Tuesday 31 January 2023

कंम्बाइंड डिफेन्स सर्विसेस परिक्षेच्या पुर्वतयारी प्रशिक्षणासाठी आवाहन

 

 

जालना, दि. 31 (जिमाका) :- कंम्बाइंड डिफेन्स सर्विसेस परिक्षेची पुर्वतयारी करण्यासाठी महाराष्ट्र शासनाकडून  सीडीएस अभ्यासक्रम क्र.60 हा महाराष्ट्रातील तरुण-तरुणींसाठी प्री-कॅडेट प्रशिक्षण केंद्र, नाशिक येथे दि.1 फेब्रुवारी ते 9 एप्रिल 2023 या कालावधीत आयोजित करण्यात आला आहे. या अभ्यासक्रमासाठी प्रशिक्षणार्थांना निवास, भोजन व प्रशिक्षणाची व्यवस्था करण्यात आली आहे. तरी इच्छुक उमेदवारांनी अधिक माहितीसाठी प्रभारी अधिकारी, प्री-कॅडेट प्रशिक्षण केंद्र, नाशिक येथे दुरध्वनी क्र.0253 2451032 किंवा भ्रमणध्वनी क्र.09130271626 यावर संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी, जालना यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे केले आहे.

-*-*-*-*-

14 वर्षाखालील मुलांसाठी एफ. सी. बार्यन महाराष्ट्र फुटबॉल कप स्पर्धेचे आयोजन

 


 

जालना, दि. 31 (जिमाका) :- महाराष्ट्र राज्याचे क्रीडा व युवक सेवा संचालनालय व  एफ. सी. बार्यन म्युनिक जर्मनी यांच्याशी महाराष्ट्र राज्याचा करारनामा झाला आहे. संपुर्ण राज्यात 14 वर्षाखालील मुलांचे जिल्हास्तरीय, विभागस्तरीय आणि राज्यस्तरीय फुटबॉल सामन्यांचे नियोजन करावयाचे आहे. स्पर्धा 8 ते 10 फेब्रुवारी 2023 या कालावधीत होणार असून या स्पर्धांमध्ये जास्तीत जास्त संघानी तसेच प्रत्येक शाळा, क्लब, असोसिएशन यांनी आपले संघ तयार करुन जिल्हास्तरीय स्पर्धांमध्ये सहभाग नोंदवावा,  असे आवाहन जिल्हा क्रीडा अधिकारी अरविंद विद्यागर यांनी केले आहे.

महाराष्ट्र राज्याचे क्रीडा व युवक सेवा संचालनालय व  एफ. सी. बार्यन म्युनिक जर्मनी यांच्याशी महाराष्ट्र राज्याचा करारनामा झाला आहे. या करारनामानूसार सपुर्ण राज्यात 14 वर्षाखालील मुलाचे जिल्हास्तरीय, विभागस्तरीय आणि राज्यस्तरीय फुटबॉल सामन्यांचे नियोजन करावयाचे आहे. या करारनाम्यानूसार राज्यातील फुटबॉल खेळाची लोकप्रियता वाढीस लागेल, खेळाडू व क्रीडा मार्गदर्शक यांना फुटबॉल खेळातील तांत्रिक प्रशिक्षण, क्रीडा नैपुण्याचा शोध घेण्यासाठी तसेच प्रशिक्षण, पायाभुत सुविधांना चालना मिळणार आहे. क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य तसेच फुटबॉल क्लब बायर्न यांचे करारामध्ये नैपुण्याचा शोध घेवुन त्यांना जर्मनी येथे प्रशिक्षण देण्यासाठी याअतंर्गत राज्यात 14 वर्षाखालील मुलांच्या एफ. सी. बार्यन महाराष्ट्र कप ' स्पर्धाचे आयोजन करण्यात येणार आहे. स्पर्धांमधुन एकुण 20 खेळाडुंची निवड करुन त्या खेळाडुंना म्युनिक  जर्मनी येथे जाणे - येणे, तेथील निवास, प्रशिक्षण इत्यादीबाबीवरील खर्च करण्यात येणार आहे.  फुटबॉल क्लब बार्यन यांचा लोगो वापरण्याची मुभा दिलेली आहे. तसेच एफ. सी. बायर्न महाराष्ट्र कप टी. व्ही. 9 मराठी हे मीडिया पार्टनर आहेत. प्रत्येक जिल्ह्यात या स्पर्धाचे आयोजन करण्यात येणार आहे. प्रत्येक संघात एकुण 20 खेळाडु सहभाग घेवु शकतात. स्पर्धेतील विजयी खेळाडुना मुव्हमेन्टो व ट्रॉफी देण्यात येणार आहे. स्पर्धा 8 ते 10 फेब्रुवारी 2023 या कालावधीत होणार आहेत. जे संघ हारतील त्यांच्यातुन पाच खेळाडुंची निवड पुढील स्पर्धांच्या निवड चाचणीसाठी होणार तर जे संघ जिल्हास्तरावर विजयी होतील त्याच्या स्पर्धा विभागस्तरावर होतील व नंतर राज्यस्तरावर श्री. शिवछत्रपती क्रीडा संकुल, महाळुंगे- बालेवाडी, पुणे येथे होवुन या स्पर्धेतून उत्कृष्ट खेळाडुंची निवड करण्यात येणार आहे. अधिक माहितीसाठी क्रीडा मार्गदर्शक महमंद शेख (मो. 8788360313) यांच्याशी संपर्क साधावा. असे जिल्हा क्रीडा अधिकारी, जालना यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे केले आहे.

-*-*-*-*-

सर्वधर्मीय सामुहिक विवाह सोहळ्यासाठी समिती गठीत; लाभासाठी सहायक धर्मादाय आयुक्त कार्यालयाशी संपर्क साधावा

 


जालना, दि. 31 (जिमाका) :- जिल्ह्यात सर्वधर्मीय सामुहिक विवाह सोहळ्यासाठी समिती गठीत करण्यात आली आहे. यामध्ये सर्वधर्मीय आदिवासी, आत्महत्याग्रस्त शेतकरी, कोरोनामध्ये मृत झालेल्याची मुले, शहीद जवान यांची मुले, बेघर/ पारधी समाज / गरीब गरजू / ऊसतोड कामगार /विमुक्त भटक्या जाती जमाती /अनुसूचित जाती जमाती व इतर मागासवर्गीय यांची मुले-मुली, व अनाथ मुले-मुली आदींचे विवाह प्राधान्याने करण्यात येणार आहेत. तरी या योजनेचा लाभ घेण्यासाठी समिती सदस्य अथवा जालना येथील सहायक धर्मादाय आयुक्त कार्यालयाशी संपर्क साधावा, असे आवाहन सहायक धर्मादाय आयुक्त वि.स. मेंढे यांनी केले आहे.

धर्मादाय आयुक्त महाराष्ट्र राज्य मुंबई यांचे आदेशानुसार जालना जिल्ह्यातील विविध सामाजिक, शैक्षणिक, धार्मिक संस्थांच्या विश्वस्थांची बैठक  जालनाचे सहायक धर्मादाय आयुक्त विनय मेंढे यांचे अध्यक्षतेखाली घेण्यात आली. बैठकीत जालना जिल्ह्यासाठी सर्वधर्मीय सामुहिक विवाह सोहळा समिती गठीत करण्यात आली आहे.  समितीमध्ये अध्यक्ष म्हणून सुदामराव सांडूजी सदाशिवे यांची निवड करण्यात आली तर उपाध्यक्ष म्हणून रमेश छोटाभाई पटेल,  सचिव म्हणून अॅड. संतोष शंकरलाल तवरावाला, सहसचिव म्हणून विमल अशोकराव आगलावे,  कोषाध्यक्ष म्हणून शामकुमार गणेशलाल जैस्वाल,  सदस्य म्हणून सुरेश जुगलकिशोरजी लाहोटी, मनोहर दगडूबा सरोदे, डॉ. राधाकिसन बाळासाहेब ठोके, नागसेन संपतराव बनकर, फादर चांगदेव गणपती भाकरे, ओमप्रकाश तुळशीराम जाधव, सुरेश गोविंदराव कुलकर्णी, अॅड. ऋषभचंद काशिनाथराव माद्रप, अॅड. प्रदीप वामनराव कुलकर्णी, अॅड. एकनाथ देविदास महाजन यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे. असे सहायक धर्मादाय आयुक्त, जालना यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे कळविले आहे.

-*-*-*-*-

आधार नोंदणी करुन दहा वर्ष झाले असल्यास आधारकार्ड अद्यावत करण्याचे आवाहन

 


जालना, दि. 31 (जिमाका) :- शासनाचे राजपत्र अधिसुचना दि. 9 नोव्हेंबर 2022 अन्वये दहा वर्षांनी आधारकार्ड अद्यावत करणे आवश्यक आहे. आधारकार्ड काढल्यानंतर कालांतराने अनेक बदल होतात. संपुर्ण पत्ता, बोटांचे ठसे, नावातील चुका, मोबाईल क्रमांक नोंदीचे आधारकार्डवर अद्यावतीकरण होणे आवश्यक आहे. त्यामुळे जिल्ह्यातील ज्या नागरिकांना आधार नोंदणी करुन दहा वर्ष इतका कालावधी पूर्ण झाला आहे, अशा व्यक्तींनी आपले आधारकार्ड myaadhaar.uidai.gov.in या संकेतस्थळावर किंवा आपले जवळच्या आधार नोंदणी केंद्रावर जाऊन अद्यावत करुन घ्यावे, असे आवाहन निवासी उपजिल्हाधिकारी केशव नेटके यांनी केले आहे.

