Wednesday 19 October 2022

कौशल्यावर आधारित प्रशिक्षण घेऊन नोकरी मागण्यापेक्षा नोकरी देणारे बना रोजगार मेळाव्याचे थाटात उद्धाटन

 







 

        जालना, दि.19 (जिमाका) :- आजच्या आधुनिकतेच्या काळात विशेष कौशल्य आधारित प्रशिक्षित मनुष्यबळाची सर्वच क्षेत्रात मोठी मागणी होत आहे. तरुणांनी कौशल्य आधारित प्रशिक्षण घेऊन नवकल्पनेच्या माध्यमातून नोकरी मागण्यापेक्षा नोकरी देणारे बनावे असा सूर मस्त्योदरी शिक्षण संस्थेचे कॉलेज ऑफ इंजिनिअरींग अँड टेक्नॉलॉली येथे आयोजित पंडित दिनदयाळ उपाध्याय रोजगार मेळाव्याच्या उद्घाटन प्रसंगी निघाला.

            याप्रसंगी आमदार राजेश टोपे, जिल्हाधिकारी डॉ. विजय राठोड, मॅजिक इनक्युबेशन सेंटर, औरंगाबादचे रितेश मिश्रा, मस्त्योदरी शिक्षण संस्थेचे प्रशासकीय अधिकारी डॉ.बी.आर. गायकवाड प्राचार्य एस.के. बिरादार, कौशल्य विभागाचे सहाय्यक आयुक्त संपत चाटे आदींची प्रमुख उपस्थिती होती.

            आमदार राजेश टोपे म्हणाले की, आजच्या आधुनिकतेच्या काळामध्ये नवनवीन तंत्रज्ञान विकसित होत आहे. तांत्रिक कौशल्य प्रशिक्षित मनुष्यबळाला मोठी मागणी होत आहे.  तरुणांनी विविध क्षेत्रामध्ये मागणी असलेल्या कोर्सची माहिती घेऊन ते आत्मसात करावेत. जालना जिल्ह्यातील विद्यार्थ्यांना कौशल्यावर आधारित शिक्षण घेता यावे यासाठी जालना व अंबड या ठिकाणी तांत्रिक शिक्षण देणाऱ्या महाविद्यालय सुरु करण्यात आले असल्याचे सांगत तरुणांनी जिद्द, चिकाटी व प्रयत्नांची जोड देत कौशल्यावर आधारित कोर्समध्ये प्राविण्य मिळवत नकारात्मकता काढून सकारात्मकवृत्तीने शिक्षण घ्यावे, असेही त्यांनी यावेळी सांगितले.

        जिल्हाधिकारी डॉ. विजय राठोड म्हणाले की, तरुणांमधील सुप्तगुण,कौशल्याला वाव मिळावा यासाठी शासनाने महाराष्ट्र स्टार्टअप यात्रा हा उपक्रम सुरु केला आहे. जिल्ह्यात झालेल्या बुटकँपमध्ये 50 तरुणांनी त्यांच्या नवसंकल्पना सादर केल्या. सर्वसामान्यांच्या समस्या लक्षात ठेऊन नवकल्पनेच्या माध्यमातून ग्राहक डोळयासमोर ठेवत सामान्यांचे जीवन सुकर होण्यासाठी अनेक उत्पादने तयार करता येऊ शकतात.  रोजगार मिळत नाही म्हणून निराश न होता तरुणांनी तांत्रिक शिक्षण घेऊन त्यात प्राविण्य मिळवत रोजगार मागण्यापेक्षा रोजगार देणारे बनावे, अशी अपेक्षा व्यक्त करत विद्यार्थ्यांनी शिक्षणाबरोबरच वाचनाची सवय अंगिकारावी, असेही त्यांनी यावेळी सांगितले.

            यावेळी मॅजिक इनक्युबेशन सेंटरचे रितेश मिश्रा यांनीही विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.

            याप्रसंगी महाराष्ट्र स्टार्टअप व नाविन्यता यात्रेमध्ये प्राविण्य मिळवलेल्या कृषी क्षेत्रात सेल्फ ड्राईव्ह ट्रेलर सादर करणाऱ्या अक्षय चव्हाण, ई-प्रशासन क्षेत्रात क्यूआर कोड बेस्ट ॲटेंडन्स मॅनेजमेंट सिस्टीमसाठी सारंग वाकोडीकर तर कृषी क्षेत्रातील वील स्प्रे पंप प्रोजेक्ट सादर करणारे पवन राजु दळवी यांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

            कार्यक्रमाचे प्रास्ताविक कौशल्य विभागाचे सहाय्यक आयुक्त संपत चाटे यांनी केले तर आभार कौशल्य विकास मार्गदर्शन अधिकारी सुरेश बहुरे यांनी मानले.  

            कार्यक्रमास महाविद्यालयातील विद्यार्थी, विद्यार्थीनींची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.

-*-*-*-*-*-

 

 

No comments:

Post a Comment