Wednesday 18 October 2017

शेतकऱ्यांच्या शेतीला शाश्वत पाणी व वीजेचा पुरवठा करुन उत्पादन वाढीवर भर देणार -पालकमंत्री बबनराव लोणीकर



शेतकऱ्यांच्या शेतीला शाश्वत पाणी व वीजेचा पुरवठा करुन उत्पादन वाढीवर भर देणार
n  पालकमंत्री बबनराव लोणीकर
कर्जमाफीसाठी पात्र शेतकऱ्यांना पालकमंत्र्यांच्या हस्ते प्रमाणपत्र देऊन शुभारंभ
जालना, दि. 18 :- जलयुक्त शिवार अभियानाच्या माध्यमातुन शेतकऱ्यांच्या शेतीला शाश्वत पाणी व शाश्वत वीज देऊन शेतकऱ्यांचे उत्पादन वाढीवर भर देण्यात येणार असल्याचे प्रतिपादन राज्याचे पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री बबनराव लोणीकर यांनी केले.
जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात आयोजित छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेच्या कर्जमुक्ती प्रारंभ कार्यक्रमात शेतकऱ्यांशी संवाद साधतांना पालकमंत्री श्री लोणीकर बोलत होते.
यावेळी आमदार नारायण कुचे, आमदार संतोष दानवे, माजी आमदार अरविंद चव्हाण, माजी आमदार विलासबापू खरात, भास्कर दानवे, सिद्धीविनायक मुळे, देविदास देशमुख, सुभाष राठोड, जिल्हाधिकारी शिवाजी जोंधळे आदींची व्यासपीठावर उपस्थिती होती.
यावेळी  पालकमंत्री श्री लोणीकर म्हणाले की, राज्यावर 3 लाख 86 हजार कोटी रुपयांचे कर्ज असतानासुद्धा राज्य शासनाने देशातील सर्वात मोठी कर्जमाफी केली आहे.  विविध योजनेच्या माध्यमातुन शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढीवर भर देण्यात येत असुन जलयुक्त शिवार अभियानाच्या माध्यमातुन गेल्या दोन वर्षात जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात सिंचनाची कामे करण्यात आली आहेत.  यांत्रिकी विभागाकडे असलेल्या मशिनरी जालना जिल्ह्यात आणुन समानतेने जलयुक्तची कामे करण्यात आली आहेत.  राज्यात जलयुक्त शिवार अभियानाच्या माध्यमातुन 11 हजार नद्यांचे खोलीकरण करण्यात आले असुन शेतीव्यवसायामध्ये यापूर्वी गुंतवणुक होत नव्हती.  परंतू राज्य शासनाने ही गुंतवणुक 26 हजार कोटी रुपयांपर्यंत केली असुन शेतीला जोडंधदे म्हणुन कुक्कुटपालन, शेळी पालन, दुग्ध व्यवसाय या  माध्यमातुन शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढीवर भर देण्यात येत असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.
जिल्ह्यातील जनतेसह शेतकऱ्यांच्या शेतीपंपाला योग्य दाबाने वीजेचा पुरवठा व्हावा यासाठी जिल्ह्यात विजेचे जाळे निर्माण करण्यात येत असुन जिल्ह्यात 33 के.व्ही. चे 49 केंद्रे मंजुर असुन त्यापैकी 19 उपकेंद्राच्या निविदा होऊन कामे सुरु होत आहेत तर 220 के.व्ही. जालना व परतूर येथे पुर्ण क्षमेतेने केंद्र कार्यरत असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.
दलित समाजाच्या विकासासाठी असलेल्या निधीचा वापर या कर्जमाफीसाठी करण्यात येणार असल्याच्या अफवा समाजामध्ये पसरवल्या जात असुन दलित समाजाच्या विकासासाठी असलेल्या निधीतून एकही पैसा यासाठी वापरला जाणार नसल्याचेही पालकमंत्री श्री लोणीकर यांनी यावेळी स्पष्ट केले.
