Friday 9 September 2022

लम्पी स्कीन आजाराचा संसर्ग; मौजे कुंबेफळ, मौजे जामखेड, मौजे वरुड येथील भाग बाधित क्षेत्र व निगराणी क्षेत्र म्हणून घोषित

 


 

            जालना, दि. 9 (जिमाका) - सहाय्यक आयुक्त पशुसंवर्धन, रोग अन्वेषण विभाग, औंध, पुणे यांच्या अहवालानुसार जालना जिल्हयातील मौजे कुंबेफळ, तालुका जालना, मौजे जामखेड ता. अंबड आणि मौजे वरुड ता. भोकरदन या गावामधील लम्पी स्कीन डीसीज रोगाचे रोग नमुने सकारात्मक आलेले आहेत. त्यामुळे त्या ठिकाणी लम्पी डीसीज रोगाचा प्रादुर्भाव झाल्याचे निदर्शनास आलेले आहे. त्यामुळे प्राण्यांमधील संक्रमण व संसर्गिक रोग प्रतिबंधक व नियंत्रण अधिनियम 2009 अन्वये जिल्ह्यातील बाधित व अबाधित पशुधनास आवश्यकतेनुसार प्रतिबंधात्मक लसीकरण करणे बंधनकारक आहे व जनावरांच्या वाहतुकीस व विक्रीस प्रतिबंध करणे आवश्यक आहे.

त्यानुसार जिल्हाधिकारी तथा अध्यक्ष (जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण, जालना)  डॉ. विजय राठोड यांनी प्राण्यांमधील संक्रमण व संसर्गिक रोग प्रतिबंधक नियंत्रण अधिनियम 2009 नियम 12 नुसार प्राप्त अधिकारान्वये जालना जिल्ह्यातील मौजे कुंबेफळ, तालुका जालना, मौजे जामखेड ता. अंबड आणि मौजे वरुड ता. भोकरदन येथील जनावरांच्या संसर्ग केंद्रापासून 5 किलोमीटर बाधित क्षेत्र व 10 किलोमीटर निगराणी क्षेत्र घोषित  केले आहे. तसेच सदर गावापासून बाधीत व निगराणी क्षेत्रामधील मोठ्या जनावरांची खरेदी विक्री / वाहतूक, बाजार, जत्रा, प्रदर्शन, बैलाच्या शर्यती आयोजित करण्यास पुढील आदेश होईपर्यंत प्रतिबंध घालण्यात आला आहे.

-*-*-*-*-*-*-

जालन्यातील 12 सप्टेंबरचा भरती मेळावा रद्द दि. 17 सप्टेंबर रोजी औरंगाबाद येथे भरती मेळावा

 


 

जालना, दि. 9 (जिमाका) - औद्योगिक प्रशिक्षण संस्था, जालना येथे बीटीआरआय व जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र कार्यालय, जालना यांच्या संयुक्त विद्यमानाने दि.12 सप्टेंबर 2022 रोजी  भरती मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. तथापि संचालक, व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालय यांच्या सुचनेनुसार औद्योगिक प्रशिक्षण संस्था, औरंगाबाद व जालना यांचा दि. 17 सप्टेंबर 2022 रोजी औद्योगिक प्रशिक्षण संस्था, औरंगाबाद येथे एकत्रीत भरती मेळावा असल्यामुळे जालना येथे  दि. 12 सप्टेंबर रोजी आयोजित भरती मेळावा रद्द करण्यात आला आहे.

 हा भरती मेळावा दि. 17 सप्टेंबर 2022 रोजी औद्योगिक प्रशिक्षण संस्था औरंगाबाद (बीटीआरआय) येथे एकत्रीत आयोजित केला आहे. तरी जालना जिल्हयातील सर्व औदयोगिक आस्थापना व प्रशिक्षणार्थी यांनी मेळाव्यात सहभागी होण्यासाठी https://dgt.gov.in/appmela / या लिंकवर रजिस्ट्रेशन करावे, असे आवाहन सहायक प्रशिक्षणार्थी सल्लागार (मुलभूत प्रशिक्षण तथा अनुषंगिक सुचना केंद्र व्दारा औदयोगिक प्रशिक्षण संस्था, जालना) यांनी केले आहे.