-*-*-*-*-

Sunday 29 January 2023

औरंगाबाद विभाग शिक्षक मतदार संघ निवडणूक जालना जिल्हयात 15 मतदान केंद्र, 5,037 मतदार मतदान 30 जानेवारी रोजी सकाळी 8.00 ते दुपारी 4.00 वाजेपर्यंत

 

 

जालना, दि. 29 (जिमाका) -- 5- औरंगाबाद विभाग शिक्षक मतदारसंघ निवडणूकीसाठी दि. 30 जानेवारी 2023 रोजी सकाळी 8.00 ते दुपारी 4.00 वा. दरम्यान मतदान होणार आहे. जालना जिल्हयात  एकूण 15 मतदान केंद्र तर  5 हजार 37 मतदार आहेत. मतदान सुरळीत पार पाडण्यासाठी प्रशासन सज्ज झाले आहे.जालना जिल्हयात एकुण 5 हजार 37 मतदारांपैकी पुरुष मतदार 4 हजार 186 व स्त्री मतदार 851 आहेत. तालुकानिहाय मतदार संख्या पुढीलप्रमाणे आहे

जालना तालुका- पुरुष मतदार 1098, स्त्री मतदार 450 एकुण मतदार 1548, बदनापुर तालुका - पुरुष मतदार 198, स्त्री मतदार 49 एकुण मतदार 247, भोकरदन तालुका- पुरुष मतदार 876, स्त्री मतदार 138, एकुण मतदार 1014, जाफ्राबाद तालुका- पुरुष मतदार 415 स्त्री मतदार 55 एकुण मतदार 470, परतुर तालुका - पुरुष मतदार 368, स्त्री मतदार 30 एकुण मतदार 398, मंठा  तालुका - पुरुष मतदार 372 स्त्री मतदार 28 एकुण मतदार 400, अंबड तालुका - पुरुष मतदार 533 स्त्री मतदार 70 एकुण मतदार 603, घनसावंगी तालुका- पुरुष मतदार 326 स्त्री मतदार 31 एकुण मतदार 357 एवढी मतदार संख्या आहे, अशी माहिती पदनिर्देशित अधिकारी (05 -औरंगाबाद विभाग शिक्षक मतदारसंघ) तथा उपजिल्हा निवडणूक अधिकारी डॉ. ज्ञानोबा बानापुरे यांनी दिली आहे.

-*-*-*-*-*-*-

औरंगाबाद विभाग शिक्षक मतदार संघ निवडणूकीच्या मतदानासाठी जालना जिल्ह्यात 15 मतदान केंद्र


 

जालना, दि. 29 (जिमाका) --- औरंगाबाद विभाग शिक्षक मतदार संघ निवडणूकीच्या मतदानासाठी जालना जिल्ह्यात एकुण 15 मतदान केंद्र  आहेत. मतदान केंद्र ही महसूल मंडळनिहाय असून जिल्ह्यात मतदान केंद्र क्र.51 ते 65 या क्रमांकाची राहणार आहेत.

            मतदान केंद्रांचा सविस्तर तपशील पुढील प्रमाणे आहे.  मतदान केंद्र क्र. 51 - जालना शहरात रेल्वेस्टेशन रोडवरील जिल्हा परिषद माध्यमिक शाळा उत्तर बाजू खोली क्र. 2  येथे शिक्षक मतदार यादी भाग क्र. 66 अंतर्गत समाविष्ट गावे जालना शहर महसूल मंडळातील राहतील.

मतदान केंद्र क्र. 52 -  जालना शहरात रेल्वे स्टेशन रोडवरील जिल्हा परिषद (मुलांची) प्रशाला सभागृह  येथे शिक्षक मतदार यादी भाग क्र. 66 अंतर्गत समाविष्ट गावे जालना शहर महसूल मंडळातील राहतील. 

मतदान केंद्र क्र. 53  इंदेवाडी येथील जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळा, इंदेवाडी शाळा क्र.1 येथे शिक्षक मतदार यादी भाग क्र. 67 अंतर्गत समाविष्ट गावे जालना ग्रामीण महसूल मंडळातील तर शिक्षक मतदार यादी भाग क्र.73 अंतर्गत समाविष्ट गावे वाघ्रुळ जहांगिर महसूल मंडळातील राहतील.

मतदान केंद्र क्र.54-   रामनगर येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा पुर्व बाजूस अंतर्गत समाविष्ट गावे रामनगर महसूल मंडळातील तसेच शिक्षक मतदार यादी भाग क्र. 68 अंतर्गत गावे पाचनवडगाव महसूल मंडळातील राहतील.तर भाग क्र. 69 अंतर्गत रामनगर महसूल मंडळातील गावे राहतील.

 मतदान केंद्र क्र.55 - नेर जिल्हा परिषद हायस्कुल खोली क्र.1 येथे शिक्षक मतदार यादी भाग क्र.70 अंतर्गत समाविष्ट गावे विरेगाव महसूल मंडळातील व शिक्षक मतदार यादी भाग क्र.71 अंतर्गत नेर महसूल मंडळातील आणि शिक्षक मतदार यादी भाग क्र.72 अंतर्गत समाविष्ट गावे सेवली महसूल मंडळातील राहतील. 

मतदान केंद्र क्र.56 - बदनापूर शहरात जिल्हा परिषद हायस्कुल उत्तर बाजुस खोली क्र. 1 येथे शिक्षक मतदार यादी भाग क्र.74 अंतर्गत समाविष्ट गावे बदनापूर महसूल मंडळातील व शिक्षक मतदार यादी भाग क्र.75 अंतर्गत समाविष्ट गावे रोशनगाव महसूल मंडळातील आणि शिक्षक मतदार यादी भाग क्र.76 अंतर्गत समाविष्ट गावे सेलगांव महसूल मंडळातील तसेच शिक्षक मतदार यादी भाग क्र.77 अंतर्गत समाविष्ट गावे बावणेपांगरी महसूल मंडळातील तर शिक्षक मतदार यादी भाग क्र.78 अंतर्गत समाविष्ट गावे दाभाडी महसूल मंडळातील राहतील. 

मतदान केंद्र क्र.57 - भोकरदन येथील जिल्हा परिषद हायस्कुल येथे शिक्षक मतदार यादी भाग क्र.79 अंतर्गत समाविष्ट गावे भोकरदन महसूल मंडळातील तर शिक्षक मतदार यादी भाग क्र. 80 अंतर्गत समाविष्ट गावे हसनाबाद महसूल मंडळातील तसेच शिक्षक मतदार यादी भाग क्र.81 अंतर्गत समाविष्ट गावे सिपोरा बाजार महसूल मंडळातील व शिक्षक मतदार यादी भाग क्र.83 अंतर्गत समाविष्ट गावे धावडा महसूल मंडळातील, शिक्षक मतदार यादी भाग क्र.85 अंतर्गत समाविष्ट गावे केदारखेडा महसूल मंडळातील आणि शिक्षक मतदार यादी भाग क्र.86 अंतर्गत समाविष्ट गावे आन्वा महसूल मंडळातील  राहतील. 

मतदान केंद्र क्र.58 - पिंपळगाव रेणूकाई येथील जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेत खोली क्र.1 मध्ये शिक्षक मतदार यादी भाग क्र. 82 अंतर्गत समाविष्ट गावे पिंपळगाव रेणूकाई महसूल मंडळातील राहतील. 

मतदान केंद्र क्र.59 - राजूर येथील जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेतील खोली क्र.1 मध्ये  शिक्षक मतदार यादी भाग क्र. 84 अंतर्गत समाविष्ट गावे राजूर महसूल मंडळातील राहतील. 

मतदान केंद्र क्र.60 - जाफ्राबाद येथील जिल्हा परिषद हायस्कुलमध्ये  दक्षिणेकडील खोली क्र.1 येथे शिक्षक मतदार यादी भाग क्र. 87 अंतर्गत समाविष्ट गावे जाफ्राबाद महसूल मंडळातील व शिक्षक मतदार यादी भाग क्र.88 अंतर्गत समाविष्ट गावे माहोरा महसूल मंडळातील तर शिक्षक मतदार यादी भाग क्र.89 अंतर्गत समाविष्ट गावे वरुड बु. महसूल मंडळातील तसेच शिक्षक मतदार यादी भाग क्र. 90 अंतर्गत समाविष्ट गावे कुंभारझरी महसूल मंडळातील आणि शिक्षक मतदार यादी भाग क्र. 91 अंतर्गत समाविष्ट गावे  टेंभूर्णी महसूल मंडळातील राहतील. 