यावेळी कर्जमाफीसाठी पात्र असलेल्या लक्ष्मण परिहार, भगवान जाधव, श्रीमती कावेराबाई फकीरबा परिहार, श्रीमती रुखमीनी प्रल्हाद सोसे, विजयमाला सोसे, लिलावती दादाराव मोरे, महानंदा उत्तमराव घुगरगे, शांताबाई किसन बहेर, पठाण लालाभाई रहिम, रंजित लक्ष्मण शेलुटे, दत्तू पेढणे, सोनानी जनाजी हिवाळे, मिराबाई बालासिंग चाँदा, आसराबाई शेषराव जाधव, सुभद्राबाई गेणू खरात, कौसल्याबाई भाऊसाहेब ढगे, विश्वनाथ कोचट, इंदीराबाई उमाजी गवारे, सुमनबाई आसाराम बोनगे, तुळशिराम साने, सुखदेव दाभाडे, लिलाबाई भगवान ठोंबरे, पार्वताबाई खंडू सहाने, जाफरबेग अहमदबेग मिर्झा, लताबाई अशोक गाढे या   शेतकऱ्यांचा पालकमंत्र्यांच्या हस्ते प्रातिनिधीक स्वरुपात प्रमाणपत्राचे वितरण करण्यात आले.
यावेळी आमदार संतोष दानवे, आमदार नारायण कुचे, जिल्हाधिकारी शिवाजी जोंधळे यांनीही मनोगत व्यक्त केले. प्रारंभी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक जिल्हा उपनिबंधक एन.व्ही.आघाव यांनी केले.  कार्यक्रमास व्ही.पी.रोडगे, डॉ. ए.बी. काशिकर, संजय देवरे, बी.टी. भोजने, पी.एच. बेरा, श्रीमती प्रेरणा शिवदास, श्रीमती ए.एम शहा, शरद तनपुरे, प्रशांत गावंडे, महेश जयरंगे, प्रदीप मघाडे, पी.आर.मोताळे, एस.जी.जडे, सुहास साळवे, गोपी चन्नू, कृष्णा कानडे, श्री. बावस्कर  यांच्यासह पदाधिकारी, अधिकारी व शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
***-***




Monday 16 October 2017

गटशेतीमुळे शेतकऱ्यांच्या जिवनात परिवर्तन - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस



गटशेतीमुळे शेतकऱ्यांच्या जिवनात परिवर्तन
-         मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
‘ड्राय पोर्ट’मुळे होणार निर्यातीत वाढ
18 तारखेपासून कापूस खरेदी
-          
       जालना,दि.16  गटशेतीमुळे शेती क्षेत्र मोठया प्रमाणात उपलब्ध झाल्यामुळे विविध प्रकारचे पिक घेता येते. तंत्रज्ञानासह  यांत्रिकीचा वापर करता येत असल्याने उत्पादनात आणि पर्यायाने उत्पनात वाढ होते परिणामी गटशेती शेतकऱ्यांच्या जिवनात परिर्वन घडवून आणत असल्याचे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.
          देळेगव्हाण येथे ॲग्रो इंडिया गटशेती संघ पुरस्कृत इंडिको फॉर्मर प्रोडयुसर कंपनी आयोजित 146 व्या द्वादश मेळाव्यात मुख्यमंत्री बोलत होते. यावेळी जालना जिल्हयाचे पालकमंत्री बबनराव लोणीकर, प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे, सर्वश्री आमदार संतोष दानवे, नारायण कुचे, विभागीय आयुक्त डॉ. पुरुषोत्तम भापकर, नांदेड परिक्षेत्राचे पोलीस महानिरीक्षक चिरंजीव प्रसाद, जिल्हाधिकारी शिवाजी जोंधळे, मुख्य कार्यकारी अधिकारी दीपक चौधरी, गटशेतीचे प्रणेते डॉ. भगवानराव कापसे उप विभागीय अभियंता ल.सि.(जलसंधारण) उपविभाग भोकरदनचे आर.के.जाधव, कार्यकारी अभियंता ल.सि.(जलसंधारण) जालना विभागाचे एस.डी.डोणगांवकर, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी दशरथ तांभाळे आदी उपस्थित होते. 
