Sunday 3 February 2019

100 खाटांच्या जिल्हा स्त्री रुग्णालयाच्या ईमारतीचा लोकार्पण सोहळा संपन्न



            जालना, दि. 3 – जालना शहरात उभारण्यात आलेल्या 100 खाटांच्या जिल्हा स्त्री रुग्णालयाच्या ईमारतीचा लोकार्पण सोहळा  आज दि. 3 फेब्रुवारी रोजी पशुसंवर्धन, दुग्ध विकास, मत्स्य व्यवसाय व वस्त्रोद्योग राज्यमंत्री अर्जुनराव खोतकर, खासदार रावसाहेब दानवे, युवानेते आदित्य ठाकरे यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये  संपन्न झाला.
            यावेळी जिल्हा परिषदेचे अध्यक्ष अनिरुद्ध खोतकर, माजी आमदार शिवाजी चोथे, संतोष सांबरे, माजी नगराध्यक्ष भास्कर आंबेकर, सिद्धेश कदम, अभिमन्यू खोतकर, संजय खोतकर, विजय पवार, श्री घुगे आदींची प्रमुख उपस्थिती होती.
            यावेळी मार्गदर्शन करताना राज्यमंत्री श्री खोतकर म्हणाले की,  जालना शहरामध्ये महिलांसाठी अत्याधुनिक असे रुग्णालय असावे यासाठी सातत्याने पाठपुरावा केला व त्यास यश येऊन आज भव्य अशी ईमारत उभी राहीली आहे.  शहराच्या मध्यभागी रुग्णालयाची उभारणी केली असल्याने नागरिकांना सहज व सुलभपणे वैद्यकीय सेवेसाठी रुग्णालयात येता येणार असुन या माध्यमातुन शहरासह जिल्ह्यातील महिलांना आरोग्य सेवेचा लाभ मिळणार आहे.  जालन्याचा विकास करण्यासाठी आपण सातत्याने प्रयत्नशिल असल्याचे सांगत  अंदाज समितीच्या माध्यमातुन राज्यातील पोलीसांसाठी चांगली व सुसज्ज घरे असावीत असा अहवाल मुख्यमंत्र्यांना सादर केल्यामुळे पोलीसांसाठी 600 ते 800 स्क्वेअर फुटाची घरे देण्यात येत असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.
            खासदार रावसाहेब दानवे म्हणाले की, सर्वसामान्यांबरोबरच महिलांच्या विकासासाठी केंद्र व राज्य शासनामार्फत अनेकविध योजना राबविल्या जात आहेत.  जालना येथे रुग्णालय उभारणीसाठी सामुहिकरित्या प्रयत्न करण्यात आले असुन या प्रयत्नांच्या माध्यमातुन जालना शहरात भव्य व सुसज्ज अशी  रुग्णालयाची ईमारत उभारण्यात आली आहे.  आयुष्यमान भारत योजनेच्या माध्यमातुन पाच लाख रुपयापर्यंतच्या आरोग्य सेवा मोफत देण्यात येत असुन महिलांना प्रसुतीसाठी असलेली रजा 10 आठवड्यावरुन 26 आठवडे करण्यात आली आहे.  पंतप्रधान उज्ज्वला गॅस योजनेच्या माध्यमातुन देशातील आठ कोटी कुटूंबांना केवळ 100 रुपयात गॅसचे वितरण करण्यात आले असुन ग्रामीण तसेच शहरी भागातील महिलांची या योजनेच्या माध्यमातुन धुरापासुन मुक्तता करण्यात आली असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.
            यावेळी युवानेते आदित्य ठाकरे यांनीही उपस्थितांना मार्गदर्शन केले.
            कार्यक्रमास पदाधिकारी, अधिकारी, नागरिक, महिला तसेच रुग्णालयातील डॉक्टर्स, परिचारिका आदींची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.
*******






No comments:

Post a Comment