Monday 16 October 2017

जालना शहराचा सर्वतोपरी विकास करण्यासाठी शासन कटिबद्ध – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस



जालना शहराचा सर्वतोपरी विकास करण्यासाठी
शासन कटिबद्ध – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
           जालना, दि. 16 – गेल्या तीन वर्षात जालना जिल्ह्यासह शहराचा सर्वतोपरी विकास करण्यासाठी शासनाने प्राधान्य दिले असुन येणाऱ्या काळात जालना जिल्ह्याचा अधिक चांगल्या पद्धतीने विकास करण्यासाठी शासन कटिबद्ध असल्याचे प्रतिपादन राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.
          शहरातील वृंदावन हॉल येथे सिमेंट रस्त्याचे लोकार्पण व विकास परिषद टप्पा-2 कार्यक्रमप्रसंगी मार्गदर्शन करताना मुख्यमंत्री श्री फडणवीस बोलत होते.
          यावेळी राज्याचे पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री बबनराव लोणीकर, राज्यमंत्री अर्जुनराव खोतकर, खासदार रावसाहेब दानवे, आमदार नारायण कुचे, आमदार राजेश टोपे, माजी आमदार संतोष सांबरे, कैलास गोरंट्याल, जिल्हा परिषदेचे अध्यक्ष अनिरुद्ध खोतकर, नगराध्यक्ष संगीता गोरंट्याल, रसायन तंत्रज्ञान विभागाचे कुलगुरु पद्मश्री जे.डी. यादव, भास्कर आंबेकर, माजी आमदार अरविंद चव्हाण, उद्योगपती सुनिल रायठठ्ठा, महेश शिवणकर, मनोज पांगरकर, किशोर अग्रवाल, राजु बारवाले, सुनिल आर्दड, रामेश्वर पाटील भांदरगे, जिल्हाधिकारी शिवाजी जोंधळे, आदींची उपस्थिती होती.
          मुख्यमंत्री श्री फडणवीस म्हणाले की, जालना जिल्ह्यासह शहराचा रस्तेविकास, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था, भुयारी गटार योजना यासारख्या योजनांसाठी मोठ्या प्रमाणात निधी उपलब्ध करुन देण्यात आला आहे. जिल्ह्यात रस्तेविकासासाठी जवळपास साडेपाच हजार कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करुन देण्यात आला असुन या माध्यमातुन जिल्ह्यात रस्त्यांचे जाळे मजबुत करण्यात येत आहे.  शहरात उड्डाणपुल तसेच जालना शहरासाठी आवश्यक असलेल्या बाह्यवळण रस्त्याचा प्रश्नही तातडीने मार्गी लावण्यासाठी आवश्यक ते सर्व प्रयत्न करण्यात येतील, असेही मुख्यमंत्री श्री फडणवीस यांनी यावेळी सांगितले.
          आयसीटी सारखी इन्स्टीट्युट जालना शहरामध्ये होत आहे.  या संस्थेच्या माध्यमातुन देण्यात येणारे शिक्षण हे रोजगाराभिमुख असुन शेतीपुरक उद्योग, केमिकल टेक्नॉलॉजी, पर्यावरण, अपारंपरिक ऊर्जास्त्रोत यासाठी संशोधन व मनुष्यबळ निर्मितीचे काम हे या संस्थेच्या माध्यमातुन होणार आहे.  या संस्थेतुन शिक्षण घेतलेला विद्यार्थी बेरोजगार राहणार नाही असा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला.
          औरंगाबाद येथे असलेल्या डीएमआयसीचा सर्वांत जास्त फायदा औरंगाबाद व जालना शहराला होणार आहे.  डिसेंबर, 2018 पर्यंत शेंद्रा-बिडकीन येथे इंडस्ट्रीयल स्मार्ट सिटीचा पहिला फेज पूर्ण करण्यात येणार आहे.  या ठिकाणी इन्फ्रास्ट्रक्चर उभारणी झाल्यास अनेक उद्योगधंदे  या ठिकाणी येणार आहेत.  जालना जिल्हा ही औद्योगिकनगरी असुन याला चांगली कनेक्टीव्हीटी देण्याबरोबरच चांगल्या दर्जाचे इन्फ्रास्ट्रक्चर उभारणीची गरज असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.
