरदर्शनच्या वृत्त निवेदिका श्रीमती ज्योती अंबेकर यांनी कार्यक्रमाचे बहारदार सुत्रसंचालन करुन उपस्थितीची मने जिंकून घेतली.
            उदघाटनाच्या पहिल्याच दिवशी शेतकरी, पशुपालक, विद्यार्थी, विद्यार्थी, महिला आदी जवळपास दीड लाख लोकांनी या प्रदर्शनास भेट दिली.
            या उदघाटन सोहळयास पदाधिकारी, अधिकारी, शेतकरी, पशुपालक तसेच महिलांच्या मोठ्या संख्येने उपस्थिती होती.
पशु पक्षी प्रदर्शन ठळक मुद्दे
·         एकाच छत्राखाली शेतकरी आणि पशुपालकांना उत्तम जातीचे पशुधन
·         पशु उत्पादन घेण्याच्या आधुनिक व शास्त्रोक्त पद्धतींची माहिती
·         आवश्यक निविष्ठा उपलब्ध
·         चर्चासत्रांच्या माध्यमातून तज्ञ व्यक्तींकडून मार्गदर्शन
·        विदर्भ-मराठवाडा भागात धवलक्रांतीच्या कक्षा अधिक व्यापक करण्यावर पशुसंवर्धन विभागाचा भर
·         राज्यांतील पशुधनाच्या उच्च वंशावळीच्या विविध जाती या प्रदर्शनात समावेश
·         आदर्श गाव (मॉडेल व्हिलेज) या संकल्पनेवर आधारीत गावाची निर्मिती  प्रदर्शनात
·         प्रामुख्याने गीर, साहिवाल, थारपारकर, राठी व वेचूर या अधिक दूध देणाऱ्या देशी गायी प्रदर्शनाचे
           आकर्षण.
·         पशुसंवर्धन विभागाच्या विविध योजनांसह दुग्धव्यवसाय, शेळीपालन, कुक्कुटपालन, वराहपालन,
          ससेपालन, बटेरपालन आदी पशुसंवर्धनाशी निगडीत व्यवसाय याविषयी मार्गदर्शन.
.           कोट्यावधी रुपये किंमत असलेल्या सुलतान, युवराज रेड्याचा प्रदर्शनात समावेश.