Thursday 19 January 2023

रब्बी हंगामाची ई-पीक पाहणी अॅपद्वारे पीक पेरा नोंदवण्यासाठी तीन दिवसीय विशेष मोहिम - 20 ते 22 जानेवारी 2023 या कालावधीत मोहिम - मोहिमेत शेतकऱ्यांनी सहभागी होण्याचे आवाहन

 

 

जालना,दि. 19 (जिमाका) :-  शेतकऱ्यांच्या शेतातील पिकांची माहिती सहज उपलब्ध व्हावी, पीक नोंदणी प्रक्रीयेत शेतकऱ्यांचा सक्रीय सहभाग वाढवा, कृषी पतपुरवठा धोरण सुलभ व्हावे, पीक विमा आणि पीक पाहणी दावे निकाली काढण्याची प्रक्रिया सुलभ करणे, किमान आधारभूत किंमत योजनेतंर्गत विक्रीसाठी संगती देण्याची सुविधा उपलब्ध करुन देणे, नैसर्गिक आपत्तीमुळे पिकांचे नुकसान झाल्यास अचूक भरपाई आणि योग्य प्रकारे मदत करणे शक्य व्हावे या उद्देशाने राज्य शासनाने ई-पीक पाहणी उपक्रम सुरु केला आहे. रब्बी हंगामाची 100 टक्के ई - पीक पाहणी नोंदणी पूर्ण करण्याच्या अनुषंगाने दि. 20 ते 22 जानेवारी 2023 या कालावधीत जिल्हाभरात ई - पीक पेरा नोंदणीसाठी तीन दिवसीय विशेष मोहिमेचे आयोजन करण्यात आले आहे. मोबाईल ॲपच्या माध्यमातून करण्यात येणाऱ्या या ई-पीक पाहणी नोंदणी मोहिमेत जालना जिल्हयातील जास्तीत शेतकऱ्यांनी सहभागी व्हावे, असे आवाहन अपर जिल्हाधिकरी अंकुश पिनाटे यांनी केले आहे.

रब्बी हंगामातील ई-पीक पाहणी ॲपद्वारे  पीक  पेरा नोंदविण्यासाठी आयोजित तीन दिवसीय विशेष मोहिम यशस्वी करण्यासाठी संबंधित तालुक्यातील तलाठी, कृषी सहायक, पोलिस पाटील, रोजगार सेवक, स्वस्त धान्य दुकानदार, कोतवाल, शेतीमित्र, प्रगतीशील शेतकरी, आपले सरकार केंद्र चालक, संग्राम केंद्र चालक, कृषी महाविद्यालयातील विद्यार्थी, तरुण मंडळाचे प्रतिनिधी अशा स्वयंसेवकांच्या सहकार्याने ई - पीक पेरा नोंदवण्याची मोहिम यशस्वीपणे पार पाडावी, अशी सूचना श्री. पिनाटे यांनी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी, उपविभागीय अधिकारी, तहसिलदार यांना केली आहे.

रब्बी हंगामाची 100 टक्के ई-पीक पाहणी पूर्ण करण्याच्या अनुषंगाने नायब तहसिलदार व मंडळ अधिकारी यांना " नोडल अधिकारी " म्हणुन नियुक्त करण्यात येऊन त्यांच्यामार्फत मोहिम कालावधीचा दैनिक आढावा घेण्यात यावा. असे निर्देशही त्यांनी दिले आहेत.

क्षेत्रीय स्तरावरुन पीक पाहणी रिअल टाईम क्रॉप डाटा संकलित होण्याच्या दृष्टीने तसेच सदर डाटा / माहिती संकलन करताना पारदर्शकता आणणे, पीक नोंदणी प्रक्रियेत शेतकऱ्यांचा सक्रीय सहभाग घेणे, पतपुरवठा सुलभ करणे, पीक विमा आणि पीक पाहणी दावे निकाली काढण्याची प्रक्रिया सुलभ करणे किमान आधारभूत किंमत योजनेंतर्गत विक्रीसाठी संगती देण्याची सुविधा उपलब्ध करुन देणे, नैसर्गिक आपत्तीमुळे पिकांचे नुकसान झाल्यास अचूक भरपाई आणि योग्य प्रकारे मदत करणे शक्य व्हावे या उद्देशाने शेतकऱ्यांनी त्यांच्या स्मार्ट मोबाईलमध्ये ई - पीक पाहणी अॅप चालू करून त्यात पीक पाहणी नोंदविण्याची नवीन पध्दत सुरु करण्यात आली आहे. दि. 20 ते 22 जानेवारी 2023 या कालावधीत जिल्हाभरात राबविण्यात येणारी ई - पीक पेरा नोंदणी मोहिमे यशस्वी करण्याचे आवाहन श्री. पिनाटे यांनी केले आहे.

-*-*-*-*-*-*-

No comments:

Post a Comment