          पुढे मुख्यमंत्री म्हणाले की, शेतीची उत्पादकता कमी होत आहे कारण शेतीचे लहान-लहान तुकडे होत गेल्याने शेतीमधील गुंतवणूक कमी झाली, यांत्रिकीचा वापर करणे अवघड झाले परिणामी शेतकरी कर्जबाजारी झाला यावर गटशेती सारखा पर्याय नसल्याचे सांगूण मुख्यमंत्री म्हणाले की, देळेगव्हाण येथील गटशेती पाहुन मनस्वी आंनद झाला. शासनाने तयार केलेल्या गटशेतीच्या मॉडलमध्ये देळेगव्हाणच योगदान महत्वपूर्ण आहे. गटशेती धोरणाअंतर्गत 200 कोटीचा निधी उपलब्ध करुन देण्यात आला असून शेतकऱ्यांच्या जीवनात परिर्वत आणणार असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.
          जलयुक्त शिवार योजनेविषयी बोलतांना मुख्यमंत्री म्हणाले की या योजनेअंतर्गत राज्यात अनेक कामे झाले असून 11 हजार गावांना लागणारे पिण्याचे टँकर कायमस्वरुपी बंद झाले. ज्या ठिकाणी केवळ खरीपाचे पीक घेतल्या जात होते त्या ठिकाणी शेतकरी आता रब्बी चेही पिक घेत असल्याचे सांगत मुख्यमंत्री म्हणाले की, समृध्दी महामार्गामुळे शेतकऱ्यांचा माल जे.एन.पी.टी. बंदरापर्यत  कमी वेळेत पोहचता येणार आहे. या महामार्गामध्ये कोल्डचेईन उभारण्यात येणार असल्यामुळे नाशवंत फळांसाठी याचा फायदा होणार आहे. जालना जिल्हयात होणाऱ्या ‘ड्राय पोर्ट’मुळे निर्यातीत वाढ होणार असल्याचेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले.
          कर्जमाफी विषयी बोलतांना मुख्यमंत्री म्हणाले शेतकऱ्यांना कर्ज माफी देण्याच्या शासन निर्णयाची अमलबजावणी सुरु आहे. 18  ऑक्टोबर, 2017 पासून कर्जमाफीचा पहिला हफ्ता शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करण्यात येणार आहे. या कर्जमाफीचा फायदा राज्यातील गरजू शेतकऱ्यांना होणार आहे. तसेच 18 तारखेपासून कापूस खरेदी सुरु करण्यात येणार असून शेतकऱ्यांनी हमी भावापेक्षा कमी भावात व्यापाऱ्यांना कापूस विक्री करु नये. शासनाच्या केंद्रावर हमीभापेक्षा निश्चितच जास्त भाव शेतकऱ्यांना मिळणार असल्याचे मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितले.
          या प्रसंगी पालकमंत्री बबनराव लोणीकर, प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे, गटशेतीचे प्रणेते डॉ. भगवानराव कापसे यांनी आपले विचार मांडले.
          या कार्यक्रमापुर्वी राज्य शासनाच्या नदी पुनरोज्जीवन योजनेअंतर्गत जाफ्राबाद तालुक्यातील देळेगव्हाण येथील जीवनरेखा नदीवर बांधण्यात आलेल्या बंधाऱ्याचे जलपूजन व लोकार्पण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते झाले. तसेच मा. मुख्यमंत्री महोदयांच्या हस्ते राजूर ते चिखली या राष्ट्रीय महामार्गाचे भुमीपूजन, गटशेती शिवार पाहणी तसेच जलपूजनाचा कार्यक्रम मुख्यमंत्री महोदयांच्या हस्ते पार पडला. यावेळी तालुक्यातील पदाधिकारी आणि ग्रामस्थ उपस्थित होते.