मतदान केंद्र क्र.61 - अंबड  येथील जिल्हा परिषद हायस्कुलमध्ये  पुर्वेकडील खोली येथे शिक्षक मतदार यादी भाग क्र.101 अंतर्गत समाविष्ट गावे अंबड महसूल मंडळातील व  शिक्षक मतदार यादी भाग क्र.102 अंतर्गत समाविष्ट गावे जामखेड महसूल मंडळातील व   शिक्षक मतदार यादी भाग क्र. 103 अंतर्गत समाविष्ट गावे धनगर पिंपरी महसूल मंडळातील तसेच व  शिक्षक मतदार यादी भाग क्र. 104 अंतर्गत समाविष्ट गावे राहिलागड महसूल मंडळातील राहतील.

मतदान केंद्र क्र.62 - अंबड  येथील जिल्हा परिषद शाळेत शिक्षक मतदार यादी भाग क्र.105 अंतर्गत समाविष्ट गावे वडीगोद्री  महसूल मंडळातील व  शिक्षक मतदार यादी भाग क्र. 106 अंतर्गत समाविष्ट गावे गोंदी महसूल मंडळातील आणि शिक्षक मतदार यादी भाग क्र. 107 अंतर्गत समाविष्ट गावे सुखापूरी  महसूल मंडळातील राहतील.

मतदान केंद्र क्र.63 - घनसावंगी येथे नगरपंचायत कार्यालय खोली क्र.1 येथे शिक्षक मतदार यादी भाग क्र.108 अंतर्गत समाविष्ट गावे घनसावंगी महसूल मंडळातील, शिक्षक मतदार यादी भाग क्र.109 अंतर्गत समाविष्ट गावे कुंभार पिंपळगाव महसूल मंडळातील, शिक्षक मतदार यादी भाग क्र.110 अंतर्गत समाविष्ट गावे तिर्थपुरी महसूल मंडळातील, शिक्षक मतदार यादी भाग क्र.111 अंतर्गत समाविष्ट गावे अंतरवाली टेंभी महसूल मंडळातील, शिक्षक मतदार यादी भाग क्र.112 अंतर्गत समाविष्ट गावे जांबसमर्थ महसूल मंडळातील, शिक्षक मतदार यादी भाग क्र.113 अंतर्गत समाविष्ट गावे राणी उंचेगाव महसूल मंडळातील आणि शिक्षक मतदार यादी भाग क्र.114 अंतर्गत समाविष्ट गावे रांजणी महसूल मंडळातील राहतील.

मतदान केंद्र क्र.64 - परतूर येथील जिल्हा परिषद प्रशालेतील उत्तरेकडील बाजुस शिक्षक मतदार यादी भाग क्र.92 अंतर्गत समाविष्ट गावे आष्टी महसूल मंडळातील, शिक्षक मतदार यादी भाग क्र. 93 अंतर्गत समाविष्ट गावे सातोना खुर्द महसूल मंडळातील, शिक्षक मतदार यादी भाग क्र.94 अंतर्गत समाविष्ट गावे श्रीष्टी महसूल मंडळातील, शिक्षक मतदार यादी भाग क्र. 95 अंतर्गत समाविष्ट गावे परतूर महसूल मंडळातील तसेच शिक्षक मतदार यादी भाग क्र.96 अंतर्गत समाविष्ट गावे वाटुर महसूल मंडळातील राहतील.

मतदान केंद्र क्र.65 - मंठा येथील जिल्हा परिषद प्रशालेतील पुर्वेकडील खोलीत शिक्षक मतदार यादी भाग क्र.97 अंतर्गत समाविष्ट गावे मंठा महसूल मंडळातील, शिक्षक मतदार यादी भाग क्र.98 अंतर्गत समाविष्ट गावे ढोकसाळ महसूल मंडळातील, शिक्षक मतदार यादी भाग क्र.99 अंतर्गत समाविष्ट गावे तळणी महसूल मंडळातील आणि शिक्षक मतदार यादी भाग क्र.100 अंतर्गत समाविष्ट गावे पांगरी गोसावी महसूल मंडळातील राहतील. असे सहायक मतदार नोंदणी अधिकारी, 05-औरंगाबाद विभाग शिक्षक मतदारसंघ तथा जिल्हाधिकारी, जालना यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे कळविले आहे.

-*-*-*-*-*-*-*-


औरंगाबाद विभाग शिक्षक मतदारसंघ निवडणूक मतदार ओळखपत्राच्या व्यतिरिक्त 10 कागदपत्रे पुरावा म्हणून ग्राह्य

 


जालना,दि.29, (जिमाका) :- औरंगाबाद विभाग शिक्षक मतदार संघ निवडणुकीचे मतदान 30 जानेवारी,2023 रोजी होणार आहे. ज्या मतदारांना निवडणूक आयोगाकडून ओळखपत्र देण्यात आले आहे त्यांनी ते सादर करणे आवश्यक आहे. मतदान केंद्रांवर मतदारांची ओळख पटविण्यासाठी जे मतदार ओळखपत्र (EPIC) सादर करु शकत नाहीत, अशा मतदारांना त्यांची ओळख पटविण्यासाठी मतदार ओळखपत्राच्या (EPIC) व्यतिरिक्त 10 कागदपत्रे पुरावा म्हणून ग्राह्य असल्याचे निवडणूक आयोगाने कळविले आहे.

हे पुरावे असणार ग्राह्य

1) आधार कार्ड 2) वाहन चालक परवाना 3) पॅन कार्ड 4) भारतीय पारपत्र 5) केंद्र/राज्य शासन / सार्वजनिक उपक्रम/पब्लिक लिमिटेड कंपन्यांनी वितरीत केलेले फोटोसह सेवा ओळखपत्र 6) खासदार/आमदार यांचे अधिकृत ओळखपत्र 7) संबंधित शिक्षक मतदारसंघातील शिक्षण संस्थेत कार्यरत असलेल्या मतदारांना वितरीत केलेले सेवा ओळखपत्र 8) विद्यापीठाद्वारे वितरित पदवी/पदवीका मुळ प्रमाणपत्र 9) सक्षम प्राधिकरणाद्वारे वितरीत केलेले दिव्यांगत्वाचे  मुळ प्रमाणपत्र 10) भारत सरकारच्या सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण मंत्रालयाने वितरीत केलेले युनिक डिसॅबिलीटी ओळखपत्र इत्यादी कागदपत्रे पुरावा म्हणून ग्राह्य धरण्याबाबत निवडणूक आयोगाने कळविले आहे.

-*-*-*-*-*-*-*-

Friday 27 January 2023

औरंगाबाद विभाग शिक्षक मतदार संघ निवडणूक मत कसे नोंदवावे याबाबत मतदारांसाठी सूचना दि. 30 जानेवारी रोजी मतदान

 


जालना, दि. 27 (जिमाका) :- 05- औरंगाबाद विभाग शिक्षक मतदार संघाच्या व्दिवार्षिक निवडणूक कार्यक्रमानुसार दि. 30 जानेवारी 2023 रोजी मतदान प्रक्रिया पार पडणार आहे. या निवडणुकीसाठी मतदान प्रक्रिया ही इतर निवडणुकीपेक्षा वेगळी आहे. या निवडणुकीत मतपत्रिकेवर मतदान होणार आहे. मतदाराला मतदान हे पसंती क्रमांकानुसार करावयाचे आहे. मतदान करताना आयोगाने उपलब्ध करून दिलेल्या जांभळ्या रंगाच्या स्केच पेनचाच वापर करणे मतदारांना बंधनकारक आहे. त्यामुळे औरंगाबाद विभाग शिक्षक मतदार संघाच्या निवडणूकीत मतदान करणाऱ्या मतदारांनी मतदान प्रक्रीयेच्या सर्व नियम व अटी जाणून घ्याव्यात, अशी सूचना सहायक निवडणूक निर्णय अधिकारी तथा उप आयुक्त (सामान्य प्रशासन) विभागीय आयुक्त कार्यालय, औरंगाबाद यांनी दिली आहे.

औरंगाबाद विभाग शिक्षक मतदारसंघातून महाराष्ट्र विधान परिषदेसाठी व्दिवार्षिक निवडणूकीत आपले मत कसे नोंदवावे याबाबत मतदारांसाठी सुचना खालीलप्रमाणे देण्यात आलेल्या आहेत.

(1) मतदान करण्यासाठी केवळ मतपत्रिकेसोबत पुरविलेला जांभळ्या रंगाचा स्केचपेनचाच वापर करावा. याशिवाय इतर कुठलेही पेन, पेन्सिल, बॉलपॉईंट पेन यांचा वापर करू नये.

(2) ज्या उमेदवारास तुम्ही पहिला पसंतीक्रम देण्यासाठी निवडले आहे, त्या उमेदवाराच्या नावासमोरील पसंतीक्रम (Order of Preference) असे नमूद केलेल्या रकान्यात "1" हा अंक नमूद करुन मतदान करावे.

(3) निवडून द्यावयाच्या उमेदवारांची संख्या एका पेक्षा जास्त असेल तरी "1" हा अंक केवळ एकाच उमेदवाराच्या नावासमोर नमूद करावा.

(4) निवडून द्यावयाच्या उमेदवारांची संख्या कितीही असली तरी तुम्हाला जेवढे उमेदवार निवडणूक लढवित

आहेत, तेवढे पसंतीक्रम नोंदविता येतील.

 (5) उर्वरित उमेदवारांच्या नावासमोर तुमचा पुढील पसंतीक्रम 2, 3, 4 इत्यादी अंक तुमच्या पसंतीक्रमानुसार

"पसंतीक्रम (Order of Preference) या स्तंभामध्ये दर्शवा.

