Monday 16 October 2017

गटशेतीमुळे शेतकऱ्यांच्या जिवनात परिवर्तन - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस



गटशेतीमुळे शेतकऱ्यांच्या जिवनात परिवर्तन
-         मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
‘ड्राय पोर्ट’मुळे होणार निर्यातीत वाढ
18 तारखेपासून कापूस खरेदी
-          
       जालना,दि.16  गटशेतीमुळे शेती क्षेत्र मोठया प्रमाणात उपलब्ध झाल्यामुळे विविध प्रकारचे पिक घेता येते. तंत्रज्ञानासह  यांत्रिकीचा वापर करता येत असल्याने उत्पादनात आणि पर्यायाने उत्पनात वाढ होते परिणामी गटशेती शेतकऱ्यांच्या जिवनात परिर्वन घडवून आणत असल्याचे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.
          देळेगव्हाण येथे ॲग्रो इंडिया गटशेती संघ पुरस्कृत इंडिको फॉर्मर प्रोडयुसर कंपनी आयोजित 146 व्या द्वादश मेळाव्यात मुख्यमंत्री बोलत होते. यावेळी जालना जिल्हयाचे पालकमंत्री बबनराव लोणीकर, प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे, सर्वश्री आमदार संतोष दानवे, नारायण कुचे, विभागीय आयुक्त डॉ. पुरुषोत्तम भापकर, नांदेड परिक्षेत्राचे पोलीस महानिरीक्षक चिरंजीव प्रसाद, जिल्हाधिकारी शिवाजी जोंधळे, मुख्य कार्यकारी अधिकारी दीपक चौधरी, गटशेतीचे प्रणेते डॉ. भगवानराव कापसे उप विभागीय अभियंता ल.सि.(जलसंधारण) उपविभाग भोकरदनचे आर.के.जाधव, कार्यकारी अभियंता ल.सि.(जलसंधारण) जालना विभागाचे एस.डी.डोणगांवकर, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी दशरथ तांभाळे आदी उपस्थित होते. 
          पुढे मुख्यमंत्री म्हणाले की, शेतीची उत्पादकता कमी होत आहे कारण शेतीचे लहान-लहान तुकडे होत गेल्याने शेतीमधील गुंतवणूक कमी झाली, यांत्रिकीचा वापर करणे अवघड झाले परिणामी शेतकरी कर्जबाजारी झाला यावर गटशेती सारखा पर्याय नसल्याचे सांगूण मुख्यमंत्री म्हणाले की, देळेगव्हाण येथील गटशेती पाहुन मनस्वी आंनद झाला. शासनाने तयार केलेल्या गटशेतीच्या मॉडलमध्ये देळेगव्हाणच योगदान महत्वपूर्ण आहे. गटशेती धोरणाअंतर्गत 200 कोटीचा निधी उपलब्ध करुन देण्यात आला असून शेतकऱ्यांच्या जीवनात परिर्वत आणणार असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.
          जलयुक्त शिवार योजनेविषयी बोलतांना मुख्यमंत्री म्हणाले की या योजनेअंतर्गत राज्यात अनेक कामे झाले असून 11 हजार गावांना लागणारे पिण्याचे टँकर कायमस्वरुपी बंद झाले. ज्या ठिकाणी केवळ खरीपाचे पीक घेतल्या जात होते त्या ठिकाणी शेतकरी आता रब्बी चेही पिक घेत असल्याचे सांगत मुख्यमंत्री म्हणाले की, समृध्दी महामार्गामुळे शेतकऱ्यांचा माल जे.एन.पी.टी. बंदरापर्यत  कमी वेळेत पोहचता येणार आहे. या महामार्गामध्ये कोल्डचेईन उभारण्यात येणार असल्यामुळे नाशवंत फळांसाठी याचा फायदा होणार आहे. जालना जिल्हयात होणाऱ्या ‘ड्राय पोर्ट’मुळे निर्यातीत वाढ होणार असल्याचेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले.
          कर्जमाफी विषयी बोलतांना मुख्यमंत्री म्हणाले शेतकऱ्यांना कर्ज माफी देण्याच्या शासन निर्णयाची अमलबजावणी सुरु आहे. 18  ऑक्टोबर, 2017 पासून कर्जमाफीचा पहिला हफ्ता शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करण्यात येणार आहे. या कर्जमाफीचा फायदा राज्यातील गरजू शेतकऱ्यांना होणार आहे. तसेच 18 तारखेपासून कापूस खरेदी सुरु करण्यात येणार असून शेतकऱ्यांनी हमी भावापेक्षा कमी भावात व्यापाऱ्यांना कापूस विक्री करु नये. शासनाच्या केंद्रावर हमीभापेक्षा निश्चितच जास्त भाव शेतकऱ्यांना मिळणार असल्याचे मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितले.
          या प्रसंगी पालकमंत्री बबनराव लोणीकर, प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे, गटशेतीचे प्रणेते डॉ. भगवानराव कापसे यांनी आपले विचार मांडले.
          या कार्यक्रमापुर्वी राज्य शासनाच्या नदी पुनरोज्जीवन योजनेअंतर्गत जाफ्राबाद तालुक्यातील देळेगव्हाण येथील जीवनरेखा नदीवर बांधण्यात आलेल्या बंधाऱ्याचे जलपूजन व लोकार्पण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते झाले. तसेच मा. मुख्यमंत्री महोदयांच्या हस्ते राजूर ते चिखली या राष्ट्रीय महामार्गाचे भुमीपूजन, गटशेती शिवार पाहणी तसेच जलपूजनाचा कार्यक्रम मुख्यमंत्री महोदयांच्या हस्ते पार पडला. यावेळी तालुक्यातील पदाधिकारी आणि ग्रामस्थ उपस्थित होते.
***-***




No comments:

Post a Comment