          जालना शहरापासुन जवळच असलेल्या दरेगाव परिसरात ड्रायपोर्टची उभारणी करण्यात येत आहे.  या ड्रायपोर्टमुळे मराठवाड्यातील शेतकऱ्यांसह उद्योजकांनी उत्पादित केलेल्या मालाला आंतराष्ट्रीय बाजारपेठेत चांगला भाव मिळण्याबरोबरच बेरोजगारांच्या हाताला मोठ्या प्रमाणात काम मिळणार आहे. तसेच 40 हजार लोकांना रोजगार देण्याची क्षमता असलेल्या सीडस पार्कचीही उभारणी जालना जिल्ह्यात होत आहे.  येणाऱ्या काळात जिल्ह्याचा अधिक गतीने विकास करण्यासाठी आपण कटिबद्ध असल्याचेही मुख्यमंत्री श्री फडणवीस यांनी यावेळी सांगितले.
          शेतकऱ्यांना कर्जापासुन माफी देण्याचा शासनाने निर्णय घेऊन येत्या 18 तारखेपासुन कर्जमाफीचा पहिला हफ्ता शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करण्यात येणार आहे. या कर्जमाफीचा फायदा राज्यातील गरजु शेतकऱ्यांना होणार असल्याची माहितीही मुख्यमंत्री  देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी दिली.
          राज्यमंत्री श्री खोतकर म्हणाले की, गतीमान शासन व गतीमान विकास या माध्यमातुन जालना जिल्ह्यातील शहरी भागाबरोबरच ग्रामीण भागाचा विकास मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वाखाली करण्यात येत आहे.  जालना जिल्ह्याच्या विकासासाठी मांडलेल्या सर्व मागण्या मुख्यमंत्री मान्य करतील असा विश्वास असल्याचे सांगत जालना येथे सिडकोचा प्रकल्प व्हावा, अशी मागणीही त्यांनी यावेळी केली.
          खासदार रावसाहेब दानवे म्हणाले की, जालना हे व्यापारी शहर आहे.  व्यापारीकरणासाठी आवश्यक असलेल्या सर्व सोयी-सुविधा उपलब्ध करुन देण्याचा गेल्या दोन वर्षात प्रयत्न करण्यात आला.  ड्रायपोर्ट प्रकल्, सीडस पार्क, रसायन तंत्रज्ञान विद्यालय यासारखे अनेकविध जिल्ह्यासाठी मंजुर करण्यात आले असुन या माध्यमामुन रोजगार वाढीबरोबरच बेरोजगारांच्या हाताला मोठ्या प्रमाणात काम मिळणार असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.
          रसायन तंत्रज्ञान विभागाचे कुलगुरु जे.डी यादव म्हणाले की, रसायन तंत्रज्ञान महाविद्यालयाची उभारणी 200 एकर जागेवर जालना येथे करण्यात येत असुन या मुंबई येथे असलेल्या या महाविद्यालयाने 500 पेक्षा अधिक उद्योगपती निर्माण केले असल्याचे त्यांनी यावेळी सांगुन महाविद्यालय स्थापनेबाबत एलसीडी द्वारे माहिती दिली.
          प्रांरभी मुख्यमंत्र्यांच्या हस्ते सिमेंट रस्त्याच्या कोनशिलेचे अनावरण करण्यात येऊन वृंदावन हॉल येथे दीपप्रज्वलनाने विकास परिषद कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. कार्यक्रमास प्रतिष्ठित नागरिक, उद्योगपती, पदाधिकारी, मोठ्या संख्येने उपस्थित होते.
*******



No comments:

Post a Comment