Friday 13 October 2017

जिल्ह्याचा विकास अधिक जलद गतीने करण्यासाठी अधिकारी, कर्मचाऱ्यांनी अधिकाधिक प्रयत्न करावेत – विभागीय आयुक्त श्री भापकर



जिल्ह्याचा विकास अधिक जलद गतीने करण्यासाठी
अधिकारी, कर्मचाऱ्यांनी अधिकाधिक प्रयत्न करावेत
                            – विभागीय आयुक्त श्री भापकर

       जालना, दि. 13 -  जालना जिल्ह्यात विकासाच्या दृष्टीकोनातुन अत्यंत चांगल्या पद्धतीने काम करण्यात येत असुन जिल्हयाचा विकास अधिक जलद गतीने करण्यासाठी सर्व प्रशासकीय अधिकारी, कर्मचाऱ्यांनी अधिकाधिक प्रयत्न करण्याचे निर्देश विभागीय आयुक्त पुरुषोत्तम भापकर यांनी दिले.
            जिल्हाधिकारी कार्याल्याच्या सभागृहात जिल्ह्याच्या महसुल विषयाबरोबरच विविध विषयावरील  आयोजित आढावा बैठकीत उपस्थित अधिकाऱ्यांना मार्गदर्शन करताना श्री भापकर बोलत होते.
            यावेळी व्यासपीठावर जिल्हाधिकारी शिवाजी जोंधळे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दीपक चौधरी, उपायुक्त महसुल प्रल्हाद कचरे, उपायुक्त (रोहयो) अनंत कुंभार, उपायुक्त (विकास) पारस बोथरा, उपायुक्त (पुरवठा) श्रीमती वर्षा ठाकुर-घुगे, रिता मेत्रेवार, सहाय्य्क आयुक्त श्रीमती सुत्रावे आदींची उपस्थिती होती.
            विभागीय आयुक्त श्री भापकर म्हणाले की, जालना जिल्ह्यामध्ये जलयुक्त शिवार अभियानाचे अत्यंत चांगले काम झाले असुन मराठवाड्या सर्वप्रथम ओडीएफ होण्याचा मानही जालना जिल्ह्याला मिळाला आहे.  आधारसिडींगमध्ये जिल्हा अग्रेसर असण्याबरोबरच  शेततळयांच्या बाबतीतही जिल्हा राज्यात 4 थ्या क्रमांकावर आहे.  पीकविमा योजनेमध्ये जालना जिल्ह्याने भरीव कामगिरी करत संपूर्ण देशामध्ये प्रथम येण्याचा मान पटकावला असुन येणाऱ्या काळात जिल्ह्याचा अधिक गतीने विकास करण्यासाठी सर्व अधिकारी, कर्मचाऱ्यांनी अधिक वेगाने काम करण्याची गरज असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.

            गौणखनिजाचा आढावा घेताना श्री भापकर म्हणाले की, जिल्ह्यात अवैधरित्या वाळुचे उत्खनन व वाहतुकीबाबत मोठ्या प्रमाणात तक्रारी आहेत.  अवैधरित्या वाळुचे उत्खनन व वाहतुक करताना आढळल्यास संबंधितांच्या गाड्या जप्त करण्याबरोबरच दोषींवर गुन्हे दाखल करण्यात यावेत.  या कामात हयगय अथवा दिरंगाई होणार नाही याची दक्षता घेण्यात यावी.  त्याचबरोबर शेतकऱ्यांच्या शेतजमीनीची सुपिकता व उत्पादकता वाढविण्यासाठी जिल्ह्यातील प्रत्येक शेतकऱ्यांच्या शेतामध्ये गांडुळखत तसेच सेंद्रीय खताचे युनिट उभे करण्याची गरज आहे.  यासाठी कृषी विभागाने आवश्यक ती कारवाई करण्याच्या सुचनाही त्यांनी यावेळी दिल्या. 
            महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेच्या माध्यमातुन मोठ्या प्रमाणात वैयक्तिक लाभाच्या योजना घेता येतात.  याचा लाभ प्रत्येक लाभार्थ्यांना होण्यासाठी अधिकाऱ्यांनी वैयक्तिकरित्या प्रयत्न करावा.  तसेच राज्यात घटत चाललेले वृक्षाचे प्रमाण वाढविण्यासाठी व  पर्यावरणाचा समतोल राखुन वाढते प्रदुषण रोखण्यासाठी शासनाने वृक्ष लागवड कार्यक्रम हाती घेतला आहे.  येणाऱ्या काळात मराठवाड्यात अधिकाधिक वृक्षांची लागवड करावयाची असुन जिल्ह्यातही वृक्षांचे प्रमाण वाढविण्यासाठी नर्सरीच्या माध्यमातुन अधिकची रोपे निर्मिती करण्याच्या सुचनाही त्यांनी यावेळी उपस्थित अधिकाऱ्यांना केल्या.  
            यावेळी विभागीय आयुक्त श्री भापकर यांनी शासकीय वसुली, महसुल जमा व शासकीय भरणा प्रलंबित प्रकरणे,जीओ टॅगिंग, पुरवठा विभागाचा आढज्ञवा, महाराजस्व अभियान,  कर्मचारी कल्याण अभियान यासह विविध योजनेचा व्यापक स्वरुपात आढावा घेतला.        जिल्हाधिकारी शिवाजी जोंधळे यांनी जिल्ह्यातील विविध विकास कामांची माहिती दिली.
            बैठकीचे संचलन जिल्हा पुरवठा अधिकारी राजू नंदकर यांनी केले. बैठकीस सर्व उपजिल्हाधिकारी, उप विभागीय अधिकारी, तहसिलदार, गटविकास अधिकारी, उपमुख्य कार्यकारी अधिकारी यांच्यासह प्रशासकीय विभागाचे प्रमुख अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
***-***


No comments:

Post a Comment