 (6) कोणत्याही उमेदवारांच्या नावासमोर केवळ एकच अंक नमूद करावा. एकच अंक एका पेक्षा जास्त उमेदवारांच्या नावासमोर नमुद करू नये.

(7) पसंतीक्रम हा केवळ अंकात दर्शविला जाईल. उदा. 1,2,3 इत्यादी आणि तो एक, दोन, तीन, इत्यादी असा शब्दात दर्शवू नये.

(8) अंक हे भारतीय आंतरराष्ट्रीय अंक स्वरुपात जसे १,२,३, इत्यादी किंवा रोमन स्वरुपातील I, II, III इत्यादी किंवा संविधानाच्या ८ व्या अनुसुचितील भारतीय भाषेतील अंकाच्या स्वरुपात नोंदविता येतील.

(9) मतपत्रिकेवर तुमची स्वाक्षरी किंवा आद्याक्षरे किंवा नाव किंवा कोणतेही शब्द नमूद करू नये. तसेच अंगठ्याचा ठसा उमटवू नये.

(10) तुमचा पसंतीक्रम दर्शविण्यासाठी मतपत्रिकेवर उमेदवाराच्या नावासमोर (/) किंवा (X) अशी खुण करू नये. अशी मतपत्रिका बाद ठरेल.

(11) तुमची मतपत्रिका वैध ठरण्यासाठी उमेदवारांपैकी एकाच्या नावासमोर "1" हा अंक नमूद करून तुमचा

पहिला पसंतीक्रम दर्शविणे आवश्यक आहे.  इतर पसंतीक्रम हे ऐच्छिक स्वरुपाचे असून ते अनिवार्य नाहीत.

-*-*-*-*-

जिल्ह्यात कलम 37 (1) अन्वये 28 जानेवारीपासून प्रतिबंधात्मक आदेश लागू

 


 जालना, दि. 27 (जिमाका) :- औरंगाबाद शिक्षक मतदारसंघ निवडणूक मतदान प्रक्रिया दि.30 जानेवारी 2023 रोजी जिल्ह्यातील 15 केंद्रावर होणार आहे. तसेच  9 फेब्रुवारी रोजी संकष्ट चतुर्थी असल्याने राजूरा, माळाचा गणपती व मावा पाटोदा येथील गणपती मंदीरात भाविकांची दर्शनासाठी गर्दी होते. या पार्श्वभूमीवर कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी जालना जिल्ह्याच्या संपूर्ण हद्दीत महाराष्ट्र पोलीस अधिनियम 1951 च्या कलम 37 (1) अन्वये दि. 28 जानेवारी 2023 रोजीचे 6 वाजेपासून ते दि.10 फेब्रुवारी 2023 रोजीच्या 24.00 वाजेपर्यंत प्रतिबंधात्मक आदेश  अपर जिल्हादंडाधिकारी केशव नेटके यांनी जारी केले आहेत.

         या आदेशान्वये शासकीय कर्तव्य पार पाडणाऱ्या कर्मचाऱ्यांव्यतिरीक्त अन्य कोणत्याही व्यक्तिस सार्वजनिक ठिकाणी किंवा त्याच्या जवळपास खालीलप्रमाणे गोष्टी करण्यास मनाई करण्यात आली आहे. शस्त्रे, लाठ्या, सोटे, बंदूक, तलवार, भाले चाकु व इतर शरिरास इजा अथवा अपाय करणाऱ्या वस्तु जवळ  बाळगता येणार नाही. तीक्ष्ण पदार्थ अथवा स्फोटके सहज हाताळता येतील अशी घातक वस्तु जवळ बाळगता येणार नाही. दगड किंवा इतर उपकरणे किंवा प्रवर्तक शस्त्र गोळा करुन ठेवता किंवा जवळ बाळगता येणार नाहीत  व्यक्तीच्या किंवा समुहाच्या भावना जाणूनबजून दुखविण्याच्या उद्देशाने असभ्यतेची भाषणे, वाद्य वाजविणे, गाणी म्हणता येणार नाही. व्यक्तीचे किंवा शवांचे किंवा त्याच्या प्रतिकृतीचे प्रदर्शन करणार नाही.  आवेशी भाषणे, अंगविक्षेपण, विडंबनात्मक नकला करता येणार नाहीत. आणि सभ्यता, नीतीमत्ता यास बाधा येईल किंवा ज्यामुळे राज्याची सुरक्षितता धोक्यात येईल किंवा अराजकता माजेल, अशी चित्रे, निशाणी, घोषणा पत्रे किंवा इतर कोणत्याही वस्तु जवळ बाळगता येणार नाही. हा आदेश संपूर्ण जालना जिल्ह्याच्या हद्दीत दि. 28 जानेवारी 2023 रोजीचे 6 वाजेपासून ते दि.10 फेब्रुवारी 2023 रोजीच्या 24.00 वाजेपर्यंत लागू राहील,  असे आदेशात नमूद करण्यात आले आहे.

-*-*-*-*-

महाराष्ट्र पोलीस अधिनियम 1951 चे कलम 37 (3) अन्वये मनाई आदेश जारी

 


जालना, दि. 27 (जिमाका) :- 5-औरंगाबाद शिक्षक मतदार संघ निवडणूक मतदान प्रक्रिया   दि.30 जानेवारी 2023 रोजी जालना जिल्ह्यातील पंधरा (15) मतदान केंद्रावर होणार आहे. तसेच दि. 9 फेब्रुवारी  रोजी संकष्ट चतुर्थी असल्याने राजूर, माळाचा गणपती व मावा पाटोदा येथील गणपती मंदिरात भाविकांची दर्शनासाठी मोठ्या प्रमाणात गर्दी होत असते. या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र पोलीस अधिनियम 1951 चे कलम 37 (3) अन्वये अधिकाराचा वापर करुन पाच किंवा अधिक व्यक्तींना जमण्यास किंवा सभा, मिरवणुका, मोर्चा काढण्यास मनाई करण्यात येत असल्याचे आदेश अपर जिल्हादंडाधिकारी केशव नेटके यांनी जारी केले आहेत. हा आदेश संपूर्ण जालना जिल्ह्यासाठी दि. 28 जानेवारी 2023 रोजीचे 6 वाजेपासून ते दि.10 फेब्रुवारी 2023 रोजीच्या 24.00 वाजेपर्यंत लागू राहील,  असे आदेशात नमूद करण्यात आले आहे.

सध्या महाराष्ट्रात राजकीयदृष्ट्या सत्ताधारी व विरोधकात एकमेकांविरुध्द विविध कारणावरुन आरोप प्रत्यारोप सुरु आहे. तसेच मराठा आरक्षण मिळावे या मागणीसाठी व शेतक-यांचे विविध मागण्यांसाठी विविध संघटनांकडून आत्मदहन, उपोषण, धरणे, मोर्चे, निदर्शने, रास्तारोको इत्यादी सर्व प्रकारची आंदोलनात्मक कार्यक्रम घेण्याची शक्यता नाकारता येत नाहीत. हा आदेश कामावरील कोणताही अधिकारी किंवा कर्मचारी यांना लागू होणार नाही. तसेच विवाह, अंत्ययात्रा आणि पोलीस अधिक्षक जालना व उपविभागातील पोलीस अधिकारी जालना, अंबड, परतुर, भोकरदन यांनी विशेषरित्या परवानगी दिलेल्या मिरवणूका, सभा, मोर्चा यांना लागू होणार नाही. असेही आदेशात नमूद करण्यात आले आहे.

-*-*-*-*-

शेतजमिनीचा वाद मिटविण्यासाठी शेतकऱ्यांच्या फायद्याची ‘सलोखा योजना’

 


जालना, दि. 27 (जिमाका) :- शेतजमिनीचा ताबा व वहिवाटीबाबत शेतक-यांतील आपआपसातील वाद मिटविण्यासाठी व समाजामध्ये सलोखा निर्माण होऊन एकमेकांमधील सौख्य व सौहार्द वाढीस लागण्यासाठी एका शेतकऱ्याच्या शेतजमिनीचा ताबा  दुस-या शेतक-याकडे व दुस-या शेतक-याच्या नावावरील शेतजमिनीचा ताबा पहिल्या शेतक-याकडे असणा-या शेतजमीनधारकांचे अदलाबदल दस्तांसाठी मुद्रांक शुल्क नाममात्र रु. 1000/- व नोंदणी फी नाममात्र रु. 1000/- आकारण्याबाबत सवलत देण्याची "सलोखा योजना राबविण्यास शासनाने मान्यता दिली आहे. तरी सर्व संबंधित शेतकऱ्यांनी  सलोखा योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. विजय राठोड यांनी केले आहे.

