Friday 28 October 2022

जिल्हा वार्षिक योजनेतंर्गतचा निधी विकास कामांवर वेळेत खर्च करावा - पालकमंत्री अतुल सावे जिल्हा नियोजन समितीची बैठक संपन्न

 





जालना दि. 28 (जिमाका) :-  जिल्हा वार्षिक योजनेतंर्गत सन 2022-23 मधील विकास कामांच्या बाबतीत कुठल्याही प्रकारे दिरंगाई  करु नये. तातडीने प्रशासकीय मान्यता घेऊन विकास कामांवर  वेळेत निधी खर्च करावा. कुठल्याही परिस्थितीत निधी परत जावु देऊ नये, याची दक्षता सर्व विभागप्रमुखांनी घ्यावी, अशी सूचना सहकार, इतर मागास बहुजन कल्याण विभागाचे मंत्री तथा जालना जिल्हयाचे पालकमंत्री अतुल सावे यांनी केली. तसेच सन 2021-22 मधील प्रलंबित विकास कामेही मार्गी लावण्याचे निर्देश त्यांनी दिले.

जिल्हा नियोजन समितीची बैठक आज पालकमंत्री यांच्या अध्यक्षतेखाली  जिल्हाधिकारी कार्यालयाच्या नियोजन समितीच्या सभागृहात पार पडली. त्यावेळी ते बोलत होते.  व्यासपीठावर   केंद्रीय रेल्वे, कोळसा व खाण राज्यमंत्री रावसाहेब पाटील दानवे, खासदार  संजय जाधव, आमदार राजेश टोपे, आमदार बबनराव लोणीकर,  आमदार कैलास गोरंट्याल, आमदार नारायण कुचे, आमदार संतोष दानवे,  जिल्हाधिकारी डॉ. विजय राठोड, जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. अक्षय शिंदे, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी वर्षा मीना आदी उपस्थित होते.

पालकमंत्री अतुल सावे म्हणाले की, जिल्हा वार्षिक योजनेतंर्गत चालू वर्षातील कामे पूर्ण करण्यासाठी अवधी कमी राहिला असल्यामुळे  विकास कामांच्या प्रस्तावांना तातडीने तांत्रिक व प्रशासकीय मान्यता घेण्यात यावी.  पंधरा दिवसांत हे काम पूर्ण करुन कामांना गती द्यावी. लोकप्रतिनिधींच्या सुचनेप्रमाणे सर्व  विभागांनी  प्राधान्याने वेळेत कामे पूर्ण करावीत. कामांमध्ये दिरंगाई करु नये. संपूर्ण निधी विकास कामांवर वेळेत खर्च करण्यात यावा.  

अतिवृष्टीमुळे   नुकसान झालेल्या  शेतकऱ्यांना  तात्काळ मदत करता यावी  यासाठी  तातडीने पंचनामे पूर्ण करुन अहवाल  सोमवारपर्यंत  शासनाकडे सादर करावा. जेणेकरुन  मंत्रिमंडळ बैठकीत अहवाल ठेवून त्यावर  निर्णय घेता येईल, अशी सूचना त्यांनी जिल्हा प्रशासनाला केली. जालना जिल्हयातील कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी  अवैध व गैरप्रकारांना आळा घालण्याकरीता पोलीस यंत्रणेने कडक कारवाई करावी. नगर पालिका प्रशासनाने अतिक्रमणाकडे गांभीर्याने लक्ष देऊन ती काढावीत. बोगस पीआर कार्डची  चौकशी  करुन संबंधीत  अधिकाऱ्यांवर  कारवाई  करण्याची सूचना  जिल्हा प्रशासनाला त्यांनी दिली.

केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब पाटील दानवे म्हणाले की,  जिल्हा वार्षिक योजनेतंर्गतचा निधी  वेळेत खर्च करावा. जिल्हयाच्या  विकासाकरीता प्राप्त झालेला हा निधी  परत जाता कामा नये. जिल्हयातील  वेगवेगळया प्रकारचे अवैध धंदे बंद करण्यासाठी  पोलीस प्रशासनाने त्या विरोधात कडक भूमिका घ्यावी.  जिल्हयात कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवावी.

खा. संजय जाधव यांनी अतिवृष्टीमुळे नदीकाठच्या शेतजमिनींचे अतोनात नुकसान झाले आहे, त्यांचाही पंचनाम्यात समावेश करुन शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्याची मागणी केली. आमदार बबनराव लोणीकर यांनी  जिल्हा वार्षिक योजनेतंर्गत  अनुसूचित जाती व आदिवासी  क्षेत्रासाठीचा निधी तातडीने खर्च करण्याची सूचना केली. शेतकऱ्यांच्या कल्याणासाठी  श्यामाप्रसाद मुखर्जी रुरबन अभियानातंर्गत निधी  देण्याची मागणीही त्यांनी केली.

आमदार राजेश टोपे यांनी जिल्हा वार्षिक योजनेतंर्गत चालू वर्षातील निधी वेळेत खर्च करण्यासाठी  विविध विकास कामांसाठी तात्काळ मान्यता घेऊन कामे गतीने पूर्ण करण्याची सूचना केली. आमदार नारायण कुचे यांनी अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना तात्काळ मदत देण्यात यावी. तसेच शेतकऱ्यांना नियमित वीज मिळण्याची मागणी केली. आमदार कैलास गोरंटयाल यांनी जालन्यातील स्टेडियमच्या विकासाबाबत तातडीने कार्यवाही करण्याची सूचना करुन नगरविकासाची कामे त्वरीत मार्गी लावण्याची मागणी केली.

जिल्हा वार्षिक योजना (सर्वसाधारण) सन 2022-23 अंतर्गत  जालना जिल्हयासाठी 282 कोटी इतका नियतव्यय मंजूर आहे. अनुसूचित जाती उपयोजनेसाठी 73 कोटी 96 लक्ष इतका नियतव्यय मंजूर आहे. तर ओटीएसपीसाठी 23 कोटी 3 लक्ष 29 हजार इतका नियतव्यय मंजूर आहे.  