***-***




जालना शहराचा सर्वतोपरी विकास करण्यासाठी शासन कटिबद्ध – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस



जालना शहराचा सर्वतोपरी विकास करण्यासाठी
शासन कटिबद्ध – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
           जालना, दि. 16 – गेल्या तीन वर्षात जालना जिल्ह्यासह शहराचा सर्वतोपरी विकास करण्यासाठी शासनाने प्राधान्य दिले असुन येणाऱ्या काळात जालना जिल्ह्याचा अधिक चांगल्या पद्धतीने विकास करण्यासाठी शासन कटिबद्ध असल्याचे प्रतिपादन राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.
          शहरातील वृंदावन हॉल येथे सिमेंट रस्त्याचे लोकार्पण व विकास परिषद टप्पा-2 कार्यक्रमप्रसंगी मार्गदर्शन करताना मुख्यमंत्री श्री फडणवीस बोलत होते.
          यावेळी राज्याचे पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री बबनराव लोणीकर, राज्यमंत्री अर्जुनराव खोतकर, खासदार रावसाहेब दानवे, आमदार नारायण कुचे, आमदार राजेश टोपे, माजी आमदार संतोष सांबरे, कैलास गोरंट्याल, जिल्हा परिषदेचे अध्यक्ष अनिरुद्ध खोतकर, नगराध्यक्ष संगीता गोरंट्याल, रसायन तंत्रज्ञान विभागाचे कुलगुरु पद्मश्री जे.डी. यादव, भास्कर आंबेकर, माजी आमदार अरविंद चव्हाण, उद्योगपती सुनिल रायठठ्ठा, महेश शिवणकर, मनोज पांगरकर, किशोर अग्रवाल, राजु बारवाले, सुनिल आर्दड, रामेश्वर पाटील भांदरगे, जिल्हाधिकारी शिवाजी जोंधळे, आदींची उपस्थिती होती.
          मुख्यमंत्री श्री फडणवीस म्हणाले की, जालना जिल्ह्यासह शहराचा रस्तेविकास, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था, भुयारी गटार योजना यासारख्या योजनांसाठी मोठ्या प्रमाणात निधी उपलब्ध करुन देण्यात आला आहे. जिल्ह्यात रस्तेविकासासाठी जवळपास साडेपाच हजार कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करुन देण्यात आला असुन या माध्यमातुन जिल्ह्यात रस्त्यांचे जाळे मजबुत करण्यात येत आहे.  शहरात उड्डाणपुल तसेच जालना शहरासाठी आवश्यक असलेल्या बाह्यवळण रस्त्याचा प्रश्नही तातडीने मार्गी लावण्यासाठी आवश्यक ते सर्व प्रयत्न करण्यात येतील, असेही मुख्यमंत्री श्री फडणवीस यांनी यावेळी सांगितले.
          आयसीटी सारखी इन्स्टीट्युट जालना शहरामध्ये होत आहे.  या संस्थेच्या माध्यमातुन देण्यात येणारे शिक्षण हे रोजगाराभिमुख असुन शेतीपुरक उद्योग, केमिकल टेक्नॉलॉजी, पर्यावरण, अपारंपरिक ऊर्जास्त्रोत यासाठी संशोधन व मनुष्यबळ निर्मितीचे काम हे या संस्थेच्या माध्यमातुन होणार आहे.  या संस्थेतुन शिक्षण घेतलेला विद्यार्थी बेरोजगार राहणार नाही असा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला.
          औरंगाबाद येथे असलेल्या डीएमआयसीचा सर्वांत जास्त फायदा औरंगाबाद व जालना शहराला होणार आहे.  डिसेंबर, 2018 पर्यंत शेंद्रा-बिडकीन येथे इंडस्ट्रीयल स्मार्ट सिटीचा पहिला फेज पूर्ण करण्यात येणार आहे.  या ठिकाणी इन्फ्रास्ट्रक्चर उभारणी झाल्यास अनेक उद्योगधंदे  या ठिकाणी येणार आहेत.  जालना जिल्हा ही औद्योगिकनगरी असुन याला चांगली कनेक्टीव्हीटी देण्याबरोबरच चांगल्या दर्जाचे इन्फ्रास्ट्रक्चर उभारणीची गरज असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.
