Tuesday 6 September 2022

जालना मोसंबी - भौगोलिक मानांकन जनजागृती, विक्री व्यवस्थापन व भारतीय पोस्टाद्वारे विशेष आवरणाचे मान्यवरांच्या हस्ते विमोचन संपन्न

 


        जालना दि. 6 (जिमाका) :-    जालना मोसंबीच्या अधिकृत वापरकर्त्यांच्या जनजागृतीसाठी राष्ट्रीय कृषि व ग्रामीण विकास बँक (नाबार्ड), बीपीजी बळीराजा (शेतकरी उत्पादक कंपनी), अंतरवाला आणि जालना जिल्हा फळे व मोसंबी बागायतदार संघ यांच्या संयुक्त विद्यमाने कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. भारतीय पोस्टचे विशेष आवरणाचे (लिफाफा) विमोचन देखील करण्यात आले.

            याप्रसंगी  आमदार राजेश टोपे, आमदार कैलास गोरंट्याल, डॉ. प्रदीप पराते उपमहाव्यवस्थापक महाराष्ट्र क्षेत्रीय कार्यालय नाबार्ड पुणे, पोस्ट मास्टर जनरल भारतीय पोस्ट औरंगाबाद क्षेत्रीय कार्यालय आदनान अहमेद, जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी भीमराव रणदिवे, संचालक आयसीटी मराठवाडा कॅम्पस  यु एस अन्नपुरे, प्रकल्प संचालक आत्मा शीतल चव्हाण, भास्कर पडुळ, संचालक बळीराजा (शेतकरी उत्पादक कंपनी) अंतरवाला गणेश पडुळ,  अध्यक्ष  जिल्हा मोसंबी बागायदार संघ पांडुरंग डोंगरे, सचिव जिल्हा मोसंबी बागायतदार संघ अतुल अड्डा शास्त्रज्ञ केव्हीके खरपुडी शशिकांत पाटील,जिल्हा कृषि पणन अधिकारी कृष्णा कापरे, विक्री व्यवस्थापनासाठी विपणन कंपनी, मोसंबी उत्पादक शेतकरी इत्यादी उपस्थित होते.

            कार्यक्रमाचा मुख्य हेतु अधिकाधिक मोसंबी उत्पादक शेतकरी यांना भौगोलिक मानांकित जालना मोसंबीचे वापरकर्ता (ऑथराईज्ड युजर) करण्यासाठी जनजागृती करणे असा होता. त्यासाठी लागणारे कागदपत्रे याबद्दल माहिती देण्यात आली. राष्ट्रीय व जागतिक बाजारपेठेत जालना मोसंबीला एक वेगळे स्थान आहे. त्याच्या प्रसिध्दीसाठी भारतीय पोस्टद्वारा विशेष आवरणाचे विमोचन करुन हे लिफाफे विविध पोस्ट कार्यालयामध्ये विक्रीसाठी उपलब्ध करुन देण्यात येतील असे प्रतिपादन अदनान अहमद यांनी केले.

            राजेश टोपे यांनी मोसंबी बागायतदार संघ व बळीराजा शेतकरी उत्पादक कंपनीच्या उपक्रमाचे कौतुक केले व जालना मोसंबीचे ब्रँडिंग होण्यास व भाव वधारण्यास या माध्यमातुन मदत होईल असे सांगितले.सगळ्या मोसंबी उत्पादक शेतकऱ्यांनी बागायतदार संघ, कृषि विभाग यांच्या सहकार्याने अधिकृत वापरकर्ता व्हावे असेही आवाहन केले. कैलास गोरंट्याल यांनी याप्रसंगी सर्व मोसंबी उत्पादक शेतकरी यांना शुभेच्छा दिल्या व भौगोलिक मानांकनाचा लाभा घ्यावा असे व्यक्त केले.

 

 

जालना मोसंबीचे अधिकृत वापरकर्ते होण्यासाठी मोसंबी उत्पादक शेतकऱ्यांकडुन लागणारे कागदपत्रे

आधार कार्ड, 7/12, जीआय फॉर्म 3 अ (आपल्या शेतकरी उत्पादक कंपनी अथवा कृषि विभाग अथवा  https://ipindia.gov.in  या संकेतस्थळावरुन घ्यावे, स्टेटमेंट ऑफ केस (मोसंबी बागायतदार संघ,कृषि विभाग यांच्याकडुन मिळु शकेल), जालना जिल्हा फळे व मोसंबी बागायतदार संघ यांच्याकडुन नाहरकत प्रमाणपत्र किंवा बागायतदार संघाला अर्जाची एक प्रत द्यावे व मुळ अर्जासोबत जोडावे.अर्ज करण्यासाठी माफक असे रुपये 10 शुल्क आहे. असे सर्व कागदपत्रे प्रत्येकी 20 अर्जदारांचे एकत्रित अर्ज तसेच डिमांड ड्रास्ट, धनादेश (Registar of Geographical  Indications, payable of Chennai या नावे) सोबत स्वत: उत्पादक शेतकऱ्याने किंवा शेतकरी उत्पादक कंपनीने किंवा कृषि विभागाने किंवा मोसंबी उत्पादक संघाने भौगोलिक मानांकन रजिस्ट्री, चेन्नई यांना त्यांच्या पत्राद्वारे पाठवावे. सगळे कागदपत्रे, पत्र व्यवहार इंग्रजी किंवा हिंदी भाषेत बिनचुक करावे. शेतकऱ्यांचे अर्ज दाखल केल्यानंतर भौगोलिक मानांकन रजिस्ट्री, चेन्नई त्याची शहानिशा करुन अधिकृत वापरकर्ता (ऑथराईज्ड युजर) नोंदणी प्रमाणपत्र देऊ करते. या सगळ्यासाठी साधारणत: 4-6 महिने लागतात.

अर्ज पाठविण्यासठी पत्ता :  Geographical Indications Registry Intellectual Property Office Building, G.S.T.Road, Guindy,Chennai-600 032 Phone :044-22502092 Fax : 044-22502090 Email : gir-ipo@nic.in

 अधिकृत वापरकर्त्याला तो नोंदणीकृत असलेल्या वस्तुंच्या संदर्भात भौगोलिक संकेत वापरण्याचे अधिकार आहेत. माहितीसाठी https:// ipindia.gov.in  या संकेतस्थळाला अवश्य भेट द्यावी असे आवाहन जिल्हा विकास व्यवस्थापक नाबार्ड तेजल क्षीरसागर, यांनी केले.

                                                           -*-*-*-*-*-

No comments:

Post a Comment