दरम्यान, जांब समर्थ येथील श्रीराम मंदिरातील मूर्ती चोरी प्रकरणी आरोपींना जेरबंद केल्याबद्दल जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. अक्षय शिंदे यांचा  पालकमंत्री व इतर मान्यवरांच्या हस्ते यावेळी सत्कार करण्यात आला. पालकमंत्री यांच्यासह केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब पाटील दानवे व लोकप्रतिनिधींनी याप्रसंगी त्यांचे कौतुकही केले.

-*-*-*-*-*-*-

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून परीक्षांचे अंदाजित वेळापत्रक प्रसिद्ध

 


 

जालना दि. 28 (जिमाका) :-      महाराष्ट्र   लोकसेवा आयोगाकडून 2023 मधील नियोजित विविध स्पर्धा परीक्षांचे अंदाजित वेळापत्रक आयोगाच्या https://mpsc.gov.in व https://mpsconline.gov.in या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आले असल्याचे  आयोगाचे सहसचिव सुनील अवताडे यांनी कळविले आहे. इच्छुक उमेदवारांनी या संधीचा लाभ घ्यावा, असे आवाहनही त्यांनी केले आहे.

            शासन सेवेतील विविध पदांवरील भरतीकरिता आयोगामार्फत वर्षभर विविध परीक्षांचे आयोजन करण्यात येते. त्यानुसार 2023 मध्ये घेण्यात येणाऱ्या विविध परीक्षांचे दिनांक आयोगाकडून निश्चित करण्यात आले आहेत. प्रस्तावित परीक्षेचे वेळापत्रक निश्चित करताना संघ लोकसेवा आयोग, विविध विद्यापीठे, परीक्षा घेणाऱ्या इतर संस्था इत्यादींकडून आयोजित करण्यात येणाऱ्या परीक्षा एकाच दिवशी येणार नाहीत व उमेदवारांचे नुकसान होणार नाही यादृष्टीने आयोगाच्या परीक्षांचे वेळापत्रक निश्चित करण्यात येते. तरी संबंधित संस्थांनी  परीक्षा एकाच दिवशी येणार नाहीत, याची दक्षता घेण्याची विनंती  संस्थांना आयोगाने केल्याचेही त्यांनी कळविले आहे.

-*-*-*-*-*-

जिल्हा क्रीडा संकुल समिती, जालना करिता लिपीक, संगणक ऑपरेटर, सुरक्षा रक्षक व सफाई कामगार यांची नेमणूक करण्यासाठी दरपत्रक सादर करण्याचे आवाहन

 

 

जालना दि. 28 (जिमाका) :- जिल्हा क्रीडा संकुल समिती, जालनाच्या व्यवस्थापनाकरिता बाह्य यंत्रणामार्फत कंत्राटी तत्वावर, कार्यालयीन काम करण्यासाठी  01 – लिपीक, 01 - संगणक ऑपरेटर, 02 - सुरक्षा रक्षक, 01- सफाई कामगार यांची नेमणूक करणेसाठी नोंदणीकृत संस्थाद्वारे विहित नमुन्यात दरपत्रक मागविण्यात येत आहेत. विहित नमुन्यातील दरपत्रकाचा नमुना जिल्हा क्रीडा अधिकारी, जालनाच्या सुचना फलकावर लावण्यात आलेला आहे. दरपत्रक बंद लिफाफयामध्ये जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, जिल्हा क्रीडा संकुल, सर्व्हे नं. 488, प्रशासकीय इमारत, जालना येथे दिनांक 31 ऑक्टोबर 2022 ते दि. 4 नोव्हेंबर 2022 पर्यंत कार्यालयीन वेळेत (सुट्टीचे दिवस वगळून) सादर करावेत, उशिरा आलेल्या दरपत्रकाचा विचार करण्यात येणार नाही, यांची संबधीतांनी नोंद घ्यावी. अधिकच्या माहितीकरिता जिल्हा क्रीडा अधिकारी तथा सदस्य सचिव, जिल्हा क्रीडा संकुल समिती, अरविंद विद्यागर, यांना 9422243435 या भ्रमणध्वनीवर संपर्क साधावा.

--*-*-*-*-*-*-*-

Thursday 27 October 2022

जालना जिल्ह्यातील अतिवृष्टीग्रस्त पिकांची कृषी मंत्री अब्दुल सत्तार यांनी केली पाहणी बरंजळा लोखंडे, नळणी, वाटुर, एदलापूर भागातील शेतपीकांची पाहणी






 


 

 

जालना दि. 27 (जिमाका) :-  कृषी मंत्री अब्दुल सत्तार यांनी आज जालना जिल्ह्यात परतीच्या पावसामुळे नुकसान झालेल्या भागाची पाहणी केली. यावेळी त्यांनी भोकरदन तालुक्यातील बरंजळा लोखंडे, नळणी  गाव  परतुर तालुक्यातील वाटुर आणि  एदलापूर (ता. जालना) परिसरात शेताच्या बांधावर जाऊन  पाहणी केली. यावेळी कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांनी उपस्थित शेतकऱ्यांशी सहानुभूतीपूर्वक संवाद साधून त्यांना धीर दिला.

नुकसानीचे पंचनामे पूर्ण करून तातडीने शासनास अहवाल सादर करावा, असे निर्देश कृषी मंत्री अब्दुल सत्तार यांनी यावेळी अधिकाऱ्यांना दिले. पंचनामा करीत असताना एकही नुकसानग्रस्त शेतकरी पंचनामा अभावी मदतीपासून  वंचित राहणार नाही, याची दक्षता घेण्याची सूचना मंत्री अब्दुल सत्तार यांनी केली.

नुकसानग्रस्त शेतकऱ्यांनी हताश न होता, धीर धरावा. नुकसानभरपाई बाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे लवकरच निर्णय घेतील, असे मंत्री अब्दुल सत्तार म्हणाले.

यावेळी तहसीलदार सारिका कदम, तहसीलदार रूपा चित्रक,  जिल्हा परिषद सदस्या आशाताई पांडे, जि. प. सदस्य डॉ. चंद्रकांत साबळे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी भीमराव रणदिवे, उपविभागीय कृषी अधिकारी राम रोडगे, भूषण शर्मा, शेख नजीर, मोहन अग्रवाल, तालुका कृषी अधिकारी डॉ. सखाराम पवळ, तालुका कृषी अधिकारी मंठा विष्णू राठोड,   तालुका कृषी अधिकारी रामेश्वर भुते, पं. स.तालूका कृषि अधिकारी राजेश तांगडे, गट विकास अधिकारी श्री. सुरडकर , कृषी विभागाचे अधिकारी, कर्मचारी आणि परिसरातील शेतकरी आदींची उपस्थिती होती.

