Thursday 19 January 2023

आत्माच्या माध्यमातून सेंद्रिय शेतीला बळकटी शेतकऱ्यांसह इतरांनी परस बागेत का होईना सेंद्रिय पद्धतीने भाजीपाला पिकवावा

 


जालना,दि. 19 (जिमाका) :- आपल्या शेतीतील उत्पादीत मालामधून रासायनिक घटकांचे प्रमाण रासायनिक खते, औषधी यामुळे वाढून त्याचा मानवी आरोग्यावर अतिशय विपरीत परिणाम होत आहे, त्यामुळे शेतकऱ्यांसह इतरांनी परस बागेत का होईना सेंद्रिय पद्धतीने भाजीपाला पिकवावा, असे आवाहन आत्मा प्रकल्प संचालक शीतल चव्हाण यांनी केले आहे.  

 कृषी विभागाच्या कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा (आत्मा)च्या माध्यमातून शेतकरी गटासाठी विविध उपक्रम राबविले जात स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव वर्षानिमित्ताने सेंद्रिय शेतीला चालना दिली आहे, संयुक्त राष्ट्राने सन 2023 हे वर्ष जागतिक तृण धान्य वर्ष म्हणून साजरे करणार असल्याने आत्माच्या माध्यमातून आता जिल्ह्यात सेंद्रिय तृण धान्य ग्राहकाला मिळणार आहे, यामध्ये ज्वारी, गहू , बाजरी चा समावेश आहे.

भोकरदन तालुक्यात सेंद्रिय शेती करण्यासाठी परंपरागत कृषी विकास योजनेअंतर्गत नैसर्गिक शेती योजनेच्या माध्यमातून देऊळगाव ताड, चिंचोली, वालसा डावरगाव, केदारखेडा, वालसा - खालसा या गावातून 15 शेतकरी गटांनी नोंदणी प्रस्ताव आत्मा कार्यालयाकडे केली असून याच शेतकरी उत्पादक गटांच्या माध्यमातून 300 शेतकऱ्यांची जिल्ह्यातील पहिल्या नोंदणीकृत सेंद्रिय शेती उत्पादक कंपनीची नोंदणी होणार असल्याची माहिती आत्माच्या प्रकल्प संचालक शीतल चव्हाण यांनी दिली आहे.

शेतीक्षेत्रात रासायनिक खतांचा असंतुलित वापर, तसेच कीटकनाशकांचा अतिप्रमाणात आणि अनावश्यक वापर रोखण्यासाठी सेंद्रिय शेतीला मोठ्या प्रमाणावर चालना देण्यात येत आहे. त्यानुसार सेंद्रिय शेती-विषमुक्त शेतीसाठी चालना देण्यात येणार आहे. परंपरागत कृषि विकास योजनेच्या माध्यमातून सेंद्रिय शेतीच्या प्रसारासोबतच त्यातील शेतमालाच्या वितरणासाठी व्यवस्था निर्माण करण्यात येणार आहे. यामुळे विषमुक्त फळे, भाजीपाला आणि अन्नधान्य उपलब्ध होणार आहे. सेंद्रिय शेतीसाठी कमी खर्चाचे तंत्रज्ञान विकसित करून शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढविणे, पिकांचे अवशेष वापरून शेतातच सेंद्रिय शेती निविष्ठा तयार करण्याची प्रणाली विकसित करणे, ही प्रणाली सक्षम प्राधिकाऱ्यांच्या मान्यतेने तयार करून इतरत्र प्रसारित करणे, राज्यातील शेतकऱ्यांना दर्जेदार सेंद्रिय निविष्ठा योग्य पद्धतीने वापरण्याचे तंत्रज्ञान उपलब्ध करणे, सेंद्रिय शेतमालाच्या वितरणासाठी बाजारपेठ आणि स्वतंत्र विक्री व्यवस्था निर्माण करणे, सेंद्रिय शेतमालाच्या निर्यातीस प्रोत्साहन देणे, सहभाग हमी पद्धतीने सेंद्रिय शेतीचे गट प्रमाणीकरण करून घेणे आदी उद्दिष्टे या योजनेची असणार आहेत,शेतीमध्ये रासायनिक खतांचा असंतुलित वापर वाढल्याने जमिनीतील जैविक घटकांचा विनाश होऊन त्या मृतवत होत चालल्या आहेत. तसेच, तणनाशके-कीटकनाशकांच्या अतिवापरामुळेही जमिनीची सुपिकता कमी झाली आहे. या साऱ्यांचा परिणाम म्हणून उत्पादित शेतमालात आरोग्यास अपायकारक अशा रासायनिक घटकांचे प्रमाण वाढून त्याचा मानवी आरोग्यावर अतिशय विपरीत परिणाम होत आहे. या पार्श्वभूमीवर नागरिकांचा जैविक शेतीतून उत्पादित होणाऱ्या उत्पादनांकडे वाढता कल आहे. त्यातून सेंद्रिय (जैविक) शेतीची गरज मोठ्या प्रमाणावर भासू लागली आहे. योजनेत लागवड ते काढणी व ब्रँडिंग मार्केटिंग पर्यंत शेतकऱ्यांना मार्गदर्शन करण्यात येणार असून त्यांचे प्रमाणीकरण करून दिले जाणार असल्याची माहिती दिली. असे प्रसिध्दीपत्रकाद्वारे कळविण्यात आले आहे.

-*-*-*-*-

No comments:

Post a Comment