-*-*-*-*-*-*-

व्यावसायिक अभ्यासक्रमात प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांना जात प्रमाणपत्र पडताळणीसाठी अर्ज करण्याचे आवाहन

 


जालना, दि. 9  (जिमाका):-    अनुसुचित जाती, विमुक्त जाती, भटक्या जमाती, इतर मागासवर्ग व विशेष मागास प्रवर्गातील जे विदयार्थी सन 2021-22 या वर्षात इयत्ता 12 वी विज्ञान शाखेत शिकत होते व ज्यांना सन 2022-23 या शैक्षणिक वर्षात वैद्यकिय, अभियांत्रिकी, औषधनिर्माणशास्त्र वा तत्सम व्यावसायीक अभ्यासक्रमात प्रवेश घ्यावयाचा आहे, अशा विद्यार्थापैकी ज्या विद्यार्थांनी अद्यापही जात प्रमाणपत्र पडताळणीसाठी अर्ज केले नाहीत अशा विदयार्थांनी तसेच एमबीए, बीएड, एलएलबी, एमसीए, तंत्रनिकेतनच्या तिस-या वर्षात शिकणारे विदयार्थी तसेच ज्या अभ्यासक्रमांचे प्रवेश सामाईक प्रवेश परीक्षेमार्फत (CET)  होतात अशा विद्यार्थांनी ऐनवेळी होणारी धावपळ टाळण्यासाठी जात प्रमाणपत्र पडताळणीचे प्रस्ताव विनाविलंब सादर करावेत.

जात प्रमाणपत्र पडताळणीचे अर्ज https://bartievalidity.maharashtra.gov.in/  या संकेतस्थळावर भरावेत. ऑनलाईन अर्ज भरल्यानंतर त्याची प्रिंटआऊट डाऊनलोड करुन त्यामधील फॉर्म-15A वर संबंधित महाविद्यालयाच्या प्राचार्यांच्या स्वाक्षरीसह ऑनलाईन अर्जाची हार्डकॉपी आवश्यक त्या कागदपत्रांसह समितीकडे तात्काळ दाखल करावी.

तसेच ज्या विद्यार्थांचे जात प्रमाणपत्र पडताळणीचे अर्ज समितीकडे प्रलंबित आहेत व ज्यांना समितीने त्रृटीपत्रे पाठविली आहेत, अशा अर्जदारांनी अर्जातील त्रृटींची पुर्तता करण्यासाठी समिती कार्यालयात प्रत्यक्ष संपर्क करण्याचे आवाहन जिल्हा जाती प्रमाणपत्र समितीचे सदस्य अधिकारी तथा सदस्य सचिव प्रदिप भोगले यांनी  प्रसिध्दीपत्रकाद्वारे केले आहे.  

-*-*-*-*-*-*-

कृषी प्रक्रीया उद्योगातून रोजगार निर्मिती या विषयावर दि. 13 सप्टेंबर, रोजी मोफत वेबीनार

 


       जालना दि. 9 (जिमाका) :- जालना जिल्ह्यातील बेरोजगार उमेदवारांना स्वयंरोजगार करण्याबाबत उद्योजकता जाणिव, प्रेरणा व  मार्गदर्शन होण्यासाठी  चला उद्योजक होऊ या!  या शृंखलेअंतर्गत कृषी प्रक्रीया उद्योगातून रोजगार निर्मिती " या विषयावर मोफत ऑनलाईन मार्गदर्शन कार्यक्रमाचे आयोजन दि. 13 सप्टेंबर2022 मंगळवार रोजी दुपारी 4 वाजता करण्यात आले आहे. सदर कार्यक्रम कार्यालयाच्या https://www.facebook.com/JalnaSkillDevelopment या फेसबुक पेजवरून थेट ऑनलाईन प्रक्षेपित करण्यात येणार आहे. यामध्ये कृषी विज्ञान केंद्र, जालना यांचे शास्त्रज्ञ-अन्न्‍ा तंत्रज्ञान, श्री.शशिकांत पाटील,  हे  मार्गदर्शक ह्या वेबीनारद्वारे मार्गदर्शन करणार आहेत.