-*-*-*-*-*-*-*-

राष्ट्रीय लोकअदालतचे 12 नोव्हेंबर रोजी आयोजन

 


जालना दि. 27 (जिमाका) :-  जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, जालना, जिल्हा न्यायालय, जालना व सर्व तालुका न्यायालयामध्ये प्रलंबित मोटार वाहन अपघात कायद्याअंतर्गत नुकसान भरपाईचे प्रकरणे, प्रलंबित दिवाणी व फौजदारी प्रकरणे, कलम 138, एन. आय.अॅक्टची प्रकरणे, बँकेची वसूली प्रकरणे, कौटुंबिक वादाची प्रकरणे, मजुरी संबंधीचे वादाची प्रकरणे, भुसंपादनाची प्रकरणे, इलेक्ट्रीसीटी, पाणी बिल, महसुलची प्रकरणे व इतर प्रकरणे तसेच दावा दाखलपूर्व प्रकरणे इत्यादी प्रकरणासाठी दि. 12 नोव्हेंबर 2022 रोजी राष्ट्रीय लोक अदालतचे आयोजन करण्यात आलेले आहे.

तरी सर्व संबंधीतांनी या संधीचा फायदा घेवून आपली जास्तीत जास्त प्रकरणे लोकअदालतमध्ये ठेवून तडजोडीने मिटवावीत, असे आवाहन राजेश अहिर, सचिव, जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, जालना यांनी केले आहे.

-*-*-*-*-*-*-*-

 

शिष्यवृत्ती योजनांच्या ऑनलाईन अर्जासाठी 31 ऑक्टोबरपर्यंत मुदतवाढ

 


 

जालना, दि.27 (जिमाका) :- दि. 22 जून, 2012 च्या शासन निर्णयानुसार शिक्षण संचालक, शिक्षण संचालनालय (योजना) कार्यालयाकडे राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटक शिष्यवृत्ती NMMS व दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी असलेली मॅट्रिक पूर्व शिष्यवृत्ती या योजना वर्ग करण्यात आलेल्या आहेत. शिवाय शिक्षण संचालनालय (योजना) या कार्यालयामार्फत आता अल्पसंख्याक विद्यार्थ्यांसाठी असलेली प्रि-मॅट्रिक शिष्यवृत्ती (इयत्ता 1 ली ते 10 वी मधील विद्यार्थी), अल्पसंख्याक विद्यार्थ्यांसाठी असलेली बेगम हजरत महल राष्ट्रीय शिष्यवृत्ती (इयत्ता 9 वी ते 12 वी फक्त मुली), राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटक शिष्यवृत्ती (NMMS) (इयत्ता 9 वी ते 12 वी मधील विद्यार्थी), दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी असलेली मॅट्रिक पूर्व शिष्यवृत्ती (इयत्ता 9 वी व 10 वी मधील विद्यार्थी) या योजनांची अंमलबजावणी करण्यात येणार आहे. या सर्व योजनांमधील पात्र विद्यार्थ्यांनी वाढीव मुदतीत NSP 2.0 पोर्टलवर (www.scholarships.in)दि.31 ऑक्टोबर 2022  पूर्वी अर्ज भरण्याचे आवाहन शिक्षण संचालक, कृष्णकुमार पाटील यांनी केले आहे.

-*-*-*-*-*-*-*-

15 नोव्हेंबर पासून जिल्हास्तरीय शालेय क्रीडा स्पर्धेस प्रारंभ

 


 जालना, दि.27 (जिमाका) :- क्रीडा व युवक सेवा, संचालनालय, महाराष्ट्र राज्य, पुणे यांचे अधिनस्त जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय व जिल्हा क्रीडा परिषद, जालना यांच्या संयुक्त विद्यमाने सन 2022-23 या वर्षात कोरोना – 19 महामारी नंतर प्रथमच तालुकास्तर, जिल्हास्तर शालेय क्रीडा स्पर्धांना प्रारंभ होणार आहे. जिल्हयातील सर्व प्रकारच्या शाळा,कनिष्ठ महाविद्यालयातील खेळाडू सहभागी होण्यास पात्र असतील. शालेय क्रीडा स्पर्धेत सहभागी होण्यासाठी जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, जालना मार्फत www.jalnadso.com ही वेबसाईट तयार करण्यात आलेली असून या वेबसाईटवर खेळाडू ऑनलाईन करून, शाळांची माहिती भरून स्पर्धेत सहभागी होता येणार आहे.

जिल्हयातील जास्तीत जास्त शाळा, कनिष्ठ महाविद्यालये यांनी आपल्या शाळेतील खेळाडूंना शालेय क्रीडा स्पर्धेत सहभागी करावेत. सोबतच्या वेळापत्रकाप्रमाणे जिल्हास्तरीय शालेय क्रीडा स्पर्धांना दि. 15 नोव्हेंबर 2022 पासून प्रारंभ होणार आहे. जिल्हास्तर स्पर्धेचा कार्यक्रम पुढील प्रमाणे आहे. तसेच कबड्डी, खो-खो, कुस्ती, क्रिकेट, बुध्दीबळ, कॅरम, फुटबॉल, व्हॉलीबॉल, मैदानी व योगासन या दहा खेळांच्या स्पर्धा तालुकास्तरापासून होत असल्याने तालुकास्तर स्पर्धा ह्या जिल्हास्तर स्पर्धापुर्वी संबंधीत तालुका क्रीडा संयोजकामार्फत आयोजित होत आहेत याची नोंद घ्यावी. अधिक माहितीसाठी श्री महमंद शेख, क्रीडा मार्गदर्शक, 8788360313, क्रीडा मार्गदर्शक संतोष वाबळे, 7588169493, क्रीडा अधिकारी रेखा परदेशी, 9022951924 यांच्याशी संपर्क साधण्याचे आवाहन जिल्हा क्रीडा अधिकारी, अरविंद विद्यागर,  यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे  केले आहे.