          जालना शहरापासुन जवळच असलेल्या दरेगाव परिसरात ड्रायपोर्टची उभारणी करण्यात येत आहे.  या ड्रायपोर्टमुळे मराठवाड्यातील शेतकऱ्यांसह उद्योजकांनी उत्पादित केलेल्या मालाला आंतराष्ट्रीय बाजारपेठेत चांगला भाव मिळण्याबरोबरच बेरोजगारांच्या हाताला मोठ्या प्रमाणात काम मिळणार आहे. तसेच 40 हजार लोकांना रोजगार देण्याची क्षमता असलेल्या सीडस पार्कचीही उभारणी जालना जिल्ह्यात होत आहे.  येणाऱ्या काळात जिल्ह्याचा अधिक गतीने विकास करण्यासाठी आपण कटिबद्ध असल्याचेही मुख्यमंत्री श्री फडणवीस यांनी यावेळी सांगितले.
          शेतकऱ्यांना कर्जापासुन माफी देण्याचा शासनाने निर्णय घेऊन येत्या 18 तारखेपासुन कर्जमाफीचा पहिला हफ्ता शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करण्यात येणार आहे. या कर्जमाफीचा फायदा राज्यातील गरजु शेतकऱ्यांना होणार असल्याची माहितीही मुख्यमंत्री  देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी दिली.
          राज्यमंत्री श्री खोतकर म्हणाले की, गतीमान शासन व गतीमान विकास या माध्यमातुन जालना जिल्ह्यातील शहरी भागाबरोबरच ग्रामीण भागाचा विकास मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वाखाली करण्यात येत आहे.  जालना जिल्ह्याच्या विकासासाठी मांडलेल्या सर्व मागण्या मुख्यमंत्री मान्य करतील असा विश्वास असल्याचे सांगत जालना येथे सिडकोचा प्रकल्प व्हावा, अशी मागणीही त्यांनी यावेळी केली.
          खासदार रावसाहेब दानवे म्हणाले की, जालना हे व्यापारी शहर आहे.  व्यापारीकरणासाठी आवश्यक असलेल्या सर्व सोयी-सुविधा उपलब्ध करुन देण्याचा गेल्या दोन वर्षात प्रयत्न करण्यात आला.  ड्रायपोर्ट प्रकल्, सीडस पार्क, रसायन तंत्रज्ञान विद्यालय यासारखे अनेकविध जिल्ह्यासाठी मंजुर करण्यात आले असुन या माध्यमामुन रोजगार वाढीबरोबरच बेरोजगारांच्या हाताला मोठ्या प्रमाणात काम मिळणार असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.
          रसायन तंत्रज्ञान विभागाचे कुलगुरु जे.डी यादव म्हणाले की, रसायन तंत्रज्ञान महाविद्यालयाची उभारणी 200 एकर जागेवर जालना येथे करण्यात येत असुन या मुंबई येथे असलेल्या या महाविद्यालयाने 500 पेक्षा अधिक उद्योगपती निर्माण केले असल्याचे त्यांनी यावेळी सांगुन महाविद्यालय स्थापनेबाबत एलसीडी द्वारे माहिती दिली.
          प्रांरभी मुख्यमंत्र्यांच्या हस्ते सिमेंट रस्त्याच्या कोनशिलेचे अनावरण करण्यात येऊन वृंदावन हॉल येथे दीपप्रज्वलनाने विकास परिषद कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. कार्यक्रमास प्रतिष्ठित नागरिक, उद्योगपती, पदाधिकारी, मोठ्या संख्येने उपस्थित होते.
*******



कर्जमाफीचा पहिला हफ्ता 18 ऑक्टोबरपासून शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करणार –मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस



कर्जमाफीचा पहिला हफ्ता 18 ऑक्टोबरपासून
शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करणार
                               –मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
           जालना, दि. 16 :- शेतकऱ्यांना कर्ज माफी देण्याच्या शासन निर्णयाची अमलबजावणी सुरु आहे. 18  ऑक्टोबर, 2017 पासून कर्जमाफीचा पहिला हफ्ता शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करण्यात येणार आहे. या कर्जमाफीचा फायदा राज्यातील गरजू शेतकऱ्यांना होणार असल्याची माहिती राज्याचे मुख्यमंत्री  देवेंद्र फडणवीस यांनी आज येथे दिली .