 

जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, जालना  आणि थिंक शार्प  फाउंडेशन,  पुणे यांचेसंयुक्त विद्यमाने चला उद्योजक होऊ या! या नाविन्यपुर्ण उद्योजकता अभियानातंर्गत प्रत्येक महिन्यात किमान एकदा, दुस-या आठवडयात साधारणपणे दुस-या मंगळवारी फेसबुक पेजवर  https://www.facebook.com/JalnaSkildevelopment यावरून विनामुल्य ऑनलाईन उद्योजकता मार्गदर्शन वेबिनार शृंखला सुरू करण्यात आलेली आहे.

सदर कार्यक्रम या कार्यालयाचे अधिकृत फेसबूक पेज https://www.facebook.com/ JalnaSkillDevelopment वर थेट लाईव्ह प्रक्षेपित करण्यात येणार आहे. यामध्ये सहभागी होणा-या  युवक युवतीना शेतकरी यांना दालमिल, मोसंबी, आवळा, सिताफळ, आंबा, भाजीपाला व दुग्ध अशा विविध कृषि विषयक उद्योग प्रक्रीया माहिती तसेच कृषि प्रक्रीया उदयोग उभारणीसाठी केंद्र व राज्य शासनाच्या योजनांबाबत तज्ञाकडून मार्गदर्शन करण्यात येणार आहे. या अनुषंगाने सहभागी उमेदवारांना फेसबूक पेजवर कमेंट बॉक्स मध्ये आपले प्रश्न विचारता येतील. याची उत्तरे कार्यक्रमाच्या शेवटी देण्यात येतील. या मार्गदर्शनाचा  लाईव्ह लाभ घेण्यासाठी स्वयंरोजगार ईच्छूक  युवक-युवतीं यांनी या  कार्यालयाच्या  JalnaSkillDevelopment या फेसबूक पेजला फॉलो  करावे आणि लाईव्ह सहभागी व्हावे. या मध्ये काही अडचण आल्यास या कार्यालयाचा दुरध्वनी 02482-299033 अथवा jalnarojgar@gmail.com या  - मेलवर संपर्क  साधावा असे आवाहन सहायक आयुक्त, कौशल्य विकास,रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन  केंद्र, संपत चाटे, यांनी  प्रसिध्दीपत्रकाद्वारे केले आहे.

-*-*-*-*-*-*-

Tuesday 6 September 2022

जालना मोसंबी - भौगोलिक मानांकन जनजागृती, विक्री व्यवस्थापन व भारतीय पोस्टाद्वारे विशेष आवरणाचे मान्यवरांच्या हस्ते विमोचन संपन्न

 


        जालना दि. 6 (जिमाका) :-    जालना मोसंबीच्या अधिकृत वापरकर्त्यांच्या जनजागृतीसाठी राष्ट्रीय कृषि व ग्रामीण विकास बँक (नाबार्ड), बीपीजी बळीराजा (शेतकरी उत्पादक कंपनी), अंतरवाला आणि जालना जिल्हा फळे व मोसंबी बागायतदार संघ यांच्या संयुक्त विद्यमाने कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. भारतीय पोस्टचे विशेष आवरणाचे (लिफाफा) विमोचन देखील करण्यात आले.

            याप्रसंगी  आमदार राजेश टोपे, आमदार कैलास गोरंट्याल, डॉ. प्रदीप पराते उपमहाव्यवस्थापक महाराष्ट्र क्षेत्रीय कार्यालय नाबार्ड पुणे, पोस्ट मास्टर जनरल भारतीय पोस्ट औरंगाबाद क्षेत्रीय कार्यालय आदनान अहमेद, जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी भीमराव रणदिवे, संचालक आयसीटी मराठवाडा कॅम्पस  यु एस अन्नपुरे, प्रकल्प संचालक आत्मा शीतल चव्हाण, भास्कर पडुळ, संचालक बळीराजा (शेतकरी उत्पादक कंपनी) अंतरवाला गणेश पडुळ,  अध्यक्ष  जिल्हा मोसंबी बागायदार संघ पांडुरंग डोंगरे, सचिव जिल्हा मोसंबी बागायतदार संघ अतुल अड्डा शास्त्रज्ञ केव्हीके खरपुडी शशिकांत पाटील,जिल्हा कृषि पणन अधिकारी कृष्णा कापरे, विक्री व्यवस्थापनासाठी विपणन कंपनी, मोसंबी उत्पादक शेतकरी इत्यादी उपस्थित होते.