-*-*-*-*-*-*-

व्यायामशाळा विकास, क्रीडांगण विकास अनुदानासाठी प्रस्ताव सादर करण्याचे आवाहन

 


 

जालना, दि.27 (जिमाका) :- क्रीडा व युवक सेवा, संचालनालय, महाराष्ट्र राज्य, पुणे यांचे अधिनस्त जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, जालना मार्फत जिल्हा वार्षीक योजनेअंतर्गत सन 2022-23 या वर्षासाठी सर्वसाधारण व विशेष घटक योजना तरतुदी अंतर्गत जालना जिल्हयामध्ये कार्यरत असलेल्या शासकीय शाळा, स्थानिक स्वराज्य संस्था  (ग्रामपंचायत, नगर परिषद, नगरपंचायत, महानगरपालिका, जिल्हा परिषद, कॅन्टोनमेंट बोर्ड), शासकीय रूग्णालय, शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, जिल्हा परिषद आदिवासी विकास व सामाजिक न्याय विभाग, अल्पसंख्याक विभाग मार्फत चालविण्यात येणाऱ्या सर्व शासकीय प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक शाळा, आश्रमशाळा व वसतीगृह, शासकीय उप जिल्हा रूग्णालय, शासकीय जिल्हा रुग्णालय, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय तसेच शासनाद्वारे मान्यता दिलेल्या शैक्षणिक शाळा व महाविद्यालयांना शासनामार्फत अनुदान मिळण्यास प्रारंभ होवून 5 वर्षे पुर्ण झालेले आहेत असे शाळा व महाविद्यालये अनुदानासाठी पात्र राहतील. क्रीडा विभागाच्या विविध समित्या तसेच पोलीस कल्याण निधी / पोलीस विभाग, शासकीय कार्यालये, जिमखाना हे अनुदानासाठी पात्र राहतील करिता व्यायामशाळा विकास अनुदान व क्रीडांगण विकास अनुदान प्राप्त करून घेणे करिता विहित नमुन्यातील परिपुर्ण प्रस्ताव मागविण्यात येत आहे.

 

जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, जालना मार्फत सन 2022-23 या वर्षात संस्थेला व्यायामशाळा विकास अनुदान व क्रीडांगण विकास अनुदान प्राप्त करून घेणे करिता विहित नमुन्यातील अर्जाचा नमुना जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, जालना येथून प्राप्त करून घेऊन विहित मुदतीत परिपुर्ण कागदपत्रासह सादर करणे आवश्यक राहील. विहित नमुन्यात दर्शविण्यात आलेले सर्व कागदपत्र प्रस्तावासोबत जोडणे आवश्यक आहे. विहित नमुन्यातील अर्जाचा नमुना प्राप्त करून घेऊन ते सादर करण्याचा कालावधी हा दि. 01 ते 09 नोव्हेंबर 2022 कार्यालयीन वेळेत (सुट्टीचे दिवस वगळून) हा राहील. विहित कालावधी नंतर आलेले प्रस्ताव स्विकारले जाणार नाहीत व ते विचारात घेतले जाणार नाही. ज्या संस्था, ग्रामपंचायती, शाळा, विद्यालये, महाविद्यालये, शासकीय कार्यालय यांनी या अगोदर अनुदान मिळणे करिता प्रस्ताव दाखल केलेले आहेत ते सर्व प्रस्ताव रद्द समजण्यात येतील. अशा सर्व संस्था, ग्रामपंचायती, शाळा, विद्यालये, महाविद्यालये, शासकीय कार्यालये यांनी दि. 01 ते 09 नोव्हेंबर 2022 या कालावधीत कार्यालयीन वेळेत पुनश्च: प्रस्ताव दाखल करणे आवश्यक राहील, संबंधीतांचे पुर्वी सादर केलेले प्रस्ताव विचारात घेतले जाणार नाहीत याची सर्वांनी नोंद घ्यावी.

विशेष घटक योजना तरतुदी अंतर्गत लाभाकरिता संबंधीत संस्था पदाधिकारी यांची अनुसुचित जाती व नवबौध्द प्रवर्गातील संख्या 50% अथवा त्यापेक्षा अधिक असणे आवश्यक आहे. लाभार्थी हे अनुसुचित जाती व नवबौध्द प्रवर्गातील असणे आवश्यक आहे. व्यायामशाळा व क्रीडांगण विकास अनुदान योजनेत लाभार्थी निवड करतांना लाभार्थी दलित वस्ती किंवा दलित वस्तीच्या लगत असणे आवश्यक आहे. अधिक माहितीसाठी कार्यालयीन वेळेत जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, जालना येथे संपर्क साधण्याचे आवाहन जिल्हा क्रीडा अधिकारी, यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे केले  आहे. 

-*-*-*-*-*-

Wednesday 19 October 2022

कौशल्यावर आधारित प्रशिक्षण घेऊन नोकरी मागण्यापेक्षा नोकरी देणारे बना रोजगार मेळाव्याचे थाटात उद्धाटन

 







 

        जालना, दि.19 (जिमाका) :- आजच्या आधुनिकतेच्या काळात विशेष कौशल्य आधारित प्रशिक्षित मनुष्यबळाची सर्वच क्षेत्रात मोठी मागणी होत आहे. तरुणांनी कौशल्य आधारित प्रशिक्षण घेऊन नवकल्पनेच्या माध्यमातून नोकरी मागण्यापेक्षा नोकरी देणारे बनावे असा सूर मस्त्योदरी शिक्षण संस्थेचे कॉलेज ऑफ इंजिनिअरींग अँड टेक्नॉलॉली येथे आयोजित पंडित दिनदयाळ उपाध्याय रोजगार मेळाव्याच्या उद्घाटन प्रसंगी निघाला.

            याप्रसंगी आमदार राजेश टोपे, जिल्हाधिकारी डॉ. विजय राठोड, मॅजिक इनक्युबेशन सेंटर, औरंगाबादचे रितेश मिश्रा, मस्त्योदरी शिक्षण संस्थेचे प्रशासकीय अधिकारी डॉ.बी.आर. गायकवाड प्राचार्य एस.के. बिरादार, कौशल्य विभागाचे सहाय्यक आयुक्त संपत चाटे आदींची प्रमुख उपस्थिती होती.