          जालना तालुक्यातील कडवंची या गावातील सिमेंट नालाबंधाऱ्याची पहाणी व जलपूजन मुख्यमंत्री श्री फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आले.  त्या प्रसंगी उपस्थित शेतकऱ्यांशी संवाद साधताना ते बोलत होते. यावेळी राज्याचे पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री बबनराव लोणीकर, राज्यमंत्री अर्जुनराव खोतकर, खासदार रावसाहेब दानवे, आमदार नारायण कुचे, जिल्हा परिषदेचे अध्यक्ष अनिरुद्ध खोतकर, माजी आमदार अरविंद चव्हाण, विभागीय आयुक्त डॉ. पुरुषोत्तम भापकर, जिल्हाधिकारी शिवाजी जोंधळे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दीपक चौधरी, कडवंचीचे सरपंच चंद्रकांत क्षीरसागर आदींची उपस्थिती होती.
          मुख्यमंत्री श्री फडणवीस म्हणाले की, शासकीय योजना यशस्वी होण्यासाठी लोकसहभाग अत्यंत महत्त्वाचा आहे. शासन, लोकप्रतिनिधी आणि जनता यांच्या माध्यमातून गावाचा कसा विकास, कायापालट होतो याचे उत्तम उदाहरण म्हणजे कडवंची हे गाव आहे.  कडवंचीच्या ग्रामस्थांनी अत्यंत मेहनतीमधून गावात जलसंधारणाची कामे केली आहेत. या गावाची आदर्श गाव म्हणून सर्वत्र ओळख निर्माण झाली आहे.  कडवंचीचा आदर्श इतर गावांनींही घेऊन गावात जलसंधारणाची कामे करावीत, यासाठी शासनामार्फत सर्वतोपरी मदत केली जाईल. शाश्वत शेतीच्या अभावामुळेच शेतकरी अडचणीत आहेज.  शेतकऱ्यांच्या जीवनात परिवर्तन घडविण्यासाठी विकेंद्रीत पाणीसाठे निर्माण करुन शेतकऱ्याच्या शेतीला शाश्वत सिंचन मिळाल्यास शेतकरी निश्चित समृद्ध होऊ शकतो, असा विश्वासही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी व्यक्त केला.
           शेतकऱ्यांच्या पिकांची उत्पादकता वाढविण्यासाठी विविध योजनांच्या माध्यमातून शासन प्रयत्न करीत आहे. गटशेती ही नवीन योजना तयार करण्यात आली आहे.  शेतीक्षेत्रात यापूर्वी गुंतवणूक होत नव्हती परंतु राज्य शासनाने या क्षेत्रात 25 हजार कोटी रुपयांपर्यंत गुंतवणूक वाढवलेली आहे.  देशातील द्राक्षे व डाळींबाला परदेशात मोठ्या प्रमाणात मागणी आहे.  जालना जिल्ह्यातून समृद्धी महामार्ग जात आहे. तसेच ड्रायपोर्ट हा प्रकल्प साकारला जात आहे.   जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी पिकवलेल्या फळपिकांना या प्रकल्पाच्या माध्यमातून आंतरराष्ट्रीय बाजारपेठ उपलब्ध होणार आहे. यामुळे जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या जीवनात नक्कीच परिवर्तन होईल, असा विश्वासही मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी यावेळी व्यक्त केला.
          जलयुक्त शिवार अभियानांतर्गत तयार करण्यात आलेल्या पुस्तिका व सीडीचे मुख्यमंत्री श्री.फडणवीस यांच्या हस्ते विमोचन करण्यात आले. या कार्यक्रमास पदाधिकारी, अधिकारी तसेच कडवंची व परिसरातील शेतकरी व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
*******