            कार्यक्रमाचा मुख्य हेतु अधिकाधिक मोसंबी उत्पादक शेतकरी यांना भौगोलिक मानांकित जालना मोसंबीचे वापरकर्ता (ऑथराईज्ड युजर) करण्यासाठी जनजागृती करणे असा होता. त्यासाठी लागणारे कागदपत्रे याबद्दल माहिती देण्यात आली. राष्ट्रीय व जागतिक बाजारपेठेत जालना मोसंबीला एक वेगळे स्थान आहे. त्याच्या प्रसिध्दीसाठी भारतीय पोस्टद्वारा विशेष आवरणाचे विमोचन करुन हे लिफाफे विविध पोस्ट कार्यालयामध्ये विक्रीसाठी उपलब्ध करुन देण्यात येतील असे प्रतिपादन अदनान अहमद यांनी केले.

            राजेश टोपे यांनी मोसंबी बागायतदार संघ व बळीराजा शेतकरी उत्पादक कंपनीच्या उपक्रमाचे कौतुक केले व जालना मोसंबीचे ब्रँडिंग होण्यास व भाव वधारण्यास या माध्यमातुन मदत होईल असे सांगितले.सगळ्या मोसंबी उत्पादक शेतकऱ्यांनी बागायतदार संघ, कृषि विभाग यांच्या सहकार्याने अधिकृत वापरकर्ता व्हावे असेही आवाहन केले. कैलास गोरंट्याल यांनी याप्रसंगी सर्व मोसंबी उत्पादक शेतकरी यांना शुभेच्छा दिल्या व भौगोलिक मानांकनाचा लाभा घ्यावा असे व्यक्त केले.

 

 

जालना मोसंबीचे अधिकृत वापरकर्ते होण्यासाठी मोसंबी उत्पादक शेतकऱ्यांकडुन लागणारे कागदपत्रे

आधार कार्ड, 7/12, जीआय फॉर्म 3 अ (आपल्या शेतकरी उत्पादक कंपनी अथवा कृषि विभाग अथवा  https://ipindia.gov.in  या संकेतस्थळावरुन घ्यावे, स्टेटमेंट ऑफ केस (मोसंबी बागायतदार संघ,कृषि विभाग यांच्याकडुन मिळु शकेल), जालना जिल्हा फळे व मोसंबी बागायतदार संघ यांच्याकडुन नाहरकत प्रमाणपत्र किंवा बागायतदार संघाला अर्जाची एक प्रत द्यावे व मुळ अर्जासोबत जोडावे.अर्ज करण्यासाठी माफक असे रुपये 10 शुल्क आहे. असे सर्व कागदपत्रे प्रत्येकी 20 अर्जदारांचे एकत्रित अर्ज तसेच डिमांड ड्रास्ट, धनादेश (Registar of Geographical  Indications, payable of Chennai या नावे) सोबत स्वत: उत्पादक शेतकऱ्याने किंवा शेतकरी उत्पादक कंपनीने किंवा कृषि विभागाने किंवा मोसंबी उत्पादक संघाने भौगोलिक मानांकन रजिस्ट्री, चेन्नई यांना त्यांच्या पत्राद्वारे पाठवावे. सगळे कागदपत्रे, पत्र व्यवहार इंग्रजी किंवा हिंदी भाषेत बिनचुक करावे. शेतकऱ्यांचे अर्ज दाखल केल्यानंतर भौगोलिक मानांकन रजिस्ट्री, चेन्नई त्याची शहानिशा करुन अधिकृत वापरकर्ता (ऑथराईज्ड युजर) नोंदणी प्रमाणपत्र देऊ करते. या सगळ्यासाठी साधारणत: 4-6 महिने लागतात.