            आमदार राजेश टोपे म्हणाले की, आजच्या आधुनिकतेच्या काळामध्ये नवनवीन तंत्रज्ञान विकसित होत आहे. तांत्रिक कौशल्य प्रशिक्षित मनुष्यबळाला मोठी मागणी होत आहे.  तरुणांनी विविध क्षेत्रामध्ये मागणी असलेल्या कोर्सची माहिती घेऊन ते आत्मसात करावेत. जालना जिल्ह्यातील विद्यार्थ्यांना कौशल्यावर आधारित शिक्षण घेता यावे यासाठी जालना व अंबड या ठिकाणी तांत्रिक शिक्षण देणाऱ्या महाविद्यालय सुरु करण्यात आले असल्याचे सांगत तरुणांनी जिद्द, चिकाटी व प्रयत्नांची जोड देत कौशल्यावर आधारित कोर्समध्ये प्राविण्य मिळवत नकारात्मकता काढून सकारात्मकवृत्तीने शिक्षण घ्यावे, असेही त्यांनी यावेळी सांगितले.

        जिल्हाधिकारी डॉ. विजय राठोड म्हणाले की, तरुणांमधील सुप्तगुण,कौशल्याला वाव मिळावा यासाठी शासनाने महाराष्ट्र स्टार्टअप यात्रा हा उपक्रम सुरु केला आहे. जिल्ह्यात झालेल्या बुटकँपमध्ये 50 तरुणांनी त्यांच्या नवसंकल्पना सादर केल्या. सर्वसामान्यांच्या समस्या लक्षात ठेऊन नवकल्पनेच्या माध्यमातून ग्राहक डोळयासमोर ठेवत सामान्यांचे जीवन सुकर होण्यासाठी अनेक उत्पादने तयार करता येऊ शकतात.  रोजगार मिळत नाही म्हणून निराश न होता तरुणांनी तांत्रिक शिक्षण घेऊन त्यात प्राविण्य मिळवत रोजगार मागण्यापेक्षा रोजगार देणारे बनावे, अशी अपेक्षा व्यक्त करत विद्यार्थ्यांनी शिक्षणाबरोबरच वाचनाची सवय अंगिकारावी, असेही त्यांनी यावेळी सांगितले.

            यावेळी मॅजिक इनक्युबेशन सेंटरचे रितेश मिश्रा यांनीही विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.

            याप्रसंगी महाराष्ट्र स्टार्टअप व नाविन्यता यात्रेमध्ये प्राविण्य मिळवलेल्या कृषी क्षेत्रात सेल्फ ड्राईव्ह ट्रेलर सादर करणाऱ्या अक्षय चव्हाण, ई-प्रशासन क्षेत्रात क्यूआर कोड बेस्ट ॲटेंडन्स मॅनेजमेंट सिस्टीमसाठी सारंग वाकोडीकर तर कृषी क्षेत्रातील वील स्प्रे पंप प्रोजेक्ट सादर करणारे पवन राजु दळवी यांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

            कार्यक्रमाचे प्रास्ताविक कौशल्य विभागाचे सहाय्यक आयुक्त संपत चाटे यांनी केले तर आभार कौशल्य विकास मार्गदर्शन अधिकारी सुरेश बहुरे यांनी मानले.  

            कार्यक्रमास महाविद्यालयातील विद्यार्थी, विद्यार्थीनींची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.

-*-*-*-*-*-

 

 

जायकवाडी धरणातुन गोदावरी पात्रात पाण्याचा विसर्ग नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा

 


 

    जालना दि. 19 (जिमाका) :- कार्यकारी अभियंता जायकवाडी प्रकल्प पैठण, यांच्या संदेशानुसार आज दि. 19 ऑक्टोबर रोजी प्रकल्पाचा जीवंत पाणीसाठा 100 टक्के आहे व  पाणलोट क्षेत्रात चांगला पाऊस  होत असुन पाणलोट क्षेत्रातील नदी नाल्याद्वारे जायकवाडी धरणात पाण्याची आवक वाढत असल्यामुळे धरणाची पाणी पातळी वाढत आहे. धरणाचे एकुण 18 द्वारे 3.0 फुट उंचीवर उघडून एकुण 56 हजार 592 क्युसेक विसर्ग गोदावरी नदीमध्ये सुरु राहील. पाण्याची आवक पाहुन विसर्ग वाढविणे, कमी करणेबाबत पुढील निर्णय घेण्यात येईल तरी नदी काठच्या गावांतील नागरिकांनी सावध रहावे. उपविभागीय अधिकारी (अंबड,परतुर) व तहसिलदार (अंबड, घनसावंगी, परतुर) यांनी नदीकाठच्या परिसरातील सर्व लोकांना सतर्क राहण्याबाबत तसेच चल मालमत्ता चिजवस्तु,वाहने, जनावरे,पाळीव प्राणी व शेती अवजारे इत्यादी साधन सामग्री सुरक्षित स्थळी हलविण्याबाबत दवंडीद्वारे सुचित करावे व पुरापासुन सावध राहण्यासाठी आपल्या स्तरावरुन ईशारा देण्यात यावा,  असे आवाहन निवासी उपजिल्हाधिकारी तथा मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे केले आहे.

-*-*-*-*-*-*-

खडकपूर्णा प्रकल्पातून पाण्याचा विसर्ग नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा

 


 

    जालना दि. 19 (जिमाका) :-  खडकपुर्णा प्रकल्प  पुर नियंत्रण कक्ष, ता. देऊळगावराजा यांच्या संदेशानुसार आज दि. 19 ऑक्टोबर रोजी प्रकल्पाचा जीवंत पाणीसाठा 100 टक्के आहे व  पाणलोट क्षेत्रात चांगला पाऊस  होत असुन पाणलोट क्षेत्रातील नदी नाल्याद्वारे खडकपुर्णा प्रकल्पात पाण्याची आवक वाढत असल्यामुळे धरणाची पाणी पातळी वाढत आहे. धरणाचे एकुण 13 द्वारे 0.30 मीटरने उघडून एकुण 15 हजार 147.99 क्युसेक विसर्ग नदीमध्ये सुरु राहील. पाण्याची आवक पाहुन विसर्ग वाढविणे, कमी करणेबाबत पुढील निर्णय घेण्यात येईल तरी नदी काठच्या गावांतील नागरिकांनी सावध रहावे. उपविभागीय अधिकारी (परतुर) व तहसिलदार (मंठा) यांनी नदीकाठच्या परिसरातील सर्व लोकांना सतर्क राहण्याबाबत तसेच चल मालमत्ता चिजवस्तु,वाहने, जनावरे,पाळीव प्राणी व शेती अवजारे इत्यादी साधन सामग्री सुरक्षित स्थळी हलविण्याबाबत दवंडीद्वारे सुचित करावे व पुरापासुन सावध राहण्यासाठी आपल्या स्तरावरुन ईशारा देण्यात यावा,  असे आवाहन निवासी उपजिल्हाधिकारी तथा मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे केले आहे.

