Wednesday 19 October 2022

शेतकऱ्यांनी पंतप्रधान पिकविमा योजने अंतर्गत नुकसान भरपाईसाठी काढणी पश्चात नुकसान अंतर्गत पिक नुकसानीची माहिती 72 तासांच्या आत विमा कंपनीस कळविणे बंधनकारक

 


 

जालना दि. 19 (जिमाका) :- जालना जिल्ह्यामध्ये मागील काही  दिवसामध्ये परतीच्या पावसामुळे काही महसूल मंडळामध्ये सतत पाऊस,अतिवृष्टी झाली आहे.त्यामुळे नदी-नाल्यांना पूर येऊन शेतीक्षेत्राचे नुकसान होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.         प्रधानमंत्री पिक विमा योजना खरीप हंगाम 2022 जालना जिल्ह्यामध्ये एचडीएफसी इरगो जनरल इन्शुरंस  कंपनीमार्फत राबविण्यात येत आहे.

सद्यस्थितीमध्ये बाजरी,मका व सोयाबीन या पिकाची कापणी सुरु असून मोठ्या प्रमाणात होत असलेल्या पावसामुळे पिकांचे  नुकसान झाल्याचे निदर्शनास आलेले आहे.त्यानुषंगाने शासन निर्णयातील मार्गदर्शक सूचनानुसार हंगाम कालावधीमध्ये अधिसूचित क्षेत्रामधील अधिसूचित पिकाचे शेतात कापणी करून सुकवणीसाठी पसरवून ठेवलेल्या,कापणी पासून जास्तीत जास्त 2 आठवड्यापर्यंत (14 दिवस) गारपीट,चक्रीवादळ ,चक्रीवादळामुळे पडलेला पाऊस व अवकाळी पावसापासून नुकसान झाल्यास वैयक्तिक स्तरावर पंचनामे करून नुकसान भरपाई निश्चित करणेसाठी शेतकऱ्यांनी विमा दावा मंजूर होणेसाठी झालेल्या पिक नुकसानीची माहिती/पूर्वसूचना कंपनीस देणे आवश्यक आहे.

त्यासाठी पिक विमा धारक शेतकऱ्यांनी गुगल प्ले स्टोअर वरून Crop Insurance हे अप डाऊनलोड करून त्यामध्ये आपल्या नुकसानीची माहिती भरावी किंवा एचडीएफसी इरगो विमा कंपनीच्या १८०० २६६ ०७०० या टोल फ्री क्रमांकावर किंवा विमा कंपनीचे पिहू whatsapp bot(730454888)याद्वारे नुकसानीची पूर्वसूचना द्यावी.जर एखाद्या शेतकऱ्याला वाटत असेल पूर्वी तक्रार दिलेली आहे परंतु पूर्वीपेक्षा जास्त नुकसान वाटत असेल तर त्यांनी पुन्हा एकदा तक्रार वरील पर्यायाद्वारे नोंदवू शकतात.तक्रार नोंदवताना ज्या शेतकऱ्यांनी सुरुवातीला तक्रार नोंदविताना घटनेचा प्रकार हा जास्त पाऊस निवडलेला असेल तर पुन्हा एकदा तक्रार देताना घटनेचा प्रकार inundation(क्षेत्र जलमय होणे)हा प्रकार निवडून पिकाची अवस्था Harvested निवडून व्यवस्थित तक्रार द्यावी.

            तथापि काही तांत्रिक अडचणीमुळे शेतकरी वरील माध्यमद्वारे विमा कंपनीस पूर्वसूचना देऊ न शकल्यास विमा कंपनीचे तालुका प्रतिनिधी किंवा जिल्हा प्रतिनिधी,संबधित तालुका कृषि अधिकारी कार्यालय यांचेकडे प्रत्यक्ष 2 प्रतीत अर्ज देऊन एका प्रतीवर पोहोच घ्यावी, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ.विजय राठोड व जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी भिमराव रणदिवे यांनी केले आहे.

                                        -*-*-*-*-*-*-

No comments:

Post a Comment