महाराष्ट्रामध्ये किंबहुना देशामध्ये जमिनीच्या वादाबाबतची कोट्यवधी प्रकरणे विविध न्यायालयांमध्ये वर्षानुवर्षे प्रलंबित आहेत. त्यामध्ये मुख्यतः मालकी हक्काबाबतचे वाद, शेत बांधावरून होणारे वाद, जमिनीच्या ताब्याबाबतचे वाद, रस्त्याचे वाद, शेतजमीन मोजणीवरून होणारे वाद, अधिकार अभिलेखातील चुकीच्या नोंदीमुळे होणारे वाद, शेतीवरील अतिक्रमणावरून होणारे वाद, शेती वहीवाटीचे वाद, भावाभावांतील वाटणीचे वाद, शासकीय योजनेतील त्रुटी किंवा प्रस्ताव अमान्यतेबाबतचे वाद इत्यादी कारणांमुळे शेतजमिनीचे वाद समाजामध्ये आहेत.

शेतजमीन हा प्रत्येकाचा जिव्हाळ्याचा व संवेदनशील विषय असल्यामुळे त्यातील वादांमुळे कौटुंबिक नात्यामध्ये एकमेकांबद्दल असंतोषाची भावना व दुरावा निर्माण झालेला आहे. हा वाद संपुष्ठात येऊन समाजामध्ये सलोखा निर्माण व्हावा व एकमेकांतीला सौख्य, शांतता व सौहार्द वाढीस लागावे यासाठी शासनाने अशा एका शेतक-याच्या नावावरील शेतजमिनीचा ताबा दुस-या शेतकऱ्याकडे व दुस-या शेतक-याच्या नावावरील शेतजमिनीचा ताबा पहिल्या शेतक-याकडे असणा-या शेतजमीनधारकांचे अदलाबदल दस्तांसाठी नोंदणी फी व मुद्रांक शुल्कामध्ये सवलत देण्याकरिता शासनाने "सलोखा योजना" जाहीर केली आहे.

सदरील योजनेच्या अटी व शर्ती आणि या योजनेमुळे शासन, शेतकरी व समाजाचे होणारे फायदे शासन निर्णय क्रमांक : मुद्रांक-2022/प्र.क्र.93/म-1 (धोरण), दि. 3 जानेवारी, 2023 मध्ये सविस्तर वर्णित करण्यात आले आहे. हा  शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध असून त्याचा संगणक संकेतांक 202301031130576019 असा आहे.

-*-*-*-*-

 

 

 

 

 

 

 

 

 

 

Wednesday 25 January 2023

प्रजासत्ताक दिनानिमित्त जालना येथे पालकमंत्री अतुल सावे यांच्या हस्ते मुख्य शासकीय ध्वजारोहण संपन्न

 








        जालना, दि. 26 (जिमाका) :-     भारतीय प्रजासत्ताक दिनाच्या 73 व्या वर्धापन दिनानिमित्त जालना येथील पोलीस मुख्यालयाच्या मैदानावर मुख्य शासकीय ध्वजारोहण राज्याचे सहकार, इतर मागास बहुजन कल्याण मंत्री तथा जालना जिल्ह्याचे पालकमंत्री अतुल सावे यांच्या हस्ते आज संपन्न झाले.

यावेळी आमदार राजेश टोपे, आमदार नारायण कुचे, जिल्हाधिकारी डॉ. विजय राठोड , जिल्हा पोलीस अधिक्षक डॉ. अक्षय शिंदे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी वर्षा मीना, अप्पर जिल्हाधिकारी अंकुश पिनाटे, निवासी उपजिल्हाधिकारी केशव नेटके, उप विभागीय अधिकारी संदीपान सानप आदींसह  स्वातंत्र्य सैनिक, अधिकारी, कर्मचारी, विद्यार्थी, नागरिक, पत्रकार यांची प्रमुख उपस्थिती होती.

 पालकमंत्री अतुल सावे हे आपल्या शुभेच्छा संदेशात  म्हणाले की, 15 ऑगस्ट, 1947 रोजी आपला देश स्वतंत्र झाला. या स्वतंत्र देशाची राज्यघटना तयार करण्याचे महान कार्य घटनाकार भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी केले.   26 जानेवारी, 1950 रोजी भारत देश प्रजासत्ताक झाला आणि अंतिम सत्ता प्रजेच्या हाती सोपविण्यात आली.  आपला भारत हा एक मोठा लोकशाही देश आहे. ज्या देशाची सर्व सत्ता प्रजेच्या हाती असते, तो देश म्हणजे प्रजासत्ताक होय. भारतीय राज्यघटनेमुळे लोकांना आपले हक्क आणि कर्तव्य यांची जाणीव झाली. भारताचे स्वातंत्र्य अबाधित ठेवणे, भारतीय संविधानाचे पालन करणे ही आपली सर्वांची सामुदायिक जबाबदारी आहे.  नागरिकांना त्यांचे मूलभूत हक्क व अधिकार बहाल करुन त्यांच्या व्यक्तीगत सन्मानाचे व जिवीताचे रक्षण करण्याचे अभिवचन संविधानाने भारतीय जनतेस दिले आहे.   भारतात जनहितकारी, कल्याणकारी व धर्मनिरपेक्ष राज्यव्यवस्था राबविली जाईल असेही अभिवचन संविधानात देण्यात आले आहे. जगातील सर्वात मोठा सार्वभौम लोकशाही देश म्हणून भारताकडे पाहिले जाते.

आपल्या देशाच्या स्वातंत्र्यासाठी अनेक क्रांतिकारकांनी आपल्या जीवाचीही पर्वा केली नाही त्या शूरवीरांना आपण वंदन करूयात. इंग्रजांची जुलमी राजवट संपवण्यासाठी स्वातंत्र्य सैनिकांनी केलेला त्याग, देशासाठी आपले सर्वस्व ओवाळून दिलेली प्राणाची आहूती यांचे कायम स्मरण आपणाला राहिले पाहिजे, असे सांगून पालकमंत्री म्हणाले की, आज देशाच्या सीमेवर अनेक सैनिक अहोरात्र मातृभूमीच्या सेवेसाठी सज्ज आहेत. त्यांचा आपण सन्मान करुयात.  आपल्या संविधानातील स्वातंत्र्य, समता, बंधुता आणि न्याय ही मूल्येही लक्षात ठेवूयात आणि ही मूल्ये आपल्या दैनंदिन जीवनात समाविष्ट करण्याचा प्रयत्न करूयात.

            प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने आवाहन करताना पालकमंत्री पुढे म्हणाले की,   जात, धर्म, वंश, लिंग हे सर्व भेदभाव विसरुन एक समानतेने सर्वांना समान संधी मिळवून देण्यासाठी अग्रेसर राहावे. आपल्या देशाच्या समर्थ उभारणीमध्ये युवकांचा मोठा वाटा आहे.  इंटरनेट आणि स्मार्ट फोनच्या या आधुनिक युगात आपली युवा पिढी यासाठी अधिक अग्रेसर राहील, अशी अपेक्षा आहे.  तुम्ही-आम्ही आपण सर्वजण मिळून प्रयत्न केल्यास सामाजिक जीवनमान उंचावण्याबरोबरच आपल्या देशाला सामर्थ्यशाली महासत्ता बनवू शकतो.

यावेळी पालकमंत्री यांनी परेडचे निरीक्षण केले. परेडमध्ये पोलीस दल, राज्य राखीव पोलीस बल गट, महिला पोलीस दल, श्वानपथक, होमगार्ड पथक, बँडपथक, महिला सुरक्षा दामिनी पथक, दंगल नियंत्रण पथक, एनसीसी, स्काऊट गाइड पथक, अग्नीशामक दलासह विविध विभागाच्या चित्ररथांचा समावेश होता. यावेळी उत्कृष्ट कार्य केल्याबद्दल अधिकारी, कर्मचाऱ्यांचा पालकमंत्री यांच्या हस्ते प्रशस्तीपत्र देऊन गौरव करण्यात आला.  आंतरराष्ट्रीय पौष्टीक तृणधान्य वर्षानिमित्त कृषी विभागाच्यावतीने विविध तृणधान्यांच्या माध्यमातून तयार करण्यात आलेल्या रांगोळीची यावेळी पालकमंत्री यांनी पाहण केली. यावेळी विविध शाळेच्या विद्यार्थ्यांनी देशभक्तीपर गीतांवर सामुहिक नृत्य सादर केले. सूत्रसंचलन संजय कायंदे यांनी केले.

     

-*-*-*-*-*- 

जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रांगणात जिल्हाधिकारी डॉ. विजय राठोड यांच्या हस्ते ध्वजारोहण संपन्न


 


 

जालना, दि. 26 (जिमाका) :-     प्रजासत्ताक दिनाच्या 73 व्या वर्धापन दिनानिमित्त जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रांगणात जिल्हाधिकारी डॉ. विजय राठोड यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. ध्वजारोहण कार्यक्रमानंतर भारताच्या संविधान उद्देशिकेचे सामुहिक वाचन करण्यात आले.

            यावेळी अप्पर जिल्हाधिकारी अंकुश पिनाटे, निवासी उपजिल्हाधिकारी केशव नेटके, उपविभागीय अधिकारी संदीपान सानप, उपजिल्हाधिकारी (रोहयो) रवींद्र परळीकर, उपजिल्हाधिकारी अंजली कानडे, उपजिल्हाधिकारी अर्चना भोसले उपजिल्हाधिकारी गणेश निऱ्हाळी, उप जिल्हा निवडणुक अधिकारी डॉ. ज्ञानोबा बानापुरे यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.

