Friday 20 January 2023

महात्मा ज्योतीबा फुले संशोधन व प्रशिक्षण संस्था (महाज्योती), नागपूर महाज्योती मार्फत पोलीस-मिलीटरी भरती पूर्व प्रशिक्षणासाठी नोंदणी करण्याचे आवाहन

 


 

जालना,दि. 20 (जिमाका) :- महात्मा ज्योतिबा फुले संशोधन व प्रशिक्षण संस्था (महाज्योती), नागपूर या संस्थेमार्फत इतर मागास वर्ग विमुक्त जाती-भटक्या जमाती व विशेष मागास प्रवर्गातील विद्यार्थ्यांसाठी पोलीस-मिलीटरी भरती पूर्व प्रशिक्षण राबविण्यात येत असते. या प्रशिक्षणासाठी नोंदणी प्रक्रिया सुरु करण्यात आलेली आहे.  प्रशिक्षण हे महाज्योतीमार्फत नागपूर व औरंगाबाद या दोन ठिकाणी देण्यात येणार आहे. तरी पात्र व इच्छुक उमेदवारांनी महाज्योतीच्या www.mahajyoti.org.in या संकेतस्थळावर ऑनलाईन अर्ज दि.25 जानेवारी 2023 पर्यंत सादर करावेत, असे आवाहन महात्मा ज्योतीबा फुले संशोधन व प्रशिक्षण (महाज्योती) संस्थेचे व्यवस्थापकीय संचालक राजेश खवले यांनी केले आहे.  

महात्मा ज्योतिबा फुले संशोधन व प्रशिक्षण संस्था (महाज्योती), नागपूरतर्फे आयोजित प्रशिक्षणाचा कालावधी चार महिन्याकरिता असून हे प्रशिक्षण अनिवासी स्वरुपाचे आहे. सहभागी होणाऱ्या विद्यार्थ्यांना दरमाह 6 हजार रुपये इतके विद्यावेतन देण्यात येणार आहे. तसेच प्रशिक्षणा दरम्यान पुस्तके, गणवेश देखील मोफत देण्यात येणार आहेत. या प्रशिक्षणाचा लाभ घेण्यासाठी उमेदवार हा इतर मागास वर्ग विमुक्त जाती-भटक्या जमाती व विशेष मागास प्रवर्गापैकी असावा तसेच तो नॉनक्रिमिलेअर गटातील असावा. उमेदवार किमान बारावी उत्तीर्ण असावा. इच्छुक उमेदवारांनी महाज्योतीच्या www.mahajyoti.org.in या संकेतस्थळावरील नोटीस बोर्डमधील पोलीस भरती पूर्व प्रशिक्षण या टॅबवर जाऊन ऑनलाईन पध्दतीने अर्ज करावा. अर्ज करण्याची अंतीम दि. 25 जानेवारी 2023 ही आहे. तरी महाराष्ट्रातील इतर मागास वर्ग विमुक्त जाती-भटक्या जमाती व विशेष मागास प्रवर्गातील विद्यार्थ्यांना पोलीस-मिलिटरी भरती पूर्व प्रशिक्षणाकरिता अर्ज करण्याचे आवाहन महाज्योतीतर्फे करण्यात आले आहे. असे आवाहन व्यवस्थापकीय संचालक, महात्मा ज्योतीबा फुले संशोधन व प्रशिक्षण संस्था, (महाज्योती) महाराष्ट्र राज्य, नागपूर यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे केले आहे.

-*-*-*-*-

No comments:

Post a Comment