Monday 23 January 2023

-कुष्ठरोग जनजागृती अभियान-2023 कुष्ठरोगाबाबतचे गैरसमज दूर करण्यासाठी जनजागृती अभियानात सर्वांचा सहभाग आवश्यक - जिल्हाधिकारी डॉ. विजय राठोड - 30 जानेवारी ते 13 फेब्रुवारी या कालावधीत स्पर्श-कुष्ठरोग जनजागृती अभियान पंधरवडा - “कुष्ठरोगाविरुध्द लढा देऊन, कुष्ठरोगाला इतिहास जमा करुयात” या वर्षीचे घोषवाक्य - 26 जानेवारी रोजी विशेष ग्रामसभेचे आयोजन - कुष्ठरोगाबाबत प्रतिज्ञा घेण्याची सूचना -‘सपना’ मार्फत केली जाणार जनजागृती - महिला मंडळे, बचतगट, तरुण मंडळे यांनी जनजागृती करावी - खाजगी डॉक्टरांचाही सहभाग आवश्यक - शाळेत विविध स्पर्धांचे आयोजन केले जाणार - प्रभातफेरीचे आयोजन

 




 

जालना,दि. 23 (जिमाका) :- योग्य व वेळेवर उपचाराने कुष्ठरोग बरा होणारा रोग आहे. या रोगाविषयीचे गैरसमज दूर करण्यासाठी  जालना जिल्हयात दि. 30 जानेवारी ते 13 फेब्रुवारी 2023 या कालावधीत स्पर्श-कुष्ठरोग जनजागृती अभियान पंधरवडा राबविण्यात येणार आहे. या अभियानाच्या यशस्वीतेसाठी सर्वांनी अभियानात सहभागी व्हावे, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. विजय राठोड यांनी केले.

स्पर्श-कुष्ठरोग जनजागृती अभियान-2023 जिल्हास्तरीय समन्वय समितीची सभा आज जिल्हाधिकारी डॉ. विजय राठोड यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी कार्यालयात संपन्न झाली. बैठकीस जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. जयश्री भूसारे, आरोग्य सेवा (कुष्ठरोग)चे सहायक संचालक तथा सदस्य सचिव डॉ. श्यामकांत गावंडे, जिल्हा आशा समन्वयक, तालुका आरोग्य अधिकारी उपस्थित होते.

स्पर्श-कुष्ठरोग जनजागृती अभियान-2023 अंतर्गत या वर्षीचे घोषवाक्य कुष्ठरोगाविरुध्द लढा देऊन, कुष्ठरोगाला इतिहास जमा करुयात असे आहे. दि. 30 जानेवारी राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या पुण्यतिथी निमित्त राष्ट्रीय तसेच आंतरराष्ट्रीय स्तरावर कुष्ठरोग निवारण दिन साजरा करण्याबाबत केंद्र शासनाने निर्देश जारी केले आहेत. या अनुषंगाने जिल्हयात दि. 30 जानेवारी ते 13 फेब्रुवारी 2023 या पंधरवडयात विविध आरोग्य शिक्षणाचे कार्यक्रम राबविण्यात येणार आहेत.

दि. 26 जानेवारी 2023 रोजी स्पर्श-कुष्ठरोग जनजागृती मोहिम अंतर्गत जिल्हयातील सर्व ग्रामपंचायतींमध्ये विशेष ग्रामसभेचे आयोजन करण्यात येणार आहे. ग्रामसभेत कुष्ठरोगाबाबत प्रतिज्ञा, उपस्थित प्रमुख अधिकाऱ्यांमार्फत आवाहन, गावातील प्रौढ व्यक्तीस राष्ट्रपिता महात्मा गांधी यांचा पेहराव करुन त्यांच्यामार्फत अथवा सपना (‘सपना’ ही संकल्पना समाजात राहणाऱ्या एका सामान्य मुलीला लक्षात घेऊन तयार केलेली आणि विकसित केलेली आहे. जी कुष्ठरोगविषयक संदेशाव्दारे समाजात जागरुकता पसरविण्यास मदत करेल. ‘सपना’ ही स्थानिक शाळेत जाणारी मुलगी असू शकते जी शक्यतो  त्याच परिसरातील ‘सपना’ बनण्यास इच्छुक असावी.) या शाळकरी मुलीमार्फत कुष्ठरोग विषयक माहिती व संदेश दिला जाईल. रोगमुक्त कुष्ठरुग्णांना ग्रामसभेत प्रमुख पाहुणे म्हणून आंमत्रित  केले जाईल. कुष्ठरोगाविषयी प्रश्न-उत्तरे घेतली जातील. कुष्ठबाधीत व्यक्ती मार्फत सत्कार व त्यांचे मार्फत कुष्ठरोगविषयक संदेश वाचन केले जाईल.

जिल्हाधिकारी म्हणाले की, दि. 30 जानेवारी ते 13 फेब्रुवारी 2023 या पंधरवडयात राबविण्यात येणाऱ्या  कुष्ठरोग जनजागृती मोहिमेत प्रत्येकाचा सहभाग आवश्यक आहे. स्थानिक महिला मंडळे, बचतगट, तरुण मंडळे यांनी सभेच्या माध्यमातून या रोगाविषयी जनजागृती करावी. गैरसमज दूर करावेत. खाजगी रुग्णालयाच्या डॉक्टरांनीही जनजागृतीसाठी पुढाकार घ्यावा. आरोग्य विभागाने  बाजाराच्या ठिकाणी प्रदर्शन आयोजित करावीत. आरोग्य मेळावे घ्यावेत. शाळेत प्रार्थनेनंतर कुष्ठरोगबाबतच्या प्रतिज्ञाचे वाचन करण्याची सूचना करावी. शाळेतील सूचना फलकावर कुष्ठरोगबाबतचे संदेश लिहावेत. नाटक, प्रश्नमंजुषा स्पर्धा, निबंध स्पर्धा, कुष्ठरोगावरील गाणी, कवितावाचन, रांगोळी स्पर्धा, कटपुतली, चित्रकला स्पर्धा, पथनाटय, कुष्ठरोगावरील म्हणी/घोषवाक्य स्पर्धा शाळेत घेण्यात याव्यात. शालेय विद्यार्थ्यांची प्रभातफेरी तसेच कुष्ठरोग दौड जिल्हास्तरावर आयोजित करावी. आपल्या जिल्हयातून कुष्ठरोगाचे निर्मुलन करण्यासाठी सर्वांनीच पुढाकार घेऊन कुष्ठरोगाचा प्रसार शुन्यावर आणण्याचे ध्येय साध्य करावे.

***

 

No comments:

Post a Comment