                                                           

-*-*-*-*-*-

प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने जिल्हा व सत्र न्यायालयात ध्वजारोहण

 

    

 

जालना, दि. 26 (जिमाका) :-     प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने आज जालना जिल्हा व सत्र न्यायालयात प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश श्रीमती वर्षा मोहिते यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. तत्पूर्वी जालना तालुका दिवाणी व फौजदारी न्यायालयात वरिष्ठ स्तर दिवाणी न्यायाधीश एन.एल. येवलेकर यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी जिल्हा व सत्र न्यायाधीश एस. आर. तांबोळी, जिल्हा वकील संघाचे अध्यक्ष ॲड.रामेश्वर गव्हाणे, उपाध्यक्ष ॲड. परमेश्वर गडगिळे, जिल्हा सरकारी अभियोक्ता ॲड.बाबासाहेब इंगळे, सहाय्यक जिल्हा सरकारी अभियोक्ता ॲड.जयश्री बोराडे, ॲड. वाल्मिक घुगे,ॲड. भारत खांडेकर, ॲड. अशोक मते, ॲड. शोभा विजयसेनानी, ॲड. अरविंद मुरमे, ॲड. विनायकराव चिटणीस, ॲड. सतीश तवरावाला, ॲड. सत्यकुमार करंडे, ॲड. रोहित बनवस्कर, ॲड. लक्ष्मण उढाण, ॲड. जी.एन. ढवळे आदिंसह सर्व न्यायिक अधिकारी, जिल्हा वकील संघाचे सदस्य, न्यायालयीन कर्मचारी आदींची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.

-*-*-*-*-*-

राष्ट्रीय मतदार दिन उत्साहात संपन्न लोकशाहीच्या सक्षमीकरणासाठी नवमतदारांनी मतदार नोंदणी अवश्य करावी - निवासी उपजिल्हाधिकारी केशव नेटके रॅलीच्या माध्यमातून मतदान व मतदार नोंदणीबाबत जनजागृती

 

 

 जालना,दि. 25 (जिमाका) :- भारत निवडणूक आयोगाने वर्षातून चार वेळा नवमतदारांना नाव नोंदणीची संधी उपलब्ध करुन दिली आहे. तरी राष्ट्रीय मतदार दिनाचे औचित्य साध्य होण्यासाठी तसेच लोकशाहीच्या सक्षमीकरणासाठी नवमतदारांनी मतदार नोंदणी अवश्य करावी, असे आवाहन निवासी उपजिल्हाधिकारी केशव नेटके यांनी केले.

राष्ट्रीय मतदार ‍दिनानिमित्त बुधवार दि. 25 जानेवारी 2023 रोजी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या परिसरात कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते, याप्रसंगी ते बोलत होते. यावेळी उपजिल्हाधिकारी गणेश निऱ्हाळी,  उपजिल्हा निवडणूक अधिकारी डॉ. ज्ञानोबा बानापुरे, उपविभागीय अधिकारी संदिपान सानप, तहसिलदार श्रीकांत भुजबळ, रमेश पुलोद, उपशिक्षणाधिकारी विपुल भागवत, विनया वडजे, दिव्यांग आयकॉन निलेश मदारे यांची प्रमुख उपस्थिती होती.

दरवर्षी राष्ट्रीय मतदार दिन 25 जानेवारी रोजी साजरा करण्यात येतो, असे सांगून  निवासी उपजिल्हाधिकारी श्री. नेटके म्हणाले की, सर्व विद्यार्थ्यांनी  आपल्या वयाचे अठरा वर्षे पूर्ण होताच आपले नाव मतदार यादीत नोंदवावे. भारत निवडणूक आयोगाने मतदार नोंदणीसाठी ऑनलाईन व ऑफलाईन हे दोन्ही पर्याय ठेवले आहेत. आपणास अनुरुप अशा कोणत्याही प्रकारे आपली नोंदणी करु शकता. या वर्षाची थीम 'मतदाना इतके अमूल्य नसे काही, बजावू हमखास मताधिकार आम्ही' असे असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.

प्रास्ताविकात डॉ. ज्ञानोबा बाणापूरे यांनी   राष्ट्रीय मतदार ‍दिनाच्या अनुषंगाने आपण सर्व नवमतदारांना मतदार म्हणून आपले नाव नोंदणी करण्यासाठी आवाहन करत असतो. तसेच शाळा व महाविद्यालयांत विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात येते. लोकशाहीचे भवितव्य हे नवमतदारांवर अवलंबुन असल्याचेही त्यांनी सांगितले. तसेच उपस्थित सर्वांना राष्ट्रीय मतदार दिनाची प्रतिज्ञा दिली.

दिव्यांग आयकॉन निकेश मदारे म्हणाले की,  भारत हा लोकशाही प्रधान देश आहे. मतदानाच्या प्रक्रियेत सर्वांना सामिल होता यावे या भावनेतून भारत निवडणूक आयोगाने दिव्यांगाना नोंदणीपासून ते मतदान करेपर्यंत उपयुक्त अशा सुविधा उपलब्ध करुन दिल्या आहेत. देशात मतदानाचा टक्का दिवसेंदिवस वाढत चालला असून प्रत्येकाने नावनोंदणी करुन मतदानाचा हक्क बजावावा, असे आवाहन त्यांनी यावेळी केले.

या कार्यक्रमात राष्ट्रीय मतदार दिनानिमित्त आयोजित निबंध लेखन, रांगोळी, घोषवाक्य, चित्रकला स्पर्धेतील प्रथम, द्वितीय आणि तृतीय  क्रमांक पटकावलेल्या विद्यार्थ्यांचा प्रमाणपत्र व स्मृतिचिन्ह देवून गौरवण्यात आले. तर मतदार नोंदणी व निवडणूक प्रक्रियेत उल्लेखनीय कार्य करणारे अधिकारी-कर्मचाऱ्यांचा प्रमाणपत्र देवून यथोचित सन्मान करण्यात आला. कार्यक्रमास विद्यार्थी, शिक्षक, अधिकारी-कर्मचारी यांच्यासह  नागरिकांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.

            दरम्यान, राष्ट्रीय मतदार दिनानिमित्त सकाळी शालेय विद्यार्थ्यांची रॅली गांधी चमन येथून काढण्यात आली. अपर जिल्हाधिकारी अकुंश पिनाटे यांनी रॅलीला हिरवी झेंडी दाखविली.  गांधी चमन ते टाऊन हॉल, शनि मंदीर, नुतन वसाहत मार्गे अंबड चौफुलीपासून  जिल्हाधिकारी कार्यालय येवून रॅलीचा समारोप झाला.  या रॅलीत जालना येथील ‍जिल्हा परिषद प्रशाला मुलांची शाळा, श्री. शिवाजी हायस्कुल, सरस्वती भुवन प्रशाला,  स्वामी विवेकानंद विद्यालय, उर्दु हायस्कुल आदी शाळांनी सहभाग नोंदविला. रॅलीतील विद्यार्थ्यांनी दिलेल्या  ''मतदार  राजा जागा हो, लोकशाहीचा धागा हो'' या घोषणेने जालना शहरासह जिल्हाधिकारी कार्यालय परिसर दणाणून गेला.

-*-*-*-*-

औरंगाबाद विभाग शिक्षक मतदारसंघ निवडणूक मद्यविक्री अनुज्ञप्ती बंदचे आदेश जारी

 


 

जालना,दि. 25 (जिमाका) :- औरंगाबाद विभाग शिक्षक मतदारसंघ निवडणूक-2023 चा निवडणूक कार्यक्रम घोषित झालेला आहे. दि. 30 जानेवारी 2023 रोजी मतदान होणार आहे. निवडणूक कालावधीत शांतता आणि कायदा व सुव्यवस्थेची परिस्थिती अबाधीत ठेवण्यासाठी लोकप्रतिनिधीत्व अधिनियम 1951 च्या कलम 135-सी तसेच मुंबई दारुबंदी कायदा 1949 चे कलम 142(1) अन्वये प्रदान करण्यात आलेल्या अधिकाराचा वापर करुन जालना जिल्ह्यातील सर्व ठोक व किरकोळ मद्यविक्रीच्या अनुज्ञप्ती बंद ठेवण्याचे आदेश जिल्हाधिकारी डॉ.विजय राठोड यांनी जारी केले आहेत.

आदेशात नमूद केल्याप्रमाणे जालना जिल्हयात मतदान संपण्यापुर्वीच्या 48 तास अगोदरपासून पूर्णवेळ म्हणजेच दि.28 जानेवारी 2023 रोजी सायंकाळी 4 वाजल्यापासून पुढे तसेच मतदानाच्या पुर्वीचा संपूर्ण दिवस दि.29 जानेवारी रोजी व मतदानाच्या दिवशी दि. 30 जानेवारी  रोजी संपूर्ण दिवस मद्यविक्री अनुज्ञप्त्या बंद ठेवण्यात याव्यात. मतमोजणी ही दि.2 फेब्रुवारी 2023 रोजी औरंगाबाद येथे होणार असल्याने या दिवशी कोरडा दिवस ठेवण्याची आवश्यकता नाही. या आदेशाचे पालन संबंधित अनुज्ञप्तीधारकांनी करावे. आदेश उल्लंघन करणाऱ्या अनुज्ञप्तीधारकाविरुध्द नियमानूसार कडक कारवाई करण्यात येईल, असे आदेशात नमुद केले आहे.