अर्ज पाठविण्यासठी पत्ता :  Geographical Indications Registry Intellectual Property Office Building, G.S.T.Road, Guindy,Chennai-600 032 Phone :044-22502092 Fax : 044-22502090 Email : gir-ipo@nic.in

 अधिकृत वापरकर्त्याला तो नोंदणीकृत असलेल्या वस्तुंच्या संदर्भात भौगोलिक संकेत वापरण्याचे अधिकार आहेत. माहितीसाठी https:// ipindia.gov.in  या संकेतस्थळाला अवश्य भेट द्यावी असे आवाहन जिल्हा विकास व्यवस्थापक नाबार्ड तेजल क्षीरसागर, यांनी केले.

                                                           -*-*-*-*-*-

अपर जिल्हादंडाधिकारी यांचे कलम 37 (1) व (3) अन्वये आदेश जारी

 


 

     जालना दि. 6 (जिमाका) :-   दि. 9 सप्टेंबर 2022 पर्यंत गणेशोत्सव साजरा होणार असुन दि. 9 सप्टेंबर 2022 रोजी गणपती विसर्जन होणार आहे. तसेच दि. 13 सप्टेंबर 2022 रोजी अंगारिका चतुर्थी असल्याने राजुर येथे गणपती मंदिर असल्याने यात्रा भरत असुन या ठिकाणी भाविकांची दर्शनासाठी मोठ्या प्रमाणात गर्दी असते. दि. 17 सप्टेंबर 2022 रोजी मराठवाडा मुक्तीसंग्राम दिन आहे.  सध्या महाराष्ट्रात राजकीय दृष्ट्या सत्ताधारी व विरोधकात एकमेकाविरुध्द आरोप प्रत्यारोप विविध कारणास्तव सुरु आहे. मराठा आरक्षण, ओबीसी आरक्षण मिळावे या मागणीसाठी तसेच शेतक-यांचे विविध मागणीसाठी विविध संघटनांकडून आत्मदहन, उपोषण, धरणे, मोर्चे, निदर्शने, रास्तारोको इत्यादी सर्व प्रकारची आंदोलनात्मक कार्यक्रम घेण्याची शक्तता नाकरता येत नाही. 

        त्यामुळे अपर जिल्हादंडाधिकारी जालना यांना प्राप्त अधिकारानुसार पोलीस अधिनियम 1951 चे कलम 37 (1) अन्वये शासकीय कर्तव्य पार पाडणा-या कर्मचा-यांच्या व्यतिरिक्त इतर कोणतीही व्यक्ती सार्वजनिक ठिकाणी किंवा त्या आसपास शस्त्रे, लाठ्या, सोटे, बंदुके, तलवारी , भाले, चाकु व इतर शरीरास इजा अथवा अपाय करणा-या वस्तु जवळ बाळगणार नाही. तीक्ष्ण पदार्थ अथवा स्फोटके सहज हाताळता येतील अशी घातक वस्तु जवळ बाळगणार नाही. दगड किंवा इतर उपकरणे किंवा प्रवर्तक शस्त्रे गोळा करुन ठेवणार नाही किंवा जवळ बाळगणार नाही. व्यक्तींच्या किंवा समुहाच्या भावना जाणुनबुजुन दुखविण्याचे उद्देशाने असभ्यतेने भाषण म्हणणार नाही, वाद्य वाजविणार नाही, गाणे म्हणणार नाही. व्यक्तींचे किंवा शवाचे किंवा त्याच्या प्रतिकृतीचे प्रदर्शन करणार नाही. आवेषी भाषण, अंगविक्षेप,विडंबनापर नकला करणार नाही  आणि सभ्यता किंवा नितिमत्ता यास बाधा येईल किंवा ज्यामुळे राज्याची सुरक्षितता धोक्यात येईल किंवा कोणतीही वस्तु बाळगणार नाही.

 

   तसेच  अपर जिल्हादंडाधिकारी जालना यांना प्राप्त अधिकारानुसार पोलीस अधिनियम 1951 चे कलम 37 (3) अन्वये  पाच किंवा अधिक व्यक्तींना जमण्यास किंवा सभा, मिरवणुका, मोर्चा काढण्यास मनाई केली आहे.   

