Tuesday 24 January 2023

व्यसनमुक्ती कार्यशाळा संपन्न युवकांनी शाश्वत उपजीविकेसाठी व्यसनांच्या त्याग करुन उद्योग व्यवसायाची कास धरत सर्वांगीण विकास साधावा -उद्योजक रत्नदीप कांबळे सर्वांना देण्यात आली तंबाखूमुक्तीची शपथ

 


जालना, दि. 24 (जिमाका):- युवकांनी शाश्वत उपजीविकेसाठी व्यसनांचा त्याग करून उद्योग व्यवसायाची कास धरत सर्वांगीण विकास साधावा, असे प्रतिपादन बीईएसीआयचे चेअरमन तथा उद्योजक रत्नदीप कांबळे यांनी केले.

स्वच्छिक सेवा आणि सशक्तिकरण कार्यक्रमांतर्गत नेहरू युवा केंद्र युवा कार्यक्रम आणि क्रीडा मंत्रालय भारत सरकार संलग्न धरती धन ग्रामविकास संस्था जालना, सलाम मुंबई फाउंडेशन मुंबई यांच्यावतीने समर्थ करिअर अकॅडमीमध्ये व्यसनमुक्त युवा शाश्वत उपजीविका प्रशिक्षण कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी मार्गदर्शनपर ते बोलत होते. यावेळी मंचावर पूजा रोटोमॅक कंपनीचे संचालक भगवान पाडळे, सम्यक स्पाइसेस क्लस्टरचे संचालक संतोष दाभाडे, धरतीधन ग्रामविकास संस्थेचे अध्यक्ष मिलिंद सावंत, समर्थ करिअर अकॅडमीचे संचालक सौरभ आनंदे यांची प्रमुख उपस्थिती होती.

उद्योजक श्री. कांबळे म्हणाले की, जागतिक स्तरावर उद्योग व्यवसायांमध्ये मोठे बदल होत असून युवकांनी केवळ नोकरीच्या मागे न धावता स्वतंत्र उद्योग व्यवसाय उभारणीसाठी शासनाच्या विविध योजनांचा लाभ घेऊन आत्मनिर्भर भारत निर्माण करण्यासाठी प्रयत्न करावा.  

जालना जिल्ह्यातील अनुसूचित जाती-जमातीच्या लाभार्थ्यांना शासनाच्या विविध योजनांचा लाभ मिळवून देण्यासाठी  ट्रेनरशिपच्या माध्यमातून प्रयत्न केले जात असल्याचे संतोष दाभाडे सांगितले तर श्री. पडोळे यांनी धरतीधन संस्थेच्या माध्यमातून युवकांसाठी सुरू करण्यात आलेल्या व्यसनमुक्त युवा शाश्वत उपजीविका हा प्रकल्प आदर्शवत असल्याचे सांगत युवकांनी मोठ्या प्रमाणात उद्योग उभारणीकडे वळावे, असे आवाहन केले.

प्रारंभी अतिथींचा सत्कार संयोजकांच्यावतीने पुस्तके भेट देवून करण्यात आला. जिल्हाभरामध्ये सलाम मुंबई फाउंडेशन, धरतीधन ग्रामविकास संस्था, जिल्हा प्रशासन यांच्या सहकार्याने संपूर्ण जिल्ह्यामध्ये तंबाखू मुक्त शाळा प्रकल्प राबविण्यासाठी स्वयंसेवी संस्थांनी व युवकांनी स्वयंस्फूर्तीने सहभागी होण्याचे आवाहन संयोजक मिलिंद सावंत यांनी प्रास्ताविकात केले. हा कार्यक्रम नेहरु युवा केंद्राचे जिल्हा युवा अधिकारी प्रणित सांगवीकर व लेखाधिकारी वसंत सुर्वे यांच्या मार्गदर्शनाखाली घेण्यात आला. यावेळी स्वयंसेवक प्रिती झिने, श्वेता इंगळे, युवा बहुद्देशीय संस्थेचे जयपाल राठोड, गोपाल भोसले, दीपक आनंदे, प्रदीप कानगुडे यांच्यासह मोठ्या संख्येने युवक- युवतीची उपस्थिती होती. यावेळी सर्वांना तंबाखूमुक्तीची शपथ देण्यात आली तर  शेवटी आभार संयोजक योगेश कोळी यांनी मानले. असे जिल्हा युवा अधिकारी, नेहरू युवा केंद्र, जालना यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे कळविले आहे.

-*-*-*-*-

No comments:

Post a Comment