Sunday 3 February 2019

मराठवाडा विकास पॅकेज अंतर्गत पशुपालकांना दुधाळ गाय, म्हैस व शेळीगटांचे वितरण



            जालना, दि. 3 – मराठवाडा विकास पॅकेज अंतर्गत जिल्ह्यातील पशुपालकांना 50 टक्के अनुदानावर दुधाळ गाय, म्हैस व शेळीगटांचे वितरणाचा कार्यक्रम येथील कृषि उत्पन्न बाजार समितीसमोरील विस्तीर्ण अशा प्रांगणात आयोजित करण्यात आलेल्या भव्य अशा अखिल भारतीय पशुपक्षी प्रदर्शनात पशुसंवर्धन, दुग्ध विकास, मत्स्य व्यवसाय व वस्त्रोद्योग राज्यमंत्री अर्जुनराव खोतकर, खासदार रावसाहेब दानवे, युवानेते आदित्य ठाकरे यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये  संपन्न झाला.
            यावेळी जिल्हा परिषदेचे अध्यक्ष अनिरुद्ध खोतकर, माजी आमदार शिवाजी चोथे, संतोष सांबरे, माजी नगराध्यक्ष भास्कर आंबेकर, सिद्धेश कदम, अभिमन्यू खोतकर, संजय खोतकर, विजय पवार, श्री घुगे आदींची प्रमुख उपस्थिती होती.
            यावेळी राज्यमंत्री अर्जुनराव खोतकर म्हणाले की, महापशुधन एक्स्पोमध्ये देशातील नामवंत अशा विविध प्रजाती, पशुधनाचा समावेश करण्यात आला असुन हे प्रदर्शन भरविण्यासाठी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, वित्तमंत्री सुधीर मुनगंटीवार तसेच पशुसंवर्धन मंत्री महोदव जानकर यांनी मोलाचे सहकार्य केल्याबद्दल त्यांचे आभार व्यक्त करत राज्यातला पशुपालक, शेतकरी तांत्रिकदृष्टया सक्षम व्हावा, नवनव्या तंत्रज्ञानाचा वापर करुन पशुसंवर्धनाचा व्यवसाय करावा यासाठी पशुसंवर्धन विभाग भरीव अशी कामगिरी करत आहे.  संपुर्ण देशभरात यापूर्वी कधीच भरविण्यात आले नाही अशा पद्धतीचे भव्य असे प्रदर्शन जालन्यामध्ये भरविण्यात येऊन पशुपालकांसह शेतकऱ्यांना याचा मोठा फायदा होणार असल्याने आपणास मनस्वी आनंद झाला असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.
            राज्यात उत्पादित होणाऱ्या दुधापैकी 73 टक्के दुध हे पश्चिम महाराष्ट्रात होत असुन उर्वरित 17 टक्के दुध मराठवाड्यासह इतर भागातुन संकलित करण्यात येते.  मराठवाडा हा दुग्धव्यवसायामध्ये अग्रेसर व्हावा यासाठी प्रदर्शनामध्ये 30 लिटरपेक्षा अधिक दुध देणाऱ्या गायी व म्हैशींचा समावेश करण्यात आला असुन अशाच पद्धतीच्या   गायी व म्हैशींचे संगोपन केल्या पशुपालक व शेतकऱ्यांच्या आर्थिक उत्पन्नात भर पडण्याबरोबरच मराठवाडा दुग्धविकासामध्ये नक्कीच अग्रेसर होईल असा विश्वास व्यक्त करत मराठवाडा विकास पॅकेज अंतर्गत 50 टक्के अनुदानावर जिल्ह्यातील 6 हजार शेतकऱ्यांना 26 हजार दुधाळ जनावरांचे वाटप करण्यात आले असुन येणाऱ्या काळात 1 लाख दुधाळ जनावरांचे वाटप करण्याचा आपला मानस असुन जालन्यामध्ये भरविण्यात आलेल्या या प्रदर्शनास राज्याच्या कानाकोपऱ्यातुन शेतकरी, पशुपालक तसेच
नागरिक, महिलांनी लाखोच्या संख्येने उपस्थित राहुन उत्स्फुर्त असा प्रतिसाद दिल्याबद्दल त्यांनी आभारही व्यक्त केले.
            खासदार रावसाहेब दानवे म्हणाले की, निसर्गाच्या लहरीपणामुळे तसेच पावसाच्या अनियमितपणामुळे मराठवाड्याला सातत्याने दुष्काळी परिस्थितीचा सामना करावा लागतो.  शेतकऱ्यांनी पारंपरिक शेतीबरोबरच उत्पन्न वाढीच्या दृष्टीकोनातुन शेतीला पुरक असे जोडधंदे करण्याची गरज असुन या माध्यमातुन शेतकऱ्यांचा आर्थिकस्तर उंचावण्यास मदत होईल असे सांगुन शासन शेतकऱ्यांच्या हिताचे अनेकविध निर्णय घेत असुन पीकविमा, दुष्काळी अनुदान, बोंडअळी, छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेच्या माध्यमातुन शेतकऱ्यांना मदत करत आहे.  दोन हेक्टरपर्यंत शेती असणाऱ्या अल्पभूधारक शेतकऱ्यांना हजार रुपये देण्याचा केंद्र शासनाने निर्णय घेतला असल्याचे सांगत शासन शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे असल्याची ग्वाहीही त्यांनी यावेळी दिली.
            यावेळी युवानेते आदित्य ठाकरे यांनीही उपस्थितांना मार्गदर्शन केले.  यावेळी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते पशुपालकांना मराठवाडा विकास पॅकेज अंतर्गत दुधाळ जनावरांसाठीच्या अनुदानाचे वाटप करण्यात आले.
            या कार्यक्रमास पदाधिकारी, अधिकारी, शेतकरी, पशुपालक तसेच महिलांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.
*******





           


No comments:

Post a Comment