-*-*-*-*-*-*-

शेतकऱ्यांनी पंतप्रधान पिकविमा योजने अंतर्गत नुकसान भरपाईसाठी काढणी पश्चात नुकसान अंतर्गत पिक नुकसानीची माहिती 72 तासांच्या आत विमा कंपनीस कळविणे बंधनकारक

 


 

जालना दि. 19 (जिमाका) :- जालना जिल्ह्यामध्ये मागील काही  दिवसामध्ये परतीच्या पावसामुळे काही महसूल मंडळामध्ये सतत पाऊस,अतिवृष्टी झाली आहे.त्यामुळे नदी-नाल्यांना पूर येऊन शेतीक्षेत्राचे नुकसान होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.         प्रधानमंत्री पिक विमा योजना खरीप हंगाम 2022 जालना जिल्ह्यामध्ये एचडीएफसी इरगो जनरल इन्शुरंस  कंपनीमार्फत राबविण्यात येत आहे.

सद्यस्थितीमध्ये बाजरी,मका व सोयाबीन या पिकाची कापणी सुरु असून मोठ्या प्रमाणात होत असलेल्या पावसामुळे पिकांचे  नुकसान झाल्याचे निदर्शनास आलेले आहे.त्यानुषंगाने शासन निर्णयातील मार्गदर्शक सूचनानुसार हंगाम कालावधीमध्ये अधिसूचित क्षेत्रामधील अधिसूचित पिकाचे शेतात कापणी करून सुकवणीसाठी पसरवून ठेवलेल्या,कापणी पासून जास्तीत जास्त 2 आठवड्यापर्यंत (14 दिवस) गारपीट,चक्रीवादळ ,चक्रीवादळामुळे पडलेला पाऊस व अवकाळी पावसापासून नुकसान झाल्यास वैयक्तिक स्तरावर पंचनामे करून नुकसान भरपाई निश्चित करणेसाठी शेतकऱ्यांनी विमा दावा मंजूर होणेसाठी झालेल्या पिक नुकसानीची माहिती/पूर्वसूचना कंपनीस देणे आवश्यक आहे.

त्यासाठी पिक विमा धारक शेतकऱ्यांनी गुगल प्ले स्टोअर वरून Crop Insurance हे अप डाऊनलोड करून त्यामध्ये आपल्या नुकसानीची माहिती भरावी किंवा एचडीएफसी इरगो विमा कंपनीच्या १८०० २६६ ०७०० या टोल फ्री क्रमांकावर किंवा विमा कंपनीचे पिहू whatsapp bot(730454888)याद्वारे नुकसानीची पूर्वसूचना द्यावी.जर एखाद्या शेतकऱ्याला वाटत असेल पूर्वी तक्रार दिलेली आहे परंतु पूर्वीपेक्षा जास्त नुकसान वाटत असेल तर त्यांनी पुन्हा एकदा तक्रार वरील पर्यायाद्वारे नोंदवू शकतात.तक्रार नोंदवताना ज्या शेतकऱ्यांनी सुरुवातीला तक्रार नोंदविताना घटनेचा प्रकार हा जास्त पाऊस निवडलेला असेल तर पुन्हा एकदा तक्रार देताना घटनेचा प्रकार inundation(क्षेत्र जलमय होणे)हा प्रकार निवडून पिकाची अवस्था Harvested निवडून व्यवस्थित तक्रार द्यावी.

            तथापि काही तांत्रिक अडचणीमुळे शेतकरी वरील माध्यमद्वारे विमा कंपनीस पूर्वसूचना देऊ न शकल्यास विमा कंपनीचे तालुका प्रतिनिधी किंवा जिल्हा प्रतिनिधी,संबधित तालुका कृषि अधिकारी कार्यालय यांचेकडे प्रत्यक्ष 2 प्रतीत अर्ज देऊन एका प्रतीवर पोहोच घ्यावी, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ.विजय राठोड व जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी भिमराव रणदिवे यांनी केले आहे.

                                        -*-*-*-*-*-*-

नेहरु युवा केंद्राच्या वतीने क्लीन इंडिया कार्यक्रम संपन्न

 



 

        जालना, दि. 19 (जिमाका) :-नेहरु युवा केंद्र जालना, समाजकार्य महाविद्यालय रामनगर जालना व युवा बहुद्देशीय सेवाभावी संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने समाजकार्य महाविद्यालय, रामनगर येथे स्वच्छ भारत 1 ते 31 ऑक्टोबर च्या दरम्यान 19 ऑक्टोबर रोजी विशेष मेगा स्वच्छता मोहीम राबविण्यात आली. तसेच सांस्कृतिक विभाग प्रमुख  डॉ. दीपक बुक्तरे व   सांस्कृतिक विभाग प्रमुख प्रा.डॉ. रेणुका भावसार यांनी स्वच्छतेचे महत्व  विद्यार्थ्यांना सांगून महाविद्यालयाच्या परिसरामध्ये स्वच्छता अभियान राबविण्यात आले. तसेच यावेळी उपस्थित जिल्हा युवा अधिकारी नेहरु युवा केंद्र  प्रणित सांगवीकर, लेख व कार्यक्रम पर्यवेक्षक नेहरु युवा केंद्र, वसंत सुर्वे, सांस्कृतिक विभाग प्रमुख दीपक बुक्तरे, डॉ. रेणुका भावसार, डॉ. नरसिंग पवार, डॉ. बालाजी मुंढे, डॉ. प्रवीण कानकुटे, डॉ. मीना बोर्डे, डॉ. मधु खोब्रागडे, संस्थेचे अध्यक्ष जयपाल राठोड, महेश जाधव, शीतल मगर, अभिषेक तौर, किशोर वैद्य, वैष्णवी खरात इत्यादींची उपस्थिती होती अशी माहिती जिल्हा युवा अधिकारी, नेहरु युवा केंद्र यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे दिली आहे.