-*-*-*-*-

 

 

Tuesday 24 January 2023

राष्ट्रीय मतदार दिनानिमित्त 25 जानेवारी रोजी विविध कार्यक्रम - सकाळी 8 वाजता गांधी चमन येथून निघणार रॅली - सकाळी 9 वाजता जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रांगणात कार्यक्रम

 जालना,दि. 24 (जिमाका) :- राष्ट्रीय मतदार दिनानिमित्त बुधवार, दि. 25 जानेवारी 2023 रोजी जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी यांच्या कार्यालयाच्यावतीने विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.  

दि. 25 जानेवारी रोजी सकाळी 8.00 वाजता गांधी चमन येथून विद्यार्थ्यांची रॅली निघणार आहे. जिल्हाधिकारी डॉ. विजय राठोड यांच्या हस्ते रॅलीला हिरवी झेंडी दाखविण्यात येणार आहे. ही रॅली गांधी चमन ते जिल्हाधिकारी कार्यालय अशी जाणार आहे. त्यानंतर सकाळी 9.00 वाजता जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रांगणात जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. यावेळी मतदारांसाठी प्रतिज्ञेचे सामुहिक वाचन केले जाणार आहे. दिव्यांग स्विप आयकॉनचे निकेश मदारे, अपर जिल्हाधिकारी अंकुश पिनाटे, निवासी उपजिल्हाधिकारी केशव नेटके हे मार्गदर्शन करणार आहेत. या कार्यक्रमात उत्कृष्ट मतदार नोंदणी अधिकारी, उत्कृष्ट पर्यवेक्षक/मतदान केंद्रस्तरीय अधिकारी, उत्कृष्ट मतदार मित्र/तंत्रस्नेही, उत्कृष्ट निवडणूक साक्षरता मंच, उत्कृष्ट सूत्रसंचालन, उत्कृष्ट रांगोळी रेखाटन, उत्कृष्ट भिंतीचित्र आदी पुरस्कारांसह  निबंध स्पर्धा, चित्रकला स्पर्धा, घोषवाक्य स्पर्धेतील विजेत्यांना मान्यवरांच्या हस्ते प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात येणार आहे. या कार्यक्रमास सर्व अधिकारी, कर्मचारी व  नागरिकांनी उपस्थित राहण्याचे आवाहन उपजिल्हा निवडणूक अधिकारी डॉ. ज्ञानोबा बानापुरे यांनी केले आहे.

-*-*-*-*-*-

भारत सरकार शिष्यवृत्ती योजनेबाबत आवाहन महाडिबीटी पोर्टलवर मागासवर्गीय विद्यार्थ्यांनी मुदतीत अर्ज सादर करावेत


 

        जालना दि. 24 (जिमाका) :- शैक्षणिक वर्ष सन 2022-23 मधील प्रवेशित व भारत सरकार शिष्यवृत्ती योजनेसाठी पात्र अनुसूचित जाती, विजाभज, इमाव  तसेच विमाप्र प्रवर्गातील विद्यार्थ्यांचे  महाडिबीटी ऑनलाईन प्रणालीवर अर्ज नोंदणीसाठी दि.22 सप्टेंबर 2022 रोजी ऑनलाईन प्रणाली सुरु करण्यात आली आहे. शासनाच्या महाडीबीटी पोर्टलवर तात्काळ अर्ज नोंदणी करण्यासाठी व अर्ज त्वरित सहाय्यक आयुक्त समाज कल्याण कार्यालयाला ऑनलाईन पाठविण्यासाठी जालना जिल्ह्यातील सर्व महाविद्यालयांनी व प्रवेशित मागासवर्गीय विद्यार्थ्यांनी मुदतीत अर्ज करावेत, असे आवाहन  समाज कल्याणचे सहाय्यक आयुक्त अमित घवले यांनी केले आहे.

शैक्षणिक वर्ष सन 2022-23 मधील प्रवेशित व भारत सरकार शिष्यवृत्ती योजनेसाठी पात्र अनुसूचित जाती, विजाभज, इमाव  तसेच विमाप्र प्रवर्गातील विद्यार्थ्यांचे महाडिबीटी ऑनलाईन प्रणालीवर अर्ज नोंदणीसाठी दि.22 सप्टेंबर 2022 रोजी ऑनलाईन प्रणाली सुरु झाली असुन अद्यापपर्यंत अनुसूचित जाती प्रवर्गातील विद्यार्थ्यांचे फक्त 6 हजार 19 अर्ज नोंदणी झाले आहेत.  मागील वर्षात जालना जिल्ह्यात नोंदणी झालेल्या 10 हजार 798 पेक्षा 4 हजार 779 अर्ज अद्यापही नोंदणी झालेले नसल्याने जालना जिल्ह्याची एकुण 57 टक्केच अर्ज नोंदणी झालेली आहे. अद्यापही 43 टक्के मागासवर्गीय विद्यार्थ्यांनी महाडिबीटी प्रणालीवर शिष्यवृत्ती करिता अर्ज केलेले नाहीत. या सर्व प्रकारावरुन विद्यार्थ्यांची व महाविद्यालयांची शासनाच्या शिष्यवृत्ती योजनेबाबत उदासिनता दिसुन येत आहे. प्रवेशित विद्यार्थ्यांनी महाडिबीटी प्रणालीवर शिष्यवृत्ती अर्ज नोंदणी करण्यासाठी दि. 31 जानेवारी 2023 पर्यंत आहे. तसेच जालना जिल्ह्यातील सर्व महाविद्यालयांनी कॅम्प आयोजित करुन अर्ज नोंदणी करण्याबाबत कार्यवाही करावी तसेच महाविद्यालयांच्या लॉगीनवर आज दि. 23 जानेवारी  2023 रोजी प्रलंबित 3 हजार 169 अनुसूचित जाती प्रवर्गातील विद्यार्थ्यांच्या अर्जांची पडताळणी करुन सर्व पात्र अर्ज मंजुर करण्याची कार्यवाही करावी, असेही प्रसिध्दीपत्रकाद्वारे कळविण्यात आले आहे. 

-*-*-*-*-

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजनेसाठी अर्ज सादर करण्याचे आवाहन


     जालना दि. 24 (जिमाका) :- सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाकडून अनुसूचित जाती व नवबौध्द घटकांतील जे विद्यार्थी शासकीय वसतीगृह प्रवेशासाठी  पात्र असून प्रवेश मिळालेला नाही.  अशा विद्यार्थ्यांना भोजन, निवास व इतर शैक्षणिक सुविधा स्वत: उपलब्ध करुन घेण्यासाठी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजना राबविण्यात येते. तरी जालना जिल्ह्यातील अनुसूचित जाती व नवबौध्द घटकांतील पात्र विद्यार्थ्यांनी मंगळवार दि. 31 जानेवारी 2023 पर्यंत संबंधित महाविद्यालयात अर्ज सादर करावेत, असे आवाहन समाज कल्याण सहाय्यक आयुक्त अमित घवले यांनी केले आहे.

सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाकडून अनुसूचित जाती व नवबौध्द घटकांतील जे विद्यार्थी शासकीय वसतीगृह प्रवेशासह पात्र असून प्रवेश मिळाला नाही अशा विद्यार्थ्यांना मॅट्रिकोत्तर शिक्षण घेता यावे. म्हणुन भोजन, निवास व इतर शैक्षणिक सुविधा या विद्यार्थ्यांना स्वत: उपलब्ध करुन घेण्यासाठी आवश्यक रक्कम संबंधित अनुसूचित जाती व नवबौध्द घटकातील विद्यार्थ्यांच्या आधार संलग्न बँक खात्यामध्ये थेट वितरीत करण्यासाठी  भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजना राबविण्यात येत आहे. संबंधित महाविद्यालयांनी दि.5 फेब्रुवारी 2023 पर्यंत विद्यार्थ्यांचे प्राप्त अर्ज समाज कल्याण कार्यालय, जालना येथे सादर करावेत. असेही कळविण्यात आले आहे. या योजनेअंतर्गत लाभाच्या स्वरुपात  अनुसूचित जाती व नवबौध्द घटकांतील विद्यार्थ्यांच्या आधार संलग्न बँक खात्यामध्ये रक्कम थेट वितरीत करण्यात येते.  यामध्ये भोजन भत्ता  25 हजार रुपये, निवास भत्ता 12 हजार रुपये, निर्वाह भत्ता 6 हजार रुपये  प्रति विद्यार्थी एकुण संभाव्य वार्षिक खर्च 43 हजार रुपये या रकमे व्यतिरिक्त वैद्यकीय व अभियांत्रिकी शाखेतील विद्यार्थ्यांसाठी प्रतिवर्ष 5 हजार रुपये व अन्य शाखेतील विद्यार्थ्यांना प्रतिवर्ष 2 हजार रुपये इतकी रक्कम शैक्षणिक साहित्यासाठी ठोक स्वरुपात देण्यात येईल. विद्यार्थी अनुसुचित जाती व नवबौध्द या प्रवर्गातील असावा, विद्यार्थी महाराष्ट्राचा रहिवासी असावा, विद्यार्थी कोणत्याही शासकीय वसतिगृहात प्रवेश मिळालेला नाही, शासकीय वसतिगृहात प्रवेशासाठी पात्र असलेल्या अभ्यासक्रमात विद्यार्थ्यांने प्रवेश घेतलेला असावा, विद्यार्थ्यांस इयत्ता दहावी, बारावी, पदवी, पदवीकामध्ये किमान 50 टक्के पेक्षा जास्त गुण असणे अनिवार्य आहे. या योजनेमध्ये दिव्यांग अनुसूचित जाती व नवबौध्द घटकातील विद्यार्थ्यांसाठी 3 टक्के आरक्षण असेल व गुणवत्तेची मर्यादा 40 टक्के असेल, विद्यार्थ्यांच्या पालकांचे उत्पन्न रुपये 2.50 लाखापेक्षा जास्त नसावे, विद्यार्थी स्थानिक नसावा, विद्यार्थ्यांने प्रवेश घेतलेल्या शैक्षणिक संस्था ज्या शहराच्या ठिकाणी आहे. अशा शहरातील सदर विद्यार्थी रहिवासी नसावा, या योजनेचा लाभ  घेण्यासाठी जालना नगरपालिका क्षेत्रामध्ये असलेल्या महाविद्यालये तसेच जालना नगरपालिका हद्दीपासून 5 किलोमीटर परिसरात असलेली महाविद्यालयात शिक्षण घेत असलेल्या महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनीच अर्ज सादर करावा, बारावी नंतर पदवीका, पदवी अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेणारा अभ्यासक्रम या दोन वर्षापेक्षा आणि पदवीनंतर पदविका पदवी अभ्यासक्रमाचा कालावधी दोन वर्षापेक्षा कमी नसावा, विद्यार्थ्यांची महाविद्यालयातील उपस्थिती किमान 75 टक्के असणे आवश्यक आहे. याप्रमाणे निकष असतील. असे सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण, जालना यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे कळविले आहे.