 

हा आदेश कामावरील कोणताही ‍ अधिकारी किंवा कर्मचारी यांना लागु होणार नाही.  तसेच विवाह, अंत्ययात्रा आणि पोलीस अधिक्षक जालना व उपविभागीय पोलीस अधिकारी जालना, अंबड, परतुर, भोकरदन यांनी विशेषरित्या परवानगी दिलेल्या मिरवणुका, सभा, मोर्चा यांना लागु राहणार नाही.

       हा आदेश संपुर्ण जिल्ह्यासाठी  दि. 19 सप्टेंबर 2022  रोजीचे रात्री 12.00 वाजेपर्यंत अंमलात राहील.

-*-*-*-*-*-

Friday 2 September 2022

प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेचा निरंतर लाभ मिळण्यासाठी बँक खाते आधार क्रमांकाशी संलग्नीकरण तसेच योजनेचे ई- केवायसी करण्याचे आवाहन

 


 

जालना, दि. 2 (जिमाका) :- जिल्ह्यातील सर्व प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत लाभार्थ्यांचे आपल्या आधार क्रमांकाशी संलग्न बँक खात्यामध्ये अनुदान वितरीत होण्यासाठी लवकरच प्रारंभ होणार आहे. याशिवाय सर्व पात्र लाभार्थ्यांना ऑगस्ट 2022 पासुन योजनेच्या पुढील लाभाचे हफ्ते निरंतर मिळविण्याकरीता ई- केवायसीची प्रक्रिया बंधनकारक करण्यात आली आहे.

याकरीता प्रधानमंत्री किसान सन्मान निधी (पीएम किसान ) https://pmkisan.gov.in या वेबसाईटवरील फार्मर कॉर्नर या टॅबमध्ये किंवा पी.एम. किसान अॅपव्दारे ओटीपीव्दारे लाभार्थीना स्वतः ई - केवायसी प्रमाणीकरण मोफत करता येईल.

ग्राहक सेवा  (सीएससी) केंद्रावर ई - केवायसी प्रमाणीकरण बायोमॅट्रिक पध्दतीने करता येईल. केंद्र शासनाकडुन ग्राहक सेवा केंद्र (सीएससी) केंद्रावर बायोमॅट्रिक पध्दतीने केवायसी प्रमाणीकरण करण्यासाठी प्रती लाभार्थी प्रती बायोमॅट्रिक प्रमाणीकरण दर रुपये 15 फक्त निश्चित करण्यात आला आहे.

पी.एम. किसान योजनेअंतर्गत सर्व पात्र लाभार्थ्यांना पुढील ऑगस्ट- नोव्हेंबर 2022 या कालावधीची लाभ प्राप्त होण्यापुर्वी ई - केवायसी  प्रमाणीकरण प्रक्रिया बंधनकारक करण्यात आली आहे.

प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना अंतर्गत जालना जिल्हयातील आधार प्रमाणित एकुण 3 लाख 54 हजार 321 लाभार्थ्यांपैकी 2 लाख 39 हजार 044 लाभार्थ्यांचे ई - केवायसी  प्रमाणिकरण पुर्ण झाले आहे. तसेच उर्वरित 1 लाख 15 हजार 277 लाभार्थ्यांचे ई - केवायसी  प्रमाणीकरण करणे आवश्यक आहे. योजनेसंदर्भात लाभार्थ्यांच्या सोयीसाठी आणि या योजनेचा निरंतर लाभ मिळण्यासाठी वरील दोन्ही बाबींची पुर्तता करण्याचे आवाहन निवासी उपजिल्हाधिकारी तथा नोडल अधिकारी (प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना) केशव नेटके यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे केले आहे.                                                        

-*-*-*-*-*-*-.


भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे इंदू मिल येथील आंतरराष्ट्रीय दर्जाच्या स्मारक स्ट्रक्चरमध्ये नवीन सूचना नोंदविण्यासाठी समितीबाबत आवाहन

 


 

जालना,दि. 2 (जिमाका):- भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे इंदू मिल येथील आंतरराष्ट्रीय दर्जाच्या स्मारक  स्ट्रक्चरमध्ये कोणताही बदल न करता संशोधन केंद्र, व्याख्यान वर्ग, ग्रंथालय, ध्यानकेंद्र व प्रेक्षकगृह इ.मध्ये काही नवीन सूचना मिळण्याकरीता समाजातून तज्ञ व्यक्ती तथा जाणकार व्यक्तींची समिती गठीत करणे आवश्यक आहे. त्यासाठी महाराष्ट्रातील सर्व विभागामधुन विविध क्षेत्रातील किमान 50 व्यक्तींची नावे कळविण्याबाबत निर्देश आहेत. त्यानुषंगाने विविध क्षेत्रातील अनुभवी, तज्ञ तथा जाणकार व्यक्तींनी त्यांचेकडील असलेल्या अनुभवाबाबत, माहितीबाबतचा अहवाल  सहायक आयुक्त, समाज कल्याण अधिकारी कार्यालयास दि. 12 सप्टेंबर 2022 पर्यंत सादर करावा, जेणेकरुन आपली नावे शासनास पाठवता येतील, असे आवाहन सहायक आयुक्त, समाज कल्याण अधिकारी, यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे केले आहे.                                                                            

                                                        -*-*-*-*-*-

नारी शक्ती पुरस्कारासाठी ऑनलाईन प्रस्ताव सादर करण्याचे आवाहन

 जालना, दि. 2 (जिमाका) :-केंद्र शासनाच्या महिला व बाल विकास मंत्रालया मार्फत महिला व बाल विकास क्षेत्रात उल्लेखनिय कामगिरी करणाऱ्या महिला, स्वयंसेवी संस्था, सार्वजनिक क्षेत्रातील उद्योग इत्यादीना नारी / स्त्री शक्ती पुरस्कार दिला जाणार आहे.

शासनाच्या मार्गदर्शक सुचना नुसार पात्रतेचे निकष खालील प्रमाणे आहेत.

व्यक्तीगत पुरस्काराकरीता पात्र इच्छुक महिलांचे दि. 1 जुलै 2022 रोजी किमान वय 25 वर्ष असावे. महिला, संस्थांना महिलांशी संबंधीत क्षेत्रातील उल्लेखनिय कामाचा अनुभव असावा. अर्जदारांना यापुर्वी केंद्र शासनाचे नारी शक्ती वा तत्सम पुरस्कार मिळालेले नसावेत. केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सुचनानुसार महिलांसाठी विशेष कार्य करणाऱ्या महिलांना, संस्थाना 8 मार्च रोजी जागतिक महिला दिनी नारी शक्ती पुरस्कार दिला जाणार आहे.

पात्रता व अटी, शर्ती पुरस्कारासाठी नियमावली व निकष केंद्र शासनाचे वेबसाईट www.wcd.nic.in यावर उपलब्ध आहेत. नारी शक्ती पुरस्कार हे 8 मार्च 2023 रोजी जागतिक महिला दिनी नवी दिल्ली येथे वितरीत करण्यात येणार आहे.

सदर पुरस्कारासाठी पात्र महिला, कार्यकर्त्या व स्वयंसेवी संस्था, सार्वजनिक क्षेत्रातील उद्योग ई. यांचे कडून ऑनलाईन पध्दतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. शासन पत्रात नमुद मार्गदर्शक सुचनेनुसार नारी शक्ती पुरस्कारासाठी अर्जदारांनी, अर्ज, नामनिर्देशन योग्य त्या कागद पत्रासह केवळ ऑनलाईन पध्दतीने केंद्र शासनाचे वेबसाईट www.awards.gov.in यावर भरावयाचे आहेत. केवळ ऑनलाईन अर्जच स्विकारल जाणार आहेत. अर्ज,नामनिर्देशन भरण्याची अंतिम तारिख दि. 31 ऑक्टोबर 2022 आहे.

तरी इच्छुक महिलांनी नोंद घ्यावी असे आवाहन जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी करीत आहेत. संपर्कासाठी दुरध्वनी क्रं. 02482-224711. अशी माहिती जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे दिली आहे.                                                   -*-*-*-*-*-