 

-*-*-*-*-*-

Tuesday 18 October 2022

19 रोजी महाराष्ट्र स्टार्टअप व नाविन्यता यात्रा जिल्हास्तरीय पारितोषिक वितरण समारंभ

 


 

जालना, दि. 18 (जिमाका):-  नाविन्यपूर्ण संकल्पना आणि नवउद्योजकांना प्रोत्साहन देण्यासाठी महाराष्ट्र स्टार्ट-अप व नाविन्यता यात्रा दुसरा टप्पा जिल्हास्तरीय सादरीकरण सत्रात निवड झालेल्या प्रथम अक्षय विजय चव्हाण, कृषी क्षेत्र-सेल्फ ड्राईव्ह ट्रेलर,  द्वितीय सारंग वाकोडीकर, ई प्रशासन क्षेत्र-QR कोड बेस्ड अटेंडन्स मॅनेजमेंट सिस्टीम आणि तृतीय पवन राजु दळवी, कृषी क्षेत्र -वील स्प्रे पंप या  पहिल्या तीन नवउद्योजकांना  मत्सोदरी शिक्षण संस्थेचे कॉलेज ऑफ इंजिनीअरिंग ॲण्ड टेक्नॉलॉजी, नागेवाडी औरंगाबाद रोड, जालना येथे  दि. 19 ऑक्टोंबर, 2022 रोजी आयोजित रोजगार मेळाव्यामध्ये पारितोषिक वितरण समारंभाचे आयोजन करण्यात आले आहे.

 

महाराष्ट्र स्टार्ट-अप व नाविन्यता यात्रा दुसरा टप्पा जिल्हास्तरीय प्रशिक्षण शिबिर सादरीकरण सत्राचे दि.13 ऑक्टोंबर, 2022 रोजी जे. ई. एस. महाविद्यालय, जालना येथे आयोजन करण्यात आले होते. सादरीकरण सत्रास नोंदणी केलेल्या 59 पैकी 43 नागरिकांनी स्थानिक समस्येसाठी उत्तम उपाय असलेल्या कृषी, शिक्षण, आरोग्य, सस्टेनिबिलिटी (कचरा व्यवस्थापन, पाणी, स्वच्छ उर्जा .), प्रशासन, स्मार्ट पायाभुत सुविधा व गतिशीलता आणि इतर क्षेत्रातील या 07 क्षेत्रातील आपल्या नाविन्यपूर्ण व्यवसाय संकल्पनांचे जिल्हास्तरीय तज्ञ समितीसमोर सादरीकरण केले होते.

 

जिल्हास्तरीय विजेत्यांची घोषणा  व पारितोषिक समारोह

जिल्हास्तरीय सादरीकरण सत्रास नियुक्त तज्ञ परीक्षण समितीच्या परीक्षणाअंती कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता जिल्हा कार्यकारी समितीव्दारे प्रथम श्री.अक्षय विजय चव्हाण, कृषी क्षेत्र-सेल्फ ड्राईव्ह ट्रेलर,  द्वितीय श्री.सारंग वाकोडीकर, ई प्रशासन क्षेत्र  -QR कोड बेस्ड अटेंडन्स मॅनेजमेंट सिस्टीम आणि तृतीय श्री.पवन राजु दळवी, कृषी क्षेत्र -वील स्प्रे पंप या क्षेत्रातील जिल्हास्तरावर पहिल्या तीन उत्कृष्ट व्यवसाय नवसंकल्पनांची निवड करण्यात आली आहे. जिल्हास्तरीय सादरीकरण सत्रात या विजेत्या तीन नवउद्योजकांना मत्सोदरी शिक्षण संस्थेचे कॉलेज ऑफ इंजिनीअरिंग ॲण्ड टेक्नॉलॉजी, नागेवाडी औरंगाबाद रोड, जालना येथे दि. 19 ऑक्टोंबर, 2022 रोजी सकाळी ९ वाजता पारितोषिक वितरण करण्यात येणार आहे.

 

राज्यस्तरीय विजेत्यांची घोषणा  व पारितोषिक समारोह -

प्रत्येक जिल्हयातील सादरीकरण सत्रातील सर्वोत्तम 3 संकल्पनांमधून राज्यस्तरीय निवड तज्ञ समितीसमोर अंतिम विजेत्यांची निवड झालेली असून, श्री. सारंग वाकोडीकर यांच्या ई प्रशासन या क्षेत्रातील QR कोड बेस्ड अटेंडन्स मॅनेजमेंट सिस्टीम व्यवसाय नवसंकल्पनेची राज्यस्तरावर प्रथम विजेते म्हणून निवड झाली असून,  मा. राज्यपाल यांचे हस्ते दि. 16 ऑक्टोबर, 2022 रोजी राजभवन, मुंबई येथे पारितोषिक व प्रमाणपत्र वितरण समारंभ संपन्न झाला आहे. तसेच, सदर विजेत्यांना पेटेंट सहाय्य, इन्क्युबेशन सहाय्य, बीज भांडवल,निधी साठी सहाय्य, नाविन्यता परिसंस्थेतील महत्वाच्या संस्था व तज्ञ व्यक्तींचे मार्गदर्शन, तसेच सॉफ्टवेअर क्रेडीटस, क्लाऊड क्रेडीटस इत्यादी सारखे इतर लाभही पुरविण्यात येणार आहेत. अशी सहायक आयुक्त माहिती कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे कळविले आहे.

