Friday 9 September 2022

लम्पी स्कीन आजाराचा संसर्ग; मौजे कुंबेफळ, मौजे जामखेड, मौजे वरुड येथील भाग बाधित क्षेत्र व निगराणी क्षेत्र म्हणून घोषित

 


 

            जालना, दि. 9 (जिमाका) - सहाय्यक आयुक्त पशुसंवर्धन, रोग अन्वेषण विभाग, औंध, पुणे यांच्या अहवालानुसार जालना जिल्हयातील मौजे कुंबेफळ, तालुका जालना, मौजे जामखेड ता. अंबड आणि मौजे वरुड ता. भोकरदन या गावामधील लम्पी स्कीन डीसीज रोगाचे रोग नमुने सकारात्मक आलेले आहेत. त्यामुळे त्या ठिकाणी लम्पी डीसीज रोगाचा प्रादुर्भाव झाल्याचे निदर्शनास आलेले आहे. त्यामुळे प्राण्यांमधील संक्रमण व संसर्गिक रोग प्रतिबंधक व नियंत्रण अधिनियम 2009 अन्वये जिल्ह्यातील बाधित व अबाधित पशुधनास आवश्यकतेनुसार प्रतिबंधात्मक लसीकरण करणे बंधनकारक आहे व जनावरांच्या वाहतुकीस व विक्रीस प्रतिबंध करणे आवश्यक आहे.

त्यानुसार जिल्हाधिकारी तथा अध्यक्ष (जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण, जालना)  डॉ. विजय राठोड यांनी प्राण्यांमधील संक्रमण व संसर्गिक रोग प्रतिबंधक नियंत्रण अधिनियम 2009 नियम 12 नुसार प्राप्त अधिकारान्वये जालना जिल्ह्यातील मौजे कुंबेफळ, तालुका जालना, मौजे जामखेड ता. अंबड आणि मौजे वरुड ता. भोकरदन येथील जनावरांच्या संसर्ग केंद्रापासून 5 किलोमीटर बाधित क्षेत्र व 10 किलोमीटर निगराणी क्षेत्र घोषित  केले आहे. तसेच सदर गावापासून बाधीत व निगराणी क्षेत्रामधील मोठ्या जनावरांची खरेदी विक्री / वाहतूक, बाजार, जत्रा, प्रदर्शन, बैलाच्या शर्यती आयोजित करण्यास पुढील आदेश होईपर्यंत प्रतिबंध घालण्यात आला आहे.

-*-*-*-*-*-*-

No comments:

Post a Comment