Friday 27 January 2023

जिल्ह्यात कलम 37 (1) अन्वये 28 जानेवारीपासून प्रतिबंधात्मक आदेश लागू

 


 जालना, दि. 27 (जिमाका) :- औरंगाबाद शिक्षक मतदारसंघ निवडणूक मतदान प्रक्रिया दि.30 जानेवारी 2023 रोजी जिल्ह्यातील 15 केंद्रावर होणार आहे. तसेच  9 फेब्रुवारी रोजी संकष्ट चतुर्थी असल्याने राजूरा, माळाचा गणपती व मावा पाटोदा येथील गणपती मंदीरात भाविकांची दर्शनासाठी गर्दी होते. या पार्श्वभूमीवर कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी जालना जिल्ह्याच्या संपूर्ण हद्दीत महाराष्ट्र पोलीस अधिनियम 1951 च्या कलम 37 (1) अन्वये दि. 28 जानेवारी 2023 रोजीचे 6 वाजेपासून ते दि.10 फेब्रुवारी 2023 रोजीच्या 24.00 वाजेपर्यंत प्रतिबंधात्मक आदेश  अपर जिल्हादंडाधिकारी केशव नेटके यांनी जारी केले आहेत.

         या आदेशान्वये शासकीय कर्तव्य पार पाडणाऱ्या कर्मचाऱ्यांव्यतिरीक्त अन्य कोणत्याही व्यक्तिस सार्वजनिक ठिकाणी किंवा त्याच्या जवळपास खालीलप्रमाणे गोष्टी करण्यास मनाई करण्यात आली आहे. शस्त्रे, लाठ्या, सोटे, बंदूक, तलवार, भाले चाकु व इतर शरिरास इजा अथवा अपाय करणाऱ्या वस्तु जवळ  बाळगता येणार नाही. तीक्ष्ण पदार्थ अथवा स्फोटके सहज हाताळता येतील अशी घातक वस्तु जवळ बाळगता येणार नाही. दगड किंवा इतर उपकरणे किंवा प्रवर्तक शस्त्र गोळा करुन ठेवता किंवा जवळ बाळगता येणार नाहीत  व्यक्तीच्या किंवा समुहाच्या भावना जाणूनबजून दुखविण्याच्या उद्देशाने असभ्यतेची भाषणे, वाद्य वाजविणे, गाणी म्हणता येणार नाही. व्यक्तीचे किंवा शवांचे किंवा त्याच्या प्रतिकृतीचे प्रदर्शन करणार नाही.  आवेशी भाषणे, अंगविक्षेपण, विडंबनात्मक नकला करता येणार नाहीत. आणि सभ्यता, नीतीमत्ता यास बाधा येईल किंवा ज्यामुळे राज्याची सुरक्षितता धोक्यात येईल किंवा अराजकता माजेल, अशी चित्रे, निशाणी, घोषणा पत्रे किंवा इतर कोणत्याही वस्तु जवळ बाळगता येणार नाही. हा आदेश संपूर्ण जालना जिल्ह्याच्या हद्दीत दि. 28 जानेवारी 2023 रोजीचे 6 वाजेपासून ते दि.10 फेब्रुवारी 2023 रोजीच्या 24.00 वाजेपर्यंत लागू राहील,  असे आदेशात नमूद करण्यात आले आहे.

-*-*-*-*-

No comments:

Post a Comment