-*-*-*-*-*-

19 रोजी जालना येथे पंडीत दीनदयाळ उपाध्याय रोजगार मेळावा 727 रिक्तपदांसाठी भरती

 


जालना, दि. 18 (जिमाका):-  जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, जालना व मत्स्योदरी शिक्षण संस्थेचे कॉलेज ऑफ इंजिनीअरिंग ॲण्ड टेक्नॉलॉजी  यांचे संयुक्त विद्यमाने दि. 19 ऑक्टोबर 2022, बुधवार  रोजी मत्स्योदरी शिक्षण संस्थेचे कॉलेज  इंजिनीअरिंग ॲण्ड टेक्नॉलॉजी  नागेवाडी, जालना  येथे सकाळी 9 ते दुपारी 4 वाजेपर्यंत  पंडित दीनदयाळ उपाध्याय  रोजगार मेळावा आयोजित करण्यात आला आहे. या मेळाव्यात दहावी पास किंवा नापास,बारावी,आय.टी.आय,बी..,बी.कॉम,एम.कॉम,बी.एस सी., डिप्लोमा  इंजिनिअर,बी.ई.,डिप्लोमा  ॲग्री,बी.एस.सी.ॲग्री,एम.एस.सी.ॲग्री,एम.बी.ए,ए.एन.एम,जी.एन.एम,बी.एस.सी.(नर्सिंग) या पात्रताधारक उमेदवारांसाठी 727 रिक्तपदे उपलब्ध असून प्रत्यक्ष मुलाखतीसाठी विविध 24 कंपन्या व आस्थापनांचे  प्रतिनिधी उपस्थित राहणार आहेत. तसेच, कौशल्य विकास व स्वयंरोजगाराबाबत विविध महामंडळांचे स्टॉल्स लावून विविध अर्थसहाय्य योजनांचे  मार्गदर्शन  करण्यात येणार आहे. या मेळाव्याच्या ठिकाणी जाण्यासाठी उमेदवारांना जालना  येथील बस स्टँड, रेल्वे स्टेशन, अंबड चौफुली आणि  विशाल कॉर्नर येथून  इंजिनिअरिंग कॉलेजच्या बसेसची  मोफत सुविधा करण्यात आलेली आहे.

 

            या रोजगार मेळाव्यामध्ये  जालना येथील एन.आर.बी. बेरिंग लि. यांची 60 पदे, लक्ष्मी कॉटस्पिन लि. यांची 60 पदे, दिव्या एस. आर.जे. फुडस यांची 60 पदे, व्हिजन इलेक्ट्रोमॅक यांची 26  पदे, सिल्व्हर्क्स स्ट्रिप्स इंडस्ट्रीस प्रा.ली. यांची 26 पदे, भूमी कॉटेक्स इंडस्ट्री प्रा.लि प्रा.लि.यांची 19 पदे, एल.जी.बालाकृष्णन ॲण्ड ब्रॉस लि. यांची 15 पदे, एप्रोकॉप इंजिनिअरिंग प्रा.लि.  यांची 14  पदे, श्री बालाजी ट्रॅक्टर्स  यांची 12  पदे, ठाकुरजी सॅाल्व्हेक्स प्रा. लि.  यांची 10 पदे, विक्रम टी प्रोसेसर प्रा.लि. यांची 10 पदे, गौरी ॲग्रोटेक प्रोडक्टस प्रा.लि.  यांची 9 पदे, आई इन्शुरन्स ॲण्ड इन्वेस्टमेंट सर्विसेस यांची 50 पदे, जय बालाजी एंटरप्राइजेस यांची 150  पदे, जालना क्रिटिकल केअर हॉस्पिटल, यांची 9  पदे, कृषीधन सिडस प्रा.लि.  यांची 6 पदे, राजलक्ष्मी ॲग्रोटेक इंडिया प्रा.ली. यांची 5 पदे, यश इंट्रप्राईजेस  यांची 6  पदे, वरकड हॉस्पिटल प्रा.लि. यांची 4 पदे, संत कृपा  हॉस्पिटल  यांची 3  पदे, यंशवते शु पॅलेस ॲण्ड स्पोर्टस यांची 10 पदे, मोदी पाईप प्रा.ली.  यांची 2 पदे, आणि औरंगाबाद येथील बडवे इंजीनिअरिंग लि. यांची 120 पदे व  नवभारत फर्टिलाईजर लि, यांची  41 पदे. अशी एकूण 727 रिक्तपदे उपलब्ध आहेत. या मेळाव्यासाठी वरील 24 नामांकित कंपन्यांचे नियुक्ती अधिकारी उपस्थित राहणार असुन पात्र उमेदवारांच्या चाचणी व मुलाखती घेऊन विविध पदांसाठीच्या रिक्त जागांसाठी निवड व भरती करणार आहेत.

 

                      या सुवर्ण संधीचा बेरोजगार उमेदवारांनी जास्तीत जास्त फायदा घ्यावा. तसेच, रोजगार  इच्छुक उमेदवारांनी याचा लाभ घेण्यासाठी किमान पाच प्रतीत रिझ्युम/बायोडाटा  आणि  शैक्षणिक कागदपत्रे आधार कार्ड, सेवायोजन नोंदणी छायाप्रतीसह  सकाळी 9 वाजता उपस्थित राहावे. नोकरी इच्छुक उमेदवारांनी अद्यापपर्यत सेवायोजन नोंदणी केली नसल्यास www.rojgar.mahaswayam.gov.in या संकेतस्थळावर नोकरी साधक म्हणून नोंदणी करावी. तसेच, यापुर्वी महारोजगार वेब पोर्टलवर नोंदणी केली असल्यास वरील सुधारीत संकेतस्थळावर आपला 15 अंकी नोंदणी क्रमांक टाकून लॉगीन करावे आणि मोबाईल आधार क्रमांक पडताळणी करावी. तसेच, या वेबपोर्टलवर लॉग-इन करुन जॉब फेअर टॅबवर  क्लिक करुन पंडित दीनदयाळ उपाध्याय  रोजगार मेळावा जालना 3 (2022-2023)   या मध्ये जाऊन पात्रतेप्रमाणे विविध कंपन्याच्या उपलब्ध रिक्तपदांसाठी ॲप्लाय करावे, यासाठी काही अडचण आल्यास कार्यालयीन दुरध्वनी व व्हॉटस्अप  क्रमांक 02482-299033 वर संपर्क करावा. या मेळाव्यास नोकरी इच्छूक उमेदवारांनी  उपस्थित राहुन  मुलाखती द्याव्यात आणि या रोजगार संधीचा लाभ घ्यावा असे आवाहन सहायक आयुक्त, कौशल्य विकास, रोजगार उद्योजकता, संपत चाटे,  यांनी केले आहे.

-*-*-*-*-*-