Wednesday 25 January 2023

राष्ट्रीय मतदार दिन उत्साहात संपन्न लोकशाहीच्या सक्षमीकरणासाठी नवमतदारांनी मतदार नोंदणी अवश्य करावी - निवासी उपजिल्हाधिकारी केशव नेटके रॅलीच्या माध्यमातून मतदान व मतदार नोंदणीबाबत जनजागृती

 

 

 जालना,दि. 25 (जिमाका) :- भारत निवडणूक आयोगाने वर्षातून चार वेळा नवमतदारांना नाव नोंदणीची संधी उपलब्ध करुन दिली आहे. तरी राष्ट्रीय मतदार दिनाचे औचित्य साध्य होण्यासाठी तसेच लोकशाहीच्या सक्षमीकरणासाठी नवमतदारांनी मतदार नोंदणी अवश्य करावी, असे आवाहन निवासी उपजिल्हाधिकारी केशव नेटके यांनी केले.

राष्ट्रीय मतदार ‍दिनानिमित्त बुधवार दि. 25 जानेवारी 2023 रोजी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या परिसरात कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते, याप्रसंगी ते बोलत होते. यावेळी उपजिल्हाधिकारी गणेश निऱ्हाळी,  उपजिल्हा निवडणूक अधिकारी डॉ. ज्ञानोबा बानापुरे, उपविभागीय अधिकारी संदिपान सानप, तहसिलदार श्रीकांत भुजबळ, रमेश पुलोद, उपशिक्षणाधिकारी विपुल भागवत, विनया वडजे, दिव्यांग आयकॉन निलेश मदारे यांची प्रमुख उपस्थिती होती.

दरवर्षी राष्ट्रीय मतदार दिन 25 जानेवारी रोजी साजरा करण्यात येतो, असे सांगून  निवासी उपजिल्हाधिकारी श्री. नेटके म्हणाले की, सर्व विद्यार्थ्यांनी  आपल्या वयाचे अठरा वर्षे पूर्ण होताच आपले नाव मतदार यादीत नोंदवावे. भारत निवडणूक आयोगाने मतदार नोंदणीसाठी ऑनलाईन व ऑफलाईन हे दोन्ही पर्याय ठेवले आहेत. आपणास अनुरुप अशा कोणत्याही प्रकारे आपली नोंदणी करु शकता. या वर्षाची थीम 'मतदाना इतके अमूल्य नसे काही, बजावू हमखास मताधिकार आम्ही' असे असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.

प्रास्ताविकात डॉ. ज्ञानोबा बाणापूरे यांनी   राष्ट्रीय मतदार ‍दिनाच्या अनुषंगाने आपण सर्व नवमतदारांना मतदार म्हणून आपले नाव नोंदणी करण्यासाठी आवाहन करत असतो. तसेच शाळा व महाविद्यालयांत विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात येते. लोकशाहीचे भवितव्य हे नवमतदारांवर अवलंबुन असल्याचेही त्यांनी सांगितले. तसेच उपस्थित सर्वांना राष्ट्रीय मतदार दिनाची प्रतिज्ञा दिली.

दिव्यांग आयकॉन निकेश मदारे म्हणाले की,  भारत हा लोकशाही प्रधान देश आहे. मतदानाच्या प्रक्रियेत सर्वांना सामिल होता यावे या भावनेतून भारत निवडणूक आयोगाने दिव्यांगाना नोंदणीपासून ते मतदान करेपर्यंत उपयुक्त अशा सुविधा उपलब्ध करुन दिल्या आहेत. देशात मतदानाचा टक्का दिवसेंदिवस वाढत चालला असून प्रत्येकाने नावनोंदणी करुन मतदानाचा हक्क बजावावा, असे आवाहन त्यांनी यावेळी केले.

या कार्यक्रमात राष्ट्रीय मतदार दिनानिमित्त आयोजित निबंध लेखन, रांगोळी, घोषवाक्य, चित्रकला स्पर्धेतील प्रथम, द्वितीय आणि तृतीय  क्रमांक पटकावलेल्या विद्यार्थ्यांचा प्रमाणपत्र व स्मृतिचिन्ह देवून गौरवण्यात आले. तर मतदार नोंदणी व निवडणूक प्रक्रियेत उल्लेखनीय कार्य करणारे अधिकारी-कर्मचाऱ्यांचा प्रमाणपत्र देवून यथोचित सन्मान करण्यात आला. कार्यक्रमास विद्यार्थी, शिक्षक, अधिकारी-कर्मचारी यांच्यासह  नागरिकांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.

            दरम्यान, राष्ट्रीय मतदार दिनानिमित्त सकाळी शालेय विद्यार्थ्यांची रॅली गांधी चमन येथून काढण्यात आली. अपर जिल्हाधिकारी अकुंश पिनाटे यांनी रॅलीला हिरवी झेंडी दाखविली.  गांधी चमन ते टाऊन हॉल, शनि मंदीर, नुतन वसाहत मार्गे अंबड चौफुलीपासून  जिल्हाधिकारी कार्यालय येवून रॅलीचा समारोप झाला.  या रॅलीत जालना येथील ‍जिल्हा परिषद प्रशाला मुलांची शाळा, श्री. शिवाजी हायस्कुल, सरस्वती भुवन प्रशाला,  स्वामी विवेकानंद विद्यालय, उर्दु हायस्कुल आदी शाळांनी सहभाग नोंदविला. रॅलीतील विद्यार्थ्यांनी दिलेल्या  ''मतदार  राजा जागा हो, लोकशाहीचा धागा हो'' या घोषणेने जालना शहरासह जिल्हाधिकारी कार्यालय परिसर दणाणून गेला.

-*-*-*-*-

No comments:

Post a Comment