-*-*-*-*-

लोकशाही दिनाचे 6 फेब्रुवारी रोजी आयोजन


जालना, दि. 24 (जिमाका):- जिल्हास्तरीय लोकशाही दिनाचे आयोजन प्रत्येक महिन्याच्या पहिल्या सोमवारी करण्याबाबतचे निर्देश असून त्याअनुषंगाने जिल्ह्यात सोमवार दि. 6 फेब्रुवारी 2023 रोजी सकाळी 10 ते 12  या वेळेत लोकशाही दिनाचे जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजन करण्यात आले आहे, अशी माहिती उपजिल्हाधिकारी (सामान्य) शर्मिला भोसले यांनी दिली आहे.  

लोकशाही दिनाकरीता अर्जदारांनी अर्ज विहीत नमुन्यात 15 दिवस अगोदर दोन प्रतीत पाठवणे आवश्यक आहे. या लोकशाही दिनामध्ये अर्ज देताना त्यांनी संबंधित तालुक्यातील तिसऱ्या सोमवारी तालुकास्तरीय लोकशाही दिनामध्ये अर्ज दिलेला असावा व या तालुकास्तरीय लोकशाही दिनात एक महिन्यापेक्षा जास्त कालावधी होऊन देखील कोणतीही कार्यवाही झाली नाही अशाच अर्जदाराने टोकन क्रमांकाच्या पावतीसह विहीत नमुन्यात दोन प्रतीमध्ये अर्ज सादर करावा तसेच ज्या अर्जदाराने तालुकास्तरीय लोकशाही दिनात भाग घेतला नाही अशा अर्जदाराचे अर्ज स्वीकारले जाणार नाहीत. कोणत्याही स्तरावर लोकशाही दिनात खालील बाबींशी संबंधित अर्ज स्वीकारले जाणार नाहीत. न्यायप्रविष्ठ प्रकरणे, राजस्व,अपील, सेवाविषयक आस्थापनाविषयक बाबी, विहीत नमुन्यात नसणारे व त्यासोबत आवश्यक त्या कागदपत्राच्या प्रती न जोडलेले अर्ज, तालुकास्तरीय लोकशाही दिनातील टोकन क्रमांकाशी तसलिदार यांच्या स्वाक्षरीची पोच पावती तसेच त्यासाठी दिलेल्या मुदती व नमुन्यात ज्यांनी यापुर्वीच्या आवश्यक कागदपत्रासह अर्ज केले असतील त्यांना तक्रार मांडता येईल. ज्यांनी त्यापुर्वी जिल्हास्तरावरील लोकशाही दिनी तक्रार अर्ज दिलेला आहे, परंतु अद्याप कार्यवाही झालेली नाही, अशा तक्रारदारांनी पुन्हा अर्ज करु नये. तसेच लोकशाही दिन विहीत नमुन्याचा अर्ज  http:jalna.nic.in  या संकेस्थळावर उपलब्ध आहे, असेही प्रसिध्दीपत्रकाद्वारे कळविले आहे. 

व्यसनमुक्ती कार्यशाळा संपन्न युवकांनी शाश्वत उपजीविकेसाठी व्यसनांच्या त्याग करुन उद्योग व्यवसायाची कास धरत सर्वांगीण विकास साधावा -उद्योजक रत्नदीप कांबळे सर्वांना देण्यात आली तंबाखूमुक्तीची शपथ

 


जालना, दि. 24 (जिमाका):- युवकांनी शाश्वत उपजीविकेसाठी व्यसनांचा त्याग करून उद्योग व्यवसायाची कास धरत सर्वांगीण विकास साधावा, असे प्रतिपादन बीईएसीआयचे चेअरमन तथा उद्योजक रत्नदीप कांबळे यांनी केले.

स्वच्छिक सेवा आणि सशक्तिकरण कार्यक्रमांतर्गत नेहरू युवा केंद्र युवा कार्यक्रम आणि क्रीडा मंत्रालय भारत सरकार संलग्न धरती धन ग्रामविकास संस्था जालना, सलाम मुंबई फाउंडेशन मुंबई यांच्यावतीने समर्थ करिअर अकॅडमीमध्ये व्यसनमुक्त युवा शाश्वत उपजीविका प्रशिक्षण कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी मार्गदर्शनपर ते बोलत होते. यावेळी मंचावर पूजा रोटोमॅक कंपनीचे संचालक भगवान पाडळे, सम्यक स्पाइसेस क्लस्टरचे संचालक संतोष दाभाडे, धरतीधन ग्रामविकास संस्थेचे अध्यक्ष मिलिंद सावंत, समर्थ करिअर अकॅडमीचे संचालक सौरभ आनंदे यांची प्रमुख उपस्थिती होती.

उद्योजक श्री. कांबळे म्हणाले की, जागतिक स्तरावर उद्योग व्यवसायांमध्ये मोठे बदल होत असून युवकांनी केवळ नोकरीच्या मागे न धावता स्वतंत्र उद्योग व्यवसाय उभारणीसाठी शासनाच्या विविध योजनांचा लाभ घेऊन आत्मनिर्भर भारत निर्माण करण्यासाठी प्रयत्न करावा.  

जालना जिल्ह्यातील अनुसूचित जाती-जमातीच्या लाभार्थ्यांना शासनाच्या विविध योजनांचा लाभ मिळवून देण्यासाठी  ट्रेनरशिपच्या माध्यमातून प्रयत्न केले जात असल्याचे संतोष दाभाडे सांगितले तर श्री. पडोळे यांनी धरतीधन संस्थेच्या माध्यमातून युवकांसाठी सुरू करण्यात आलेल्या व्यसनमुक्त युवा शाश्वत उपजीविका हा प्रकल्प आदर्शवत असल्याचे सांगत युवकांनी मोठ्या प्रमाणात उद्योग उभारणीकडे वळावे, असे आवाहन केले.

प्रारंभी अतिथींचा सत्कार संयोजकांच्यावतीने पुस्तके भेट देवून करण्यात आला. जिल्हाभरामध्ये सलाम मुंबई फाउंडेशन, धरतीधन ग्रामविकास संस्था, जिल्हा प्रशासन यांच्या सहकार्याने संपूर्ण जिल्ह्यामध्ये तंबाखू मुक्त शाळा प्रकल्प राबविण्यासाठी स्वयंसेवी संस्थांनी व युवकांनी स्वयंस्फूर्तीने सहभागी होण्याचे आवाहन संयोजक मिलिंद सावंत यांनी प्रास्ताविकात केले. हा कार्यक्रम नेहरु युवा केंद्राचे जिल्हा युवा अधिकारी प्रणित सांगवीकर व लेखाधिकारी वसंत सुर्वे यांच्या मार्गदर्शनाखाली घेण्यात आला. यावेळी स्वयंसेवक प्रिती झिने, श्वेता इंगळे, युवा बहुद्देशीय संस्थेचे जयपाल राठोड, गोपाल भोसले, दीपक आनंदे, प्रदीप कानगुडे यांच्यासह मोठ्या संख्येने युवक- युवतीची उपस्थिती होती. यावेळी सर्वांना तंबाखूमुक्तीची शपथ देण्यात आली तर  शेवटी आभार संयोजक योगेश कोळी यांनी मानले. असे जिल्हा युवा अधिकारी, नेहरू युवा केंद्र, जालना यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे कळविले आहे.

-*-*-*-*-